অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ज्येष्ठ वारसाधिकार

ज्येष्ठ वारसाधिकार

साधारणतः संपत्तीचा वारसा फक्त ज्येष्ठ मुलाकडे जाणे , यास ज्येष्ठ वारसाधिकार म्हणतात. असा वारसाधिकार काही बाबतीत व काही संपत्तीलाच लागू असे आणि तो रूढी अथवा रीतिरिवाज यांमुळे उत्पन्न झालेला असे. राज्याचा वारसा वडील मुलाकडेच प्रायः जात असे. तसेच राजाने आपल्या सरदारदरकदारांना मान आणि अधिकार यांसाठी दिलेली संपत्ती ज्येष्ठ वारसाधिकाराने प्रक्रांत होत असे. अशी संपत्ती वगळल्यास इतर संपत्तीची मुलांत समविभागणी होत असे. तैत्तिरीय संहिते वरून ज्येष्ठ मुलास अधिक हिस्सा देण्याची प्रथा काही प्रमाणात भारतात प्रचलित होती असे दिसते. ज्येष्ठ मुलास ही जी विशेष वागणूक मिळत असे, तीस 'उद्धार' म्हणत. जुन्या भारतीय संस्कृतीत पित्याचे श्राद्धतर्पण वगैरेंची जबाबदारी ज्येष्ठ पुत्रावर असल्यामुळे त्यास 'उद्धार' मिळणे न्याय्य समजले जात असे. या विशेष अधिकाराला विरोध होत गेल्यामुळे तो हळूहळू नष्ट झाला.

ज्येष्ठ वारसापद्धती कधी अस्तित्वात आली, हे नक्की सांगता येत नाही. पण तिचा उगम राजेशाही व सरंजामशाही यांच्यात आहे हे निश्चित. ज्या राजवटी सरंजामशाहीवर उभारल्या होत्या त्या मजबूत रहाव्या म्हणून एकालाच–विशेषतः ज्येष्ठ पुत्रालाच–वारस करण्याची पद्धती सुरू झाली असावी व त्या मोबदल्यात राजे लोक ज्येष्ठ पुत्राकडून लष्करी व इतर सेवा करून घेत असत. राजे लोक आपल्या सरदारांवर अवलंबून असत व सरदारांचे सामर्थ्य त्यांच्या संपत्तीवर अवलंबून असे. अशा संपत्तीची सर्व पुत्रांत समविभागणी होऊन तिचे तुकडे होणे इष्ट नसे, म्हणून ज्येष्ठ वारसाधिकार पद्धती सुरू झाली असावी. इंग्लंडमध्ये नॉर्मन लोकांनी त्यांच्या सरंजामशाहीचा महत्त्वाचा आधार म्हणून ती स्वीकारली. अर्ल सायमन डी माँटफर्ड याने लेस्टर येथे १२५५ साली ही पद्धती सुरु केली. रशियाच्या पहिल्या पीटरने (१६७२–१७२५) १७१४ मध्ये आज्ञापत्र काढून ही पद्धत आपल्या राज्यात जारी केली.

सरंजामशाहीच्या अस्तानंतर ज्येष्ठ वारसापद्धतीची गरज कमी झाली. अठराव्या शतकात लोकशाहीचे आदर्श मानणाऱ्यांनी व अर्थशास्त्रज्ञांनी या पद्धतीवर खूप कडक टीका केली. या पद्धतीमुळे मालमत्तेच्या सुलभ हस्तांतराला अडथळा येत होता, त्याचप्रमाणे ज्येष्ठ मुलगा नेहमी समर्थ आणि कुशल असेल याची खात्रीही नसे. परिणामतः ही ज्येष्ठ वारसाधिकारपद्धती लयास गेली. इंग्लंडमध्ये १९२६ साली ही पद्धत नष्ट झाली. इंग्लंडच्या राजघराण्यात मात्र याच पद्धतीने ज्येष्ठ मुलास किंवा मुलीस अद्यापही गादीचा वारसा मिळतो. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर यूरोपमधील बहुतेक देशांनी ही वारसापद्धत रद्द केली. अमेरिकेत तर ही पद्धती फारशी प्रचलित नव्हतीच. भारतात देशपांडे, देशमुख, पाटील इ. वतने ज्येष्ठ वारसाधिकाराप्रमाणेच प्राप्त होत असत. जोपर्यंत संस्थाने होती, तोपर्यंत गादीचा वारसा याच पद्धतीने ठरे. स्वातंत्र्योत्तर भारतात १९५५ च्या अधिनियमान्वये वतनदारी नष्ट करण्यात आली आहे. या अधिनियमाबरोबरच ज्येष्ठ वारसाधिकाराचे भारतात राहिलेले अवशेषही नष्ट झाले आहेत.

लेखक : अच्युत खोडवे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate