অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अज्ञान

अज्ञान

(मायनर). विधीप्रमाणे सज्ञान ठरली जाण्याइतपत किमान वयोमर्यादा जिने गाठली नाही अशी व्यक्ती. भिन्न भिन्न व्यक्तिविधींमध्ये सज्ञानतेच्या वयाबद्दल निरनिराळ्या तरतुदी आहेत. १८७५ च्या भारतीय सज्ञान-अधिनियमाने सज्ञानतेचे वय पुरी १८ वर्षे व न्यायालयाने पालक नेमला असल्यास २१ वर्षे ठरविले आहे. विवाह, विवाह-विच्छेद, देज यांसाठी हिंदु-मुसलमानांना व दत्तकासाठी हिंदूंना वरील नियम लागू नाही. सज्ञान झाल्यावर प्रत्येक व्यक्ती विधिदृष्ट्या स्वयंपूर्ण होते व तिला आपले अधिकार उपभोगण्याची व बजावण्याची पात्रता मिळते. त्याचप्रमाणे तिच्यावर अनेक कर्तव्यांची जबाबदारी पण पडते. अज्ञानाला सर्वसाधारणपणे अशी पात्रताही नसते किंवा त्याच्यावर अशी जबाबदारीही नसते.अज्ञान ही समाजसंपत्ती असल्याने प्राचीन काळापासून त्याचे पालन हे राजकर्तव्य म्हणजे शासन- -कर्तव्य मानतात. मुसलमानी विधीप्रमाणे सात वर्षांखालील मुलांची व वयात न आलेल्या मुलींची पालक आई, तारुण्यागम झालेल्या विवाहितेचा पालक पती आणि बाकीच्या अज्ञानांचा पालक बाप असतो. त्याचप्रमाणे अज्ञानाच्या संपत्तीचा पालक पिता किंवा पितामह किंवा त्याने मृत्युपत्राने नेमलेला व्यवस्थापक असतो. हिंदू अज्ञान व्यक्तीचा व संपत्तीचा नैसर्गिक पालक पिता व त्याच्यानंतर आई असते, तर विवाहित अज्ञान मुलीचा पालक पती असतो. पूर्वी मृत्युपत्रीय पालक नेमण्याचा अधिकार फक्त बापाला असे.

१९५६ च्या हिंदू अज्ञानता व पालकत्व अधिनियमाखाली तो अधिकार आईलाही मिळाला आहे. अज्ञानाच्या हितार्थ आवश्यक वाटल्यास १८९० च्या पालक व पाल्य अधिनियमाखाली न्यायालयाला पालकाची नियुक्ती करता येते. महाराष्ट्रात १९०५ च्या पाल्याधिकरण-अधिनियमान्वये अज्ञानांच्या संपदाव्यवस्थेसाठी पाल्याधिकरण येऊ शकते.अज्ञानाच्या पोषणाची जबाबदारी आईबापांची. ती झुगारून अज्ञानांचा परित्याग करणारे आईबाप शिक्षेला पात्र होतात. १९५६ च्या अज्ञानासंबंधीच्या अधिनियमाप्रमाणे पालक अज्ञानाच्या हितासाठी योग्य ती कृती करू शकतात. अज्ञानाला व्यक्तिशः बंधनकारक होणारा करार त्यांना करता येत नाही आणि न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय अज्ञानाची स्थावर संपत्ती हस्तांतरित करता येत नाही. कायदेशीर गरज अगर अज्ञानाचे हित असल्याशिवाय अशी परवागनी न्यायालये देत नाहीत.अज्ञान आपले हितसंबंध समजण्याला अपात्र असल्याने त्याने केलेली संविदा किंवा हस्तांतरण अग्राह्य असून त्याच्यावर बंधनकारक असत नाही. मात्र अज्ञानावस्थेत त्याच्यासाठी जीवनोपयोगी वस्तू पुरवणार्‍या विक्रेत्यास त्यांचे मूल्य यांच्या संपदेतून वसूल करता येते. अज्ञान भागीदार होऊ शकत नसला, तरी भागीदारीच्या नफ्यात तो हिस्सेदार होऊ शकतो. वचनचिठ्ठी, हुंडी इ. परक्राम्य लेख अज्ञान स्वीकारू शकत नाही. त्याला ते काढता आले किंवा पृष्ठांकित करता आले, तरी तत्संबंधी जबाबदारी त्याच्यावर येत नाही.अज्ञान अभिकर्ता होऊ शकतो, पण तो अभिकर्ता नेमू शकत नाही.

मानसिक अवस्था अभिप्रेत नसलेल्या अपकृत्याबाबत अज्ञान उत्तरदायी होतो. ७ वर्षे संपण्यापूर्वी केलेला गुन्हा अज्ञानाला क्षम्य असतो. पण परिपक्व बुद्धीच्या ते ७ ते १२ वर्षे वयाचा गुन्हेगार शिक्षेला पात्र असतो.अज्ञानाला वाद लावता येत नाही; पण त्याच्यातर्फे इष्टमित्राला तो लावता येतो. अज्ञान प्रतिवादी असल्यास त्याच्या हितसंरक्षणार्थ त्या कार्यवाहीपुरता पालक नेमावा लागतो. अज्ञान पक्षकार असलेल्या वादाची तडजोड अज्ञानाच्या हिताची असल्याबद्दल खात्री करून घेऊन न्यायालयांनी तसे प्रमाणपत्रे द्यावे लागते.अज्ञानवस्थेत वादकारण घडल्यास वादाला मुदतप्रतिबंध येत नाही. सज्ञानावस्थेनंतर विहित कालमर्यादेमध्ये दाखल केलेला वाद मुदतीत राहतो.

लेखक : ना. स. श्रीखंडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate