অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्पीड लॉक मनातच हवा

स्पीड लॉक मनातच हवा


नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होतात. दरवर्षी राज्यात सरासरी १२ हजार लोकांचा अपघातामध्ये मृत्यू होतो. 20 हजाराहून नागरिकांना गंभीर दुखापत होते. तसेच या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या ८० टक्के लोकांचे वय हे साधारणपणे १८ ते ३० वयोगटातील असते.
अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालकांमध्ये जाणीव-जागृती करण्यासोबतच त्यांना वाहतुकीचे नियम, वाहन आणि रस्त्यांची स्थिती आदींबाबत माहिती देणे क्रमप्राप्त आहे. माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शैक्षणिक पातळीवर एक प्रकारचा कार्यानुभव उपक्रम राबवून अशा प्रकारची जाणीव मुलांमध्ये निर्माण करता येणे शक्य आहे. समज येण्यापूर्वीच पालक मुलांना वाहन उपलब्ध करून देतात. लहान मुलांच्या हाती वाहने देणाऱ्या पालकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वागले पाहिजे. विशेषत: वाहन केव्हा चालवायला द्यावे, याबाबत सजग असायला हवे. त्याला वाहन, वाहतुकीचे नियम, रस्ते आदींबाबत माहिती देऊनच वेगावर मर्यादा ठेवण्याचे भान ठेवायला सांगणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे.
`विनासायास मिळणारे वाहनचालक परवानेच रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांना जबाबदार आहेत. वाहन चालविता येत नसतानाही परवाना मिळविणे आणि देणे हे सामाजिक गुन्ह्याचे प्रकार आहेत. प्रत्येकाने आपली क्षमता ओळखून स्टिअरिंग व्हील हातात घ्यावे. परिवहन विभागाने काटेकोर चाचणी घेऊनच वाहन चालविण्याचे परवाने द्यावेत, अशा सूचनाही शासनाने दिल्या आहेत.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी १०८ डायल करा अपघात झाल्यानंतरचा पहिला तास, ज्याला ‘गोल्डन अवर’ संबोधले जाते. हा एक तास अपघातातील व्यक्तींसाठी फार महत्त्वाचा असतो. या कालावधीत अपघातग्रस्त व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळाल्यास जीवितहानी टळू शकते. यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्प (MEMS) राबविण्यात येत आहे. त्याद्वारे राज्यभरात 950 अद्ययावत रुग्णवाहिका २४ तास सज्ज ठेवल्या आहेत. १०८ हा नंबर डायल केल्यावर अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकते. अपघातातील जखमींवर वैद्यकीय उपचारासाठी राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये ६८ ठिकाणी ट्रॉम केअर सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत.
साक्षीदाराचे रेकॉर्डींग - एक महत्त्वाचे पाऊल अपघाताची माहिती देणाऱ्या किंवा साक्षीदाराला आता न्यायालयांमध्ये जावे लागणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अपघाताची माहिती जलदगतीने पोलीस किंवा इतर यंत्रणांपर्यंत पोहचविली जावी असे सगळ्यांना वाटेल.
सतर्कतेमुळे अपघात कमी होतील
प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक पातळीवर रस्त्यावर सुरक्षितता पाळणे किंवा अशा प्रकारची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. केवळ वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश न ठेवता समाजप्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे हा या मोहिमेचा उद्देश असला पाहिजे.
काही ठराविक रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण कमी व्हावे आणि चालकांनी वाहन बेदरकारपणे चालवू नये यासाठी एस. टी. महामंडळाने बसेसना स्पीड लॉक ही सिस्टीम सुरू केली आहे. त्यामुळे वेग मर्यादेचे भान ठेवूनच चालकाला बस चालवावी लागते. अशी स्पीड लॉक सिस्टीम आपण आपल्या वाहनांना बसवू शकतो की नाही, माहित नाही. मात्र सुरक्षेपोटी अशी स्पीड लॉक सिस्टीम प्रत्येकाने आपल्या मनातच बसवून घेतली तर अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. वर्षातून एकदा रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्याऐवजी प्रत्येकाने दररोज वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून वाहन चालविताना वेगाचे भान आणि सामाजिक जबाबदारीने वागले तर सुरक्षा सप्ताह साजरा करण्याची वेळच येणार नाही.
शेवटी अपघात हा अपघाताने होत असला तरी वेगाचे भान, स्वयंसुरक्षा आणि स्वयंशिस्त पाळून जर वाहने चालविली तर नक्कीच अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते.

 

- अजय जाधव,
जनसंपर्क अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय

-माहिती स्रोत: महान्यूज,सोमवार, ०५ जानेवारी, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate