অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नेवार

नेवार

दीर्घ प्राचीन परंपरा असलेली नेपाळमधील एक इतिहास प्रसिद्ध व प्रभावी जात. यांची वस्ती प्रामुख्याने काठमांडूच्या दरीत आढळते. याशिवाय पाटण, भटगाव, कीर्तिपूर वगैरे लहानमोठ्या शहरांतून त्यांची वस्ती आढळते. शेती व इतर धंद्यांनिमित्त खेड्यांतून विखुरलेले नेवारही दिसतात. नेवारांची एकूण लोकसंख्या सु. ४,००,००० (१९७१) होती. त्यांपैकी सु. ५०% नेवार काठमांडू दरीत राहतात.

नेवार या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल तसेच नेवारांच्या मूलस्थानासंबंधी विविध मते आहेत. काही तज्ञनेपाळ या प्रदेश नामावरून नेवार हा शब्द आला असावा किंवा नेवार या शब्दावरून नेपाळ हा शब्द रूढ झाला असावा, असे मानतात; तर काही जण पाल म्हणजे लोकर या मूळ शब्दात ‘ने’ हे व्यंजन पूर्वपदी येऊन नेपाल हा शब्द झाला असावा व याचे अपभ्रष्ट रूप नेवार झाले असावे, असे म्हणतात. नेवार हे हिमालयाच्या उत्तरेकडील भूप्रदेशातून नेपाळात आले असावेत, असे सर्वसाधारण मत आहे. तथापि मलबारमधील नायरांशी त्यांचे अनेक बाबतीत साम्य असल्यामुळे ते दक्षिण हिंदुस्थानातून इकडे आले असावेत, असेही एक मत आहे. त्यांचे वास्तव्य नेपाळात इ.स.पू. सु. सहाव्या शतकापासून आहे, याविषयी फारसे मतभेद नाहीत. मात्र नेवार हा एक वांशिक गट नाही. त्यांच्यात मंगोलॉइड व भूमध्यसामुद्रिक (मेडिटेरिनिअन) या दोन्ही वंशाची शारीर वैशिष्ट्ये आढळतात. तथापि चालीरिती, रूढी याबाबतींत त्यांचे सांस्कृतिक वेगळेपण अद्यापि टिकून आहे. बहुसंख्य नेवार नेवारी भाषा बोलतात. नेवारीवर संस्कृत भाषेची छाप दिसते, तसेच तिची स्वतंत्र लिपी असूनही देवनागरी लिपीचा उपयोग केला जातो. काही नेवार नेवारी व नेपाळी अशा दोन्ही भाषा बोलतात.

नेवारांचा पोशाख साधा असतो. पुरुष कुडता व विजार वापरतात तर स्त्रिया साडी व लांब पोलके, त्यावर ओढणीवजा वस्त्र वापरतात. श्राद्धादी धार्मिक प्रसंगी पुरुष धोतर नेसतात. पाश्चात्त्यांच्या सहवासामुळे तसेच आधुनिक शिक्षणामुळे पोशाखात बराच फरक पडत चालला आहे. नेवार स्त्रीला दागिन्यांची हौस असून नाकाव्यतिरिक्त ती हात, गळा वगैरे सर्वांगावर दागिने घालते. गोंदण्याची पद्धत फक्त ज्यापू या उपजातीत रूढ आहे. गोंदण्यामुळे परलोकात अन्न मिळते, अशी त्यांची समजूत आहे. पूर्वी नेवार स्त्रिया मस्तकावर जटेप्रमाणे केस बांधीत, पण आता आंबाडा व साध्या वेण्या अशी त्यांची केशरचना असते. नेवार हिंदू व बौद्ध असून त्यांत अनेक जाती व उपजाती आहेत. देवभजू ब्राह्मण, छथरिया श्रेष्ठ, पंचथरिया श्रेष्ठ व उदास हे उच्चवर्णीय मानले जातात आणि त्याखालोखाल पहाडी ज्यापू, हले, माली, चित्रकार, छीप, मनंधर, कौ, डुयीय, जोगे, पोरे, कुल्लू, च्यामे इ. जातींचा क्रमांक लागतो.

व्यापार व शेती हे नेवारांचे प्रमुख धंदे असून काही नेवार धातुकाम, सुतारकाम, कुंभारकाम, गवंडीकाम इ. इतर व्यवसायही करतात. प्रत्येक नेवार कुटुंबाची थोडीफार शेती असतेच. भात विकत घेणे ते कमीपणाचे मानतात. शेतीसाठी ते नांगर वापरीत नाहीत. एखाद्याने तो वापरल्यास त्यास जातिबहिष्कृत करण्यात येते. भात हे यांचे मुख्य पीक असून मका, भाज्या ही इतर पिकेही ते काढतात. भात, भाज्या, मांस, मासे हा त्यांचा नित्याचा आहार असून मद्याचे सेवन ते प्रसंगोपात्त करतात. तांदळाची दारू नेवारांत प्रसिद्ध आहे.

नेवारांची घरे साधारणतः तीन-चार मजली असतात. ती चौकोनी असून मजल्यांची उंची कमी असते. पुढच्या बाजूस खिडक्या असतात. त्यांच्या वसाहतीत वा गावात एक सार्वजनिक विश्रांतिगृह व पाण्याचे तळे असते. शिवाय गणेश, भैरव, सरस्वती, नारायण, माई इत्यादींची मंदिरे असतात. नेवारांत अनेक धार्मिक संस्कार प्रचलित असून बहुतेक संस्कार स्त्रियांसाठी असतात. त्यांपैकी यीहीमंके वायीही हा अत्यंत महत्त्वाचा व पवित्र संस्कार मानला जातो. चार ते अकरा वर्षे वयाच्या किंवा ऋतुप्राप्ती न झालेल्या मुलीचे लग्न प्रथम बेलफळाशी किंवा नारायणाशी लावतात. या संस्कारास फार खर्च येतो. म्हणून अनेकवेळा अनेक मुलींवर हा संस्कार सामुदायिक रीत्या करतात. देवभजू व डुयीय नेवारांव्यतिरिक्त बहुतेक नेवार हा विधी पाळतात. यासंस्कारामुळे मुलीची सामाजिक प्रतिष्ठा वाढते आणि तिच्या खऱ्याखुऱ्या विवाहाला केवळ कराराचे स्वरूप राहते. तिला घटस्फोटही घेता येतो. तसेच पती मरण पावला तर विधवेला पुनर्विवाह करता येतो; अशी त्यामागे धारणा असते. मुलीच्या प्रथम रजोदर्शनाच्या निमित्तानेही करावयाचे काही खास विधी प्रचलित आहेत. कैटपूजा हा उच्चवर्णीय नेवारांमधील एक उपनयासारखा विधी आहे.

सर्वसाधारणपणे मुलेमुली वयात आल्यानंतर त्यांचे विवाह करतात. विवाहात पुरुषाचे म्हणजे वराचे स्थान गौण असून एकाच गोत्रात विवाह होत नाही. जवळपास राहणारी परिचयातील वधू सामान्यतः पसंत करण्यात येते. विवाहाचे तीन प्रकार रूढ आहेत : (१) पारंपरिक पद्धतीचा, (२) स्वयंवर आणि (३) वधूला पळवूननेऊन लग्न करणे. पहिल्या पद्धतीत वधूवरांच्या कुंडल्या जमणे महत्त्वाचे असून मध्यस्थामार्फत हा विवाह जुळतो व अनेक हिंदू विधींनी साजरा केला जातो. लग्नकार्यासाठी येणारा अवाढव्य खर्च वाचविण्यासाठी स्वयंवर विवाह गोरगरिबांत रूढ झाला आहे. त्यात वधूवर गणेशाच्या मंदिरात जातात. तेथे वधू वराच्या गळ्यात माळ घालते व त्या वेळेपासून ते पतिपत्नी होतात. तिसरा विवाहप्रकार ग्रामीण भागात विशेष रूढ असून यात वर वाग्‌दत्त वधूस पळवून नेतो आणि चार दिवस तिला दडवून ठेवतो. नंतर ती दोघे प्रकट होतात आणि मग त्यांना पतिपत्नी म्हणून कायदेशीर मान्यता मिळते. यांच्यात स्त्री आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली असता तिला किंवा नवरा चांगले वागवीत नाही म्हणून त्याला, घटस्फोट देण्याची पद्धत आहे.

विवाहित स्त्रीची प्रसूती सासरी होते. मुलाच्या जन्माबरोबर नातेवाईकांना सुवेर (अशौच) लागू होत नाही, तर ते नाळ कापलेल्या वेळेपासून सुरू होते. सुवेर सहा किंवा चार दिवस असते. सुवेर समाप्तीच्या दिवशी पतिपत्नींना शेजारी बसवून मुलाला आईच्या मांडीवर ठेवतात. मग सुईण त्याला पित्याच्या मांडीवर ठेवते. या कृतीने मुलाचे पितृत्व स्त्रीच्या पतीकडे आहे, असे मान्य केले जाते. एकविसाव्या दिवशी बाळंतीण डोलीत बसून माहेरी जाते.

नेवारांमध्ये बौद्ध व हिंदू या दोन्ही धर्मांचे लोक असले, तरी ते एकमेकांच्या धर्मात एवढे एकरूप झाले आहेत की, त्या त्या धर्माच्या पूजा स्थानांत दोन्ही धर्मांची उपासना होते. हिंदू नेवारांच्या ब्राह्मण पुरोहित वर्गाला देवभजू व लाखे म्हणतात, तर बौद्ध नेवारांचा पुरोहित वर्गाला बज्राचार्य, वांडा किंवा बरे म्हणतात. बौद्ध पॅगोडांमध्ये हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आढळतात. बौद्धमार्गी नेवार आदी-बुद्धाला भजतात. ते त्याला स्वयंभू म्हणतात आणि ज्वालेच्या रूपात त्याची पूजा करतात. याशिवाय अमिताभ, पद्मपाणी, शाक्यसिंह, मंजुश्री वगैरेबरोबर ते ब्रह्मा, विष्णू,महेश इ. हिंदू देवतांची पूजा करतात. हिंदू नेवार शिवाला सर्वश्रेष्ठ मानतात. त्यामुळे त्यांना शिवमार्गी म्हणतात. काठमांडू येथील पशुपतीचे मंदिर व कोटेश्वर येथील महादेव मंदिर प्रसिद्ध आहेत. याशिवाय ते विष्णू, कृष्ण, गणेश, आकाश भैरव, काल भैरव, बाघ भैरव इ. भैरव; तसेच लक्ष्मी, सरस्वती, पार्वती, दुर्गा, तुळजा इ. देवी आणि ग्रामदेवता यांना भजतात. नेवार लोक कुमारी म्हणून एका मुलीची पूजा करतात. वसाहतीतील जिच्या अंगावर कोणताही डाग वा व्रण नाही, अशी एक मुलगी निवडतात आणि कालीचे सजीव रूप म्हणून तिची पूजा करतात. प्रत्येक समारंभापूर्वी तिची पूजा केली जाते. याशिवाय संबंध राज्याची एक कुमारी असते. तिला राज्यकुमारी म्हणतात. राजा तिच्याकडून राज्य करण्याचा आदेश घेतो. कुमारी वयात येण्याच्या सुमारास किंवा तिला इजा होऊन रक्त आले असता, दुसरी कुमारी निवडण्यात येते. अशा कुमारीशी कोणीही विवाह करीत नाहीत, कारण तिचा नवरा लवकर मरतो, अशी समजूत आहे. नवनाथांपैकी मत्स्येंद्रनाथाला हे लोक फार मानतात. यांच्यात नाग व बेडूक यांचीही पूजा प्रचलित आहे.

नेवारांचे बहुतेक सण शेतीशी निगडित असून भरवजत्रा, भैरवीजत्रा, पर्जन्योत्सव, गायजत्रा, वनजत्रा, इंद्रजत्रा, कुमारीजत्रा, मच्छिंद्रजत्रा, गणेशजत्रा वगैरे काही प्रसिद्ध आहेत. त्यावेळी संबंधित देवतेला पशुबळी, तांदळाची दारू इ. अर्पण करतात.

नेवारांत जोगी जातीशिवाय इतरांतील मृत व्यक्तीला नदीकाठी जाळतात. प्रेत तिरडीवर ठेवण्यापूर्वी त्याचे तोंड धुतात आणि कपाळावर शेंदुराचा तिळा लावतात. जाळण्यापूर्वी मृतात्म्याला पिंडदान करतात. घरातील विवाहित मुलगी त्याला तीन प्रदक्षिणा घालते. अशौच सर्व नातेवाईक बारा दिवस, तर मुलगा एक वर्ष पाळतो. सातव्या दिवशी एका मडक्यात थोडे दही-पोहे घालून ते मृत्युस्थानी ठेवतात. असे न केल्यास मृताचे भूत त्यास्थळी राहते असा समज आहे. तेराव्या दिवशी श्राद्ध करतात.

संदर्भ : 1. Bista, D. B. People of Nepal, Kathmandu, 1976.

2. Furer-Haimendorf, Christoph Von, Elements of Newar Social Structure – Journal of the Royal Anthropological Society, London, 1956.

3. Nepali, Gopal Singh, TheNewars, Bombay, 1965.

लेखक : सु. र.देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate