অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

न्यायशास्त्र

न्यायशास्त्र

(जूरिसप्रूडन्स). न्यायशास्त्र म्हणजे विधीचा उगम, कार्य व ध्येय यांचा अभ्यास करणारे शास्त्र होय. कायदा म्हणजे काय, कायदा कोण करते, कायद्याच्या मर्यादा कोणत्या, ह्या मूलभूत प्रश्नांचा शोध घेणे व ज्या मूळ संकल्पनांभोवती कायद्याच्या नियमांचा गोफ विणण्यात येतो, त्या संकल्पना स्पष्ट करणे, तसेच त्या संकल्पनांचे एकमेकींशी असलेले संबंध स्पष्ट करणे, हे न्यायशास्त्राचे उद्दिष्ट आहे. ह्या संकल्पना स्पष्टपणे कळल्याशिवाय विविध कायद्यांचा अन्वयार्थ करणे शक्य होत नाही. उदा., जमिनीची मालकी (ओनरशिप) म्हणजे काय, मालकी व ताबा (पझेशन) ह्यांत काय फरक आहे, ताब्याला कायद्याचे संरक्षण का व किती असते, ह्यांसारख्या प्रश्नांची उकल न्यायशास्त्र करते. अधिकार, कर्तव्य, क्षमता, पात्रता, कराराचे पावित्र्य ह्यांसारख्या संकल्पनांचे अर्थ निश्चित केल्याशिवाय विधिनियमांचे नेमके अर्थ लावणे कठीण होते.

न्यायशास्त्र हे अनेक विधिपद्धतींचा तौलनिक अभ्यास करून त्यांत आढळणाऱ्या समान तत्त्वांवर आधारलेले असते. म्हणून प्रत्येक देशाचा कायदा जरी भिन्न असला, तरी न्यायशास्त्र हे सार्वत्रिकच असते. कायदा म्हणजे काय, ह्या प्रश्नाभोवती न्यायशास्त्रात बरेत संशोधन झाले आहे. ह्या प्रश्नाच्या उत्तारावरच इतर संकल्पनांचे अर्थ अवलंबून असल्याने ह्या प्रश्नाला महत्त्व मिळणे साहजिकच आहे. जो मानवी व्यवहाराचे नियमन करतो तो कायदा, असे जर मानले तर मग नीती, रूढी, सवयी, धार्मिक बंधने ह्यांपासून कायदा वेगळा कसा ओळखायचा, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. जॉन ऑस्टिनने कायद्याची व्याख्या, ‘सार्वभौम राजकीय सत्तेने दिलेले सार्वजनिक स्वरूपाचे हुकूम, जे न मानल्यास शिक्षा होते’, अशी केली. जॉन ऑस्टिनच्या व्याख्येत सार्वभौमत्वाच्या कल्पनेचे विश्लेषण आहे. ह्या व्याख्येवर खूप टीका झाली असून तीतील उणिवा बऱ्याच विधिज्ञांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत. ऑस्टिनच्या व्याख्येत कायद्याच्या गुणात्मकतेच्या कसोटीवर त्याचा विचार होत नाही. कायदा न्याय्य आहे किंवा नाही, चांगला कायदा कोणता व वाईट कायदा कोणता, ह्यांसारख्या प्रश्नांची उत्तरे ऑस्टिनच्या व्याख्येनुसार मिळत नाहीत. त्यांची उत्तरे नैसर्गिक न्यायाच्या संकल्पनेनुसार मिळतात. नैसर्गिक कायदा म्हणजे बुद्धी आणि निसर्ग ह्यांनुसार वागण्याचे नियम. फ्रीड्रिख साव्हिन्यी ह्या जर्मन विधिज्ञाच्या मते, सामाजिक रूढी हाच कायद्याचा आधार होय. सर हेन्‍री मेनने ह्याच दृष्टिकोनातून प्राचीन समाजांचा अभ्यास करून कायद्याच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला. त्याने भारतीय समाज व कायदा ह्यांचाही सूक्ष्म अभ्यास केला. रॉस्को पाउंड ह्या अमेरिकन विधिज्ञाने कायदा हा सामाजिक ध्येयांच्या पूर्तीचे साधन आहे, असे सांगून कायद्याचे समाजशास्त्रीय विश्लेषण केले.

कायद्याचा समाजशास्त्रीय दृष्टीने विचार करून सामाजिक वर्तनाशी सांगड घालणारे महत्त्वाचे समाजशास्त्रज्ञ म्हणजे माक्स वेबर व एमील द्यूरकेम हे होत. विसाव्या शतकात ह्या दृष्टिकोनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. व कायद्याचा अभ्यास समाजशास्त्रीय भूमिकेत होऊ लागला. हान्स केलझेन याने समाजशास्त्रीय दृष्टिकोनापेक्षा विभिन्न अशी विचारसरणी मांडलेली आहे. त्याच्या मते, न्यायशास्त्राचा विचार तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून केला पाहिजे. म्हणून त्याने न्यायशास्त्र हे विशुद्ध विधिशास्त्र असले पाहिजे, असे मत मांडले. अमेरिकेत न्यायशास्त्राचा विचार वास्तवतेच्या भूमिकेवरून करणारा एक पंथ निर्माण झाला आहे. तसल्या प्रकारचा विचार स्कँडिनेव्हियन राष्ट्रांतही होऊ लागला आहे.

संदर्भ : 1. Austin, John, Lectures on Jurisprudence, 2 Vols., London, 1911.

2. Durkheim, Emile, De la division du travail Social, Bordeaux, 1891.

3. Maine, Henry, Ancient Law, New York, 1960.

4. Pound, Roscoe, Contemporary Juristic Theory, Claremont (Calif.), 1940.

5. Pound, Roscoe, New Paths of the Law, Oxford, 1951.

6. Pound, Roscoe, Social Control Through Law, New Haven, 1942.

7. Savigny, Friedrich Carl Von. Vom Beruf unserer Zeit fur Gesetzgebung and                                Rechtswissenschaft, Heidelberg, 1814.

लेखक : सत्यरंजन साठे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate