অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जुगार

जुगार

यदृच्छेने निर्धारित होणारे पैजेसारखे उपक्रम धोक्याची जाणीव असूनही लाभाच्या आशेने अंगीकारणे म्हणजे जुगार. ‘सट्टा’ हा शब्द जरी सर्वसामान्यपणे जुगार या अर्थाने वापरला जात असला, तरी वायदेबाजारात चालणारे सट्ट्याचे व्यवहार जुगाराच्या कक्षेत येत नाहीत; कारण ही देवघेव सट्टेबाजीच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या बाजार समितीने ठरवून दिलेल्या नियमांनुसार चालते. माणूस आहे तेथे जुगार आहे, असे म्हणावयास हरकत नाही; फक्त परिस्थितीप्रमाणे जुगाराच्या पद्धतीत बदल होतो असे दिसते. जुगारी वृत्ती ही काही माणसांच्या बाबतीत जन्मजात असते, हे मत पुष्कळांना अमान्य आहे. जुगार अनैसर्गिक आहे, असेही अनेकांचे मत आहे. तथापि जुगार हा मानवी संस्कृतीचे एक अंग म्हणून प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.

भारतात सिंधू संस्कृतीतही द्यूत खेळणे प्रचलित असावे. या विषयावर संस्कृत भाषेत ग्रंथ आहेत. आचार्य शूलपाणी यांचा चतुरंगदीपिका हा द्यूतावरील एक प्रसिद्ध ग्रंथ होय. पारंपरिक दृष्टीने भारतात शंकराला द्यूताचा प्रवर्तक मानले जाते. प्राचीन काळात काही धार्मिक मानलेले संकेत हे जुगारवजा असत. हिब्रू लोक देवापुढे चिठ्ठ्या टाकून जो निर्णय येईल, तो देवाने केलेला निर्णय आहे, असे मानीत असत. आपल्याकडे अद्यापही देवाला कौल लावण्याची प्रथा आहे. फाशांचे व पत्त्यांचे अगदी सुरुवातीचे प्रकार पाहिले, की दैवी शक्तीवरील विश्वास हे जुगारी पद्धतीचे वा वृत्तीचे मूळ असावे. तथापि आधुनिक विज्ञानयुगातही जुगाराचे वेड कमी झालेले नाही. काही लोकांच्या मते, द्यूताने उदारपणा वाढतो व सुखदुःखात समवृत्तीने राहण्याचे शिक्षण मिळते. जुगारावर बंदी घातली, तर सरकारी उत्पन्न बुडते असेही त्याच्या समर्थकांचे म्हणणे आहे. याच्या उलट जुगारावर बंदी असावी, असे म्हणणारे लोक नैतिकतेवर भर देतात. द्यूत खेळणे वाईट आहे, अशी कल्पना ऋग्वेदकालापासून आढळते. मनूने द्यूताचा अठरा व्यसनांत उल्लेख केलेला आहे. वैर निर्माण होत असल्यामुळे करमणुकीसाठीसुद्धा द्यूत खेळू नये, असे मनूने सांगितले आहे. जुगारामुळे सर्वस्वाचा नाश संभवनीय असतो म्हणूनही तात्त्विक दृष्ट्या त्यास विरोध करण्यात येतो. जुगारी समाजाशी मिळतेजुळते घेऊ शकत नसल्यामुळे आणि यशाची शाश्वती नसल्यामुळे तो मानसिक दृष्ट्या सतत अस्वस्थ असतो, असे काहींचे म्हणणे आहे.

प्राचीन रोमन इतिहासकार टॅसिटस यांच्या म्हणण्याप्रमाणे ट्यूटन लोक जुगाराच्या नादाने गुलामगिरीच्या जाळ्यात अडकत. सूदानचे आणि प. आफ्रिकेतील आदिम जमातीचे रहिवासी जुगारात स्वतःची पत्नी व मुलेही गमावीत. इतकेच नव्हे, तर आपले स्वातंत्र्यही पणाला लावीत असत. चिनी लोक तर आपला उजवा हातही जुगारात पणास लावीत असत, असे उल्लेख सापडतात. जुगार हरल्यानंतर ते आपला हात तोडून टाकीत असत. युधिष्ठिराला द्यूताचे व्यसन असल्याने पांडवांना वनवास आणि अज्ञातवास पतकरावा लागला. पुष्कराबरोबर द्यूत खेळल्याने नलराजाचीही तीच अवस्था झाली होती. बायबलात प्रत्यक्षपणे जुगाराला आक्षेप घेतलेला आढळत नाही. तालमुडिक कायद्याप्रमाणे जुगारातील लाभाचा स्वीकार करणे म्हणजे चोरीच असे मानलेले आहे. कुराणात बुद्धिबळाव्यतिरिक्त इतर सर्व खेळांना मनाई केलेली आहे. संधी आणि ईश्वरी कृपा यांच्या ऐक्यावर भर दिला, तरी प्रॉटेस्टंटांच्या मताप्रमाणे सर्व प्रकारचे खेळ बायबलातील आज्ञेचा भंग करीत असल्याने ईश्वरनिंदक आणि निंद्य होत. जुगार खेळण्याची सोय असलेल्या स्थळास यूरोपात कॅसिनो म्हणतात. कॅसिनोत अनेक प्रकारच्या करमणुकीचीही व्यवस्था असते. तेथे नृत्याची दालनेही असतात. बिलिअर्डसारखे खेळ खेळून करमणूक करावयाचीही सोय असते.

पोर्तुगालमधील इश्टुरील, ग्रीसमधील कॉर्फ्यू, प. जर्मनीमधील बाडेन-बाडेन व बार्ट-हॉम्बुर्क येथे कॅसिनो आहेत. फ्रान्समधील माँटी-कार्लो येथील १८६१ साली सुरू झालेला आणि १८७९ मध्ये विस्तार करून सुसज्ज केलेला कॅसिनो जगप्रसिद्ध आहे. अमेरिकेतील नेव्हाडा राज्यात कॅसिनो वैध आहेत. सर्व ठिकाणी कॅसिनोचे स्वरूप साधारणतः सारखेच असते. यात भाग घेणाऱ्या खेळांडूना आपापसात पैसे लावता येत नाहीत. सर्व खेळाडूंना गृहाविरुद्ध खेळावे लागते. या खेळांची रचना आणि पैसे लावण्याची पद्धत त्यांच्या चालकांना पोषक व फायदेशीर असते. युरोप-अमेरिकेतील जुगारगृहांत अनेक प्रकारची यंत्रे ठेवलेली असतात. स्कॉट यंत्र हे त्या प्रकारचे एक यंत्र होय. एक ठराविक नाणे त्यात टाकले म्हणजे हे यंत्र चालू होते. पैसे टाकणाराला बक्षिस मिळाले असेल, तर ठराविक रकमेची नाणी या यंत्रातून बाहेर पडतात. आवक असेल त्याच्या दोन तृतीयांश रक्कम साधारणतः बक्षिसापोटी वाटली जाते. प्राचीन भारतात द्यूतसभा असत. राजे लोक तेथे जुगार खेळावयास येणारांकडून करही घेत असत. जुगारात जिंकलेल्या द्रव्यातही राजाचा वाटा असे. जे हा वाटा चुकवीत किंवा बुडवीत असत, त्यांना डाग देण्याच्या किंवा राज्याबाहेर हद्दपार करण्याची जबर शिक्षा देण्यात येत असत. चोर-दोरोडेखोरांना हे व्यसन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे राजाला त्यांची माहिती पुष्कळदा द्यूतगृहातूनच मिळे. घोड्यांच्या शर्यती, सोडत (लॉटरी) वगैरे जुगाराचे प्रकार लोकप्रिय आहेत. ऑगस्टस, नीरो आणि इतर रोमन सम्राटांनी सोडतीचा उपयोग राज्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि इमारती बांधण्यासाठी केला. यूरोपमध्ये पंधराव्या शतकापासून सोडती चालू आहेत.

पहिल्या एलिझाबेथ राणीच्या पुरस्काराने पहिली सोडत १५६९ साली सुरू झाली. सतराव्या शतकात अमेरिकेत साडेतींच्या उत्पन्नातून शाळा, चर्चे आणि सार्वजनिक कामांना मदत देत. भारत सरकारनेही बक्षिसाचे रोखे काढले होते. त्यांत व्याजाऐवजी दर ६ महिन्यांनी बक्षिसे देत. ५ वर्षांनंतर मूळ मुद्दल परत मिळावयाचे असल्याने, इतर सोडतींत असतो तसा येथे मूळ रक्कम गमावण्याचा धोका नव्हता. महाराष्ट्र आणि इतर राज्यांनीही उत्पन्नाकरिता सोडती सुरू केल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धात रशियन सरकारने साडेतीच्या मार्गाने पैसा गोळा करून तो युद्ध कार्यासाठी वापरला. युद्धरोखे घेणारांना सोडतीची तिकिटे फुकट देत असत. भारतात न्यूयॉर्क कॉटनचे व इतरही सट्ट्यांचे प्रकार प्रचलित आहेत. लोकप्रिय झालेला मटका हाही सट्ट्याचाच प्रकार होय. हे सट्टे आकड्यांवर आधारलेले असतात. ते बेकायदेशीर रीतीने चालू असतात. त्यामुळे त्यात फार मोठी आर्थिक उलाढाल होत असली, तरी सरकारला काहीच उत्पन्न मिळत नाही. प्राचीन काळापासून जगभर जुगाराची प्रथा असली, तरी ती अनीतिकारकच मानली गेली आहे. भारतीय धर्मशास्त्राने द्यूत शिक्षायोग्य महापातक मानले आहे. जुगाराच्या अड्ड्यात चोर सापडतात, म्हणून मध्यवर्ती ठिकाणी जुगाराला परवानगी द्यावी असे याज्ञवल्क्याने म्हटले आहे. अमेरिकेत जुगाराच्या इतिहासाचा आढावा घेताना त्याचा आणि गुन्हेगारीचा निकट संबंध आढळून आला. जुगार समाजाची आर्थिक परिस्थिती बिघडविण्यास कारणीभूत होत असल्यामुळे सर्व राष्ट्रांत जुगाराला आळा घालणारे कायदे आहेत. धार्मिक दृष्टीपेक्षाही हे कायदे राजकीय व आर्थिक गरजेतून जन्मलेले आढळतात.

अमेरिकेत जुगारासंबंधी कायदे करण्याचे अधिकार प्रत्येक राज्याच्या कक्षेत असल्याने प्रत्येक राज्यात वेगळा कायदा आढळतो. भारतीय संविदा अधिनियमाखाली सावर्जनिक उपद्रवकारक जुगार व तेजीमंदीसारखे करार अवैध असून बजावणीयोग्य नाहीत. केंद्राने व प्रातांनीही सु. १८५० पासून काही प्रकारचे जुगार दंडनीय ठरणारे अधिनियम केले आहेत. व्यक्तिस्वातंत्र्यात किमान व्यत्यय यावा; पण त्याचा अपायकारक अतिरेक होऊ नये या दृष्टीने ते करण्यात आले आहेत. नुसते पैसे लावून खेळणे हा जुगार असला, तरी तो दंडनीय नाही. सार्वजनिक ठिकाणी असा जुगार खेळणे मात्र दंडनीय आहे. त्याचप्रमाणे एखाद्याने मोबदला घेऊन आपल्या ताब्यातील जागा जुगार खेळण्यासाठी वापरण्यास दिली, तर ते कृत्य जुगारात मोडते. या जुगारात भाग घेणारे व जागा वापरू देणारा हे सर्वच शिक्षेस पात्र होतात. केवळ कौशल्यावलंबी उपक्रमावर बंधन घालण्यात आलेले नाही. सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक जुगारगृहांमध्ये जुगार खेळणे व लाभासाठी सार्वजनिक जुगारगृहाचे स्वामी असणे किंवा ते चालविणे, हे अपराध होत. पत्ते, फासे, तक्ते इ. जुगारसाधनांसह किंवा साधनाविना लाभाच्या मोबदल्यात वापरण्यास दिलेली गृहादी बंदिस्त जागा म्हणजे सार्वजनिक जुगारगृह, अशी व्याख्या कायद्याने करण्यात आली आहे. सार्वजनिक रस्त्यावर जुगार खेळणाऱ्यांना किंवा पशुपक्ष्यांना झुंजविणाऱ्यांना पोलीस विना-अधिपत्र पकडू शकतात. अधिपत्राखाली सार्वजनिक जुगारगृहामध्ये प्रवेश करून तपास करण्याचा व उपस्थितांना किंवा जुगारसाधनांना ताब्यात घेण्याचा अधिकारही पोलिसांना आहे. अशा अधिकारांनुसार प्रवेश करणाऱ्या पोलिसांनी तेथील जुगारसाधने ताब्यात घेतल्यास आणि न्यायालयाच्या मते ती साधने जुगारसाधने असल्याबद्दल संशय घेण्यास पोलिसांना सयुक्तिक कारणे असल्यास, ते स्थान जुगारगृह आहे व तेथे असणारे जुगारासाठी उपस्थित होते, असे गृहीतक मुंबईच्या अधिनियमाखाली आहे; ते विस्थापित करण्याचा भार आरोपीवर असतो. पोलिसांच्या संशयावरच गृहीतक आधारणे, हे टीकेस कारणीभूत झाले आहे. ताब्यात घेतलेली जुगारसाधने पोलीस नष्ट वा सरकारजमा करतात. इतर वस्तू विकून आलेले पैसे ते सरकारजमा करतात किंवा हक्कदारांना देतात. पूर्ण व सत्य प्रकटन करणाऱ्या सह-अपराधीला अपराधमुक्तीचे प्रमाणपत्र व आरोपीला केलेल्या द्रव्यदंडापैकी अंश देता येतो. अन्वेषणादी कोणत्याही टप्प्यावर पोलीसेतर मदतनीसांना उपरोक्त द्रव्यदंड वा वस्तुमूल्य यांचा काही अंश दंडाधिकारी देऊ शकतात. काही शर्तीवर चालविलेल्या घोड्यांच्या शर्यती व सोडती वैध होत. त्यांबद्दल अनुकर्मे १९१२ व १९५८ चे अधिनियम आहेत.

सदर्भ :1. Marathe, D. S. The Bombay prevention of Gambling Act IV of 1887, Poona, 1964.

2. Mathur, A. P. Commentaries on Gambling Act in India, Delhi, 1962.

3. Saim, D. D.; Sethi, J. Law Relating to gambling, Betting, Lotteries, Clubs etc.,Allahabad, 1963,

लेखक : ना.स.श्रीखंडे; श्री.पु.गोखले

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate