অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोमलता

सोमलता

(हिं. ऐन, खंटा, सोमलता; म. बुचशुर; सं. सोम, सोमवल्ली, होम; इं. मून प्लँट; लॅ. सार्कोस्टेमा ब्रेव्हिस्टिग्मा; सार्को-स्टेमा ॲसिडम; कुल-ॲस्क्लेपीएडेसी किंवा एफेड्रा जिरार्डिआना; कुल-एफेड्रेसी).

सार्कोस्टेमा ब्रेव्हिस्टिग्मा : हे एक पेरेदार रसाळ व पर्णहीन, वेलीसारखे झुडूप असून ते भारतात पश्चिम बंगाल, महाराष्ट्र (कोकण व दक्षिण महाराष्ट्र) व कर्नाटक या राज्यांत आणि म्यानमार येथे रुक्ष जंगलांत आढळते. त्याच्या कांड्या १०-१२ x ०•३-०•६ सेंमी. असतात. जून-जुलैमध्ये लहान व फिकट हिरवी फुले असलेले फुलोरे शेंड्याजवळ येतात. वलयाकार तोरणाच्या बाहेरील मंडलात दहा व आतील मंडलात पाच भाग असून परागपुंज प्रत्येक परागकोशाच्या खंडात एकचअसतो (एकूण दहा). या वनस्पतीत बर्गेनिन, ब्रेव्हिन, ब्रेव्हिनाइन, सार्कोजेनिन, सार्कोबायोज् आणि फ्लॅव्होनॉइडे ही रासायनिक संयुगे असतात.

सोमलता वेलीच्या फांद्या व थोडे मीठ कुंड्यात टाकून ते पाणी उसाला दिले असता शेतातील वाळवीचा नाश होतो आणि उसावर त्याचा वाईट परिणाम होत नाही. वेलीचा दुधाळ चीक (क्षीर) पूर्वी प्रवासी तहान भागविण्यासाठी घेत असत. भारतीय ऋग्वेद व पारशी ग्रंथ झेंद अवेस्ता यांत ही एक उल्लेखनीय वनस्पती असल्याचे वर्णन आलेले आहे. ती बागेत खडकाळ जागी लावण्यास उपयुक्त असते.

दुधाळ चीक उपदंशविरोधी व कृमिनाशक असतो. तो वातसारक असून श्वसनासंबंधीचे स्राव उद्दिपित करतो, तसेच तो श्लेष्मा वितळविणारा व कफोत्सारक असतो. सर्व प्रकारच्या सर्दीसाठी तो प्रतिरक्षा निर्माण करतो.

एफेड्रा जिरार्डिआना : ही वनस्पती देखील सोमलता म्हणून ओळखली जाते. हे हळूहळू वाढणारे कठीण व झुबकेदार झुडूप (क्षुप) आहे. ते ३०-६० सेंमी. उंच वाढते. त्याला दाट झुबक्यांत मऊ, हिरवी व बारीक पाने जोड फांद्यांवर येतात. फांद्यांच्या जोडावर शल्कपर्णे असतात. बुंध्यापासून निघालेले नर शंखपुष्प अंडाकृती, ६-८ मिमी. व एक किंवा २-३ आणि मादी शंखपुष्प साधारणतः एकच असतो. फुले ४-८ असून त्यांना ५-८ परागकोश व सायुज्यित तंतूंसह पुष्पच्छदे असतात. फुले येण्याचा काळ मे-जून असतो. फळे ७-१० मिमी. अंडाकृती असतात. बियांना लाल रंगाचा रसाळ मगज असतो. शेळ्या व याक हिवाळ्यात यांचे सेवन करतात. ही वनस्पती हिमालयातील खडकाळ भागांत, अफगाणिस्तान ते भूतान येथे सस.पासून २,४००-५,००० मी. उंचीवर आढळते.

ए. जिरार्डिआना या वनस्पतीचा वापर वैदिक काळापासून सोम वनस्पतीला पर्याय म्हणून करण्यात येत आहे. एका विशिष्ट कालावधीनंतर मूळ (खरी) सोमलता वनस्पती सापडणे अशक्य झाले किंवा कदाचित त्या वनस्पतीला एवढे संरक्षित व गुप्त ठेवण्यात आले की, तिची ओळख लुप्त झाली. सोमरस तयार करण्यासाठी नंतर ए. जिरार्डिआनाचा वापर होऊ लागला व तिचे नाव सोमलता असे झाले असावे.

इतिहास

सोम तथा सोमलता ऋग्वेदाच्या काळापासून भारतीयांना ज्ञात आहे. ही वनस्पती दैवी समजली जात असे आणि तिच्यापासून बनविलेला सोमरस देवास नैवेद्य म्हणून, वैद्यकीय दृष्ट्या गुणकारक, आरोग्य संरक्षणकर्ता, तसेच सेवन करणाऱ्यास जागरूक व दक्ष ठेवणारा समजला जाई. सोमरसाचा वापर ऋषींना ऋचा आणि कवने लिहिण्यास उत्तेजित करणारा म्हणून प्रामुख्याने होत असे. दीर्घायुष्यदायी व रोगहरणकर्ता म्हणून देखील सोमरसाचा वापर होत असे. दृष्ट लागणे, काळी विद्या यांसारख्या गोष्टींचाही नाश करण्यासाठी त्याचा वापर होत असे. शास्त्र ग्रंथांत सोमरसाचा उल्लेख पवित्र शुद्ध पेय असा केला आहे व त्याच्या सेवनामुळे पिणाऱ्यात अद्भुत शक्ती निर्माण होते, असे वर्णन आहे.

सोमलता वनस्पतीचे वर्णन ऋग्वेदातील नवव्या मंडलात आढळते. मात्र संस्कृतमधील वर्णनानुसार वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रजातीचे आकलन करणे कठीण होते, परंतु १८७५ मध्ये हॉग यांनी थोडक्यात वर्णन दिले आहे. सोमलता एक विसर्पण (सरपटणारी) करणारी वनस्पती असून ती वेडीवाकडी वाढणारी, अर्धवट क्षुपासारखी व पर्णहीन शुंडिकेसारखी आहे. शुंडिकांमध्ये अम्लधर्मीय दुधासारखा चीक असतो.

आयुर्वेदात प्रसिद्ध असलेल्या दोन संहितांमध्ये (चरकसंहिता व सुश्रुतसंहिता या ग्रंथांत) सोमलताचे वर्णन आलेले आहे. सुश्रुतसंहितेत २४ वेगवेगळ्या सोम वनस्पती, त्यांची नावे, आकार आणि विशिष्ट क्षमता यांचा उल्लेख केलेला आहे. त्यात सर्व सोमलतांना पंधरा पाने असल्याचे म्हटले आहे. सर्व प्रकारच्या सोमलता कंदयुक्त, प्रसर्पीसारखे आकारविज्ञान असणारी व दुधासारखा चीक स्रवणारी असल्याचे म्हटले आहे. या सर्व जातींमध्ये पंधरा पाने तिथीनुसार शुक्लपक्षात पौर्णिमेपर्यंत वाढत जातात, तर तिथीनुसार अनुक्रमे अमावास्येपर्यंत ती गळून जातात. शेवटी अमावास्येला सोमलता पर्णहीन खुंटात बदलते. मात्र वनस्पतिविज्ञानाच्या दृष्टीने अशी वनस्पती अद्याप सापडावयाची आहे.

या व्यतिरिक्त सुश्रुतसंहितेत १८ अतिरिक्त वनस्पतींचा उल्लेख केलेला आहे. त्यांची गुणकारिता सोम वनस्पतीसारखी आहे. सविस्तर भौगोलिक वनस्पतिविज्ञानाची कमतरता गुरू-शिष्य परंपरेमुळे निर्माण झालेली आहे. वनस्पती कुठे मिळते व ती कशी ओळखली जाते याचे ज्ञान मर्यादित तज्ञ लोकांपुरतेच सीमित होते. वैदिक वर्णनानुसार सोमलता पहाडांमध्ये उगवते. त्यावरून ती मरुवनस्पती (झेरोफायटिक) असल्याचे दर्शविते. सुश्रुतसंहितेनुसार तिच्या प्रजाती हिमालय, अर्बुद, साह्य, महेंद्र, भालुय, श्री पर्वत, देवगिरी, देवसाहा, परियात्रा आणि विंध्य पर्वत आदी भागांत सापडतात असे सांगितले आहे. काही विशिष्ट प्रजाती देवसुंद सरोवर,सिंधू नदी आणि काश्मीरमधील मानसरोवराच्या भागांतच आढळतात. यावरून असे लक्षात येते की, सोमलता मरुवनस्पती किंवा जलवनस्पती (हायड्रोफायटिक) असावी

सद्यस्थितीत पुढील वीस वनस्पती सोमलता म्हणून ओळखल्या जातात : ॲमानिटा मस्कॅरिया, ॲस्क्लेपिआस ॲसिडा, बॅसेला कॉर्डिफोलिया, कॅनाबिस सॅटिव्हा, सेरोपेजिया डेकिस्नेॲना, से. एलेगन्स, इल्युसाइन कोरॅकोना, एफेड्रा प्रजाती, इकिनोकार्पस फ्रुटेन्सेस, पेरिप्लोका अफायला, रुटा ग्रॅव्हिओलेन्स, सॅकॅरम प्रजाती, सार्कोस्टेमा ॲसिडम, सा. ब्रेव्हिस्टिग्मा, सा. ब्रुनोनिॲनम, सा. इन्टरमेडियम, सा. व्हिमिनेल, सोर्घम प्रजाती, व्हायटिस व्हिनिफेरा आणि ह्युम्युलस ल्युप्युलस.

सदर यादी वैदिक दृष्टिकोनानुसार विविध अभ्यासकांनी निश्चित केलेली आहे, तरीही खऱ्या सोमलताची ओळख पटलेली नाही. जुन्या मतानुसार सार्कोस्टेमा ही सपुष्प वनस्पती वर्गातील, तर नवीन मतानुसार एफेड्रा ही प्रकटबिजी वर्गातील असून त्यांना सोमलता म्हटले जाते. मात्र एफेड्रा ही मूळ भारतातील प्रजाती नाही. ॲमानिटा मस्कॅरिया या अळंबीला तिच्या उत्तेजित आणि भास निर्माण करणाऱ्या क्षमतांमुळे सोम वनस्पती असण्याबाबत सर्वानुमत वाढते आहे. मात्र वैदिक काळात माणसांच्या आरोग्याला हानीकारक म्हणून अळंबी आहार (अन्न) खाण्यास प्रतिबंध असा नोंदविला आहे.

आयुर्वेद

सुश्रुतसंहितेनुसार जी व्यक्ती सोम वनस्पतीपासून बनविलेल्या रसाचे प्राशन करते त्याला नवीन तरुण शरीर प्राप्त होते. त्याला अग्नी, जल, विष किंवा आयुधाद्वारे हानी पोहोचत नाही. कुठल्याही अवघड अडचणीच्या जागेवर तो चालू शकतो आणि कंदर्पचे सौंदर्य व पौर्णिमेच्या चंद्रासारखी चमक त्याला प्राप्त होते. सर्व वेद त्यांच्या शाखांसह त्या व्यक्तीस मुखोद्गत होतात. सोम पिणाऱ्या व्यक्तीस आयुष्यात कधीही अपयश येत नाही व तो सर्वत्र दैवी आत्म्यासह हिंडतो. तो सर्व जीवमात्रांच्या मनाला शांती देतो. अशा अर्थाचे उल्लेख त्यात आहेत.

आजार बरे करण्यासाठी सोमरस पिण्याची पद्धती सुश्रुतसंहितेत सविस्तर विशद केलेली आहे.

लेखक - नितिन भरत वाघ, कमला श्री. हर्डीकर

संदर्भ : 1. Encyclopedia of Medicinal Plants, 1988.

2. Karayil, Sudha; Mallikarjun, Rao Y.; Veeraiah, K.; Sambshiva Rao; K. R. S. “ Somlata–A Pioneer Herb in the Entire Plant Kingdom–Etha--nopharmacological Perspective Through Vedic Literature ”, International Journal of Research in Pharmaceutical and Biomedical Sciences, Vol. 2 (3), Jul. – Sep., 2011.

3. Kirtikar, Basu Indian Medicinal Plants, 1918. 4. Padhy, Sachidanand; Dash, Santosh Kumar, “ The Soma Drinker of Ancient India : An Ethno – Botanical Retrospection”, Journal of Human Ecology, 15 (1) : 19-26, 2004.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate