অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संसी

संसी

वायव्य भारतातील एक जिप्सीसदृश भटकी जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने पंजाब व राजस्थान या राज्यांत असून हरयाना, दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र इ. राज्यांतून ती विखुरलेली आहे. लोकसंख्या १,२६,३७७ (१९८१). संसी, सांसी, सहंसी, सहसी, संसिया, भेडकूड, मनेशा, भांटू अशा भिन्न नावांनी तिचा उल्लेख केलेला आढळतो. ही पूर्वीची बिटिशांनी गुन्हेगार म्हणून ठरविलेली जमात होय. तिचे बेडिया जमातीशी काही बाबतींत साधर्म्य आहे. हे लोक जाटांचे अनुकरणही करतात. प्रदेशपरत्वे त्यांच्या चालीरीतींत, धार्मिक विधींत, राहणीमानात आणि कामधंदयांत फरक आढळतो. बहुतेक संसी हे मोलमजुरी करणारे असून क्वचित काही शेतमजुरीही करतात. त्यांच्या स्त्रियाही मोलमजुरी करतात. काही संसी अवैध उदयोगात गुंतल्याचे दाखले मिळतात; तर काही संसी स्त्रिया वेश्याव्यवसाय करतात. संसी ही त्यांची बोलीभाषा इंडो-आर्यन भाषासमूहातील आहे.

संसी स्वतःला राजपुतांचे वंशज समजतात. भरतपूरच्या सांस मल्ल याला ते आपला पूर्वज व गुरू मानतात आणि संसी शब्दाची व्युत्पत्ती त्याच्या नावाशी जोडतात; तर राजस्थानातील संसी स्वतःला सहस्रबाहू या पुराणपुरूषाचे वंशज मानतात. त्यांचे महला (मह्‌ता) व बेह्‌डू (बीडू) असे दोन प्रमुख बहिर्विवाही गट असून त्यांत पुन्हा तेवीस बहिर्विवाही कुळी आहेत. त्यांतही अनेक उपकुळी आढळतात. बहुतेक संसी हिंदू वा शीख धर्मीय असून काही राधा सोआमी या पंथाचे अनुयायी आहेत. गंगानगरमध्ये त्यांचे सच सैदा मंदिर आहे. पंजाबात ते गुगा किंवा गुग्गा पीर याची पूजा करतात. गुगा ही मूळ नागदेवता होती. शिवाय घंसाळ (राजस्थान) येथे त्यांच्या पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले एक मंदिर आहे. हिंदू संसी शिव, पार्वती, हनुमान, दुर्गा आदी देवतांना भजतात. होळी, दिवाळी, दसरा इ. सण ते साजरे करतात. गिढा आणि भांगडा ही त्यांची प्रमुख लोकनृत्ये होत. ज्वालामुखी व कालिका या मातृदेवतांना त्यांच्यात विशेष महत्त्व आहे. त्यांच्या नैवेदयासाठी वेगळा भात करतात.

साधारणतः वयात आलेल्या मुलामुलींचे विवाह ज्येष्ठांकडून ठरविले जातात. बालविवाह क्वचित होतो. देज देण्याची रूढी असून मेंढा हा प्रमुख प्राणी त्यासाठी निवडतात. लग्नानंतर त्याचा बळी देतात. सप्तपदी हा लग्नातील प्रमुख विधी होय; मात्र शीख धर्मीय संसी आनंद करज विधीनुसार लग्न लावतात. संसीत पितृसत्ताक कुटुंबपद्धती असून पित्याची संपत्ती त्याच्या मृत्यूनंतर सर्व मुलांत वाटण्यात येते. संसीची पंचायत समिती असून बहुतेक पंच वंशपरंपरागत निवडले जातात. कुळीच्या पंचायतीत भांडणतंटयांचा निर्णय होतो व गुन्ह्यानुसार दंड वा शिक्षा ठोठावतात. संसी मांसाहारी असले, तरी गोमांस निषिद्ध आहे. शिळ्या चपात्या वाळवून त्याचे तुकडे करून गूळ घालून ते पक्वान्न म्हणून खातात. त्यांच्याजवळ शिकारी कुत्री, तसेच शेळ्या-मेंढया असतात. त्यांचे अंत्यसंस्कार हिंदु-शिखांप्रमाणे असून मृताला अग्नी देतात, क्वचित पुरतात. मृताशौच दहा दिवस पाळतात. बाराव्या दिवशी गोडाचे जेवण करून श्राद्ध घालतात. विविध राज्यशासनांनी त्यांना घरे बांधून दिली असून त्यांच्या वस्तीत शाळाही काढल्या आहेत. याशिवाय आरोग्यविषयक सुविधा आणि कुटुंबकल्याण योजना कार्यवाहीत आणल्या आहेत. विमुख जाती युवा कल्याण समितीसारख्या स्वयंसेवी संस्था त्यांच्या कल्याणार्थ कार्यरत आहेत. त्यामुळे ते स्थिर जीवनाकडे वळले असून त्यांच्यातील गुन्हेगारीही कमी झालेली आहे व शिक्षणाचा प्रसारही होत आहे.

संदर्भ : 1. Fuchs, S. At The Bottom of Indian Society, New Delhi, 1981.

2. Sher, Sher Singh, Sansis of Punjab, Delhi, 1965.

लेखिका : दुर्गा भागवत

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate