অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बलवडीचे क्रांती स्मृती वन ठरतंय युवकांचं प्रेरणास्थान

काही माणसं अवलिया असतात. ध्येय प्राप्तीसाठी ते कोणत्याही आव्हानांचा सामना करतात. अनेक अडचणींवर मात करतात. स्वतःसाठी काही घेण्यापेक्षा आपण पुढच्या पिढीला काय देतोय, याचा विचार करतात. आजच्या काळात जेव्हा केवळ स्वार्थच बोकाळला असताना, अशा माणसांची ही निष्ठा पाहून खरोखरच नतमस्तक व्हायला होतं. असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथील अवघे सत्तरीतले तरूण भाई संपतराव पवार.

भारत देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली. भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी घरदार, संसाराला तिलांजली देऊन आपले बलिदान दिले. त्यांच्या त्यागातून, बलिदानातूनच 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वातंत्र्य झाला. या स्वातंत्र्यवीरांना वंदन करण्यासाठी आणि त्यांचा आदर्श समाजाच्या डोळ्यासमोर राहावा, यासाठी स्वातंत्र्य चळवळीत केंद्रबिंदू ठरलेल्या कुंडलजवळच्या बलवडी (भा.) ता. खानापूर येथे भाई संपतराव पवार यांनी येरळाकाठी क्रांती स्मृती वन निर्माण केले. हे क्रांती स्मृती वन युवकांसाठी प्रेरणास्थान बनत आहे. येथील वृक्षच येथे भेट देणाऱ्यांना देशातील क्रांतिकारकांचा इतिहास सांगत आहेत.

असा झाला क्रांती वनाचा जन्म

सन 1942 मध्ये महात्मा गांधींनी 'करेंगे या मरेंगे' अशी गर्जना केली. अन् तेथूनच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यलढ्याचे तेजस्वी पर्व सुरु झाले. या तेजस्वी पर्वाचा सुवर्ण महोत्सव 1992 ला साजरा करण्याची घोषणा शासनाने केली. मात्र, नेमके याचवेळी सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या प्रारंभीच जानेवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात इस्लामपूर, शिराळा, कागल येथे लागोपाठ रस्त्यांवर व वर्गात मुलींचे एकतर्फी प्रेमातून खून झाले. 1942 च्या चळवळीचे वाळवा हे प्रमुख केंद्र होते. 50 वर्षांपूर्वीचा येथील तरुण देशासाठी सर्वस्व अर्पण करणारा होता. पण एकतर्फी खुनाच्या पार्श्वभूमिवर बहकलेला, भरकटलेला तरुण समाजासाठी दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनला होता. जयंतराव टिळक, मुकुंदराव किर्लोस्कर, साथी बा. न. राजहंस, शरदचंद्र गोखले आदि मंडळींनी 'क्रांती स्मृती वन महाराष्ट्र व्यासपीठ' या नावाने संघटन करुन विभागवार क्रांतिकारकांच्या नावे एक-एक वृक्ष लावून क्रांतिकारकांच्या स्मृतीची ज्योत युवकांच्या अंतःकरणात प्रज्ज्वलित व्हावी व त्यांचे मन 'वन, पर्यावरण आणि सामाजिक संतुलन' साध्य करावे, अशी संकल्पना पुढे आली. अन् त्यातूनच क्रांती स्मृती वनाचा जन्म झाला.

28 जानेवारी 1992 रोजी तत्कालिन जिल्हाधिकारी सुमित मल्लिक यांची उपस्थिती ग. प्र. प्रधान यांच्या हस्ते आणि सांगली व सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या सहभागाने समरगीते गात-गात 22 हुतात्म्यांचे स्मृतीवृक्ष भर उन्हाळ्यात लावण्यात आले. उन्हाळा असला तरी तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन दिले. निसर्ग प्रतिष्ठान, सांगली या संस्थेने केलेल्या कामास डेको चॅरिटेबल ट्रस्ट, इचलकरंजी आणि वेरळा विकास प्रकल्प या संस्थांनी कामाचा वेग कायम ठेवण्यासाठी स्वप्नवत सहकार्य केले. त्यामुळे कामाचा वेग कायम राहिला. जून ते ऑगस्ट 93 पर्यंत अक्षरश: हजारो मुलींनी श्रम व नारळाच्या किंमती एवढा निधी देऊन दहा लाख रूपयापेक्षा अधिक खर्चाचे काम अल्पावधीत केले. गडचिरोली, वर्धा, अमरावती, औरंगाबाद, पुणे, मुंबई, बेळगाव येथून येऊन लोकांनी क्रांतिकारकांचे स्मृतीवृक्ष लावले. असंख्य मान्यवर विचारवंतांनी स्मृतीवनास भेटी दिल्या, मार्गदर्शन केले.

लोकसहभागातून साकारले क्रांती स्मृती वन

खानापूर तालुक्यातील बलवडी-तांदुळवाडीच्या खडकाळ जागेची स्मृती वनासाठी निवड करण्यात आली. संपतराव पवार या ध्येयवेड्या माणसाच्या पुढाकाराने परिसरातील ग्रामीण भागातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे विद्यार्थी, लोकसहभाग यांच्या श्रमदानातून 'बळीराजा' धरणातील गाळ उपसून खडकाळ माळाचे मळ्यात रूपांतर केले. विविध सामाजिक संस्थाही या कामात हिरिरीने सहभागी झाल्या. गडचिरोली, अमरावती, औरंगाबाद, पुणे, मुंबई, बेळगाव येथून येऊन लोकांनी क्रांतिकारकांचे स्मृती वृक्ष लावले. वनराई फुलत गेली. लोकप्रतिनिधीही या कामात सहभागी झाले. त्यांच्या स्थानिक विकास निधीचा वापर करण्यात आला. वर्षा-दोन वर्षातच स्मृती वनाचे रूप पालटले. क्रांतीसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णासाहेब शिंदे, भाई उद्धवराव पाटील आदिंची छोटी - छोटी स्मारकं उभारली. नुसती झाडे लावून देशप्रेम निर्माण होणार नाही तर हे ठिकाण युवकांचे स्फूर्तीस्थान बनावे, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. राज्यातील कानाकोपऱ्यातील मान्यवर विचारवंतांनी येथे भेटी दिल्या, विचारमंथन केले. अनेक विषयांवर चर्चासत्रे, परिसंवाद होऊ लागले.

परिवर्तनाच्या प्रक्रियेत सामील होण्याची उर्मी तयार करावी, जातीवंत परिवर्तकच मुलांच्या पुढे ठेवावे, ग्रामीण युवकांवर विशेष भर देण्यात यावा, असे हेतू निश्चित करण्यात आले. यासाठी माध्यम म्हणून श्रमशक्तीचे संकलन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती सामुदायिक जीवनाची अनुभूती स्वातंत्र्यचळवळीचे सिंहावलोकन, समाजपरिवर्तकांची महती याचा वापर करण्यात आला. या सर्व प्रयत्नांमागचे उद्दिष्ट मानवता धर्म महात्मा गांधी तत्त्वज्ञान व अन्य विविध तत्त्वज्ञानाचा अभ्यास, संत, समाजसुधारक, क्रांतिकारक व परिवर्तन चळवळीचा अभ्यास करून उद्याचा युवक प्रखर राष्ट्रवादी बनावा तसाच तो विश्वमानवही घडावा. नवा भारत घडविण्यासाठी नवा माणूस घडविण्याचा हा एक व्यापक प्रयत्न आहे. भारतात आनंदवन, शांतिवन आहेत तितक्याच ताकदीचे क्रांतीवन व्हावे असे एक स्वप्न समोर ठेवले होते.

क्रांती स्मृती वन प्रतिष्ठानचे विविध उपक्रम

क्रांतीवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व याचे बिजारोपण युवकात व्हावे, नव्या क्षमता आणि कौशल्य त्यांना प्राप्त व्हावे, श्रमसंकलन, सहजीवन अनुभूती, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आदी उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबविले जात आहेत. लोकसहभागातून ही कामे सुरु आहेत. क्रांतीकारकांचा जाज्ज्वल्य इतिहास मांडणारं हे क्रांती स्मृती वन नव्या पिढीसाठी निकोप सर्वसमावेशक स्फूर्ती केंद्र ठरेल यात तीळमात्र शंका नाही. मात्र हे होण्यासाठी स्मृतिवनाला खरी गरज आहे ती लोकसहभाग अन् मदतींच्या हाताची.

लेखक - दीपक पवार,

सांगली.

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 4/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate