অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेमंड विल्यम फर्थ

रेमंड विल्यम फर्थ

(२५ मार्च १९०१). ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ. जन्म न्यूझीलंडमधील ऑक्लंड येथे. ऑक्लंड युनिव्हर्सिटी कॉलेज व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स येथे शिक्षण. १९३० नंतर सिडनी विद्यापीठात तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्समध्ये त्यांनी अध्यापन केले. १९४४-६८ या काळात लंडन विद्यापीठात त्यांनी अध्यापन केले. ब्रिटिश अकॅडेमीचे ‘फेलो’ तसेच १९५३ - ५५ या काळात ‘रॉयल अँथ्रापॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ ग्रेट ब्रिटन अँड लंडन’चे ते अध्यक्ष होते.

प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ ब्रॉनीस्लॉ मॅलिनोस्की (१८८४-१९४२) यांचे अनुयायी म्हणून फर्थ प्रसिद्ध आहेत. आदिवासी समाजात क्षेत्रीय संशोधन करून मानवशास्त्रातील काही सिद्धांत त्यांनी प्रस्थापित केले. १९२८-२९ मध्ये पॅसिफिक महासागरातील सॉलोमन बेटांच्या पूर्वेस असलेल्या टिकोपिया या बेटावरील आदिवासी जमातीची क्षेत्रीय पाहणी करून त्यांच्यातील नातेसंबंधांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. या अभ्यासाचे फलित म्हणून त्यांनी लिहिलेला वुई द टिकोपिया (१९३६) हा ग्रंथ सर्वोत्कृष्ट मानला जातो. नातेसंबंधांवरील आजवरच्या ग्रंथांत त्यांचा हा ग्रंथ मानदंड मानला जातो. मानवशास्त्रातील कार्यात्मक सिद्धांताचे (फंक्शनॅलिस्ट थिअरी) सर्वोत्कृष्ट दर्शन त्यांच्या या ग्रंथात घडते. संस्कृतीच्या कोणत्याही अंगाचे सर्वव्यापी अध्ययन केल्यास संस्कृतीच्या इतर सर्व अंगोपांगांचे किंबहुना संपूर्ण संस्कृतीचे त्याद्वारे विश्लेषण होते, हा कार्यात्मक सिद्धांताचा गाभा असून तो त्यांच्या या अध्ययनात उत्कृष्टपणे प्रतिबिंबित होतो. टिकोपिया संस्कृतीतील आर्थिक, सामाजिक, धार्मिक इ. अंगोपांगांशी नातेसंबंधाचा असलेला अतूट संबंध त्यांनी त्यात स्पष्ट केला आहे. टिकोपिया जमातीतील व भारतातील नातेसंबंधांत बरेच साम्य दिसून येते. मॅलिनोस्की यांचे एक पट्टशिष्य या नात्याने फर्थ यांनी कार्यात्मक सिद्धांत व क्षेत्रीय संशोधन यांबाबत आपल्या गुरूपेक्षाही सरस ठरेल असे संशोधन केले आहे.

सामाजिक रचना (स्ट्रक्चर) व सामाजिक संघटना (ऑर्गनायझेशन) या दोहोंतील फरक स्पष्ट केल्यामुळे सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया त्यांना स्पष्ट करता आली. सामाजिक रचना ही शाश्वत असते व त्यामुळे समाजाचा साचा तयार होतो. सामाजिक संघटना ही तात्कालिक मूल्ये व समाजगट यांची बनलेली असते, असे त्यांचे विश्लेषण आहे.

ह्यूमन टाइप्स (१९३८) हा त्यांचा दुसरा महत्त्वपूर्ण ग्रंथ असून त्यात त्यांनी जगातील अनेक आदिम संस्कृतींची उदाहरणे देऊन मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून मानवी संस्कृतीच्या आर्थिक, सामाजिक व धार्मिक तत्त्वांचे विश्लेषण केले आहे. मानवशास्त्राच्या उपयोगितेवरही त्यांनी विपुल लेखन केले आहे. एखाद्या संस्कृतीत परिवर्तन कसे घडून येते याबाबतचे त्यांचे संशोधन सोशल चेंज इन टिकोपिया (१९५९) या ग्रंथात आले असून ते उत्कृष्ट मानले जाते.

एलिमेंट्स ऑफ सोशल ऑर्गनायझेशन (१९५१) या ग्रंथात त्यांनी सामाजिक मानवशास्त्राची नव्याने मांडणी केली आहे. मानवशास्त्रातील निरनिराळ्या विषयांवर त्यांनी वेळोवेळी लिहिलेले शोधनिबंध एसेज ऑन सोशल ऑर्गनायझेशन अँड व्हॅल्यूज (१९६४) या ग्रंथात संकलित आहेत. त्यांची इतर उल्लेखनीय ग्रंथरचना अशी : इकॉनॉमिक्स ऑफ द न्यूझीलंड माओरी (१९२९), मॅन अँड कल्चर : ॲनइव्होल्यूशन ऑफ द वर्क ऑफ मॅलिनोस्की (संपा. १९५७), सिंबल्‌स : पब्लिक अँड प्रायव्हेट (१९७३) इत्यादी.

लेखक : नरेश परळीकर,रामचंद् मुटाटकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/21/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate