অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

झीखफ्रीट फ्रीड्रिख नाडेल

झीखफ्रीट फ्रीड्रिख नाडेल

(२४ एप्रिल १९०३ – १४ जानेवारी १९५६). ऑस्ट्रियाचा एक सैद्धांतिक मानवशास्त्रज्ञ. व्हिएन्ना येथे जन्म. मानवशास्त्राच्या अध्यापनात पडण्यापूर्वी त्याने संगीत, तत्त्वज्ञान व मानसशास्त्र या विषयांचा अभ्यास केला आणि व्हिएन्ना विद्यापीठातून मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांत डॉक्टरेट ही पदवी मिळविली. एवढेच नव्हे तर, त्याने संगीतावर काही पुस्तके लिहिली. त्यांपैकी एफ्. बी. बूझोनी या पियानोवादकाचे त्याचे चरित्र प्रसिद्ध आहे. याशिवाय त्याने आपली ऑपेरा कंपनी घेऊन चेकोस्लोव्हाकियाचा दौरा केला. पुढे १९३२ मध्ये त्याला रॉकफेलर प्रतिष्ठान व इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आफ्रिकन लँग्वेजिस अँड कल्चर्स या संस्थांमुळे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या प्रख्यात संस्थेत अधिछात्रवृत्ती मिळाली. या वेळी त्याला मॅलिनोस्की आणि सी. जी. सीलिगमन यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. याचा फायदा घेऊन नाडेल १९३४ मध्ये प्रत्यक्ष संशोधन क्षेत्रात उतरला तसेच त्याने न्यूप आणि इतर संबंधित समूहांबरोबर नायजेरियात १९३४–३६ च्या दरम्यान काम केले. पुढे १९३६–४० च्या दरम्यान त्याने सूदानमधील न्यूबा जमातीत संशोधन केले.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नाझी समाजव्यवस्थेचा बीमोड करण्याच्या उद्देशाने त्याने १९४१ मध्ये सूदान डिफेन्स फोर्समध्ये नाव नोंदविले आणि पुढे पूर्व आफ्रिकेतील ब्रिटीश सैनिकांत तो सामील झाला. त्याला पुढे लेफ्टनंट कर्नलचा हुद्दाही मिळाला.

तो अध्यापनाच्या व्यवसायाकडे १९४८ मध्ये वळला आणि डरॅम विद्यापीठात मानवशास्त्र विषयात प्रपाठक झाला (१९४८–५०). त्यानंतर कॅनबरा (ऑस्ट्रेलिया) विद्यापीठात त्याची याच विषयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१९५०–५६). कॅनबरा येथेच तो मरण पावला.

नाडेलने विपुल ग्रथंलेखन केले. ए ब्‍लॅक बायझंटिम (१९४२) हे त्याचे मानवशास्त्रावरील पहिले पुस्तक. यात त्याने सैद्धांतिक पायावर न्यूप जमातीचे विश्लेषण केले आहे. तर द न्यूबा (१९४७) या ग्रथांत दहा जमातसमूहांनी आपापसांत विभागलेल्या रचनात्मक स्थितीची चिकित्सा त्याने केली आहे. न्यूप रिलिजन (१९५४) हा ग्रंथ सोडला, तर उर्वरित ग्रंथांत, उदा., द फाउंडेशन ऑफ सोशल अ‍ॅन्थ्रपॉलॉजी (१९५१), थीअरी ऑफ सोशल स्ट्रक्चर (१९५८) इत्यादींत त्याची सैद्धांतिक चर्चा आढळते. त्याच्यावर मॅलिनोस्की, माक्स वेबर, ए. एन्. व्हाइटहेड आणि कुर्ट कॉफ्का यांचा बराचसा पगडा होता. थीअरी ऑफ सोशल स्ट्रक्चर हा ग्रंथ त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला. हा ग्रंथ म्हणजे विसाव्या शतकातील समाजशास्त्रीय ग्रंथातील एक महत्त्वपूर्ण सैद्धांतिक ग्रंथ मानला जातो. यात व्यक्तीच्या सामाजिक भूमिकेचे महत्त्व त्याने विशद केले आहे.

लेखक : रामचंद्र मुटाटकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate