অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जुआंग

जुआंग

ओरिसातील एक प्रमुख वन्य जमात. केओंझार, घेनकानाल, कोरापुट व कटक या जिल्ह्यांत जुआंगांची वस्ती आहे. त्यांची लोकसंख्या १९६१ च्या शिरगणतीप्रमाणे २१,८९० होती. जुआंग कुळीचे बंधू व कुटुंब असे दोन सकुलक आहेत. बंधू गटात रोटीबेटी व्यवहार होतात; पण कुटुंब गटात विवाह होत नाहीत.

जुआंग पूर्वी अतिशय मागासलेले होते. कित्येक वर्षे त्यांना मातीची भांडी बनविता येत नव्हती वा धातूंचा उपयोग माहीत नव्हता. लज्जारक्षणाकरिता स्त्रिया झाडांची पाने व मण्यांच्या माळा कमरेला बांधीत. पुरुष कमरेला झाडांच्या डाहाळ्या बांधीत. धनुष्यबाण व गोफण एवढीच त्यांची हत्यारे होती. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत हे लोक भटके जीवन जगत होते. विसाव्या शतकात जंगले तोडून तिथे थोडी शेती करीत. आता जुआंग हे मुख्यतः शेतकरी असून ते झूम म्हणजे फिरती शेती व बैठी शेतीही करतात. मुख्य पीक भाताचे काढतात. याशिवाय वांगी, रताळी, लाल भोपळा ही पिकेही ते काढतात. कडधान्ये व तीळही ते पिकवितात. लग्न दोन्ही बाजूंची वडील माणसे ठरवतात. लग्न मुलाच्या घरी लागते. लग्न मंत्र म्हणून केले जाते. जुआंग लोकांत सोयर सात दिवस पाळतात. नामकरण एकविसाव्या दिवशी करतात. त्याला एकोइसा म्हणतात.

आंबानुआखिया, घननुआखिया आणि माघ परब हे त्यांचे मुख्य सण आहेत. आंबानुआखिया म्हणजे नवे आम्रफळ खाणे आणि धननुआखिया म्हणजे नवे भात खाणे. या दोन्ही दिवशी घराची साफसफाई करून ते विशिष्ट तऱ्हेचा स्वयंपाक करून ग्रामदेवतांना दारूबरोबर त्याचा नैवेद्य दाखवतात. माघ परब ही एक पर्वणी असून पीक अमाप यावे, म्हणून ते वनदेवीला उत्तम भोजनाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी मजांग ऊर्फ सार्वजनिक गावचौकात येऊन सारेजण गातात व नाचतात. जुआंग लोकांत नाचगाण्याला फार महत्त्व आहे.

यांच्यात पंचायतीची पद्धत असून प्रमुखाला बडा-बेहरा म्हणतात. त्याच्या हाताखाली पै-बेहरा असतो. जुआंग मंडळात अनेक ग्रामप्रमुख असतात. प्रत्येक गावाची वेगळी पंचायत असते. बडा-बेहेरा आणि पै-बेहेरा अनुभवी व प्रौढ पुरुष असून त्यांना लोक पंचायतीवर निवडून देतात. जुआंग समाजात तरुणतरुणींकरिता स्वतंत्र युवागृहे असतात. या युवागृहांना मजांग म्हणतात. मजांग हे जुआंगांच्या नृत्याचे तसेच न्यायनिवाड्यांचे स्थान असते. इथे बसून पंच गावातील भांडणे व कज्जे सोडवतात.

जुआंगांच्या मते महाप्रभू हा जगत्कर्ता देव आहे. वसुधा (पृथ्वी) व धर्म (सूर्य) हे त्यांचे प्रमुख देव असून त्यांच्यापासून जीवोत्पत्ती झाली, असे ते मानतात. थानपती  हा त्यांचा स्थानिक देव असतो. याशिवाय त्यांच्या बराम, मासिमुली, कालपात, हासुली वगैरे अनेक देवता आहेत; परंतु आता ते हिंदू देवतांनाच प्रामुख्याने भजतात. लक्ष्मीपूजन, दसरा वगैरे सण ते करतात.

जुआंग बायका साडीचे खूप फेरे कमरेभोवती गुंडाळून पदर खांद्यावर टाकतात. चोळी कुमारिका घालतात. पुरुष लहान लुंगी गुंडाळतात. आता ते शर्ट, गंजीफ्रॉक वगैरे घालू लागले आहेत. जुआंग ठेंगणे, पण सुदृढ बांध्याचे असतात. स्त्रियांचा बांधा तर रेखीव आणि आकर्षक असतो. त्यांना गोंदून घेण्याची हौस असते. दागिनेही आवडतात. बहुतेक बायका कानांत, नाकात, हातांत, गळ्यात विविध प्रकारचे मणी, पितळ, चांदी वगैरेंचे दागिने घालतात.

जुआंगांची घरे चौरस असून भिंती व धाबे मातीचे असतात व त्याच्यावर गवत घालतात. कधी कधी छप्पर केवळ गवताचेच असते. त्यांच्या झोपडीला एक दार व आत तीन खोल्या असतात. एक खोली झोपायला, दुसरी स्वयंपाकाला आणि तिसरी कोठीसाठी. गुरे व शेळ्या यांच्यासाठी वेगळ्या छपऱ्या असतात. जुआंगांच्या घरात धनुष्यबाण व शेतीची अवजारे आढळतात. मृतांचे ते दहन करतात, त्या वेळी प्रेताचे डोके दक्षिणेकडे करतात. दहा दिवस अशौच पाळतात. मृताचे स्मारक उभारण्याचे व पितरांची पूजा करण्याची चाल यांच्यात नाही.

संदर्भ : Pradhan, R. K. JuangAdivasi, Cuttack, 1964.

लेखिका : दुर्गा भागवत

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate