Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 18:18:22.784821 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक संकल्पना व संज्ञा / आधुनिक समाजातील विवाहसंस्था
शेअर करा

T3 2019/10/17 18:18:22.791881 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 18:18:22.895251 GMT+0530

आधुनिक समाजातील विवाहसंस्था

आधुनिक समाजातील विवाहसंस्था या विषयक माहिती.


दुसऱ्या महायुद्धानंतर आधुनिक यूरोपीय व अमेरिकन समाजातील विवाहसंस्थेमध्ये क्रांतिकारी बदल घडून येऊ लागले. जगभराच्या पारंपरिक समाजांतील विवाहसंस्था आधुनिकतेच्या दबावामुळे कोणत्या दिशेने जाण्याची शक्यता आहे, याचे आकलन होण्याच्या दृष्टीने आधुनिक समाजातील विवाहसंस्थेचे आजचे स्वरूप समजावून घेणे अगत्याचे आहे.

एकोणीसाव्या शतकात औद्योगिक क्रांतीच्या परिणामी झपाट्याने घडून आलेले औद्योगिकीकरण; उदारमतवादी, व्यक्तिनिष्ठ व समतावादी सामाजिक विचारसरणी तसेच लोकशाहीवादी राजकीय विचारप्रणाली यांच्या प्रभावामुळे यूरोपीय समाजव्यवस्थेला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले. कारखानापद्धतीची उत्पादनव्यवस्था, नागरीकरण, वाढती भौगोलिक आणि सामाजिक चलनशीलता या सामाजिक पर्यावरणात सरंजामशाही व्यवस्थेतील प्रस्थापित विस्तारित कुटुंबास तडे जाऊन त्या जागी पती, पत्नी आणि फक्त अविवाहित मुले असा मर्यादित आकार असलेली प्रारंभिक वा केंद्रस्थ कुटुंबव्यवस्था अस्तित्वात आली व त्यास अनुकूल अशी विवाहसंस्था आकारास आली.

कारखानापद्धतीच्या उत्पादनव्यवस्थेमुळे कुटुंबास उत्पादनव्यवस्थेत स्थान उरले नाही, परिणामी कुटुंबातील मिळवत्या व्यक्तींना अर्थार्जनासाठी कुटुंबाबाहेर पडावे लागले. स्त्रीपुरुष समानतेच्या विचारसरणीमुळे स्त्रिया घराचा उंबरठा ओलांडून कुटुंबाबाहेरील जगात स्वतंत्रपणे अर्थार्जन करू लागल्या. त्यामुळे त्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर घराबाहेर पडून नोकरी अथवा अन्य व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. आधुनिक काळात व्यवसायाची सर्व क्षेत्रे स्त्रियांना उपलब्ध झाली आहेत व व्यावसायिक जगात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्याची स्वाभाविक व रास्त अपेक्षा स्त्रियांच्या ठायी निर्माण झाली आहे. परंपरेने त्यांच्याकडे चालत आलेली कुटुंबातील गृहिणीची भूमिका त्या तुलनेत आता दुय्यम व कमी महत्त्वाची ठरते आहे. घरकामात साहाय्यभूत होणारी अनेक यंत्रोपकरणे आता गृहिणीला सहज उपलब्ध झाली आहेत, तसेच डबाबंद व तयार अन्नपदार्थांच्या उपलब्धतेमुळे घरकामाचा ताण खूपच कमी झाला आहे. पतीच्या बरोबरीने आपणही नोकरी अथवा विविध व्यवसाय करून अर्थार्जन करतो, तेव्हा पतीने आपल्या बरोबरीने घरकामाची व बालसंगोपनाची जबाबदारी उचलावी, अशी रास्त अपेक्षा आधुनिक समाजातील स्त्री करू लागली आहे. त्यामुळे आधुनिक समाजातील कुटुंब हे पितृसत्ताक राहिले नसून समसत्ताक झाले आहे. मूल केव्हा व्हावे व किती मुले व्हावीत, याविषयीचे निर्णय घेण्याची क्षमता व स्वातंत्र्य आधुनिक समाजातील स्त्रीला प्राप्त झाले आहे. कुटुंबनियोजनाच्या प्रभावी साधनांच्या उपलब्धतेमुळे मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे तिला शक्य झाले आहे. लैंगिक सुख आणि मातृत्व यांची निसर्गाने जी सांगड घातली होती, ती आता प्रजननाच्या शास्त्रीय ज्ञानाने व संततिनियमनाच्या साधनांच्या क्रांतीमुळे तुटली आहे. मूल न होऊ देता लैंगिक सुखाचा उपभोग घेणे आधुनिक समाजातील स्त्री-पुरुषांना आता शक्य झाले आहे. त्यामुळे लैंगिक सुखासाठी विवाहाची आवश्यकता राहिली नाही. व्यक्तिनिष्ठ समाजरचनेमुळे सामाजिक नियंत्रणाची भीतीही आता उरली नाही. या सर्व घडामोडींचा भलाबुरा प्रभाव आधुनिक समाजातील विवाहसंस्थेवर पडणे अटळ व स्वाभाविकच आहे.

आधुनिक समाजात एकपतिपत्नीकत्व पद्धती आता रूढ झाली आहे. यूरोप-अमेरिकेतील आधुनिक समाज ख्रिस्ती धर्मीय असल्यामुळे एकपतिपत्नीकत्वाची ही एकमेव धर्मसंमत पद्धती या समाजात अस्तित्वात आहे. व्यक्तिवादी विचारसरणी आणि स्त्री-पुरुष समानता या मूल्यांच्या निकषावर हीच पद्धत टिकू शकते. आधुनिक विवाहसंस्थेत जोडीदाराच्या निवडीचे स्वातंत्र्य वयात आलेल्या मुलामुलींना दिले जाते. आईवडिलांनी व ज्येष्ठ आप्तेष्टांनी मुलामुलींचा विवाह जमविण्याची पद्धती आता आधुनिक समाजातून जवळजवळ नामशेष होत चालली आहे. ह्याचे महत्त्वाचे कारण नागरी समाजातील प्रचंड गतिमान अशा भौगोलिक व सामाजिक चलनशीलतेत आढळून येते. त्यामुळे नागरी समाजात शेजार असा उरला नाही. आधुनिक कुटुंबात पती, पत्नी आणि स्वतःची अविवाहित मुले यांखेरीज अन्य नातेवाईकांना स्थान नाही. या सर्वांचा परिणाम मुलामुलींचे विवाह त्यांच्या आईवडिलांनी व आप्तेष्टांनी जुळविण्याची पद्धत जवळजवळ कालबाह्य होण्यात झाला आहे व त्या जागी प्रणयनिर्भर प्रेमभावनेच्या निकषावर युवकयुवतींनी आपापले विवाह जमविण्याची पद्धत अस्तित्वात आली आहे. ही पद्धत साधारणपणे सर्वच आधुनिक समाजांत रूढ असली, तरी विशेषत्वाने अमेरिकन समाजात प्रणयनिर्भर प्रेमाच्या अधिष्ठानावर विवाह जुळवण्याला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाल्याचे आढळून येते. प्रणयभावनेच्या एकमेव निकषावर आधारलेले विवाह हे अस्थिर असण्याची व त्याची परिणती शेवटी घटस्फोटात होण्याची शक्यता जास्त असते. या विवाहपद्धतीच्या टीकाकारांच्या मते, वैवाहिक जीवनास स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या पतिपत्नीच्या समान आवडीनिवडी, समान सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी या व्यावहारिक बाजू लक्षात न घेता केवळ प्रेमभावनेच्या एकमेव आधारावर विवाह जमविणे हे अवास्तव आहे. अमेरिकन संस्कृतीत प्रकटपणे प्रेमभावनेखेरीज अन्य व्यावहारिक महत्त्वाच्या बाबींना विवाह जमविण्याच्या वेळी नगण्य स्थान देण्यात येत असले, तरी अप्रत्यक्षपणे बहुतेक तरुणतरुणींचे विवाह समान वंश, तसेच समान आर्थिक व सामाजिक दर्जा यांच्या पार्श्वभूमीवर होताना दिसतात. ह्याचाच अर्थ, प्रणयनिर्भर प्रेमभावना ही अगदीच स्वच्छंदपणे अस्तित्वात येत नसून, सामान्यतः सामाजिक संरचनेच्या चौकटीतच तिचा मार्ग आखला जातो.

विवाह जुळविण्यात आईवडील व आप्तेष्ट यांना उघड स्थान नसल्यामुळे युवक-युवतींच्या संकेतभेटीची (डेटिंग) नवी प्रथा आधुनिक समाजात रूढ झाली आहे. या प्रथेमुळे युवक-युवतींना एकत्र येण्याची संधी लाभते व त्यातून परस्परांना अनुरूप वाटणाऱ्या तरुणतरुणींचे विवाह ठरण्याची शक्यता अधिक असते. अशा भेटींमुळे तरुणतरुणींना एकमेकांची ओळख करून घेण्याची, तसेच आवडीनिवडी जाणण्याची संधी प्राप्त होते व त्यातून त्यांचे विवाह जुळतात. ह्या प्रकारात तरुणतरुणींच्या आईवडिलांना प्रकटपणे काही स्थान नसले, तरी अप्रत्यक्षपणे आपली पसंती-नापसंती ते आपल्या मुलामुलींच्या लक्षात आणून देऊन आपल्या पाल्याच्या वैवाहिक जोडीदाराच्या निवडीवर प्रभाव पाडू शकतात. तथापि या विवाहपद्धतीत संभाव्य असलेल्या अस्थेर्यावर आईवडिलांच्या अप्रत्यक्ष प्रभावाचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही.

आधुनिक समाजात वैवाहिक जोडीदाराच्या निवडीचे जास्तीत जास्त स्वातंत्र्य युवक-युवतींना दिले जाते. अगम्य आप्तसंबंध-निषेधाचा एकमेव नियम सोडल्यास, बाकी कोणताही नियम पाळणे आधुनिक समाजात बंधनकारक नाही. व्यावसायिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने सहभागी होण्याची संधी स्त्रियांना प्राप्त झाल्यामुळे विवाहसमयीच्या वयात वाढ झाली आहे. आधुनिक समाजात विवाहपूर्व लैंगिक संबंध हे फारसे निषिद्ध मानले जात नसल्यामुळे लैंगिक सुख मिळविण्यासाठी विवाहाचे बंधन स्वीकारण्याची आवश्यकता युवा पिढीला जाणवत नाही. विवाह न करता तरुणतरुणींनी एकत्र राहण्याची पद्धत आधुनिक समाजात रूढ झाली आहे व अशा एकत्र राहणाऱ्या तरुणतरुणींना समाजाचा रोष सहसा पतकरावा लागत नाही. संततिनियमनाच्या साधनांच्या उपलब्धतेमुळे कुमारी माता बनण्याची पाळी युवतीवर सहसा येत नाही व तशी वेळ आल्यास अशा मुलांच्या संगोपनाचे कार्य करणाऱ्या अनेक संस्था उपलब्ध असल्यामुळे, तिची संगोपनाची तयारी नसल्यास ती आपल्या मुलाला अशा संस्थेच्या हवाली करू शकते. परंपरागत समाजामध्ये अनौरस संततीकडे तुच्छतेच्या नजरेने पहाण्यात येते; परंतु आधुनिक समाजात सामाजिक नियंत्रण प्रभावी नसल्यामुळे व परंपरागत नीतिमत्तेच्या कल्पनांचा जनमानसावरील प्रभाव क्षीण झाल्यामुळे अशा अनौरस संततीला समाजाच्या रोषास तोंड द्यावे लागत नाही. त्याचप्रमाणे स्त्रीपुरुष समानतेच्या कल्पनेमुळे स्त्री कायमचे वैवाहिक बंधन न स्वीकारता मुलास जन्म देऊ शकते व त्याचे संगोपनही आधुनिक समाजात स्वतःच्या सामाजिक स्थानास धक्का लागू न देता करू शकते. या सर्व सामाजिक बदलांमुळे आधुनिक समाजातील विवाहसंस्था दुर्बल झाली आहे. व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना पराकोटीला पोहोचल्यामुळे घराचे घरपण नाहीसे झाले आहे. घर हे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन परस्परांशी सहकार्य करून भौतिक व भावनिक समाधान मिळविण्याचे ठिकाण, असे घराचे स्वरूप न राहता ती एक भावनाशून्य वास्तू झाली आहे. या सर्वांचा परिणाम विवाहसंस्थेशी निगडित असलेल्या तीन प्रमुख समस्यांच्या निर्मितीत झाल्याचे दिसते. ह्या समस्या म्हणजे घटस्फोट, जननदराचे घटते प्रमाण आणि पालक-युवक संघर्ष या होत.

घटस्फोट

घटस्फोटाची समस्या अनेक समाजात अस्तित्वात असली, तरी आधुनिक पाश्चात्य समाजांत दुसऱ्या महायुद्धानंतर घटस्फोटाच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. अमेरिकन समाजामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वसाधारणपणे तीन विवाहांपैकी दोन विवाहांची परिणती घटस्फोटात होऊ लागली. वाढते औद्योगिकीकरण व नागरीकरण, भौगोलिक आणि सामाजिक चलनशीलतेचा प्रचंड वेग, धर्माचा समाजमानसावरील घटता प्रभाव व घटस्फोटाकडे पाहण्याचा न्यायसंस्थेचा उदार दृष्टिकोन या कारणांनी घटस्फोटांच्या संख्येत बेसुमार वाढ झाली. औद्योगिकीकरणाच्या वाढत्या वेगामुळे आर्थिक उत्पादनाचे एक केंद्र या नात्याने कुटुंबाचे असलेले महत्त्व झपाट्याने नाहीसे होत चालले आहे. परिणामस्वरूप कुटुंबातील गृहिणी मोठ्या संख्येने नोकरी अथवा व्यवसाय करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत व त्यांचे पतीवरील आर्थिक अवलंबित्व कमी झाले असून, त्या आता आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाल्या आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे समाजाचे एकजिनसी स्वरूप बदलून ते बहुजिनसी होते. सामाजिक संबंध औपचारिक व दुय्यम स्वरूपाचे होतात. त्यामुळे सामाजिक नियंत्रणाचा दबाव कमी झाल्याने, घटस्फोटितांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अधिक सौम्य व उदार बनतो. तसेच विवाहबंधनाकडे धार्मिक भावनेतून पाहिले न जाता केवळ एक सामाजिक करार म्हणून पाहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने घटस्फोटावर धर्माचे नियंत्रण उरलेले नाही. तद्वतच न्यायसंस्थेच्या घटस्फोटाबाबतच्या उदार दृष्टिकोणामुळे घटस्फोट घेणे ही बाब आता अधिक सुलभ झाली आहे. परस्परसंमतीने घटस्फोट घेणाऱ्यांची संख्याही खूप वाढली आहे. पूर्वी घटस्फोट घेणारांना जसे सामाजिक टीकेस तोंड द्यावे लागत होते, तशी परिस्थिती आता आधुनिक समाजात राहिलेली नाही. त्यामुळे जगभरच्या सर्वच आधुनिक समाजांत घटस्फोटाचे प्रमाण खूपच वाढले आहे.

जननदराचे घटते प्रमाण

विवाहसंस्थेत होत असलेल्या परिवर्तनांमुळे आधुनिक समाजातील जननदराचे प्रमाण घटत चालले आहे. प्रजननाच्या शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार, संततिनियमनाच्या परिणामकारक साधनांची सहज उपलब्धता आणि स्त्रियांमध्ये व्यावसायिक क्षेत्रात आपणही आपले स्वतंत्र स्थान निर्माण करावे अशी वाढत चाललेली आकांक्षा यांमुळे आधुनिक समाजातील स्त्री स्वतःला एक किंवा दोन पेक्षा जास्त मुले होणार नाहीत, ह्याची खबरदारी घेत असते. निपुत्रिक विवाहित जोडप्यांना घटस्फोट घेण्यात फारशा अडचणी येत नसल्यामुळे, विवाहानंतर आपले पटत नाही किंवा आपली जोडीदाराची निवड चुकली असे लक्षात आल्यास आपणास मूल न होऊ देण्याची खबरदारी स्त्री घेऊ लागली आहे. या सर्व कारणांमुळे आधुनिक समाजातील जननदरात घट होऊ लागली आहे. संततिनियमनाचा अवलंब गरीब जनतेपेक्षा मध्यमवर्गीय व जास्त सधन वर्गात अधिक प्रमाणात होत असल्याने या वर्गाच्या आकारात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या मुलांचे पालनपोषण चांगल्या तऱ्हेने करण्याची क्षमता ज्या सामाजिक वर्गात आहे, त्यातील लोकांचाच कल स्वतःस कमीत कमी मुले होऊ देण्याकडे आहे. ह्याचा घातक परिणाम समाजातील भावी पिढीच्या पालनपोषणावर व गुणवत्तेवर होऊ शकतो.

पालक आणि युवापिढीतील संघर्ष : पारंपरिक कुटुंबप्रमुखाच्या तुलनेत आधुनिक कुटुंबातील प्रमुख हा आपले परंपरागत अधिकार गमावून बसला आहे. औद्योगिक क्रांतीच्या परिणामी आधुनिक कुटुंबातील सदस्य अर्थार्जन करण्यासाठी स्वतंत्र झाले असल्याने त्यांचे कुटुंबप्रमुखावरील अवलंबित्व कमी झाले आहे. तसेच व्यावसायिक ज्ञान मिळविण्यासाठी मुले कुटुंबप्रमुखावर आता फारशी अवलंबून नसतात. युवापिढीला व्यावसायिक ज्ञान शाळा, महाविद्यालये, तांत्रिक शिक्षणसंस्था यांतून मिळू शकते. ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातील प्रचंड प्रगतीमुळे वडिलांच्या या क्षेत्रातील अधिकाराला पूर्वीच्या तुलनेत खूपच मर्यादा पडल्या आहेत. या सर्व परिवर्तनांचा परिणाम म्हणजे कुटुंबातील वडिलांच्या मुलावरील अधिकाराला तरुण पिढीकडून होत असलेला विरोध होय. आधुनिक कुटुंबात पालक आणि त्यांच्या तरुण मुलांमधील संघर्ष ही आता नित्याची बाब झाली आहे. अशा परिस्थितीत कुटुंब हे परस्परांच्या सहकार्याचे व भावनात्मक सहजीवनाचे केंद्र न राहता, ते संघर्षाचे व भावनाशून्य सहवासाचे केंद्र बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. विवाह न करता व कौटुंबिक जीवनाची जबाबदारी न उचलता तरुणतरुणींनी एकत्र राहण्याचा पाश्चात्य समाजातील वाढता प्रघात, हे त्याचे प्रत्यंतर आहे.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे परीक्षा-नलिकेद्वारा संततिप्राप्तीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जन्मदाता पिता वेगळा व पालनपोषण करणारा सामाजिक पिता वेगळा अशी परिस्थिती समाजात निर्माण होऊ लागली आहे. आधुनिक पाश्चात्य समाजात समलिंगी विवाहालाही मान्यता मिळते आहे. या सर्व घटनांमुळे परंपरागत विवाहसंस्थेच्या मुळावरच आघात होऊ लागले आहेत. त्यामुळे विवाह करून आपले कुटुंब स्थापन करणे व कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलांचे पालनपोषण करणे, ही मानवी जीवनातील अनिवार्य बाब न रहाता एक ऐच्छिक बाब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संदर्भ : 1. Askham, Janet, Identity and Stability in Marriage, Cambridge, 1984.

2. Bernard, Jessie, The Future of Marriage, London, 1982.

3. Blood Robert O. Marriage, New York, 1962.

4. Bowman, Henry A. Marriage for Moderns, New York, 1965.

5. Cherlin, Andrew J. Marriage, Divorce, Remarriage, Cambridge,1981.

6. Clark, D. Marriage,Domestic Life and Social Change, London, 1991.

7. Fortes, M. Ed., Marriage in Tribal Societies, Cambridge, 1962.

8. Goode, W. J. The Family, New Delhi, 1965.

9. Harlan, Lindsey; Courtright, Paul B. Ed., From the Margins of Hindu Marriage, London,1995.

10. kapadia, K. M. Marriage and Family in India, London, 1959.

11. Mace, D. R.; Mace, Vera, Marriage: East and West, London 1960.

12. Murdock, G. P. Social Structure, New York, 1949.

13. Stopes, Marie, Married Love, Calcutta, 1966.

14. Westermark, E. A. The History of Human Marriage, 3Vols., (5th Ed.), 1971.

15. Williamson, Robert C. Marriage and Family Relations, New York, 1965.

१६. जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास (आवृ. तिसरी), वाई, १९९६.

१७.राजवाडे,वि. का. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, पुणे १९७६.

लेखक: त्रि. ना. वाळुंजकर

माहिती स्रोत: ">मराठी विश्वकोश

2.83333333333
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 18:18:23.794827 GMT+0530

T24 2019/10/17 18:18:23.801722 GMT+0530
Back to top

T12019/10/17 18:18:22.606859 GMT+0530

T612019/10/17 18:18:22.691782 GMT+0530

T622019/10/17 18:18:22.772813 GMT+0530

T632019/10/17 18:18:22.773771 GMT+0530