অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नागा

नागा

ईशान्य भारतातील एक प्रमुख जमात; तथापि ती एक-जिनसी जमात नाही. तिच्यात अनेक लहानमोठ्या शाखा वा उपजमाती आहेत. त्यांपैकी अंगामी नागा, आओ नागा, कुबई, कोन्याक नागा, चंग, फोम, लोथा, संगथम, सेमा नागा इ. प्रसिद्ध आहेत. नागांची एकूण लोकसंख्या ४,५४,६२१होती (१९६१). नागालँड तसेच आसाम व ब्रह्मदेश यांच्या सीमेवरील डोंगराळ व जंगली प्रदेश यांत ते विखुरलेले असून कोहीमा, मोकोकचुंग व तुएनसांग या जिल्ह्यांत त्यांची दाट वस्ती आहे.

नागांचा प्राचीन इतिहास निश्चितपणे ज्ञात नाही. व्हेरिअर एल्विन यांनी त्यांचा तेराव्या शतकापासूनचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ‘नाग’ शब्दाची व्युत्पत्तीही निश्चित नाही.‘नग’ म्हणजे पर्वत या संस्कृत शब्दावरून हा शब्द रूढ झाला असावा. नगवासी ते नाग, या अर्थांने ही संज्ञा त्यांना सपाटीवरील लोकांनी दिली असणे शक्य आहे. दुसरी एक व्युत्पत्ती अशी की, नोक म्हणजे लोक या तिबेटो-ब्रह्मी भाषांतील शब्दावरून नोक >नोग >नाग असे नाव रूढ झाले असावे. नग्न शब्दावरूनही नाग शब्दाची व्युत्पत्ती संगितली जाते. तथापि सर्वच नागा पर्वतवासी नाहीत आणि नग्नही राहत नाहीत. नाग हे त्यांचे कुलचिन्ह किंवा देवक होते, त्यावरून त्यांना नाग हे नाव मिळाले असावे, असे एक मत आहे. प्राचीन किरात लोकांशी नागांचा संबंध जोडण्याचा प्रयत्नही काही अभ्यासकांनी केलेला दिसतो.

हे लोक मूळचे मंगोलॉइड वंशाचे असून ईशान्य भारतातील हजारो वर्षांच्या त्यांच्या वास्तव्यामुळे त्यांचा वंश इंडो - मंगोलॉइड या नावाने ओळखला जातो. त्यांच्या सर्व शाखांत सारखी शारीरवैशिष्ट्ये आढळत नाहीत. जमातींचे प्रमुख व काही लोक देखणे, उंच, गव्हाळी रंगाचे व सुदृढ दिसतात. त्यांचे कपाळ रुंद, डोळे घारे व दृष्टी भेदक असते; तर इतर काही लोक लहान बांध्याचे, काळेसावळे असून त्यांचे नाक बसके व डोळे बारीक दिसतात. काही थोड्या नागा तरुणी देखण्या असल्या, तरी सर्वसाधारण नागा स्त्री ही लठ्ठ, ठेंगणी व सावळ्या रंगाची आढळते. शहरांच्या आसपास राहणारे नागा लोक कपडे वापरतात, तर जंगलांत वा दुर्गम पहाडांत राहणारे नागा स्त्रीपुरुष बहुधा नग्न किंवा अर्धनग्न असतात. नागा स्त्रियांना विविध अलंकारांची हौस असून स्त्रिया अंगावर गोंदून घेतात. दागिने हस्तिदंताचे, शिंपल्यांचे, लाकडाचे किंवा मातीच्या मण्यांचे केलेले असतात.

नागांची भाषा एक नाही. त्यांच्या अनेक बोली आहेत. त्या सर्व तिबेटो-ब्रह्मी भाषासमूहांतील असून त्यांच्यात बराच फरक आहे. त्यामुळे बहुतेक जमातींना असमिया किंवा हिंदी भाषेचा परस्परांतील व्यवहारासाठी उपयोग करावा लागतो. नागांच्या स्वतंत्र बोलीत लिखित वाङ्‌मय नाही; तथापि मौखिक परंपरेने त्यांच्या लोककथा व लोकगीते अद्यापि टिकून आहेत. त्यांच्यात भक्तिगीते आढळत नाहीत.

बहुसंख्य नागा शेती करतात. शेतीचे दोन प्रकार प्रचलित आहेत : झूम शेती व सोपान शेती. यांपैकी अंगामी व सेमा नागा विशेषत्वे सोपान शेती करतात. भात हे मुख्य पीक असून कापूस, बाजरी, नाचणी, जोंधळा, तंबाखू, मका ही पिके काढली जातात. शेतीशिवाय शिकार, लोहारकाम, विणकाम हे उद्योगही ते करतात. जमिनीवर त्यांची नितांत श्रद्धा आहे. वर्षानुवर्षे ते आपली जमीन जुन्या पद्धतीनेच कसत आहेत. नागांचे मुख्य अन्न भात असून ते मासे व मांसही खातात. यांशिवाय बांबूंच्या कोवळ्या कोंबांची भाजी, कांदा, जोंधळा, बाजरी वा नाचणीची भाकरी हेही पदार्थ त्यांच्या नित्याच्या जेवणात आढळतात. तांदळाची बीर (दारू) हे त्यांचे आवडते पेय असून रोज ते पितात, दूध मात्र ते निषद्ध मानतात. ते उत्तम विणकर आहेत. शाली व सुती वस्त्रे ते बनवितात. डाओ, भाले, बंदुकी इ. आयुधे ते तयार करतात. डाओ हे त्यांचे प्रमुख हत्यार.

नागांची खेडी वैचित्र्यपूर्ण आहेत. त्यांची गावे (खेल) बहुधा डोंगरमाथ्यावरील सपाट प्रदेशात वसलेली आढळतात. प्रत्येक जमातीचे गाव वेगळे असते. गावाभोवती संरक्षणासाठी दगडी तटबंदी किंवा बांबूंचे भक्कम कुंपण असते. काही जमातींची गावे नीट आखणी करून बसविलेली असावीत असे दिसते. त्यांत सरळ रस्ते व एकाच नमुन्याची घरे बांधलेली दिसतात. बहुतेक घरे बांबूंची, क्वचित लाकडी ओंडक्यांची आणि जमिनीपासून थोड्या उंचीवर मचाण करून बांधलेली असतात. एकूण घरे मजबूत व प्रशस्त असतात. गावप्रमुखांची घरे मोठी असतात. घरांच्या भिंती विविध रंगांनी रंगविलेल्या असतात. नागा लोक घराचे तीन दालनांत विभाजन करतात: पुढच्या खोलीत गुरेढोरे, मधल्या मोठ्या खोलीत स्वयंपाक, जेवण, बसणे-उठणे इ. व्यवहार, तर मागच्या पडवीत शेतीची अवजारे, धान्य व इतर सामान ठेवतात. नागांकडे धान्याचा साठा कमीच असतो. इतर सामान ते शेतावरील झोपडीत ठेवतात. प्रत्येक घराच्या दर्शनी भागावर माणसाच्या कवटीचा सांगाडा व शिंगे असतात. त्यांच्या पराक्रमाची ती प्रतीके मानली जातात. पूर्वी नागांमध्ये शत्रूचे डोके कापून घरी आणण्याची प्रथा होती . पूढे कोणत्याही परकीय व्यक्तीचे डोके ते कापून आणू लागले. हे पराक्रमाचे ते चिन्ह मानीत. अशा तरुणाचा वधूही मोठ्या मानाने स्वीकार करी; पण ही पद्धत आता जवळजवळ नष्ट झाली आहे. घरांच्या बांधकामात अंगामी नागा इतरांपेक्षा बरेच पुढारलेले दिसतात.

नागांचे जीवन बांबू व डाओ (हत्यार) या दोन गोष्टींशी इतके एकरूप झाले आहे की, त्यांच्या घरांच्या बांधकामात, तसेच घरांतील वस्तूंत व स्वयंपाकात बांबूचा सर्रास उपयोग करतात. त्यांची शिजविण्याव्यतिरिक्तची सर्व भांडी बांबूचीच असतात. पाणीसुद्धा बांबूच्या नळभांड्यांत ते भरतात. डाओ हे हत्यारही तसेच आहे. त्याचा उपयोग शिकार, लढाई, शेती, लाकूतोड या सर्वांकरिता करतात.

नागांची कुटुंबपद्धती पितृसत्ताक असून विभक्त कुटुंबपद्धती त्यांच्यात रूढ आहे. लग्न झाल्याबरोबर मुलगा वेगळे बिऱ्हाड थाटतो. स्त्रियांना समाजात मान असून कुटुंबाचे संचालन स्त्रियाच करतात. घरकामे सांभाळून त्या विणकाम करतात. तथापि स्त्रियांनी मारलेल्या पशूंचे मांस नागा लोकांत निषिद्ध मानतात. मुलेमुली वयात आल्यानंतर विवाह होतात. तरुण-तरुणी बहुतेक स्वतःच आपले जोडीदार निवडून लग्न ठरवितात. आईवडिलांची संमती घेऊन ते एकत्र राहतात व पुढे विवाह करतात. वधूमूल्य ऐपतीप्रमाणे व गाई, डुकरे, मिथान किंवा दारूच्या रूपाने दिले जाते. वधूमूल्य देण्याची ऐपत नसल्यास वर वधूच्या वडिलांच्या घरी काम करतो. मेजवानी हा लग्नातील महत्त्वाचा समारंभ असतो. एकाच गोत्रात शक्यतो लग्न होत नाही. एकूण नागा जमातींत स्त्रियांची संख्या कमी असल्याने अपहरण विवाह अद्यापि प्रचलित आहे. तसेच काही जमातींत मुलगा आपल्या पित्याच्या मृत्युनंतर आपल्या सावत्र आईबरोबर लग्न करू शकतो. सेमा नागांव्यतिरिक्त इतर नागा एकपत्नीव्रत पाळतात. वधूमूल्याच्या अटीमुळे हे बंधन आले असावे. अनैतिक वर्तनाच्या पुराव्यावर घटस्फोट ताबडतोब देण्यात येतो. विधवाविवाह रूढ आहे. विवाहित स्त्रीच्या वर्तनावर नागांत कडक निर्बंध आहेत. तिचा परपुरुषाशी संबंध असणे पाप मानले जाते आणि तशा गुन्हेगाराला मंडळाकडून कडक शिक्षा देण्यात येते. अविवाहित तरुणींना मात्र लग्न होईपर्यंत लैंगिक स्वातंत्र्य असते. अपत्यजन्म, प्रतिष्ठित व्यक्तीचा मृत्यू, भूकंप, ग्रहण, वणवा अशा प्रसंगी गावाचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येतात. या पद्धतीला गेन्ना म्हणतात. नवीन वास्तूत प्रवेश केल्यावरही गेन्ना पाळतात. अशा प्रसंगी दुष्ट शक्तींचे उच्चाटन करण्याकरिता काही धार्मिक विधी करतात.

नागा लोकांत युवागृहे असून काही जमातींत तरुणांची आणि तरुणीची वेगळी युवागृहे असतात; उदा., कोन्याकांमध्ये तरुणांच्या युवागृहांस ‘मोरुंग’, तर तरुणींच्या युवागृहांस ‘यो’ म्हणतात. आओ व अंगामी नागा यांच्यात एकच युवागृह असते. त्यास अनुक्रमे अरिची व किचुकी म्हणतात. युवागृहे ही सुसंघटित स्वरूपाची मंडळे असतात. प्रत्येक युवागृह म्हणजे विद्यालय, क्रीडामंडळ, लष्करी शिक्षणाचे केन्द्र, वसतिगृह व चर्चेचे प्रमुख स्थान असते. युवागृहांचे स्वतंत्र नियम असतात आणि त्या नियमांचे कटाक्षाने पालन होईल, अशी दक्षता युवागृहांचे अधिकारी सदैव घेत असतात. युवागृहांत एखादी वृद्ध स्त्री मुलांमुलींवर देखरेख ठेवते. ती मुलांना जमातीची परंपरा समजावून देते. मुलेमुली आपल्या भावी जोडीदाराची निवड याच ठिकाणी करतात.

‘तातर’ या नावाने नागांमध्ये पंचायत सभा किंवा मंडळ ओळखले जाते. हे मंडळ नियम करते व सर्व गावाची प्रशासनव्यवस्था पाहते. मंडळाच्या निवडणुका पूर्वापार चालत आलेल्या संकेतांनुसार अत्यंत चुरशीने होतात. शिवाय निवडणुकांत नियमांचे पालन कटाक्षाने केले जाते. मंडळाच्या निर्वाहासाठी प्रत्यके कुटुंबास काहीतरी धान्य वा अन्य वस्तू किंवा सेवा द्यावी लागते. मंडळाचा प्रमुख व इतर सभासद गावाचे सर्व धोरण, सण, उत्सव वगैरे कार्यक्रम ठरवितात. हे सर्व कार्यक्रम युवागृहांच्या साहाय्याने कार्यवाहीत आणले जातात. मंडळाला सर्व अधिकार दिलेले असतात; परंतु ही गणराज्यात्मक पद्धत सर्वच नागा जमातींत नाही. उदा., कोन्याक हा नागांतील सर्वांत मोठा गट असून यात जमातप्रमुख असतो. त्याला आँग म्हणतात. तो भगताचे कार्य तसेच युद्ध, खेळ यांत नेतृत्व करतो. तो म्हणेल तो कायदा असतो आणि जमातीतील कोणीही त्याला विरोध करीत नाही. अशीच व्यवस्था सेमा नागांत असून ती वंशपरंपरागत असते. आओ, अंगामी यांच्यात मात्र इतर नागा जमातींच्या मानाने अधिक प्रगत लोकनियुक्त मंडळे आहेत.

नागांना नाचगाण्याचे फार वेड आहे. त्यांच्या बोलींमध्ये असंख्य लोकगीते असून तरुणतरुणी काम करताना किंवा नाचताना ती अत्यंत समरसतेने म्हणतात. स्त्रियांचे नृत्य वेगळे असते. त्यात उत्तान गाणी व रंगेल हावभाव असून पुरुषांच्या नृत्यात समरप्रसंग दाखविण्यात येतात. काही वेळा हे नृत्य म्हणजे लढाईच भासते. सर्व पुरुष डाओ, भाले, ढाली इ. शस्त्रे व शिरस्त्राणे धारण करून बेहोषपणे नाचतात. शिरस्त्राणे बहुरंगी वेताची केलेली असतात. प्रामुख्याने काळा रंग त्यात दिसतो आणि पिसे व बकरीचे केस लावून तो सजविलेली असतात. स्त्रीपुरुषांच्या अंगावर बहुधा वस्त्र नसतेच, मात्र विविध अलंकार असतात. क्कचित वस्त्र असलेच, तर काळे वा निराळ्या भडक रंगाचे छोटेसे वस्त्र असते. त्यांच्या ढाली प्रचंड म्हणजे दोन मी. लांबरुंद व वेताच्या केलेल्या असतात. त्यांवर अस्वल किंवा वाघ यांचे कातेडे गुडाळलेले असते. या नृत्यात मोठे ढोल वाजविले जातात.

नागांचे अनेक सण आहेत. ते वर्षारंभाचा सण मोत्सू नृत्याने साजरा करतात. त्यासाठी घरे, गाव याची साफसफाई करतात व नंतर नृत्य वेष, अलंकार व आयुधे साफ करतात. या उत्सवात तांदळाची दारू पिऊन तरुण-तरुणी बेहोषपणे नाचतात. भाताची कापणी झाल्यावर पोकपटुगी नावाचा उत्सव साजरा करतात. यावेळी अनेक खेळ खेळले जातात. मानाची मेजवानी हा मिथान बळी देण्याचा समारंभ फक्त विवाहित व्यक्तीच साजरा करतात; कारण या समारंभात पत्नीला महत्त्वाचे स्थान असते. बहुतेक सण केव्हा साजरे करावयाचे याविषयी नागामंडळातच प्रथम चर्चा होते आणि त्याचा स्थूल आराखडा तयार होतो.

नागांच्या धर्मकल्पना भारतातील इतर आदिवासींप्रमाणेच म्हणजे जडप्राणवादी आहेत. या विश्वाचा उत्पादक कोणीतरी श्रेष्ठ आहे, तो देव, मनुष्यमात्राच्या जीवनाचा नियंता वा शास्ता आहे. या देवाच्या हाताखाली अनेक देवता, भुतेखेते आहेत; वृक्ष, नदी, टेकड्या वगैरेंवर वास करणाऱ्या देवताही आहेत, अशा त्यांच्या धार्मिक कल्पना आहेत. साऱ्या सृष्टीत मोठी शक्ती असलेले एक अदृश्य चैतन्य आहे, यावर नागांचा विश्वास आहे. भुताखेतांना वश करण्याची शक्ती पुरोहित व वैद्य यांत आहे. ते त्यांचा निःपात करतात वा त्यांना पळवून लावतात. त्यामुळे शेती चांगली पिकते व रोगांचे निर्मूलन होते, अशी त्यांची श्रद्धा आहे. मरणोत्तर काय होते, याबद्दल सर्व नागांचे एकमत नाही; पण आत्मा अमर आहे, या कल्पनेवर त्यांचा विश्वास आहे. आत्म्याला कोणती गती प्राप्त होते, याबद्दल मतभेद आहेत. सूर्य ही त्यांची प्रधान देवता. सेमियो, कुंचिपाई, रूपिआवा इ. इतर देवता असून पहिल्या दोन देवता अनुक्रमे धन व चांगले पीक देतात, तर रूपिआवा हा दुष्ट देव असून त्याला शांत करण्यासाठी कुत्रे व डुकरे बळी देतात. कनंगआवा हा आणखी एक उग्र वेताळ देव आहे. सर्व देवांना ते रेडे, मिथान, गायी इ. बळी देतात. युद्धदेवतेला प्रसन्न करण्यासाठी ते नृत्य करतात. त्याला केडोहोह म्हणतात. युद्धात जय मिळाल्यावर हे लोक प्रेतपूजा व नृत्य करतात. त्यांच्या धर्मावर हिंदूच्या काही कल्पनांचा प्रभाव आढळतो. त्यांच्यापैकी अनेकांनी खिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे.

नागांच्या वेगवेगळ्या शाखांतून अंत्यविधीचे वेगवेगळे प्रकार रूढ आहेत. कोणी प्रेते पुरतात, कोणी जाळतात, कोणी उघड्यावर टाकून देतात, तर कोणी लाकडी पेटीत घालून गावाबाहेर झाडाला टांगून ठेवतात. काही नागा प्रेताचे तुकडे करून ते फेकून देतात. प्रेताचे मांस झडून गेल्यावर उरलेली हाडे पुरण्याची किंवा जाळण्याची प्रथाही आढळते. आओ व कोन्याक नागा मृताला पुरतात, त्यापूर्वी त्यास चटईत गुंडाळून मंदाग्नीवर काही दिवस ठेवतात. काही दिवसांनी मृताची कवटी बाहेर पडली की, ती गावाजवळच पण बाहेरच्या बाजूला थडग्यात घालून ठेवतांत. पुढाऱ्याचा मृतदेह पवित्र मानतात, तो झाडावर न ठेवता नक्षीकाम केलेल्या फरशीवर ठेवतात.

नागांमध्ये विसाव्या शतकात अनेक स्थित्यंतरे झाली. त्यांचा संबंध आधुनिक शिक्षण, राजकीय चळवळी व सुधारणा यांच्याशी आला. तसेच सरकारने आखलेल्या आदिवासींबद्दलच्या धोरणांमुळे त्यांना अनेक सवलतीही मिळाल्या. त्यांचे स्वतःचे घटकराज्य निर्माण झाले आहे आणि अनेक नागा शिक्षित झाले आहेत.

संदर्भ : 1. Anand, V. K. Nagaland in Transition, New Delhi, 1967.

2. Elwin, Verrier, Nagas in 15th Century History, New Delhi, 1969.

3. Furer-Haimendorf, F. The Naked Nagas, Calcutta, 1962.

4. Stracey, P. D. Nagaland Nightmare, Bombay, 1968.

लेखक : सु. र.देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate