অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकच लक्ष्य 50 कोटी वृक्ष!

एकच लक्ष्य 50 कोटी वृक्ष!

वने ही पर्यावरण संतुलनासाठी आणि माणसाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वाची आहेत. शुद्ध हवेपासून ते वन उपजांपर्यंत विविधांगांनी ती माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी जोडली गेली आहेत. त्या‍मुळे वनांची निर्मिती, वनसंरक्षण आणि संवर्धनाला अनन्यसाधारण महत्व आहे.

वन धोरणानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के भौगोलिक क्षेत्र वन वृक्षाच्छादित असणे गरजेचे असताना राज्यात हे प्रमाण साधारण 20 टक्के आहे. भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वातील कलम 48 ‘अ’नुसार नैसर्गिक संसाधनाच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी राज्यावर सोपविण्यात आली आहे. या कार्यात नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी आणि वनाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन मोहिम हाती घेतली आहे.

शासनाने आयोजित केलेल्या मोहिमेत पहिल्या वर्षी 2 कोटी 81 लाख आणि दुसऱ्या वर्षी 5 कोटी पेक्षा जास्त रोपे लावण्यात आली. पुढच्या वर्षी 13 कोटी आणि 2019 पर्यंत एकूण 50 कोटी वृक्ष लावण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. केवळ वृक्षारोपण न करता वृक्ष संवर्धनाच्या प्रयत्नांकडे देखील विशेष लक्ष देण्यात येत असून या सर्व कार्यात शालेय विद्यार्थ्यांपासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत सर्व घटकांना सहभागी करून घेतल्याने वृक्षारोपणाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

वने ही प्रामुख्याने जमीन, वनस्पती, झाडे, प्राणी, सुक्ष्म जीवजंतू यांनी बनलेली असतात. वनातील हे घटक एकमेकांना पूरक स्वरुपाचे काम करतात. त्यामुळे सजीवसृष्टीचा समतोल राखण्यास मदत होते. यापैकी कुठल्याही एका घटकात बदल झाला तर पर्यावरणाची साखळी विस्कळीत होते. या पर्यावरण साखळीचे जतन करण्यासाठी दरवर्षी 1 जुलै रोजी शासनातर्फे वृक्षारोपणाचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात पहिल्या वर्षी 27 लाख आणि 26 लाखाचे उद्दीष्ट असताना यावर्षी 43 लाखापेक्षा जास्त रोपे लावण्यात आली आहेत. राज्यात चंद्रपूर आणि नाशिक या दोन जिल्ह्यात सर्वाधिक वृक्षारोपण झाले आहे.

वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘ग्रीन आर्मी’ (महाराष्ट्र हरीत सेना) साठी www.greenarmy.mahaforest.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जनसंवादाद्वारे वन्यजीव आणि वनांच्या रक्षणासाठी 1926 या क्रमांकावर ‘हॅलो फॉरेस्ट’ सेवा उपलब्ध आहे.

वनविभागाने 448 पुस्तिकांच्या माध्यमातून वनाचे महत्व जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून वनसंवर्धन आणि संरक्षण करण्यात येत आहे. शासनाच्या या प्रयत्नात नागरिक आणि सेवाभावी संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत आहेत.

वन विभागाच्या खुल्या जागेवर किंवा मोकळ्या डोंगरांवर वृक्षारोपण करण्यासाठी पाच वर्षासाठी ही जागा स्वयंसेवी संस्थांना दत्तक देण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे. शासकीय कार्यालयांच्या परिसरात, ग्रामीण भागातील मोकळ्या जागेवर, सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपणासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

यावर्षी वन विभागातर्फे साडेचार लाख आणि इतर यंत्रणातर्फे सुमारे 12 लाख व्यक्तिंनी वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला. वृक्ष संवर्धनाचे महत्व नागरिकांना समजले असून या कार्यात लोकसहभाग वाढल्याने या चळवळीला गती मिळाली आहे. शासनानेदेखील डिजीटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून वृक्ष संवर्धनावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

महाराष्ट्र राज्यात वनाचे आच्छादन वाढविण्यासाठी राज्यात 50 कोटी वृक्षलागवड करण्याचे महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने नियोजन केले आहे. सन 2018 च्या पावसाळ्यात 13 कोटी व सन 2019 च्या पावसाळ्यात 30 कोटी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण 50 कोटीपैकी 28 कोटी 50 लक्ष वन विभागामार्फत, 12 कोटी ग्रामपंचायतमार्फत व 9 कोटी 50 लक्ष इतर शासकीय यंत्रणेमार्फत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

'फॉरेस्ट' या शब्दातच फुड, ऑक्सिजन, रेन, एनर्जी, सॉईल आणि टिक असे जीवनाशी संबधीत सर्व घटक समाविष्ट असल्याने पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर वनाचे महत्व ओळखण्याची गरज आहे. शासनाने जरी आपली जबाबदारी समजून हा उपक्रम सुरू केला असला तरी शाश्वत विकासासाठी पर्यावरण आणि चांगल्या पर्यावरणासाठी वृक्षाचे महत्व समजून नागरिकांचा सहभाग वाढणे आणि त्यात सातत्य असणे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे ‘आता एकच लक्ष्य, 50 कोटी वृक्ष’ असा संकल्प करून या वसुंधरेचे सौंदर्य जपुया आणि आपल्या उज्वल भवितव्याची मजबूत पायाभरणी करू या!

लेखक -डॉ.किरण मोघे

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 5/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate