অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नेतृत्व

पुढारीपण

समूहाचे उद्दिष्ट प्राप्त करण्याकरिता अनुयायी म्हणविल्या जाणाऱ्या लोकांना एकात्मतेने वागण्यास उत्तेजन देणारी ही एक वागण्याची पद्धत आहे. नेतृत्वावर व्यक्तीचे गुणदोष, तिचे स्थान व त्यानुरूप घेतलेली भूमिक यांचा परिणाम होत असला, तरी ते सामान्यतः परिस्थितिनिर्मित असते. नेतृत्वाच्या परंपरागत विचारात शूरत्व किंवा मर्दुमकी हे व यांसारखे सार्वत्रिक गुणविशेष महत्त्वाचे ठरतात; पण नेतृत्वाचा विचार करताना परिस्थितीचाही विचार महत्त्वाचा असतो. सुप्त, कृतक तसेच वास्तविक अशा नेतृत्वातील फरकांचा विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे नेतृत्वाचे तंत्र व भूमिका यांतील भेद, नेतृत्वाची प्रक्षेपित प्रतिमा व अनुयायांचे स्वभाव आणि प्रतिसाद यांचाही अभ्यास आवश्यक ठरतो.

समान हितसंबंध किंवा ध्येय असणाऱ्या समूहाचे व व्यक्तीचे परस्परसंबंध नेतृत्वाद्वारे दिग्दर्शित होतात, असे काही लोक मानतात. नेतृत्वाच्या समाजशास्त्रीय व्याख्येतून सामान्यतः आनुवांशिक हक्क, रुढी व साहित्य–कलादी क्षेत्रांतील यश यांच्या आधारे अग्रेसर स्थान मिळविणाऱ्या लोकांना वगळण्यात येते. मॅकिआव्हेली, कार्लाइल यासारख्या विद्वानांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेल्या नेतृत्वावरील प्रबंधात नेतृत्वाच्या कल्पित क्षमतेवर व गुणविशेषांवर भर दिलेला आढळतो. पारंपरिक दृष्टिकोनाचा प्रभाव सैनिकी क्षेत्रात अजूनही टिकून असल्याचे दिसते. तथापि आधुनिक मानसशास्त्रीय व समाजशास्त्रीय अभ्यासात नेतृत्वातील व्यक्तींच्या व परिस्थितीच्या परस्पर संबंधांवर भर देण्यात येतो. नेतृत्वाच्या अभ्यासात चार गोष्टींचा विचार सामान्यपणे करण्यात येतो : (१) नेता−त्याची योग्यता; व्यक्तिमत्त्व व अधिकार; (२)अनुयायी−त्यांची योग्यता व अधिकार; (३) परिस्थिती−जिच्या संदर्भात नेता व अनुयायीसंबंध निर्माण होतात आणि (४) गटाचे उद्दिष्ट किंवा कार्य.

नेतृत्वाची भूमिका

सामूहिक उद्दिष्ट व सामूहिक जीवनाच्या दृष्टीने नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची आहे. समूहात एकजूट राखणे, तो सुस्थिर ठेवणे, समूहाच्या प्रयोजनास पोषक अशी कार्यविभागणी करणे, सर्व व्यक्तींमध्ये सुसंवाद साधणे व सर्वांचे समाधान करणे यांची जबाबदारी नेतृत्वावर असते. समूहावर बिकट प्रसंग आला असता त्यातून निभावून जाण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना आखणे, व्यक्तींना मार्गदर्शन करणे, त्यांच्या शक्ती कार्यान्वित करणे, व्यक्तींच्या आकांक्षांचा समूहाच्या मूलभूत प्रयोजनांशी मेळ घालून समूहाच्या रचनाबंधामध्ये समयोजनात्मक परिवर्तन घडवून आणण्यास हातभार लावणे इत्यादींसाठीही नेतृत्वाची आवश्यकता असते. हीच गोष्ट व्यापक समाजांनाही लागू आहे. रुढी व परंपरा यांमुळे काही समाजाची रचना सुबद्ध व सुस्थिर असते. अशा समाजांमध्ये व्यवसाय; धार्मिक श्रद्धा व समजुती तसेच आचार, नैतिक मूल्ये, भाषा इ. बाबतींत पोटसमाज (सब-सोसायटीज) असतात. त्यांचे संबंध सलोख्याचे, परस्परांना हितकारक व एकंदर समाजाच्या एकात्मतेस पोषक राहतील, हे पाहण्याचे कार्य समाजात मान्यता पावलेला वर्ग किंवा त्या वर्गाचे प्रतिनिधी करीत असतात. ज्या वेळी परिस्थितिजन्य कारणांमुळे तसेच समाजातील घटक वा वर्गांच्या बदलत्या आकांक्षा आणि वर्तन यांमुळे समाजाची पूर्वापार रचना असमाधानकारक ठरू पाहते, त्या वेळी तर लोकांच्या अभिवृत्तीत व वर्तनात बदलत्या परिस्थितीस अनुरूप असे परिवर्तन घडवून समाज अभंग राखण्यासाठी नेतृत्वाची आवश्यकता असते.

नेता या पदाची व्याख्या अनेक प्रकारे करण्यात येते. ‘नेता म्हणजे जिचा इतरांवर प्रभाव पडतो ती व्यक्ती’, अशी एक व्याख्या करण्यात आली आहे. परंतु नेता व अनुयायी यांच्यामध्ये एकतर्फी अन्योन्यक्रिया चालत नसून अनुयायांचाही प्रभाव नेत्यावर पडत असतो. हे लक्षात घेता, वरील व्याख्या असमाधानकारक ठरते. ‘समूहातील लोकप्रिय व्यक्ती म्हणजे त्या समूहाचा नेता’ ही व्याख्यादेखील समर्पक म्हणता येत नाही. कारण केवळ लोकप्रियता हे नेतृत्वाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून पुरेसे नाही. लोकप्रिय असलेली व्यक्ती लोकमान्य असतेच असे नाही. ‘समूहावर जिचे वर्चस्व असते ती व्यक्ती म्हणजे नेता’, ही व्याख्याही समर्पक म्हणता येत नाही. कारण एखाद्या व्यक्तीचे समूहावरील वर्चस्व त्याच्यावर लादलेले असू शकते किंवा समूहातील व्यक्तींच्या भीतीवर व लाचारीवर अधिष्ठित असू शकते. नेत्याचे वर्चस्व हे लोकांनी स्वेच्छेने स्वीकारलेले असते व त्याचे आदेश स्वीकार्य मानले जात असतात.

नेतृत्वाची व्याख्या अशा रीतीने केली पाहिजे की, तिच्या आधारे विवक्षित समूहाचा (वा समाजाचा) खराखुरा नेता कोण आहे, ते निश्चित करता येईल. अशा प्रकारची व्याख्या करावयाची झाल्यास प्रत्येक समूहाच्या मुळाशी काही एक प्रयोजन व प्रयोजने असतात; त्यांवर समूहाचा विविधांगी कार्य चालू असते, या गोष्टींवर भर दिला पाहिजे. समूहाकडे पाहण्याचा हा गतिप्रक्रियात्मक दृष्टिकोन स्वीकारून आर्‌. बी. कॅटेल याने नेत्याची जी व्याख्या सुचवली आहे, ती कोणत्याही समूहाच्या तसेच सामाजिक जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातील नेत्याला लागू पडेल, अशी आहे. ती व्याख्या अशी : ‘एकूण समूहाचा कार्यावर ज्या व्यक्तीचा निर्विवाद प्रभाव असतो, जी समूहामध्ये परिवर्तन घडवून आणू शकते, जिच्यामुळे समूहाचे मनोबल व एकंदर समूहशक्ती टिकून राहते आणि जी समूहाच्या अभिवृत्तीमध्ये (व परिणामी वर्तनात) बदल घडवून आणू शकते, ती व्यक्ती म्हणजे त्या समूहाचा नेता होय’. या व्याख्येशी पुढील व्याख्याही जुळती आहे: ‘नेता म्हणजे समूहास त्याच्या उद्दिष्टांप्रत व उत्कर्षाप्रत नेणारी, त्यासाठी मार्गदर्शन करणारी, मार्गातील अडचणींचे निराकरण करू शकणारी व समूहाकडून योग्य ते कार्य करून घेऊ शकणारी श्रेष्ठ दर्जाची व्यक्ती’.

नेतृत्वाचे प्रकार

सुप्रसिद्ध जर्मन समाजशास्त्र माक्स वेबर याने नेतृत्वाचे तीन प्रकार वर्णन केले आहे : (१) पारंपरिक रीत्या चालत आलेले, (२) विभूतिरुप वा दैवी गुणमूलक आणि (३) कायद्यावर अधिष्ठित असलेले. अखंड व अबाधित अशी परंपरा असलेल्या समाजात वय, लिंग, वर्ग किंवा जात, व्यवसाय, सामाजिक वा राजकीय स्थान इत्यादींनुसार काही व्यक्तींकडे नेतृत्व सोपविले जात असते. अशा व्यक्तींच्या ठिकाणी नेतृत्वास आवश्यक असलेले गुण मूलतः नसले, तरी नेतृत्व करता करता काही गुण ते संपादन करू शकतात. ह्या परंपरासिद्ध नेतृत्वास लोक मान तुकवतात खरे; परंतु हे नेतृत्व पूर्णपणे सक्षम असतेच असे नाही. बदलत्या परिस्थितीत तर त्याची अकार्यक्षमता विशेषच उघड होते. जेव्हा समाजजीवन अस्थिर होत असते किंवा अत्यंत कठिण प्रसंग निर्माण झालेले असतात, अशा वेळी जे नेतृत्व उदयास येते, ते समाजाची स्थिती सावरीत असते. अशा नेतृत्वाच्या ठिकाणी सामान्यजनांना अलौकिकत्व व दिव्यत्वाचे दर्शन होते व त्यांची गणना ईश्वरी अवतार किंवा प्रेषित म्हणून होऊ लागते. या प्रकारच्या नेतृत्वास वेबरने ‘दैविक नेतृत्व’ ही संज्ञा दिली. हे नेतृत्व चिरकाल नसते व सातत्याने टिकणारे नसते. याउलट लोकांनी सुबुद्धपणे स्वीकारलेले व व्यक्तीच्या गुणांवर तसेच कायद्यावर आधारलेले नेतृत्व समाजास सातत्याने उपलब्ध होऊ शकते.

मार्टिन कॉनवे याचे नेतृत्वाचे वर्गीकरण

मार्टिन कॉनवे याने नेतृत्वाचे वर्गीकरण पुढील प्रकारे केले आहे: (१) लोकांच्या आकांक्षा समजून घेऊन त्यांना वाचा फोडणारे नेतृत्व,(२) समूहाचे प्रतिनिधी म्हणून कार्य करणारे नेतृत्व, (३) समूहाच्या इच्छांबरोबरच समूहाच्या हिताचा विचार करणारे आणि त्या दृष्टीने कार्यक्रम आखणारे समूह−संघटक नेतृत्व व (४) नवीन विचार प्रसृत करून त्यास अनुसरणारा समूह निर्माण करणारे नेतृत्व.

नेत्यांच्या संभाव्य उद्दिष्टांना अनुलक्षून (१) आहे तीच समाजव्यवस्था टिकवून धरू पाहणारे व (२) समाजव्यवस्थेत बदल घडवून आणू पाहणारे, असेही नेतृत्वाचे वर्गीकरण काहींनी केले आहे.

काही मानसशास्त्रज्ञांनी अनेक दृष्टिकोन एकत्र करून नेतृत्वाचे पुढील प्रकार सुचविले आहेत : (१) परंपरा−निर्धारित नेतृत्व, (२) दैवी गुणांनी वा विभूतिमत्वाने युक्त वाटणारे नेतृत्व, (३) समूहाचे केवळ एक प्रतीक म्हणून अत्युच्च स्थान भूषविणारे परंतु साक्षात सत्ता नसलेले नेतृत्व, (४) विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ, (५) स्वतःच्या बुद्धीने व विचारांनी समाजास प्रभावित करणारे व (६) समूहाच्या कार्याचे नियमन करणारे प्रशासक नेतृत्व.

सक्रिय समाजसुधारणा करणाऱ्या रीतीस किंवा शैलीस अनुलक्षून नेतृत्वाचे मुख्यत्वे दोन प्रकार करता येतात : (१) हुकूमशाही नेतृत्व व (२) लोकशाही नेतृत्व. हुकूमशाही नेतृत्वाचा विशेष म्हणजे नेत्याकडे सर्वंकष सत्ता असते व ती स्वतःकडेच ठेवण्याचा व स्वतःचे सर्वश्रेष्ठ स्थान टिकवण्याचा प्रयत्न तो हरतऱ्हेने करीत असतो. हुकूमशाहाच धोरणे ठरवितो, योजना आखतो, समूहासाठी त्याने ठरविलेला संपूर्ण कार्यक्रम तो सर्वस्वी उघड करीत नाही व स्वतःच्या बेतांची कल्पना इतरांना देत नाही. त्यांच्याकडून व्यक्तिपूजेस प्रच्छन्नपणे व उघडपणे प्रोत्साहन मिळते. समूहातील महत्त्वाच्या व्यक्तींशी तो स्वतंत्रपणे संबंध ठेवतो आणि त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध स्वतःच्या स्थानास धोकादायक ठरणार नाहीत, याविषयी तो दक्ष असतो. स्वतःचे महत्त्व अबाधित राहावे म्हणून तो अन्य कुणालाही फार काळपर्यंत महत्त्व लाभू देत नाही. अनुयायांमध्ये मोकळेपणाने मिसळत नाही. धर्म, पक्ष, पंथ, राष्ट्र इ. विषयींच्या लोकांच्या भावनांना आवाहन करून स्वतःचे नेतृत्व टिकवण्याचे प्रयत्नही त्याच्याकडून होतात.

लोकशाही नेतृत्वाची शैली निराळ्या प्रकारची असते. नेता स्वतःच्या हाती सर्व सत्ता केंद्रित करून न ठेवता सत्तेचे वितरण करतो. अधिकाधिक लोकाभिमुख होऊन तो स्वतःचे नेतृत्व टिकवितो. लोकांचे प्रेम व आदर हे लोकशाही नेत्याच्या प्रतिष्ठेचे अधिष्ठान असते. लोकशाही वृत्तीचा नेता समूहाशी वा त्यातील महत्त्वाच्या व्यक्तींशी विचारविनिमय करून व समूहाच्या इच्छा-आकांक्षांचा आदर करून उद्दिष्टे, धोरणे व कार्यक्रम ठरवतो तसेच एकंदर कार्यक्रमाची स्पष्ट व पूर्ण कल्पना लोकांना देतो. धाकदपटशा व भीती या तंत्रास लोकशाही नेतृत्वात स्थान नसते. व्यक्तिमाहात्म्यासही प्रोत्साहन दिले जात नाही. समूहातील विविध घटकांत सहकार्याची भावना वाढली लावली जाते व प्रत्येकाच्या कर्तृत्वास अवसर दिला जातो. समूहातील व्यक्तींना स्वतःचे विचार व भावना व्यक्त करण्यास मुभा असते.

नेतृत्वाचे कार्य

समूहाचे प्रयोजन व स्वरूप, समूहातील लोकांचे व्यक्तिमत्त्व आणि त्या त्या वेळचा प्रसंग या तीन गोष्टींवर नेतृत्वाला कराव्या लागणाऱ्या विशिष्ट भूमिका अवलंबून असतात. तरीपण सर्वसाधारण परिस्थितीत नेतृत्वाला जे कार्य करावे लागते, त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते : (१) संयोजन : समूहाच्या तात्कालिक गरजा व उपलब्ध साधने, दूरवरची उद्दिष्टे व त्यांची साधने, या सर्वांचा विचार करून योजना आखणे, (२) धोरणे ठरविणे, (३) धोरणांची अंमलबजावणी व त्यासाठी कार्यविभागणी करणे, (४) तज्ञ या नात्याने साहाय्य करणे, (५) समूहाचे प्रतिनिधित्व करणे, (६) समूहातील व्यक्तिव्यक्तींतील किंवा समूहांतर्गत गटागटांतील संबंधांवर व त्यांच्या वर्तनावर आवश्यक त्या उपायांचा अवलंब करून नियंत्रण ठेवणे, (७) स्वतःचे वर्तन नमुनेदार ठेवून समूहापुढे आदर्श ठेवणे व (८) समूहाचा रक्षणकर्ता म्हणून एक प्रकारे पित्याची भूमिका सांभाळणे. कधीकधी लोकांच्या वैफल्याचे आणि असंतोषाचे खापर नेतृत्वाच्या माथी फोडले जाते व त्यासाठी नेत्यास बळी दिले जाते. अशा वेळी मानसिक समतोल राखून समूहाचे फाटाफुटीपासून संरक्षण करण्याचे काम नेतृत्वाला करावे लागते.

नेतृत्व व व्यक्तिमत्त्वगुण

लष्करातील तसेच कारखान्यांमधील अधिकाऱ्यांची निवड करता यावी म्हणून आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी नेतृत्वगुणांचा विचार केला आहे. नेतृत्वासाठी अनिवार्य असे काही गुण निश्चित करता येतील काय, हा प्रश्न पुढे ठेवून मानसशास्त्रज्ञांनी राजकीय, लष्करी तसेच औद्योगिक क्षेत्रातील यशस्वी नेते, मुलांच्या गटांतील नेते, विद्यार्थी नेते इत्यादिकांच्या व्यक्तिमत्त्वगुणांची नोंद केली आहे. त्यातून जे गुण एका क्षेत्रातील नेत्यांच्या ठिकाणी असतात, ते अन्य क्षेत्रांतील नेत्यांच्या ठिकाणी असतातच असे नाही, असे आढळून आले आहे. उदा.; उंची, मजबूत शरीरयष्टी, देखणेपण, वर्चस्ववृत्ती इ. यशस्वी लष्करी नेत्यांमध्ये आढळणारे गुण प्रभावी राजकीय वा सामाजिक पुढाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वात असतातच असे नाही. उंची, वजन, सुदृढ शरीर, बुद्धिमत्ता ह्या गुणांचे महत्त्व प्रसंगसापेक्ष असते, असेच म्हटले पाहिजे.

तथापि नेतृत्वाच्या ठिकाणी बहुतांशी पुढील गुणधर्म असतात, असे संशोधनावरून दिसून आले आहे. सर्वसामान्यापेक्षा अधिक बुद्धिमत्ता, मर्मग्राही दृष्टी, उपक्रमशीलता, बहिर्मुखवृत्ती, दृढनिश्चय, आत्मविश्वास, समायोजन-कुशलता, विश्वासपात्रता, सहभागी होण्याची क्षमता, जोमदार प्रतिक्रिया क्षमता, चिवटपणा व चिकाटी, इतरांच्या भावनांची कदर करण्याची वृत्ती, संघटनाकौशल्य, योजकता, स्वतःजवळ अमाप शक्ती व युक्ती आहे असे भासवणारा संयम, वक्तृत्व, विनोदबुद्धी इत्यादी.

परंतु वरील गुण असले, की मनुष्य नेता होतोच असे नाही आणि त्यांपैकी काही गुण नसतील, तर नेता होऊ शकत नाही असेही नाही. नेतृत्वाच्या संबंधात नेतृत्वगुणांबरोबरच प्रसंगाचे स्वरूपही महत्त्वाचे असते. नेता ही अद्वितीय विभूती असते व केवळ स्वतःच्या गुणांमुळे नेतृत्व प्राप्त करून घेऊन कोणत्याही प्रसंगी नेतृत्व करण्यास समर्थ असते, ही विभूतिवादी कल्पना काय किंवा केवळ गुणवादी सिद्धांत काय, हे दोन्हीही वास्तवास धरून नाहीत. नेतृत्वासाठी आवश्यक असलेले गुण असूनही काल व परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे किंवा त्या त्या प्रसंगी विशेषत्वाने आवश्यक असणारे गुण अंगी नसल्याने नेतृत्वपदास पोहोचल्या नाहीत, अशा कितीतरी व्यक्ती इतिहासात आढळतील. नेतृत्व हे प्रसंगसापेक्ष असते, ही गोष्ट संशोधनातून स्पष्ट झाली आहे. एखाद्या समस्येच्या चर्चेत नेतृत्व करू शकणारी व्यक्ती निर्णयाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीत नेतृत्व करू शकेलच असे नाही. युद्धप्रसंगी जो नेतृत्व देऊ शकतो, तो शांतताकालातही यशस्वी नेता ठरेलच असे नाही.

काही प्रसंग–उदा., परकीय आक्रमणाचा धोका, समूहातंर्गत अशांतता, मतभेद, बेकारी, सामाजिक अन्यायाची संतापयुक्त जाणीव इ.–नेतृत्वाच्या उदयास विशेष अनुकूल ठरतात. यावरूनही नेतृत्व हे प्रसंगसापेक्ष असते व त्या त्या प्रसंगातून समूहास यशस्वीपणे बाहेर काढण्याची क्षमता अंगी असलेल्या व्यक्तींकडेच नेतृत्व जाते.

यशस्वी नेतृत्व

यशस्वी नेतृत्वाबाबत जी अनेक संशोधने झाली आहेत, त्यांचे काही निष्कर्ष नियमरूपाने सांगता येणे शक्य आहे. (१) समूहाला असे वाटले पाहिजे, की नेता हा आपल्यापैकीच एकआहे, बाहेरचा नाही. त्यासाठी नेत्याची मूल्ये व अभिवृत्ती आणि समूहाची मूल्ये व अभिवृत्ती यांमध्ये फार तफावत नसावी. असल्यास नेतृत्वास ओहोटी लागते. म्हणूनच यशस्वी नेते समूहात मिसळतात व त्यांच्या जीवनात सहभागी होत असल्याचे दाखवीत असतात. (२) पण त्याबरोबरच अनुयायांना असेही वाटले पाहिजे, की आपल्याला इष्ट वाटणारे गुण नेतृत्व करणाऱ्याच्या ठिकाणी अधिक प्रमाणात आहेत. (३) आपल्यापैकीच एक, पण बुद्धी, ज्ञान, कर्तबगारी इ. बाबतींत आपल्यापैकी उत्तम व्यक्ती, असे नेत्याविषयी अनुयायांना वाटले पाहिजे. त्याबरोबरच त्याचे गुण व चारित्र्य आपल्या अनुकरणाच्या आवाक्यातील आहे, असेही त्यांना वाटले पाहिजे; अन्यथा त्याच्या अतिश्रेष्ठत्वामुळे त्याला देव्हाऱ्यात बसवून अनुयायी मोकळे होतात व नावापुरतेच अनुयायी राहतात. (४) नेतृत्वाने समूहाच्या गरजा व अपेक्षा लक्षात घेऊन वागले पाहिजे. नेत्याकडून, अपेक्षित असलेली कार्ये, कार्यपद्धती तसेच व्यक्तिमत्त्वगुण व चारित्र्यगुण यांच्या बाबतींत समूहाचा अपेक्षाभंग झाल्यास त्याचे नेतृत्व ओहोटीस लागते. ‘मी त्यांचा नेता आहे ना, मग मला त्यांना अनुसरून चालले पाहिजे’, हे एका राजकीय नेत्याचे उद्‌गार या दृष्टीने मार्मिक होत.

एकतंत्री व लोकतंत्री नेतृत्व

काही निश्चित उद्दिष्टांकडे समूहास नेणे हे नेतृत्वाचे प्रयोजन असते, ही गोष्ट लक्षात घेता समूहाच्या कार्यक्षमतेस व प्रत्यक्ष कार्यसिद्धीस पोषक ठरेल, अशा रीतीने नेतृत्व करणाऱ्यास आपली भूमिका पार पाडावी लागते, परंतु समूहाची कार्यक्षमता व प्रत्यक्ष कार्यसिद्धीचे प्रमाण या गोष्टी समूहातील व्यक्तिव्यक्तीचे संबंध, गटबाजी, सामूहिक कार्याविषयीची आस्था, समूहाचे मनोबल इ. गोष्टींवर अवलंबून असतात. थोडक्यात, त्या समूहांतर्गत मानसिक वातावरणावर अवलंबून असतात आणि त्या वातावरणाची निर्मिती नेतृत्वाच्या स्वरूपावर अवलंबून असते. समूहाच्या कार्यसिद्धीच्या दृष्टीने हुकूमशाही की लोकशाही नेतृत्व इष्ट आहे, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. सामान्य निरीक्षणावर आधारलेल्या निष्कर्षाची ग्राह्याग्राह्यता ठरविण्यासाठी कुर्ट ल्यूइन, आर्‌. एफ्‌. मेअर व इतर सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी छोटेछोटे समूह घेऊन आणि त्यांना या दोन प्रकारच्या नेतृत्वाखाली आळीपाळीने कामे करावयास लावून, म्हणजेच प्रयोगपूर्वक, निरीक्षण केले आहे. संस्था, संघटना, कारखाने, लष्कर इ. विविध क्षेत्रांत नेतृत्व करणाऱ्यांना मार्गदर्शन आणि नेतृत्वाचे प्रशिक्षण या दृष्टींनीही ह्या प्रायोगिक निरीक्षणास महत्त्व आहे. या प्रयोगांवरून असे दिसून येते की एकतंत्री नेतृत्वाखाली काम करणाऱ्या व्यक्तींच्या ठिकाणी उत्साह आणि स्वतः होऊन काम करण्याचे प्रेरणाबळ फार कमी असते. नेत्याच्या धाकाने आणि भीतीने काम करण्यात येते. एकंदर कार्याच्या नियोजनात त्यांचा सहभाग नसल्याने त्यांना त्या कार्याविषयी आत्मीयता वाटत नाही. अशा व्यक्ती मनातून असंतुष्ट असतात. त्याबरोबरच नेत्याचे लक्ष वेधून घेण्याची व त्याचा अनुनय करण्याची प्रवृत्ती त्यांच्यात आढळते. खरीखुरी सहकार्याची भावना व प्रसंगी नेत्याच्या अनुपस्थितीतही आत्मविश्वासाने काम करण्याची हिंमत यांचा अभाव आढळतो. नेत्याच्या अभावी समूहात फुटीर वृत्तीसही वाव मिळतो. याउलट लोकशाही नेतृत्वाखालील व्यक्ती सामूहिक कार्यक्रम निश्चित करण्यात सहभागी असल्याने स्वयंनिर्णयाच्या जाणिवेने आत्मीयतापूर्वक कार्य करतात; पण त्याबरोबरच त्यांच्यात शिस्तीचे प्रमाण कमी आढळते. नाना विचारांचा गलबला होण्याचा आणि परिणामी कार्याची गती मंदावण्याचा फार संभव असतो.

कुर्ट ल्यूइन व त्याच्या सहकाऱ्यांनी प्रायोगिक अन्वेषणान्ती मांडलेले निष्कर्षही सामान्य निरीक्षणास दुजोरा देणारे आहेत. गटापासून एकंदरीने अलग राहणाऱ्या, गटाशी विचारविनिमय करण्याऐवजी स्वतःच धोरण ठरवून पदोपदी आदेश देणाऱ्या व स्वतःची वैयक्तिक पसंती-नापसंती व्यक्त करणाऱ्या, हुकूमशाही नेतृत्वाखालील व्यक्तींच्या ठिकाणी नेत्याला नमून वागण्याची वृत्ती, मार्गदर्शनासाठी त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून राहण्याची वृत्ती, परस्परांबाबत तक्रारखोरी आणि आक्रमक वृत्ती तसेच वयंभावाचा (वुई-फीलिंग) व परिणामी खऱ्या एकजुटीचा अभाव इ. गोष्टी दिसून आल्या. याउलट मित्रत्वाची वृत्ती ठेवणाऱ्या, विचारविनिमय व सामुदायिक निर्णयास प्रोत्साहन देणाऱ्या, प्रत्येकाच्या कर्तृत्वास आणि गुणांस वाव देणाऱ्या, लोकशाही नेतृत्वाखालील गटामध्ये स्वावलंबन, सर्जनशीलता, सहकार्यवृत्ती, वयंभाव, एकजूट व मनोबल यांचे प्रमाणे बरेच आढळते. म्हणून लोकशाही नेतृत्व हेच इष्ट होय, असा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे.

तथापि लोकशाही वातावरणात वाढलेल्या व मध्यमवर्गीय अमेरिकन समाजातील मुलांवर केलेल्या या प्रयोगांचे निष्कर्ष सर्वसामान्य सिद्धांत म्हणून स्वीकारणे सयुक्तिक होणार नाही, असे एक मत आहे. औद्योगिक कामगारांचे गट तसेच व्यक्तिस्वातंत्र्यास विशेष महत्त्व नसलेल्या संस्कृतींतील गट घेऊन प्रयोग केले, तर भिन्न स्वरूपाचे निष्कर्ष निघण्याची शक्यता आहे, असा अभिप्राय व्यक्त करण्यात आला आहे. राजकीय क्षेत्रात पूर्णपणे लोकशाही नेतृत्व इष्ट ठरेल काय, तसेच लोकशाही धर्तीचे लष्करी नेतृत्व कितपत यशस्वी ठरेल, असे काही प्रश्न निर्णायकपणे सोडविणे कठीण आहे.

संदर्भ : 1. Cartwright, D.; Zander, A. F. Group Dynamics : Research and Theory, Row, 1960.

2. Krech, David & Others, Individual in Society : A Textbook of Social Psychology, New York, 1962.

लेखक: व. वि. अकोलकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate