অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना

बीजभांडवल योजना

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत अनुसूचित जमातीच्या लोकांना उदयोग व्यवसाय करण्यासाठी कर्जरूपात बीजभांडवल देण्यात येते. तसेच महिलांच्या सबलीकरणासाठी आर्थिक मदत कर्जरूपात दिली जाते. या योजना तीन प्रकारे राबविण्यात येतात.

१) राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली (एन.एस.टी.एफ.डी.सी.) पुरस्कृत मुदत कर्ज योजना.

२) एन.एस.टी.एफ.डी.सी. पुरस्कृत महिला सशक्तीकरण योजना.

३) राष्ट्रीय बँक सहकार्य कर्ज योजना.

या तीन योजनांव्यतिरिक्त शबरी महामंडळाच्या स्वनिधीतून रुपये २५,०००/- रकमेपर्यंत कर्ज योजना राबविली जाते.

प्रशिक्षण योजना

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत आदिवासी लाभार्थींना वेगवेगळ्या व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. मात्र तो व्यवसाय सुव्यवस्थित चालविण्यासाठी संबंधित व्यवसायाच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असते. सुशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुणांना शबरी महामंडळामार्फत १५ ऑगस्ट २००६ पासून कौशल्य व उद्योजकता विकास प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. सदरचे प्रशिक्षण शासन मान्यताप्राप्त संस्थेमार्फत दिले जाते. सदरचे प्रशिक्षण हे व्यवसायाचे स्वरूप पाहून १० ते २० दिवस कालावधीचे असते. सदर प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थींची निवास, भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात येते. सदर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यास त्याचा रोजगार सुरु करण्याकरिता व्यवसायासाठी आवश्यक असे टूलकिट साहित्य माफक व्याजदराने कर्ज स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येते.

एकंदरीत, शबरी वित्त व विकास महामंडळाच्या निर्मितीमागे आदिवासींना आर्थिक स्वावलंबी करण्याचा उददेश आहे. यानुसार महामंडळाकडून कर्ज व वित्त पुरवठ्याचे काम केले जाते आहे. राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महामंडळाच्या योजनेचा लाभ मिळाला आहे. तसेच आदिवासी तरुणांना अर्थार्जनासाठी विशिष्ट उदयोग व व्यवसायाची उभारणी करता येवू लागली आहे. असे काही महत्वपूर्ण निष्कर्ष प्रा. अंकुश सुर्यवंशी यांनी आपल्या संशोधनाच्या अंती काढले आहेत. प्रा. अंकुश सुर्यवंशी यांनी पुणे जिल्ह्यातील शबरी वित्त व विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांचा अभ्यास केला आहे.

शबरी महामंडळाकडून आदिवासींना दिलेल्या जास्तीतजास्त कर्ज योजना ह्या प्रामुख्याने पारंपारिक स्वरूपाच्या आहेत. उदा. दुग्ध व्यवसाय, शेळीपालन वगैरे. आदिवासी तरुणांना आधुनिक उदयोग व व्यवसाय उभे करण्यासाठी तसे प्रशिक्षणाचे शिबीर राबविणे आवश्यक आहे. महामंडळाच्या कर्ज योजनेतून दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करावी जेणेकरून आदिवासी तरुणांना आधुनिक उदयोग व व्यवसायाची उभारणी करणे शक्य होईल.

तात्पर्य, सर्वसामान्य आदिवासी व्यक्तीला शबरी महामंडळाकडून उदयोग व व्यवसायासाठी वित्त पुरवठ्याचे लाभ दिले जात आहे. या महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आदिवासी व्यक्तीला शाखा संपर्क करून व साधा अर्जभरून लाभ घेता येऊ शकतो.

 

संदर्भ : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ

नॅशनल सेंटर फॉर अॅडव्होकसी स्टडीज, पुणे.

अंतिम सुधारित : 8/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate