অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वास्टेक

वास्टेक

मेक्सिकोमधील एक इंडियन जमात. तिची वस्ती प्रामुख्याने पानूको नदीच्या खोऱ्यात आढळते. याशिवाय काही वास्टेकसान ल्वीस पोटोसी आणि व्हेराक्रूझ येथे राहतात. स्पॅनिश वसाहतवाद्यांचा मध्य अमेरिकेत प्रवेश होण्यापूर्वी केव्हातरी वास्टेक मूळ माया लोकांपासून अलग झाले; तेव्हापासून सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या त्यांनी आपले वेगळेपण जतन केले आहे. ते सुरुवातीस माया बोली भाषा बोलत होते; तथापि त्यांच्या भाषेत पोटोसीनो आणि व्हेराक्रूझनो हे दोन पोटभेद आहेत. वास्टेक ही बोलीभाषाही यांच्यात रूढ असून तीत बायबलमधील काही भाग तसेच काही कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.

वास्टेकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून ते स्थलांतरित शेती करतात. मका हे त्यांचे मुख्य पीक असून ते घेवडा, भोपळा, तीळ, रताळे इ. पिके घेतात. कॉफी आणि घायपात (हेनेक्केन वाख) ही त्यांची नगदी पिके असून काही वास्टेक जंगलातील कंदमुळे व फळे गोळा करून उदनिर्वाह करतात. ते हेनेक्केन वाखाच्या धाग्यांपासून चटया, पिशव्या, दोर, टोपल्या, टोप्या विणतात. यांशिवाय कुक्कुटपालन आणि गुरेपालन हे व्यवसायही करतात. स्त्रिया मातीची भांडी बनविणे आणि कशिदाकाम हे जोडधंदे करतात. स्त्री-पुरुष वैविध्यपूर्ण कपडे वापरतात. स्त्रिया प्रामुख्याने गुडघ्यापर्यंत घागरा घालतात आणि त्यावर कमरबंध बांधतात. उत्सव-समारंभाच्या वेळी ते पारंपरिक पद्धतीचे कपडे घालतात. बाप्तिस्मा, दृढीकरण, लग्न-विधी इ. धार्मिक संस्कारांच्या वेळी धर्मपिता निवडतात. धर्मपित्यांची मुले एकाच कुळातील मानण्यात येतात आणि त्यामुळे त्यांच्यात विविवाह-धी निषिद्ध मानला जातो. वास्टेकांत अद्यपि काही पेगन चालीरीती असल्या आणि जादूटोणा व भूतपिशाच यांवर त्यांची श्रद्धा असली, तरी बहुसंख्य वास्टेकांनी रोमन कॅथलिक धर्म अंगीकारला आहे. संतांचे स्मृतिदिन ते पाळतात.

आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचा त्यांच्या जीवनमानावर म्हणावा तसा प्रभाव आढळत नाही. मात्र वास्टेकन संगीत आणि नृत्य यांचा मेक्सिकोतील लोकसंगीतावर प्रभाव पडल्याचे दिसते.

संदर्भ :1. Wauchope, Robert, Ed. Handbook of Middle American Indians, Vol III, Texas, 1970.

2. Wauchope, Robert, Lost Tribes and Sunken Continents : Myth and Method in the Study ऑफ American Indians, Chicago, 1962.

लेखिका : सु. र. देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate