অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मस्तकमापनशास्त्र

मस्तकमापनशास्त्र

(क्रेनिऑमेट्री). शारीरिक किंवा भौतिकी मानवशास्त्रामध्ये कवटीची (विशेषतः मानवी) विविध मोजमापे घेण्याच्या तंत्राला ‘मस्तकमापनशास्त्र’ असे म्हणतात. तसेच मानवनिर्मितीची एक पोटविभाग म्हणूनही याचा उल्लेख होतो. अनेक परिमाणित मोजमापांचा व ती मोजण्याच्या पद्धतींचा शास्त्रोक पाठपुरावा ह्या शास्त्रामध्ये केला जातो. या मोजमापांसाठी आंतरराष्ट्रीय समितीने मान्य केलेल्या शारीरशास्त्रातील निर्देशबिंदूंचा उपयोग केला जातो. या मोजमापांचे लांबी, रुंदी, कोनमापे, व्यास इ. चार प्रमुख प्रकार आहेत. मोजमापांची संख्या खूप असल्यामुळे विशिष्ट मोजमापांचा उपयोग त्या त्या विशिष्ट कारणाप्रमाणे केला जातो. तसेच काही मोजमापे जशीच्या तशीच वापरल्यास त्यावरून निष्कर्ष काढणे कठीण जाते; म्हणून काही काही मोजमापांचा उपयोग करून निर्देशांक काढले जातात आणि त्यावरून अनुमाने निश्चित केली जातात. उदा., मस्तकाची लांबी अगर रुंदी यांच्या स्वतंत्र मोजमापांवरून मस्तकाच्या आकार-प्रकारासंबंधी फारसे काही सांगता येत नाही; मात्र ह्या दोन्हींचा एकत्रित उपयोग करून मस्तिष्क निर्देशांक काढल्यास साहजिकच मस्तकाच्या आकार-प्रकारासंबंधी बरेच काही सांगता येते. विशेषतः विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत किंवा त्यानंतरच्याही दशकात मानवशास्त्रज्ञ वंशवर्गीकरणावर भर देत होते. त्यावेळी मस्तकमापनशास्त्रातील ह्या निर्देशांकाचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला. मस्तकमापनशास्त्रामध्ये मापनावर भर असला, तरी शरीरशास्त्रानुसार मस्तकाचे सखोल वर्णन व मस्तकावलोकन हे दोन उपविभागही त्याचे अविभाज्य भाग आहेत.

शारीरिक मानवशास्त्रामध्ये मस्तकशास्त्राचे व पर्यायाने मस्तकमापनशास्त्राचे उल्लेख १६ व्या शतकात अँड्रिअस व्हिसेलिअस (१५१४-६४) याच्या वेळेपासून आढळतात. व्हिसेलिअसने मस्तकाच्या विरूपतेबाबत त्याच वेळी प्रथम उल्लेख केला. त्या काळी कवटीचा स्वतंत्र अभ्यास करण्यावर भर होता. तुलनात्मक व कार्यात्मक प्रकारांवर भर देण्याऐवजी प्रत्येक कवटीचा मानवशास्त्राप्रमाणे स्वतंत्र अभ्यास करण्यावर भर दिला जात असे. बेर्नार पालीसी (१५१०-९०) ह्या लेखकाने विशिष्ट उपकरणांचा उपयोग मानवी कवटीच्या मोजमापासाठी कशाप्रकारे करता येईल, ह्याचा सर्वप्रथम उल्लेख केला. त्या आधारावर आद्रिआन व्हॅन देन स्पिगल (१५७८-१६२५) याने कवट्यांचे निरनिराळे गट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी व्यासाच्या मोजमापांचा परस्परसंबंध लक्षात घेऊन त्याने : (१) हनुवटीपासून कपाळापर्यंतच्या चेहऱ्यावर व्यास; (२) एका भित्तीय हाडापासून दुसऱ्या भित्तीय हाडापर्यंत आडवा व्यास; (३) कवटीच्या उच्च बिंदूपासून-बृहद्रंध्रापर्यंतचा उभा व्यास व (४) कवटीच्या उच्च बिंदूपासून पश्चकपाल खंडापर्यंतचा तिरकस व्यास, अशी चार मोजमापे त्याने उपयोगात आणली. ही चारही मोपमापे लांबीने जर सारखीच असतील, तर ती सबद्ध कवटी वा मस्तक समजले जाते, असे स्पिगलने निर्दशनास आणले; परंतु पहिल्या व्यासाच्या मोजमापात फरक असल्यास कवटी लांब अगर आखूड असते. दुसऱ्या मोजमापात फरक असल्यास कवटी रुंद किंवा अरुंद असून उरलेल्या दोन मोजमापांत फरक असल्यास कवटी उंच किंवा बुटकी असते, असा निष्कर्ष त्याने काढला. मस्तकमापनाशास्त्रातील सुरुवातीच्या प्रयत्नांपैकी हा एक महत्त्वाचा प्रयत्न समजला जातो.

ल्वी झां दोबांताँ (१७१६-१८००) याने संशोधन करून बृहद्रंध्राच्या स्थितिविषयक अभ्यासावर आणखी प्रकाश टाकला. त्याचे नाव मस्तकमापनाशास्त्राच्या उपयुक्तेबाबतच्या संदर्भात घेतले जाते. बृहद्रंध्राचा तिरकस किंवा उतरता कोन हे अत्यंत सुस्पष्ट भेददर्शी लक्षण असल्याचे मत त्याने प्रतिपादन केले. त्याने सुचविलेले तंत्र मानवी उत्क्रांतीच्या लक्षणाबाबत जरी उपयुक्त असले, तरी सध्या त्याचा फारसा वापर केला जात नाही. याशिवाय पीटर केम्फर, योहान ब्लूमेनबाख, जेम्स प्रिचर्ड, रिचर्ड ओएन इ. शास्त्रज्ञांनी कवटीच्या निरनिराळ्या दृश्यांची नवीन माहिती दिली आहे. त्याशिवाय इतर अनेक शास्त्रज्ञांचे प्रयत्न ह्या शास्त्राच्या विकासासाठी कारणीभूत ठरले आहेत. त्यांपैकी अँडर्स रेटसिअस (१७९६-१८६०) ह्या स्विडिश मानवशास्त्रज्ञाचे नाव मस्तकाच्या लांबी-रुंदीच्या मोजमापांच्या संबंधावरून तयार होणाऱ्या मस्तिष्क निर्देशांकाच्या संदर्भात प्रमुख्याने घेतले जाते. रेट्सिअस शिवाय फिलाडेल्फिया (अमेरिका) राज्यामधील सॅम्यूएल जॉर्ज मॉर्टन व फ्रान्समधील प्येअर पॉल ब्रॉका यांचेही या क्षेत्रातील काम महत्त्वपूर्ण मानले जाते. पॉल तॉपीनार, टर्नर व्हिल्हेल्मश्मिट इ. मानवशास्त्रज्ञांनीही या क्षेत्रात अभ्यास व संशोधन केले आहे. मॉर्टनची मानवमितीपद्धत सर्वत्र प्रचारात आहे.

मस्तकमापन हे तंत्र असून ते प्रयोगशाळेमध्ये उपकरणांच्या साह्याने आत्मसात करावे लागते. मानवमितीचे जे उपयोग आहेत, तेच उपयोग थोड्या फार फरकाने मस्तकमापनशास्त्राचेही आहेत.

संदर्भ : 1. Comas, Juan; Thomas. C. C. Ed. Manual of Physical Anthropology, Oxford, 1960

2. Singh, I. P.; Bhasin, M. K. Anthropometry, Delhi, 1968.

लेखक : वि. श्री.कुलकर्णी

माहिती  स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate