অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अनुसूचित जाती व जमाती - ४

विवाहाचे आणि कुटुंबाचे प्रकार

त्यांच्यात विवाहसंबंध होत नाहीत. वयोमानानुसार पडणाऱ्या गटांच्या बाबतीत युवकयुवतींच्या गटांचा उल्लेख करावा लागेल. काही जमातींमध्ये अविवाहित तरुणतरुणींच्या वेगवेगळ्या अगर संयुक्त गटांना सामाजिक संस्थेचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. ठराविक वयानंतर अशा जमातींत युवक आणि युवती एका स्वतंत्र घरातच रात्री वास्तव्याला जातात. अशा वसतिगृहांना कोन्याक नागांमध्ये मोरुंग किंवा यो; गोंड जमातीत घोटुल; मुंडा आणि हो जमातींत गिटियोरा; ओराओं जमातीत धुमकुरिया आणि भुईया जमातीत धंगरबस्सा अशी नावे आहेत.

विवाहाचे आणि कुटुंबाचेही अनेक प्रकार आदिवासी जमातींत आढळून येतात. वयात आलेले तरुण आणि तरुणी एकमेकांच्या संमतीने विवाहबद्ध होतात. हा सर्वसामान्य प्रकार झाला. शिवाय आपल्याला पसंत असलेल्या मुलीला पळवून नेऊन विवाह करणे, तसेच एखाद्या मुलीला एखादा मुलगा पसंत पडला तर तिने त्याच्या घरात जाऊन बसणे आणि लग्नाला संमती मिळाल्याशिवाय बाहेर न जाणे (अशा मुलीला महाराष्ट्रात ‘घरघुशी’ म्हणतात) इ. प्रकारची आढळून येतात. भारतीय आदिवासींमध्ये पितृप्रधान-पितृवंशीय आणि मातृप्रधान-मांतृवंशीय हे दोन्ही प्रकार कुटुंबाच्या बाबातीत रूढ आहेत. तसेच बहुपत्नीकत्व आणि बहुपतिकत्व हेही दिसून येतात. बहुपतिकत्वामध्ये भ्रातृक-बहुपतिकत्व म्हणजे भावाभावांमध्ये सामायिक पत्नी असणे आणि अभ्रातृक-बहुपतिकत्व म्हणजे पत्नी सामायिक परंतु पती वेगवेगळ्या कुटुंबांतील असणे, असे दोन प्रकार आहेत. भ्रातृक-बहुपतिकत्व हे पितृप्राधान कुटुंबांतच शक्य आहे आणि ही पद्धत उत्तरेत खस आणि दक्षिणेत तोडा जमातींत दिसून येते. ईशान्येत खासी, गोरा आणि नागा लोकांच्या काही शाखांतून मातृप्रधान कुटुंबपद्धती आहे. परंतु बहुपतिकत्व नाही. केरळमधील नायर ह्या बिगर आदिवासी जमातीत मातृप्रधान कुटुंबपद्धतीबरोबर अभ्रातृक- बहुपतिकत्व रूढ होते.

लैंगिक नीती आणि विवाहनीती या बाबतींत आदिवासींची काही मूल्ये आणि पद्धती अगदी स्वतंत्र आहेत. आर्थिक स्वातंत्र्य अगर स्वालंबन, विवाह जमविण्याचे आणि मोडण्याचे स्वातंत्र्य, वैयक्तिक मालमत्तेचे स्वातंत्र्य, विवाहपूर्व लैंगिक स्वातंत्र्य व सामाजिक जीवनातील दैनंदिन व्यवहारामध्ये मुक्त संचार ही आदिवासी समाजातील स्त्रीच्या स्थानाची वैशिष्टये जवळजवळ सर्वच आदिवासींमध्ये दिसून येतात.

आदिवासींची परिस्थिती आणि त्यांच्या समस्या

आदिवासींच्या समस्या ह्या त्यांच्या सध्याच्या परिस्थितीशी निगडीत आहेत. ह्या समस्या त्यांच्या स्वायत्त जीवनाच्या आणि भारतीय जीवनात त्यांना अधिकाधिक समरस करून घेण्याच्या अशा दोन्ही मनोभूमिकांतून उद्भवलेल्या आहेत.

भारतीय आदिवासी हे भारतीय बिगर आदिवासींच्या संपर्कापासून नेहमी अलिप्तच राहिले होते, असे नव्हे. ऐतिहासिक आणि इतिहासपूर्व काळात इतरांशी त्यांचा संबंध आल्याचे दाखले सापडतात. तसेच ते नेहमी दुसऱ्यांच्या प्रभुत्वाखालीच वावरत होते, असेही नव्हे. काही आदिवासी राजांनी इतरांवर राज्य केल्याचे दाखलेही आहेत. नागा, खासी यांसारख्या जमातींनी आपल्या मुलुखांत बाहेरच्या लोकांना प्रवेश करण्यास नेहमीच विरोध केला आहे.

गोंड जमातीपैकी राजगोंड हे राजे होते. छिंदवाडा, मांडला, चंद्रपूर, अदिलाबाद आणि वरंगळ या जिल्ह्यांत पसरलेल्या त्यांच्या राज्याला गोंडवन असे नाव होते. छिंदवाड्याचे देवगड घराणे आणि वरंगळचे खेरला घराणे प्रसिद्ध होते. पुढे मराठयांच्या आधिपत्याखाली त्यांची सत्ता नाहीशी झाली. गोंड राजांनी बागयतीकरिता बांधलेले अनेक भक्कम तलाव आजही दिसून येतात.

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश या चारही राज्यांत पसरलेले भिल्ल हे पुराणकाळापासून ज्ञात आहेत. महाभारतातील एकलव्य हा भिल्लच होता, अशी समजूत आहे. इतिहासकाळात भिल्लांनी राज-

पुतान्याच्या अनेक सैनिकी चकमकींत भाग घेतला होता. सैन्यात, पोलीस खात्यात आणि गावचौकीदार म्हणून त्यांनी कामे केली आहेत.

भारताच्या ईशान्य भागात राहणारे नागा लोक पुराणांत आढळणाऱ्या किरातांचे वंशज होत, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश आणि ओरिसा या राज्यांत दिसून येणारे अनुक्रमे सावरा व साओरा हे ऐतरेय ब्राह्मण, रामायण आणि महाभारतात उल्लेखिलेले शबरच होत, अशीही समजूत आहे. एका ताम्रपटात शबरादित्य नावाच्या राजाचाही उल्लेख सापडतो. नावावरून तो आजच्या सावरांचाच पूर्वज असावा असे वाटते.

महाराष्ट्राच्या पश्चिम जिल्ह्यांच्या डोंगराळ भागात राहणारे महादेव कोळी हेही राजे होते. सध्याच्या ठाणे जिल्ह्यात विलिन झालेल्या जव्हार संस्थानचे राजे महादेव कोळीच होते. मराठ्यांच्या राजवटीत अनेकांनी सैनिकी पेशा पतकरला होता आणि काही सैन्यदळाचे प्रमुखही होते.

हिमाचल प्रदेशातील किन्नर हेही पुराणकाळापासून ज्ञात आहेत. हिंदू देवदेवतांना आपल्या नृत्य-संगीताने सुखविणारे किन्नर सर्वश्रुत आहेत.

ब्रिटिशपूर्व काळात भारतात मुलुख लुटण्याकरिता अगर जिंकून इथेच स्थायिक होण्याकरिता बाहेरून अनेक टोळ्या आल्या. द्रविड आणि आर्य असेच बाहेरून येऊन येथे स्थायिक झाले. बाहेरील टोळ्यांपुढे टिकू न शकलेल्या आणि त्यांच्या आधीच येथे स्थायिक झालेल्या लोकांनी त्यांचे राजकीय दास्यत्व पतकरले आणि कालांतराने त्यांची संस्कृतीही स्वीकारली. हे कमीअधिक प्रमाणात मैदानी प्रदेशांत राहणाऱ्या लोकांच्या बाबतीतच घडले. परंतु दुर्गम जंगलांत पळून गेलेल्या किंवा तेथे आधीपासूनच रहात असलेल्या लोकांची राजकीय स्वायत्तता आणि संस्कृती थोड्याफार प्रमाणात अबाधित राहिली. हेच लोक आजचे आदिवासी होत. मैदानी भागांत राहणारे लोक हिंदूंच्या समाजव्यवस्थेत वेगवेगळ्या जातींत समाविष्ट झाले किंवा त्यांच्या नव्या जाती बनल्या. तसेच अरण्यवासी लोकांचे राजे-प्रमुख यांनीही काही ठिकाणी हिंदूंच्या जातिव्यवस्थेत क्षत्रियांचे स्थान पटकावले, परंतु दूर जंगलात राहणारी त्यांचीच प्रजा मात्र या बाबतीत अलिप्त आणि अगम्य अशी राहिली. यामुळे ब्रिटिश काळापर्यंत त्यांची सांस्कृतिक वैशिष्टये तशीच टिकून राहिली. ब्रिटिश काळापासून या लोकांचा पद्धतशीर अभ्यास सुरू झाला आणि तेव्हापासूनच त्यांच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे.

ब्रिटिश शासनाचे धोरण आणि त्याची अंमलबजावणी व आदिवासी प्रदेशांत आणि त्यांच्या परिसरांत चालू झालेला औद्योगिक आणि इतर आर्थिक विकास यांवर ब्रिटिश काळातील आदिवासींची आर्थिक परिस्थिती अवलंबून होती.

आदिवासी-अर्थव्यवस्थेत जमीन आणि जंगल यांना अधिक महत्त्व असते; किंबहुना त्याशिवाय त्यांचे जीवनच असाध्य आणि असह्य होते. परंतु जमीन आणि जंगल यांच्या उपयोगाच्या पद्धतीत मात्र सर्व आदिवासी सारखे नाहीत. बहुसंख्य आदिवासींचे उपजीविकेचे साधन शेती हेच आहे. परंतु स्थालांतर-शेतीची जुनी पद्धत आजही काही जमातींमध्ये शिल्लक आहे. दर दोनतीन वर्षांनी जंगलांतील नव्या नव्या जमिनीचे तुकडे याकरिता निवडले जात असल्यामुळे या पद्धतीने जंगल क्रमशः नष्ट होत जाते आणि जमीनही कालांतराने निकृष्ट बनत जाते. ही पद्धत आंध्र प्रदेश, आसाम, ओरिसा, बिहार, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील काही जमातींमध्ये प्रचलित आहे. या पद्धतीला आसामामध्ये झूम, ओरिसामध्ये पोडू, मध्यप्रदेश बेवार आणि महाराष्ट्रात राब अशी नावे आहेत. भारतातील एकूण आदिवासींपैकी अदमासे १० टक्के लोक स्थलांतर-शेतीच अजून करतात.

दक्षिणेतील तोडासारख्या काही जमाती मेंढपाळाचा किंवा गवळ्याचा व्यवसाय परंपरेने करतात. दक्षिणेतीलच कादरसारख्या अन्य काही जमातींची उपजीविका जंगलांत आयत्याच मिळणाऱ्या खाद्यापदार्थांवर अवलंबून आहे. शिकार हेसुद्धा काही जमातींचे उपजीविकेचे साधन आहे.

संदर्भ : 1. Ghurye, G. S. The scheduled Tribes, Bombay, 1959.

2. Government of India, Adivasis, Delhi, 1960.

3. Government of India, Report of Commissioner for Scheduled Castes and Scheduled Tribes, for the Year 1964-65, Delhi, 1967.

4. Government of India,Report of Scheduled Areas and Scheduled Tribes Commission 1960-1961, Vols. I, II, Delhi, 1961.

5. Government of India, Social Welfare in India, Delhi, 1960.

6. Government of India, Welfare of the Backward Classes, Delhi, 1963.

7. Mujumdar, D. N.Races and Cultures of India, Bombay, 1961

8. Mujumdar, D. N.; Madan, T. N. An Introduction to Social Anthropology, Bombay, 1956.

9. Thakkar, A. V. The Problem of Aborigines in India, Poona, 1941.

लेखक: शरच्चंद्र गोखले ; मा. गु. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/21/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate