অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रखेलीपद्धति (कॉन्क्यूबिनेज)

पुरुषाने आपली पत्नी नसलेल्या स्त्रीशी, जसे पत्नीशी संबंध ठेवले जातात तशा प्रकारचे सर्व संबंध ठेवण्याच्या समाजमान्य पद्धतीला रखेलीपद्धती म्हटले जाते; परंतु विवाहित पत्नीच्या तुलनेत रखेलीला नेहमीच कुटुबांत आणि समाजात दुय्यम स्थान स्वीकारावे लागते. एखाद्या स्त्रीला रखेली म्हणून स्वीकारल्यानंतर तिच्या पालन-पोषण, निवासादींची संपूर्ण जबाबदारी तिला रखेली म्हणून ठेवणाऱ्या पुरुषावर येऊन पडते. म्हणूनच रखेलीलासुद्धा त्या पुरुषाशी एकनिष्ठ राहावे लागते. पितृप्रधान, एक-विवाही समाजात बहुधा ही रखेलीपद्धत अस्तित्वात होती, असे दिसून येते.

इतिहास

बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये रखेलीपद्धत अस्तित्वात असल्याचे आढळून येते. रोमन इतिहासात मात्र रखेलीपद्धतीचे दाखले जरी सापडले नाहीत, तरी काही हक्कांशिवाय दुय्यम स्थानावर असलेल्या पत्नींचे उल्लेख सापडतात. ग्रीसमध्ये गुलामगिरीवर आधारलेली रखेलीपद्धत अस्तित्वात होती. लढाईत हरलेल्या शत्रूंच्या स्त्रिया बहुतेक रखेल्या म्हणूनच स्वीकारल्या जात असत. ईजिप्तमध्ये तिथल्या फेअरो राजांप्रमाणेच सरदार-जहागीरदार यांच्याकडेही गुलाम स्त्रिया रखेल्या म्हणून ठेवल्या जात असत.

रखेलीला मुले झाली तर त्यांचे पालन-पोषण वैध मुलांप्रमाणेच केले जात असे. मध्य-पूर्वेत हामुराबीच्या कायद्यानुसार मुले झालेल्या रखेलीचा त्याग केला, तर तिच्या उपजीविकेकरिता आणि तिच्या मुलांच्या योग्य संगोपनाकरिता जमीन वगैरेंसारखे मिळकतीचे काही साधन द्यावे लागत असे. पत्नीला संतती झाली असल्यास मात्र रखेली ठेवण्यास परवानगी नव्हती.

चिनी संस्कृतीत रखेलीपद्धत अधिक प्रचारात होती. परंतु बहुपत्नीत्व किंवा रखेलीला पत्नीचे स्थान देणे यावर पूर्ण बंदी होती. या नियमाचे उल्लंघन केल्यास देहदंडाची शिक्षा होत असे. रखेलीला पत्नीच्या आज्ञेत रहावे लागत असे आणि रखेलीचा हेवा पत्नीने करू नये, असेही त्यांच्या प्रमुख ग्रंथांत सांगितले आहे.

यहुदी कायदा

यहुदी कायद्याप्रमाणे बहुपत्नीविवाहाप्रमाणेच रखेलीपद्धतीस आणि त्याकरिता मुलीच्या विक्रयासही मान्यता होती. रखेली जर नावडती झाली, तर तिला कालांतराने मुक्त करण्याची तरतूदही त्यात होती. ख्रिस्ती धर्माने रखेलीपद्धतीस विरोध केल्यामुळे ख्रिस्ती धर्मात ही पद्धत नाही. इस्लाममध्ये चार बायका करण्याची मुभा असली, तरी रखेलीपद्धतीस कुराणानुसार मान्यता नाही.

भारताच्या इतिहासात ब्रिटिश काळापर्यंत रखेलीपद्धत अस्तित्वात होती. ती बहुधा राजे-महाराजे, संस्थानिक, सरदार, अमीर-उमराव, सधन शेतकरी व तत्सम वर्गांत दिसून येत असे व तिला प्रतिष्ठाही होती. दक्षिणेत रखेलीपद्धत आणि देवदासी पद्धत ह्या काही काळ तरी परस्परपूरक असाव्यात, असे वाटते. यूरोपीय वसाहतींत स्थानिक स्त्रियांना रखेली म्हणून ठेवत असत. ह्या स्त्रियांची संतती अँग्लोइंडियन्स म्हणून ओळखली जाते.

भारतीय धार्मिक कर्मकांड

भारतीयांच्या धार्मिक कर्मकांडामध्ये धर्मपत्नीलाच स्थान आहे. धर्मपत्नीच पतीबरोबर यात सहभागी होऊ शकते. त्यामुळे भारतातील रखेली स्त्रियांना धर्मपत्नीच्या बरोबर स्थान मिळणे केवळ अशक्य होते. अर्थात रखेलीपासून होणाऱ्या संततीला कायदेशीर मालकी व वारसाहक्क प्राप्त होत नसले, तरी अशा संततीच्या पालनपोषणाची जबाबदारी त्या पुरुषावरच असे. दासी व रखेली यांच्यात फरक असे व रखेलीचे स्थान दासीपेक्षा प्रतिष्ठेचे, जवळजवळ पत्नीप्रमाणेच असे. आजमितीस सर्वच आधुनिक समाजांतून विवाहबाह्य संबंध अस्तित्वात असले, तरी रखेलीपद्धत मात्र (ती काही प्रमाणात अस्तित्वात असली तरी) समाजमान्य नाही. रखेली ठेवण्यास कायद्याने बंदी घातली गेली नाही; तथापि १९५६ च्या हिंदू दत्तक विधान व पोटगी कायद्यानुसार (कलम २०, २१, २२) रखेलीस, ती ज्या पुरुषाची रखेली असेल त्याच्या मिळकतीत व मालमत्तेत वाटा मागण्याचा किंवा पालनपोषणासाठी रक्कम मागण्याचा कायदेशीर हक्क नाही. आज रखेलीपद्धतीची जागा वेश्यापद्धतीने घेतलेली दिसते. पुणेकर समितीला मुंबईच्या कामाठीपुऱ्यातील ३८० वेश्यांमध्ये ७५ रखेल्या असल्याचे आढळून आले आहे (१९६२). कायम नसल्या, तरी काही काळपर्यंत ह्या रखेल्या एकाच पुरुषाशी संबंध ठेवतात, असेही या समितीस आढळून आले आहे.

संदर्भ : 1. Hobhouse, L. T. Morals in Evolution : A Study in Comparative Ethics, London, 1951.

2. Punekar, S. D.; Rao Kamala, A Study of Prostitutes in Bombay, Bombay, 1962.

लेखक: मा. गु. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate