Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 18:09:32.640564 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक संकल्पना व संज्ञा / भारतीय विवाहसंस्थेतील आधुनिक परिवर्तने
शेअर करा

T3 2019/10/17 18:09:32.645238 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 18:09:32.663522 GMT+0530

भारतीय विवाहसंस्थेतील आधुनिक परिवर्तने

भारतीय विवाहसंस्थेतील आधुनिक परिवर्तने या विषयक माहिती.

 

ब्रिटिश राजवटीच्या आगमनाबरोबर भारतीय समाजात आधुनिक युगाचा प्रारंभ झाला आणि त्याच्या प्रभावामुळे पारंपरिक भारतीय विवाहसंस्थेत मूलभूत बदल घडून येण्यास सुरुवात झाली. हे आधुनिकीकरण घडवून आणण्यात औद्योगिकीकरण तसेच दळणवळणाच्या साधनांत झालेला क्रांतिकारक बदल, सामाजिक समतेच्या तत्त्वावर आधारलेल्या उदारमतवादी, पुरोगामी विचारांचा आणि आधुनिक शिक्षणाचा प्रसार व पारंपरिक समाजव्यवस्थेत निर्माण झालेल्या विकृती दूर करण्याच्या कामी शासनाने कायदे करून घेतलेली ठाम भूमिका यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. विवाहसंस्थेला आधुनिक वळण देण्यात भारतातील सुधारकांनी सुरू केलेल्या समाजसुधारणा चळवळींचा आणि सुधारकांच्या आग्रही भूमिकेमुळे व त्यांच्या साहाय्याने ब्रिटिश शासनाने केलेल्या प्रगतिशील कायद्यांचा वाटा मोठा आहे.

समाजसुधारणा-आंदोलनांची सुरुवात

भारतात समाजसुधारणा-आंदोलनांची सुरुवात राजा राममोहन रॉय यांच्या ⇨ब्राह्मो समाजाच्या स्थापनेपासून (१८२८) झाली. व्यक्तिस्वातंत्र्याचे तत्त्व ब्राह्मो समाजाने पुरस्कारल्याने, त्याचा एक भाग म्हणून, गृहसंस्थेतील जिचे व्यक्तित्व जुन्या धर्माने नष्ट झाले होते त्या स्त्री जातीच्या उद्धाराचा मुद्दा ब्राह्मो समाजाच्या चळवळीने हाती घेतला. राजा राममोहन रॉय व त्यांचे ब्राह्मो समाजातील सहकारी यांच्या चळवळीचा परिणाम म्हणून १८२९ साली सतीची चाल ब्रिटिश शासनाने कायद्याने बंद केली. तद्वतच बालविवाहस बंदी, विधवांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन, स्त्रीशिक्षणाच्य चळवळी अशा समाजसुधारणांच्या आंदोलनांतून स्त्रीच्या स्वतंत्र अस्मितेला जाग येऊ लागली. ब्राह्मो समाजाच्या चळवळीचे एक प्रमुख नेते ⇨ईश्वरचंद्र विदायासागर यांनी हिंदू समाजातील बालविवाहाच्या प्रथेविरुद्ध जन-आंदोलन सूरू केले व विधवाविवाहाचा पुरस्कार केला. महाराष्ट्रात ⇨धोंडो केशव कर्वे, बंगालमध्ये शशिपाद बॅनर्जी, गुजरातमध्ये माधवदास करसनदास या समाजसुधारकांनी स्वतः विधवाविवाह करून समाजास सुधारणेचा मार्ग दाखविला. स्त्रियांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने ⇨महात्मा जोतीराव फुले, धोंडो केशव कर्वे, बंगालमध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर प्रभृतींनी स्त्रीशिक्षणाच्या चळवळी उभारल्या. स्त्रीशिक्षणाची चळवळ म्हणजे पर्यायाने स्त्रीस्वातंत्र्याची चळवळ होय. स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास, पुरुषाच्या बरोबरीने समान हक्काची जाणीव, विवाहात जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य या गोष्टी स्त्रीला शिक्षणामुळेच साध्य झाल्या. आधुनिक विवाहसंस्थेतील पतिपत्नीच्या समान नात्याचा पाया स्त्रीशिक्षणाने घातला. पंडिता रमाबाई, महादेव गोविंद रानडे, तसेच अन्य समाजसुधारकांच्या भरीव योगदानामुळे पारंपरिक हिंदू विवाहसंस्थेमध्ये विधायक बदल घडून आले, तद्वतच त्यासाठी आवश्यक असलेल्या कायद्यांच्या दृष्टीने अनुकूल वातावरण तयार झाले.

कायदे

ब्रिटिश शासनाने भारतातील समाजसुधारकांच्या मदतीने परंपरागत हिंदू विवाहसंस्थेत स्त्रियांवर जो अन्याय होत होता तो दूर करण्याच्या उद्देशाने जे कायदे केले, त्यांत सतीबंदीच्या कायद्याप्रमाणेच हिंदू विधवा पुनर्विवाहाच्या कायद्याचा (१८५६) उल्लेख करावा लागेल. बालविवाहाची प्रथा नष्ट करण्याच्या हेतूने म्हैसूर संस्थानामध्ये नऊ वर्षांच्या आतील मुलीच्या विवाहावर बंदी आणणारा कायदा १८९४ साली करून पहिले पाऊल उचलले. त्यापाठोपाठ बडोदे संस्थानात लग्नाच्या वेळी मुलगी बारा वर्षांहून लहान असता कामा नये, या आशयाचा कायदा १९०४ साली झाला. नंतर ब्रिटिश शासनाने अठरा वर्षांखालील मुलाच्या आणि चौदा वर्षांखालील मुलीच्या विवाहावर बंदी घालणारा कायदा १९२९ साली केला. हिंदू विवाह अधिनियमानुसार (१९५५) वराचे वय पूर्ण २१ वर्षे आणि वधूचे वय पूर्ण १८ वर्षे असले पाहिजे, अशी अट घालण्यात आली. त्याचप्रमाणे या कायद्याने द्विभार्या पद्धत बंद झाली, तसेच घटस्फोट मिळण्याचीही तरतूद करण्यात आली. १९५६ च्या हिंदू वारसा कायद्याने स्त्रियांना आणि विधवांना कुटुंबाच्या मालमत्तेत समान हक्क प्राप्त झाला. थोडक्यात, हिंदूंच्या पारंपरिक विवाहसंस्थेला आधुनिक वळण देण्यात समाजसुधारकांच्या प्रयत्नांबरोबरच हे कायदेही पूरक ठरले.

संदर्भ : 1. Askham, Janet, Identity and Stability in Marriage, Cambridge, 1984.

2. Bernard, Jessie, The Future of Marriage, London, 1982.

3. Blood Robert O. Marriage, New York, 1962.

4. Bowman, Henry A. Marriage for Moderns, New York, 1965.

5. Cherlin, Andrew J. Marriage, Divorce, Remarriage, Cambridge,1981.

6. Clark, D. Marriage,Domestic Life and Social Change, London, 1991.

7. Fortes, M. Ed., Marriage in Tribal Societies, Cambridge, 1962.

8. Goode, W. J. The Family, New Delhi, 1965.

9. Harlan, Lindsey; Courtright, Paul B. Ed., From the Margins of Hindu Marriage, London,1995.

10. kapadia, K. M. Marriage and Family in India, London, 1959.

11. Mace, D. R.; Mace, Vera, Marriage: East and West, London 1960.

12. Murdock, G. P. Social Structure, New York, 1949.

13. Stopes, Marie, Married Love, Calcutta, 1966.

14. Westermark, E. A. The History of Human Marriage, 3Vols., (5th Ed.), 1971.

15. Williamson, Robert C. Marriage and Family Relations, New York, 1965.

१६. जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास (आवृ. तिसरी), वाई, १९९६.

१७.राजवाडे,वि. का. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, पुणे १९७६.

लेखक: त्रि. ना. वाळुंजकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

3.2
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 18:09:32.940054 GMT+0530

T24 2019/10/17 18:09:32.946521 GMT+0530
Back to top

T12019/10/17 18:09:32.539427 GMT+0530

T612019/10/17 18:09:32.556066 GMT+0530

T622019/10/17 18:09:32.628747 GMT+0530

T632019/10/17 18:09:32.629705 GMT+0530