অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फ्रँट्‌स बोॲस

फ्रँट्‌स बोॲस

(इ. स. १८५८-२९ डिसेंबर १९४२). जागतिक कीर्तीचा अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. हे मूळचे जर्मन. जर्मनीतील मिंडन गावी एका ज्यू घराण्यात ह्यांचा जन्म झाला. कील विद्यापीठाची ‘मानव भूगोल’ या विषयातील पीएच्.डी. पदवी घेतली. (१८८१). त्यांनी बॅफिनलॅंडमध्ये प्रवास करून. (१८८१-८४) एस्किमो व अमेरिकन इंडियन जमातींच्या विशेष अध्ययनात लक्ष केंद्रित केले आणि पुढे अमेरिकत ते स्थायिक झाले. (१८८७). सुरुवातीस त्यांनी बर्लिन वस्तुसंग्रहालय, शिकागो प्रदर्शन इ. ठिकाणी किरकोळ स्वरूपाची कामे केली आणि पुढे ते कोलंबिया विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून आले. (१८९२). पुढे तिथेच मानवशास्त्र विषयाचा पहिला प्रमुख व प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली (१८९९). या पदावर ते निवृत्त होईपर्यंत म्हणजे १९३६ पर्यंत होते.

अध्यापन, संशोधन, लेखन, मार्गदर्शन आदी मार्गांनी मानवशास्त्र विषयाच्या सैद्धांतिक व व्यावसायिक विकासाला त्यांनी प्रयत्नपूर्वक चालना दिली. या त्यांच्या कार्यामुळे मानवशास्त्र व त्याच्या प्रमुख शाखा यांचे आधुनिक काळातील प्रणेते म्हणून त्यांना मान्यता मिळाली. बोॲस यांनी मानवशास्त्राच्या अंगोपांगांवर तसेच वायव्य अमेरिकेतील अमेरिकन इंडियन यांचे संशोधन करून द माइंड ऑफ प्रिमिटिव्हमॅन (१९११), प्रिमिटिव्ह आर्ट (१९२७), रेस, लँग्वेज अँड कल्चर (१९४०) इ. सहा ग्रंथ, ७०० प्रबंधिका व अनेक शोधनिबंध लिहिले आणि त्यांत मानवाचे वंश, भाषा व संस्कृत या वेगवेगळ्या संकल्पना असून त्यांचा स्वतंत्रपणे विचार झाला पाहिजे, हे तत्त्व त्यांनी मांडले. हे आधुनिक मानवशास्त्राचे मूलभूत तत्त्व मानले जाते. मानव जीवशास्त्राच्या संदर्भात ‘वंश’ या संकल्पनेचा विचार झाला पाहिजे, वंशवाद व वंश-पूर्वग्रह या परंपरागत विचारप्रणालींना जाणीवपुर्वक विरोध केला आणी विविध संस्कृतींमधील साम्य व भेद हे वंशविषयक बाबींवर आधारलेले नसतात, अशी विचारसरणी बोॲस यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केली. ज्या अमेरिकन इंडियन समाजांच्या संस्कृतीचा त्यानीं अभ्यास केला, त्यांच्या विविध भाषांकडे ही त्यांचे लक्ष वळले आणी आधुनिक भाषाशास्त्रीय विचारसरणीचा पाया त्यांनी स्वतःच्या कामातून व एडवर्ड सपिर (१८८४-१९३९) यांच्यासारख्या शिष्यांमार्फत अमेरिकेत घातला. यातील काही भाषा नष्टप्राय अवस्थेत होत्या. त्यांच्या आणि इतरही अपरिचित भाषांच्या वैशिष्ट्यांची नोंद बिनचूकपणे, नेमकेपणाने आणि त्यांना परिचित भाषांच्या साच्यात कोंबून न बसवता झाली पाहिजे, यावर त्यांचा मोठा कटाक्ष असे. भाषा म्हणजे काय, यासारख्या सैद्धांतिक प्रश्नांत जास्त न गुरफटता हे काम व्हायला पाहिजे, असे त्यांना वाटे. संस्कृतिसापेक्षतेचा आला सिद्धांत त्यांनी भाषेलाही लागू केला. सर्व भाषांमध्ये सारखेपणा शोधण्यापेक्षा सर्व भाषांचा एकाच वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटे. शिवाय, संस्कृती व मानव यांच्या परस्परसंबंधांचे सम्यक आकलन होण्यासाठी विशिष्ट मानसशास्त्रीय व जीवशास्त्रीय बाबी विचारात घेणे आवश्यक आहे, असे मतही बोॲस यांनी सातत्याने प्रतिपादन केले. त्यांच्याया‘संस्कृती’ विषयक संकल्पनेमुळे आधुनिक मानवशास्त्रीय अभ्यासाला एकात्मता प्राप्त झाली आहे.

एक चिकित्सक अध्यापक म्हणून त्यांचा प्रभाव सर्वत्र होता. त्यांनी अमेरिकेतील विविध विद्यापीठांतून मानवशास्त्राच्या शास्त्रशुद्ध अध्ययनाला चालना दिली आणि ‘अमेरिकन अँथ्रॉपॉलॉजिकल असोसिएशन’ ची स्थापना करण्यामध्ये खास पुढाकार घेतला (१९००). ए. एल्‌. क्रोबर, अलेक्झांडर गोल्डन-व्हाइझर, रेमंड एच्‌. लोई, रूथ बेनिडिक्ट, मार्गारेट मीड, मेलव्हिल हेरस्कोव्हिट्‌स, ॲश्लीमाँटेग्यू आदी जागतिक कीर्तीचे मानवशास्त्रज्ञ बोॲस यांचे विद्यार्थी होत. या विद्यार्थ्यांशी चर्चा करीत असतानाच त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने मरण आले.

संदर्भ : 1. Mead, Margaret, An Anthropologist at Work, London, 1959.

2. Penniman, T. K. A Hundred Years of Anthropology, London, 1970.

लेखक : विलास संगवे, अशोक केळकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate