অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मृत्यू आणि कायदा

मृत्यू आणि कायदा

व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यापूर्वी मृत्यूचा दाखला मिळवण्याचे कायदेशीर बंधन बहुतेक देशांत आढळते. भारतात कायद्यानुसार प्रत्येक जन्म-मृत्यूची नोंद करणे सक्तीचे आहे. मृत्यूपूर्व काळात औषधोपचार करणारा वैद्य मृत्यूस प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे कारणीभूत झालेल्या गोष्टींचा निर्देश करणारे प्रमाणपत्र देऊ शकतो. स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्यालयांतून मृत्यूचा दाखला नातलगांना घ्यावा लागतो. प्रेत एका गावावरून दुसऱ्या गावी नेण्याबाबत, तसेच इतरही काही बाबतीत कायदेशीर तरतुदी केलेल्या आहेत.

मृत्युपूर्वी संबंधीत व्यक्तीने दिलेल्या तोंडी किंवा लेखी जबाबाला मृत्यूपूर्व जबाब म्हणतात. हा जबाब मृत्यूच्या कारणासंबंधी किंवा परिस्थितीसंबंधी असतो. गुन्ह्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीचा मृत्युपूर्व जबाब घेण्यासाठी दंडाधिकारी किंवा ‘जस्टिस ऑफ द पीस’ यांची उपस्थिती आवश्यक असते. अपवादात्मक परिस्थितीत संबंधित वैद्य मृत्युपूर्व जबाब घेऊ शकतो.

आधुनिक काळात अवयव प्रतिरोपण शस्त्रक्रियांच्या प्रगतीमुळे मृत व्यक्तीचे संपूर्ण शरीर किंवा काही अवयव दान करण्याकडे कल वाढत आहे. काही देशांत यासंबंधी कायदेही केलेले आढळतात. काही व्यक्ती मृत्यूपूर्वीच आपले शरीर किंवा एखादा अवयव रूग्णालये किंवा वैद्यकीय शिक्षणसंस्थांना दान करण्याची इच्छा प्रकट करतात. या इच्छेची परिपूर्ती करणे मयताच्या नातलगांवर अवलंबून असते व ते अवयवदान किंवा शरीरदान नाकारू शकतात. प्रतिरोपणक्षम अवयव मृत्यूनंतर ठराविक अवधीतच काढावे लागतात. उदा., डोळ्याचा भाग प्रतिरोपणाकरता मृत्यूनंतर तीन तासांच्या आतच वापरावा लागतो. नेत्रदानाबद्दल अलीकडे विशेष प्रसार केला जातो.

पुरलेले शव कायदेशीर परवानगीने उकरून काढता येते. मृताची ओळख पटली नसल्यास किंवा मृत्यूच्या कारणाबद्दल संशय किंवा अनिश्चितता असल्यास शव उत्खनन करून त्याची संपूर्ण परीक्षा करावी लागते. भारतात याविषयी कालमर्यादा घातलेली नाही.

कायद्याच्या दृष्टीने व्यक्तीच्या मृत्यूची निश्चित वेळ आणि त्याची नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणे-उदा., ⇨ अपघात, आत्महत्या, मनुष्यवध इ. – या गोष्टी महत्त्वाच्या असतात; कारण मृत व्यक्तीची मालमत्ता, ऋण, विमा, संपत्तीचा वारसा किंवा वारसाचे इतर लाभ यांच्याशी त्या निगडीत असतात. दान किंवा मृत्युपत्रान्वये मालमत्तेची विल्हेवाट लावली असेल, तर मृत व्यक्तीची मिळकतीचा मालकीहक्क वैध होता किंवा काय, हे सिद्ध करावे लागते. मृत व्यक्तिच्या संपत्तीचे हस्तांतरण, संपादन इ. बाबतीत कायदेशीर तरतुदी आहेत. उदा., भारतीय उत्तराधिकार अधिनियम – १९२५ व हिंदू उत्तराधिकारी अधिनियम – १९५६.

एखादी व्यक्ती दीर्घकाल (काही देशांत ७ वर्षे) बेपत्ता असल्यास कायदेशीर दृष्ट्या ती मृत झाल्याचे गृहीत धरण्यात येते. तथापि असे गृहीतक त्याचप्रमाणे मृत म्हणून धरलेल्या व्यक्तिच्या मालमत्तेची विल्हेवाट यांसंबंधी वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे कायदे आढळतात. त्याचप्रमाणे बेवारशी शव किंवा त्याचे अवशेष यांची अंतीम विल्हेवाट लावण्यासंबंधीही वेगवेगळे कायदेकानू आढळतात. न्यायालयात चालू असलेल्या एखाद्या दाव्यात वादी अथवा प्रतिवादी मृत्यू पावल्यास त्याचा दाव्यावर होणारा परिणाम व त्यातून उद्‌भवणारी परिस्थिती याबाबतही नियम आहेत.

संदर्भ : 1. Choran, Jacques, Death and Western Thought, New York, 1963.

2. Cutler, D. Updating Life and Death: Essays in Ethics and Medicine, Boston, 1969.

3. Deshpande, M. G. Philosophy of Death, Pune, 1979.

4. Evans, W. E. D. Chemistry of Death, Springfield, 1963.

5. Feible, Herman, Ed, The Meaning of Death, New York. 1959.

6. Glaser, Barney; Strauss, Anselm, Awareness of Dying : A Study of Social Interaction, Chicago, 1965.

7. Kastenbaum, Robert; Aisenberg, Ruth, The Psychology of Death, London, 1974.

8. Korein, J. Brain Death : Interrelated Medical and Social Issues, New York, 1978.

9. Kubler Ross, E. On Death and Dying, New York, 1969.

10. Myers, Frederick W. H. Human Personality and Its Survival of Bodily Death, 2 Vols., New York, 1954.

11. Parikh, C. K. A Simplified Textbook of Medical Jurisprudence, Bombay, 1970.

12. Shneidman, E. S. Ed. Death: Current perspectives, Hamilton, Calif., 1976.

13. Simpson, K. Ed. The Mysteries of Life and Death, New York, 1979.

लेखक: य. त्र्यं. भालेराव

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/5/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate