Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/17 01:55:52.682377 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/17 01:55:52.686950 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/17 01:55:52.704372 GMT+0530

जेवणावळ

आप्तजन, मित्रपरिवार, शेजारीपाजारी अथवा गावकरी-मानकरी इत्यादींना निमंत्रणपूर्वक एकत्र बोलावून भोजन करणे म्हणजे जेवणावळ.

आप्तजन, मित्रपरिवार, शेजारीपाजारी अथवा गावकरी-मानकरी इत्यादींना निमंत्रणपूर्वक एकत्र बोलावून भोजन करणे म्हणजे जेवणावळ असे सामान्यपणे म्हणता येईल. हा एक सामाजिक आचार असून धार्मिक विधी आणि उत्सव, मंगलकार्य, ऋतुचक्राशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या घटना, आप्तभावाचे किंवा मित्रभावाचे संवर्धन, सामाजिक प्रतिष्ठेचे दिग्दर्शन, अशुभनिवारण इ. निमित्तांनी वा कारणांनी जेवणसमारंभ योजिले जातात. आदिम जातिजमातीपासून सर्व प्रगत समाजामध्ये कोणत्या तरी निमित्ताने जेवणावळीचा हा आचार रूढ आहे. त्यामागील उद्देशानुसार जेवणावेळीचे स्वरूप वेगवेगळे असते. जत्रा वा इतर उत्सवप्रसंगी सार्वजनिक स्वरूपाचे जेवणावळीचे कार्यक्रम केले जातात.

रोमन लोक शेतात पेरण्या करण्यापूर्वी जेवणावळ घालीत. ज्यू लोकांत मोझेसच्या उत्सावाच्या निमित्ताने व चिनी लोकांत राजाच्या सन्मानाप्रीत्यर्थ मेजवान्या आयोजित करीत. नवी पिके, फळे, भाज्या निघाल्यावर त्या त्या वेळी भोजनाचे कार्यक्रम करण्याची रूढी भारतातही आहे. गावजेवण हा भारतीय ग्रामजीवनाचा एक महत्त्वाचा आचारधर्म आहे. विवाहासारख्या मंगलप्रसंगी त्याचप्रमाणे जन्म, मृत्यू आदी संस्कारांचा एक भाग म्हणून जेवण घालण्याचा संकेत बहुधा सर्वत्र आढळतो. काही समाजांत गुन्हेगाराला शासन म्हणून त्याच्यावर जेवणावळीची सक्ती करण्यात येते. रोगनिवारणाचा उपाय म्हणूनही जेवणावळ घातली जाते. काही आदिम टोळ्यांत नवीन माणूस घेताना जेवणावळ घातली जाते. जेवताना कोणी कोठे बसावे, याबद्दलही संकेत असतात.

महाराष्ट्रात खासे पंगत, वरकड पंगत असे प्रकार प्रसिद्ध आहेत. तसेच ‘नाना फडणीशी बेत’ या नावाने पेशवेकालीन जेवणावळीचा प्रकार ओळखला जातो. इ. स. पू. तेराव्या शतकात आपल्या पूर्वजांना ईजिप्तमधून बाहेर पडावे लागले, या प्रसंगाची स्मृती म्हणून ज्यू लोक ‘पेसॉख’ (पास ओव्हर) हा धार्मिक उत्सव साजरा करतात. त्याचा एक भाग म्हणून  ‘सेडर’ ही विशिष्ट प्रकारच्या सामुदायिक भोजनाची प्रथा पाळली जाते. जेवणावळीवरून समाजातील सामंजस्य, समृद्धी, सौंदर्यदृष्टी इ. गोष्टींची कल्पना येऊ शकते. सामाजिक जीवनातील सौहार्द टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी जेवणावळीसारख्या आचारांचा फार उपयोग होतो. आधुनिक काळातही नोकरीतील बढती, पदवीप्राप्ती, पारितोषिकलाभ इ. नव्या निर्मित्तांनी जेवणाचे कार्यक्रम केले जातात.

पारंपरिक तसेच धार्मिक जेवणावळीचे स्वरूप नव्या परिस्थितीत अपरिहार्यपणे बदलत चालले आहे. आधुनिक काळात सामाजिक परिवर्तनाची एक प्रक्रिया म्हणून सहभोजनाचे कार्यक्रम केले जातात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्पृश्यास्पृश्यांची सहभोजने घडवून आणण्याच्या कार्यक्रमाचा पुरस्कार केला. अनंत हरी गद्रे यांनी त्यापासून स्फूर्ती घेऊन झुणका-भाकर सहभोजने सातत्याने घडवून आणली. भिन्नभिन्न धर्मांच्या व जातिजमातींच्या व्यक्तींनी या निमित्ताने एकत्र यावे, त्यांच्यातील सामंजस्य व एकोपा वाढावा आणि त्यातून जातिभेदादी अनिष्ट रूढी व समजुती नष्ट व्हाव्यात, असा नवा दृष्टिकोन या सहभोजनामागे आहे. त्यामुळे पारंपरिक पंक्तिप्रपंचाच्या किंवा पंक्तिभेदाच्या कल्पना हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आजही सहभोजनाचे प्रयोग वाढत्या प्रमाणात केले जात आहेत.

लेखिका: सुधा काळदाते

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

2.78947368421
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/17 01:55:52.981720 GMT+0530

T24 2019/06/17 01:55:52.987983 GMT+0530
Back to top

T12019/06/17 01:55:52.604217 GMT+0530

T612019/06/17 01:55:52.623216 GMT+0530

T622019/06/17 01:55:52.671970 GMT+0530

T632019/06/17 01:55:52.672690 GMT+0530