भारतात पक्ष्यांची इतकी प्रंचड विविधता असूनही त्यांचा ख-या अर्थाने शास्त्रशुद्ध अभ्यास झाला नव्हता. डॉ. सलीम अली यांनी आपल्या चिकाटीने आणि मेहनतीने हे काम उंचीवर नेऊन ठेवले इतके की, भारतीय पक्षी शास्त्रज्ञ म्हणजे सलीम अली ( बर्डमॅन ऑफ इंडिया) असे समीकरण बनले आहे. डॉ. सलीम अली यांनीच ख-या अर्थाने भारतात पक्षी अभ्यासाचा पाया घातला भारतभर फिरून त्यांनी विविध पक्ष्यांचे निरीक्षण केले.

अधिक माहिती

१२ नोव्हेंबर १८९६ हा डॉक्टरांचा जन्म दिवस. लहानपणापासून त्यांना पक्षी निरीक्षणाची गोडी लागली. लहान सलीमला, त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर मामांनी सांभाळले. निव्वळ योगायोगाने ते बॉम्बे नँचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये गेले आणि तेव्हापासून या संस्थेशी त्यांचे नाव जोडले गेले. कालांतराने ते तिचे अध्यक्ष झाले.

जर्मनीहून पक्षीशास्राचे (आँर्निथॉलॉजी) शिक्षण घेऊन आलेल्या सलीमला तत्काळ काही काम मिळेना. कारण, त्यावेळी भारतातील पक्ष्यांचा अभ्यास, संग्राहालायातल्या पेंढा भरलेल्या नमुन्यांपुरताच होता; असे म्हणता येईल! संस्थेकडून फक्त राहण्यापुरते आणि प्रवासापुरते पैसे घेऊन डॉक्टरांनी भारताचा कानाकोपरा पायाखालून घातला व पक्ष्यांबाबतच्या नोंदी विविध प्रकारच्या नोंदी घेतल्या. यापूर्वी असे काम यापूर्वी येथे कोणीही केलेले नव्हते. डॉक्टरांनी शास्रीय दृष्टीने स्थानिक पक्ष्यांचा अभ्यास सुरु केला.

सुगरण पक्ष्यावरील ‘हँडबुक ऑफ द बर्डस ऑफ इंडिया अॅण्ड पाकिस्तान’ ( १० खंड) आणि ‘द बुक ऑफ इंडियन बर्डस’ ही त्यांची पुस्तके विशेष गाजली. डॉक्टरांचा अभ्यास फक्त पक्ष्यांच्या दिसण्यापुरता मर्यादित नव्हता तर त्यांच्या सवयी, जीवनशैली, अधिवास, स्थलांतर अशा अनेक बाबींचा त्यात समावेश असे. यामुळेच, संदर्भ-ग्रंथ म्हणून, ही पुस्तके अजूनही वापरली जातात. सरकारने डॉक्टरांना पद्मविभूषण देऊन गौरवले (१९८३), २० जुन १९८७ रोजी, ९० व्या वर्षी, डॉ. अलींचे निधन झाले. ‘फॉल ऑफ अ स्पँरो' हे त्यांचे पुस्तक त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित आहे.

माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६