অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बंजारा

बंजारा

संपूर्ण भारतात विखुरलेली, परंतु काही राज्यांत अनुसूचित जमात व काही राज्यांत अनुसूचीबाहेर असलेली भटकी जमात. लोकसंख्या १,९८,८८५ (१९७१). यांची वस्ती प्रामुख्याने आंध्र प्रदेश, ओरिसा, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व हरयाणा या राज्यांत आढळते. बंजारा जमातीच्या अनेक शाखोपशाखा आहेत. प्रदेशपरत्वे या लोकांना बंजारी, लमाणी, लंबाडी, सुकलीर लमाण, मथुरा लमाण, न्हावी बंजारा, शिंगवाले बंजारा, चारण बंजारा, गोर बंजारा, कचलीवाले बंजारा यांसारखी विविध नावे आहेत. स्थलपरत्वे त्यांच्या चालीरीती, देवदेवता व अंत्यसंस्कार यांतही काहीसा फरक आढळतो. महाराष्ट्रात त्यांना काही जिल्ह्यांत बंजारी व इतरत्र बनजारा किंवा लमाण म्हणतात. बनजारा विशेषतः मराठवाडा व विदर्भात आढळतात. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आढळणारी वणजारी किंवा वंजारी ही जात बंजारा वा बनजारी जमातीहून सांस्कृतिक दृष्ट्या निराळी आहे. वाणिज्य किंवा वणज या शब्दावरून किंवा बनजारा आणि लवण म्हणजे मीठ वाहणारे यापासून ‘लमाणी’ हे नाव त्यांना मिळाले असावे. त्यांच्या मूलस्थानाविषयी निश्चित माहिती मिळत नाही; परंतु ते स्वतःला राजपूत कुळीतील राणा प्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेत आले असावेत. त्यांच्यात अनेक उपजमातींचे लोक आहेत. बिहार व ओरिसा या राज्यांत त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातींत समाविष्ट केले आहे; तर महाराष्ट्र राज्यात त्यांना विमुक्त जातीचा दर्जा दिलेला आहे. आंध्र प्रदेशात ते सुगाळी, दिल्लीत शिरकिवन, राजस्थान व केरळात गवरिया व गुजरातमध्ये चारण म्हणून ओळखले जातात. लोदी घराण्यातील सिंकंदरशाह (कार. १४८९-१५१७) याने १५०२ मध्ये घोलपूरवर स्वारी केली, तेव्हा बंजारांचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. एन्. एफ्. कंबलीज याने या जमातीसंबंधीचे संशोधन प्रथम प्रसिद्ध केले (१८९६). त्याच्या मते बंजारांच्या चार प्रमुख पोटजाती आहेत : चारण, मथुरिया, लमाण, आणि धाडी. यांपैकी चारण हे संख्येने जास्त आहेत. त्यांच्यात पुन्हा राठोड, परमार (पवार), चाहमान (चौहान), जाडोत (जाधव) किंवा मुखिया अशा चार कुळी आहेत.

किंचित गोरा वा सावळा वर्ण, उंच अंगकाठी, बळकट व काटक शरीर ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये असून पुरुष धोतर किंवा चोळणा वापरतात व अंगरखा घालतात आणि डोक्याला लाल पागोटे गुंडाळतात. स्त्रिया लाल घागरा व चोळी घालतात आणि कशिदा, कवड्यांनी वा आरशांच्या तुकड्यांनी सजवलेली भडक रंगाची ओढणी घेतात. स्त्रियांना दागिने व गोंदून घेण्याची हौस असून त्या हातात हस्तिदंती, शिंगाच्या किंवा पितळी बांगड्या आणि दंडात वाकी घालतात. व्यापार हा त्यांचा प्रमुख धंदा असला, तरी रानडोंगरात सापडणारे मूल्यवान खडे, डिंक, मध इ. गोळा करून ते विकतात. विसाव्या शतकात त्यांपैकी अनेक लोक शेती व मजुरी करू लागले आहेत. बंजारांच्या टोळ्या शहरांतून मजुरीसाठी झोपडपट्ट्यांतून स्थिरावत आहेत. यांच्यातील काहीजण ढाडी म्हणजे भाट असून ते संगीताचे जाणकार आहेत. पूर्वजांची स्तुतिपर गाणी गाऊन वर्षाखेरीस ते चारणांच्या वस्तीवर करमणुकीसाठी जातात. त्याबद्दल पैशाच्या किंवा बैलांच्या स्वरूपात त्यांना मोबदला मिळतो. हे लोक झोपडीत अथवा स्वतःची पाल किंवा पाली उभारून राहतात. काहींची घरे साधी असतात. बंजारा लोक ‘गोलमाटी’ ही बोलीभाषा बोलतात. त्यांच्या ह्या बोलीभाषेवर राजस्थानी व हिंदी या दोन्ही भाषांचा प्रभाव असला; तरी राजस्थानी वळण जास्त आहे.

बंजाऱ्यांना सात पिढ्यांची नामावली माहीत असावी, असा दंडक आहे. त्यांचे तांडे असतात. प्रत्येक तांड्याचा एक नायक असतो. हे पद वंशपरंपरेने चालते. नायकाच्या सल्ल्यानेच व्यापार चालतो. नायक हा तांड्याचा न्यायाधीशही असतो.

बंजाऱ्यांत एकाच कुळीत विवाह होत नाहीत. विवाहविधी साधा असतो. वधूमूल्य रूढ असून देवर-विवाह व सेवा-विवाह या पद्धती अधिमान्य आहेत. चारण व लमाण या पोटजातींत मुली वयात आल्यावर त्यांचा विवाह होतो; मात्र दक्षिणेतील मुलींचे विवाह लहानपणीच होतात. विवाहविधीत पोटजातींनुसार फरक आढळतात. बंजाऱ्यांत भगताला विशेष महत्त्व असून तो औषधोपचार व जादूटोणा दोन्ही करतो. हे लोक जडप्राणवादी असून इतर देवदेवतांबरोबर गाय, बैल यांचीही पूजा करतात. मरीआई, शंकर, तुळजाभवानी, शिव भावया, मिठू भुकिया, बालाजी इ. त्यांची कुलदैवते असून यांशिवाय ते मरिअम्मा, महाकाली, शीतलादेवी, आसावरी, बंजारीदेवी, राम, मारुती इ. देवांनाही भजतात. बालाजीच्या नावाने ते आपल्या झोपड्यांसमोर झेंडे उभारतात व त्यांची पूजा करतात. ज्येष्ठ पौर्णिमा व दिवाळी या दिवशी जुने झेंडे काढून नवीन लावतात. दसरा, दिवाळी, होळी, गोकुळाष्टमी इ. सण ते प्रामुख्याने साजरे करतात. बंजाऱ्यांचा भूतपिशाच्चांवर विश्वास आहे. पूर्वी मानव बळी देण्याची पद्धती त्यांच्यात प्रचलीत असावी. शिव भावया हा साधू आणि मिठू भुकिया हा दरोडेखोर यांना त्यांच्या जाति-जमातीत फार मान आहे. नागास्वामी तसेच गुरू नानक यांना काहींनी गुरू मानले आहे. नागास्वामीची गीते या समाजात प्रसिद्ध आहेत. काहीजण महमदीन वंशाचे असले, तरी सरस्वतीची पूजा करतात. तुर्किया व मुकेरी असे दोन मुस्लिम गट त्यांच्यात असून त्यांतील व्यक्ती वैदूचे काम करतात. बंजारा लोकांना नृत्य व संगीत यांची आवड असून नगारा, साप व मोर हे नृत्यप्रकार त्यांच्यात विशेष लोकप्रिय आहेत. एक टांगेरो व ऊडनों यांसारखी त्यांची काही नृत्ये उल्लेखनीय आहेत. बंजरांची लोकनृत्ये व लोककथा प्रसिद्ध असून भवानीला उद्देशून ते गाणी म्हणतात.

बंजारात मृतांचे दहन करतात; मात्र अविवाहित मृतास पुरतात. अशौच तीन दिवस पाळतात. बाराव्या दिवशी आप्तेष्टांना जेवण घालतात. त्यांच्यात शुभ व अशुभ प्रत्येक कार्यात विधिपूर्वक प्रदर्शित रडणे असते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक बंजारी समाजाचे होते. त्यांनी या समाजाच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या आणि या समाजाची शैक्षणिक व आर्थिक उन्नती घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला. तसेच श्री. रामसिंग धानावत हेही या समाजातील एक फार जुने आणि वयोवृद्ध कार्यकर्ते आहेत.

संदर्भ : 1. Russell, R. V.; HiraLal, The Tribes and Castes of the Central Provinces of India, Vol. II, Delhi, 1975. 2. राठोड, मोतीराज, बंजारा संस्कृति, औरंगाबाद, १९७६.

लेखक : म. बा.मांडके,गोविंदगारे, पु. र.  सिरसाळकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate