অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पावसाळा ऋतूत घ्यावायची काळजी

पावसाळा ऋतूत घ्यावायची काळजी

पावसाळा जरा शेतीच्या हंगामाचा तसाच आरोग्यासाठी सावधानतेचाही काळ असतो. आपल्या शरीराच्या रचनेत पाण्याला प्रमुख स्थान आहे आणि साधारणपणाने होणाऱ्या आजारांपैकी 70 टक्के आजार हे पाण्यापासून होणारे असतात. पडणाऱ्या पावसाच्या पाण्यासोबत आजार वाढण्याची शक्यता त्यामुळेच अधिक असते. यासाठी आला पावसाळा आरोग्य सांभाळा असे सांगितले जाते.

पावसाळा हा आपणा सर्वांना हवा हवा असाच ऋतू आहे. मात्र याच्या आरंभीच्या काळात साधारणपणाने उन्हाळ्याने तापलेल्या जमिनीला पुरेसे पाणी मिळेपर्यंत जमीन ओलावा धरत नाही. साधारण पहिल्या चार आठवड्यात ही स्थिती असते. या काळात उष्मा मोठ्या प्रमाणात वातावरणात असतो आणि आलेल्या ढगांमुळे त्यात आर्द्रतेची भर पडते. हा काळ असह्य उष्म्याचा असतो. वाढलेला आर्द्रतेच्या परिणामी श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर त्रास होताना आपणास दिसतो. याच काळात एक प्रकारे आजारांची आपत्ती देखील सुरु होते असे म्हणावे लागते.

नदी नाले यात पावसाचे पाणी वहायला लागण्याच्या काळात पेयजल साठ्यांमध्येही पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणाऱ्या काडी-कचऱ्यामुळे साठे अशुद्ध होवून जातात. हे पाण्याचे अशुद्ध झालेले साठे नंतर आजाराला निमंत्रण देणारे ठरतात. यातून अतिसारासारख्या संसर्गजन्य आराजाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका असतो.

किटकजन्य आजार

पावसाचा जोर चांगला असेल तर असा पाऊस निसर्गाच्या सफाईचे काम करतो. मात्र थांबून पडणाऱ्या पावसातून डासांची उत्पत्ती होवून त्याद्वारे आजारांचा उपद्रव सुरु होतो. डासांचा हा उपद्रव पूर्ण वर्षभर असला तरी पावसाळ्यात त्यात कित्येक पटींनी वाढ झालेली आपणास दिसून येते. सर्वसाधारणपणे सर्वांना परिचित असणाऱ्या हिवताप अर्थात मलेरियासोबतच चिकनगुणिया आणि डेंग्यूसारखे आजार पसरविण्याचे काम डासांमार्फत होते. पावसाळा हा त्यामुळेच आपणा सर्वांसाठी अती काळजीचा काळ ठरतो. या असुरक्षित अशा काळात सर्वांना अधिक खबरदारी बाळगावी लागते.

डासांचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी मच्छरदाणीचा वापर हा सर्वोत्तम असा उपाय ठरतो. याखेरीज दारे-खिडक्या यांना जाळ्या असून देखील आपण डासांना अटकाव करु शकतो. घराच्या आसपासच्या परिसरात कोठेही पाणी साठे निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेणे तसेच डासांना पिटाळून लावणारी अगरबत्ती वा तत्सम साधनांचा वापर आपणास आजारांपासून दूर ठेवू शकतो. सार्वजनिक स्रोतांवरुन पेयजल वापरले जात असेल तर पाण्यात शुद्धीकरणासाठी क्लोरिनयुक्त गोळ्यांचा वापर तसेच पाणी गाळून आणि उकळून पिणे आदी उपाय आपण आपणास आजारापासून दूर ठेवू शकतात.

पावसात भिजल्यास सर्दीपासून थेट न्यूमोनियापर्यंतचे विकार होण्याचा धोका या काळात असतो. त्यामुळे पावसाचा आनंद घेताना त्यातून आजार होणार नाही, याचीही खबरदारी आपण घ्यावी. पावसात जाताना रेन कोट तसेच छत्री यांचा वापर केल्यास हे शक्य आहे.

ग्रीष्माने तापलेल्या जमिनीला चिंब करुन नव्याने हिरवाईचं लेणं देण्याचं सृजन करणारा हा वर्षाऋतूचा काळ याचा आनंद जरुर घ्या...मनसोक्त हिंडा, पावसाळी पर्यटन करा...चिंब व्हा, आनंद घ्या पण सोबत आरोग्याची संपन्नता महत्वाची हे मात्र विसरु नका. सृजन आणि संक्रमणाच्या या पावसाळ्यात ढगातून पडणाऱ्या पावसाइतकाच कवितांचाही पाऊस पडताना दिसेल... काहीच हरकत नाही पण जरा जपून इतकच सांगणं.

लेखक: प्रशांत दैठणकर,

जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली.

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 11/8/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate