অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

योहान याकोब बाखोफन

योहान याकोब बाखोफन

(२२ डिसेंबर १८१५ - २५ नोव्हेंबर १८८७). स्विस कायदेपंडित व मानशास्त्रज्ञ. बाझेल येथे सधन घराण्यात जन्म. पदवी घेतल्यानंतर (१८३४) न्यायशास्त्र या विषयात त्याने बाझेल विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली (१८४॰) व पुढील दोन वर्षे पॅरिस व लंडनमध्ये कायद्याचा अभ्यास केला. बाझेल विद्यापीठात प्राध्यापक म्हणून (१८४२- ४४) आणि याच शहरात न्यायाधीश म्हणून (१८४४-६६) त्याने काम केले. कायद्याच्या इतिहासासंबंधीचे दोन व्याप्तिलेख (१८४३) आणि रोमन नागरी कायद्यावरील दोन ग्रंथ (१८४७ व १८४८) ही त्याची उल्लेखनीय ग्रंथसंपदा. यानंतर तो मानवशास्त्राच्या अभ्यासाकडे वळला. १८४२-४३च्या दरम्यान इटलीमध्ये प्रवास करताना पाहिलेल्या प्राचीन थडग्यांमुळे त्याची या विषयाच जिज्ञासा जागृत झाली. इटली व ग्रीस या देशांत त्याने १८४८-४९ व १८५१-५२ या काळात अभ्यासू वृत्तीने प्रवास केला. त्याच्या मानवशास्त्रविषयक संशोधनाचे फलित म्हणून त्याचे पुढील ग्रंथ उल्लेखनीय आहेत. : ए हिस्टरी ऑफ द रोमन्स (इं.शी. १८५१, एफ्.डी. गेलार्खच्या सहकार्याने), एसे ऑन द टूम सिम्बॉलिझम ऑफ द एन्शंट्स (इं.शी. -१८६१), द मदर राइट (इं.शी.). याशिवाय त्याचे काही स्फटलेखही प्रसिद्ध आहेत.

बाखोफनला आधुनिक सामाजिक मानवशास्त्रात जे स्थान प्राप्त झाले ते त्याच्या द मदर राइट या पुस्तकामुळे. या पुस्तकात त्याने अशी उपपत्ती मांडली आहे, की आधुनिक सामाजिक संस्थांचे उगमस्थान आदिम स्त्रीप्रधान समाजात होते. एक सामाजिक संस्था म्हणून कुटुंबाचा सशास्त्र इतिहास बाखोफनने प्रथम सांगितला. आद्य कुटुंब म्हणून आजवर गृहीत धरलेली एकविवाही पितृसत्ताकपद्धत बाखोफनच्या संशोधनामुळे शंकास्पद ठरली. मानवी संस्थांच्या उत्क्रांतीत मातेचा हक्क पित्याच्या हक्कापूर्वी आला आहे, असे ठाम मत त्याने प्रतिपादिले.

त्याने जॉन मकलेन्न, एडवर्ड टायलर, ॲडोल्फबास्टिआन, ल्युइस, मॉर्गन इ. तत्कालीन मीमांसकांच्या लेखनाचा अभ्यास केला. त्यांच्याशी प्रसंगोपात्त चर्चाही केली. मॉर्गन व मकलेनन यांचे नातेगोत्यासंबंधीचे (आप्तेष्टविषयक) संशोधनात्मक निष्कर्ष त्याने आपल्या लेखनात वापरले. १८७२नंतरच्या त्याच्या लेखनात मॉर्गनचा प्रभाव आढळतो.

अखेरच्या दिवसांत त्याने द मदर राइट ह्या ग्रंथाचे इतर जगातील संस्कृतींचा अभ्यास करून संस्करण करण्याचे ठरविले; पण ते त्यास जमले नाही. बाझेल येथे तो निधन पावला.

बाखोफनच्या या प्रबंधाचे एकोणिसाव्या शतकात स्वागत करण्यात आले; तथापि नंतरच्या मानवशास्त्रज्ञांत त्याचा स्त्रीप्रधान समाजाबद्दलचा दृष्टिकोन पूर्णत: मान्य झाला नाही.

संदर्भ : Dormann, Johannes, Was Johann JakobBachofen Evolutionist? Anthropos, 60:I-48, Fribourg, 1965.

लेखक : सु. र.देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate