অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोलन

सोलन

(इ. स. पू. सु. ६३०-इ. स. पू. सु. ५६०). अथेनियन कायदेतज्ज्ञ, मुत्सद्दी व कवी. ग्रीसमधील सुप्रसिद्ध सात विद्वानांपैकी एक. त्याचा जन्म अथेन्समधील एका सुसंस्कृत सधन कुटुंबात झाला. सुरुवातीस कवी असलेल्या सोलनने मेगॅरियन रहिवाशांच्या ताब्यात असलेले सॅलमिस हस्तगत करण्यासाठी अथेन्सच्या नागरिकांना आपल्या काव्यातून स्फूर्ती दिली. सोलनचे काव्य त्यातील कल्पनांमुळे स्तुत्य ठरले. त्यामुळे त्या काव्याचा अथेनियनांच्या मूलभूत शिक्षणात अंतर्भाव झाला. शिवाय एक तत्त्ववेत्ता व विधिज्ञ म्हणूनही त्याचे स्थान श्रेष्ठ होते.

त्यावेळी अथेन्समध्ये गरिबांवरील जुलूमातून यादवी माजली आणि तीव्र आर्थिक संकट उद्भवले, तेव्हा त्या आणीबाणीशी मुकाबला करण्यासाठी सोलनची मुख्य दंडाधिकारी (आर्चोन) म्हणून निवड झाली (इ. स. पू. ५९४). त्यानुसार त्यास आर्थिक व संवैधानिक कायद्यांत सुधारणा करण्याचा सर्वाधिकार देण्यात आला. तसेच त्याच्यावर सीनेट (बूल) च्या पुनर्घटनेची जबाबदारी टाकण्यात आली आणि न्यायाधिकरणाच्या (ॲरीऑपगस) रचनेत फेरफार करण्याचा अधिकार त्यास दिला; कारण तत्कालीन संविधानानुसार न्यायाधिकरण हे राज्यकारभाराचे परिणामकारक साधन होते. त्याने आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी ऋणकोंत सुधारणा सुचविल्या. समाजाची चार आर्थिक गटांत विभागणी केली आणि राजकारणात जन्मानुसार असलेले उच्च-नीच वर्चस्व नष्ट केले. त्यानुसार कर, लष्करी सेवा आणि शासनातील पदे निश्चित केली. सर्वांत खालच्या वर्गाला (कनिष्ठ) करातून सूट दिली. कायद्यासमोर प्रत्येक नागरिक समान असून त्याला अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा व उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार आहे, हे तत्त्व रुजविले. दीनदुबळे व वंचित नागरिकांसाठी त्याने नवीन विधिसंहिता बनविली; मात्र तिचा आज फार थोडा भाग अवशिष्ट आहे. वैधानिक सुधारणांबरोबरच अथेन्सची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व्यापारविषयक काही नियम करून धोरण निश्चित केले. त्यानुसार ऑलिव्ह तेल वगळता अन्य वस्तूंची निर्यात पूर्णतः बंद केली. टांकसाळ सुरू करून वैश्विक प्रमाणभूत अशी नाणी पाडली व चलनव्यवस्था सुदृढ केली. तसेच प्रचलित वजनमापात प्रमाणभूत सुधारणा करून त्यांत सुसूत्रता आणली. त्याने न्यायाधिकरणाच्या बरोबरीने चारशे नियुक्त लोकांचे दुसरे मंडळ स्थापन केले. त्याचा उद्देश न्यायाधिकरणाची एकाधिकारशाही नष्ट करून नागरिक सभेला (एक्कलेशिया) मार्गदर्शन करण्याचा होता. हे मंडळ सैद्धांतिक दृष्ट्या सर्वोच्च होते; मात्र आर्थिक व सामाजिक बाबतींत ते लवचिक होते. त्याच्या मते, ही दोनही मंडळे अथेन्सच्या प्रगती व स्वास्थ्यासाठी आवश्यक होती. त्याने केलेल्या सुधारणांना अथेन्समधील त्याच्या हितशत्रूंकडून पुढे विरोध होऊ लागला. तेव्हा हा गोंधळ पाहून तो सु. दहा वर्षे स्वेच्छा हद्दपार झाला. या हद्दपारीत त्याने ईजिप्त, सायप्रस आणि लिडिया या देशांना सदिच्छा भेटी दिल्या. अथेन्समध्ये परत आल्यानंतर त्याने पायसिस्ट्रटस या जुलमी हुकूमशाहाने अथेन्सवर वर्चस्व प्रस्थापिलेले पाहिले. त्याच्यावर सोलनने टीका केली. पायसिस्ट्रटसच्या नादी लागलेल्या लोकांना त्याने मूर्ख ठरविले. तो अथेनियन लोकशाहीचा जनक मानला जातो. राजकारणाची न्यायाशी सांगड घालून त्याने दीन-दुबळ्यांना आधार दिला. प्रत्येक नागरिकाला कायद्याने संरक्षण दिले व अथेन्समध्ये लोकशाहीची पायाभूत उभारणी केली. वृद्धापकाळाने त्याचे अथेन्समध्ये निधन झाले.

लेखक : आनंद गेडाम

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate