অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फांग

फांग

आफ्रिकेतील एक बांतू भाषिक जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे गाबाँचा जंगली उत्तर भाग, विषुववृत्तीय गिनी व कॅमेरूनचा दक्षिण भाग यांतून आढळते. आधुनिक मानवशास्त्रज्ञ कॅमेरूनमधील सानागा नदीपासून गाबाँमधील ओगोवे नदीच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत राहणाऱ्या तत्सम जमातींना ही संज्ञा देतात. त्यांची लोकसंख्या १९७१ मध्ये सु. दहा लाख होती. त्यांपैकी फांग जमातीची लोकसंख्या सु. १,७६,००० होती. त्यांना फान, फान्वे, पँग्वे व पाहुइन अशी इतर नावेही आढळतात. एकोणिसाव्या शतकात सॅव्हाना पठारावरून सानागा नदीच्या उजव्या तीरावरील जंगलात हे लोक आले असावेत.

फांग या शब्दाचा अर्थ ‘माणसे’ असा आहे. तपकिरी वर्णाचे आणि दृढ व सुरेख बांध्याचे हे लोक पूर्वी नरमांसभक्षक होते. त्यांचा धर्म इतर आदिम जमातींप्रमाणेच जडप्राणवादी असून पूर्वजपूजा विशेष रूढ आहे. शिकार आणि युद्ध यांतील नैपुण्याबद्दल त्यांची विशेष प्रसिद्धी आहे. काही फांग लोहार व सुतारकामात निष्णात होते. पाश्चात्त्यांच्या, विशेषतः फ्रेंच लोकांच्या आगमनानंतर या पारंपरिक कला लोप पावल्या व शेतीकडे त्यांनी अधिक लक्ष पुरविले. कॉफी व कोको ही त्यांची महत्त्वाची सध्याची उत्पादने होत. काही फांग हस्तिदंती कलेतही कुशल आहेत. फांगमध्ये पितृसत्ताक कुटूंबपद्धती प्रचलित असून थोरल्या मुलाकडे वारसाहक्काने संपत्ती जाते. बहिर्विवाही कुळींत नातेसंबंध जोडले जातात. लग्नात वधूमूल्य देण्याची प्रथा आहे. साटेलोटे विवाहास प्राधान्य दिले जाते. बहुभार्या विवाहपद्धती रूढ असून मेहुणी-विवाह संमत आहे. दक्षिणेकडील फांगमध्ये राजकीय संघटना अस्तित्वात नाही. उत्तरेकडील लोकांत कुलप्रमुख आढळतात.

संदर्भ : Balandier, Georges, the Soclology of Black Africa : Social Dynamics in Central Africa, New York, 1970.

लेखिका  : दुर्गा भागवत

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate