অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लायन्स इंटरनॅशनल

लायन्स इंटरनॅशनल

विविध व्यवसायांतील आणि उद्योगधंद्यांतील लोकांनी परस्पर-सहकार्य व मानवतेच्या सेवाभावी कार्यासाठी स्थापन केलेल्या मंडळांची (क्लबांची) जगातील सर्वांत मोठी संघटना. तिचे अधिकृत नाव ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज’ असे असले, तरी ‘लायन्स इंटरनॅशनल’ ह्या नावानेच ती विशेष प्रसिद्ध आहे.

ह्या संघटनेची स्थापना टेक्सस राज्यातील डॅलस येथे मेल्व्हिन जोन्स यांनी १९१७ मध्ये केली. जगातील १६६ हून अधिक स्वतंत्र देशांत या संस्थेच्या सु. २८,५०० शाखा असून सदस्यांची संख्या दहा लाखांवर आहे (१९९०). भारतात या संस्थेची सुरुवात १९५६ साली झाली. प्रथम मुंबई व दिल्ली येथे या संस्थेच्या शाखा उघडण्यात आल्या. महाराष्ट्र राज्यात या संस्थेचे कार्य पुढील तीन विभागांत विस्तारलेले आहे :

  1. मुंबई शहर (उपनगरे धरून), ठाणे व रायगड,
  2. विदर्भ व मराठवाडा,
  3. पश्चिम महाराष्ट्र.

प्रत्येक भागासाठी वेगवेगळे प्रमुख अधिकारी असून त्यांची निवड त्या भागातील क्लब सदस्यांकडून एक वर्षासाठी होत असते. अशा प्रमुखांना ‘गव्हर्नर’ किंवा ‘प्रांतपाल’ असे म्हटले जाते. बहुतेक सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांत व काही तालुकावजा शहरांतही लायन्स क्लब आहेत.

लायन्स इंटरनॅशनलने आपले लक्ष कृषी, पर्यावरणाचे रक्षण, युवकांसाठी कार्य, नागरिकत्व व देशभक्तीची सुजाण जाणीव, शिक्षण, समाजसुधारणा, आरोग्य, समाज कल्याण, आंतरराष्ट्रीय संबंध व सुरक्षितता, युवकांच्या परदेशभेटी, वृद्धांसाठी व अपंगासाठी कार्य इत्यादींवर केंद्रित केले आहे.

कल्याणकारी कार्यात दवाखाने व रुग्णालये उभारून ते चालविणे, नेत्रचिकित्सा तसेच अंधांकरिता सर्व प्रकारचे साहाय्य, गरजूंना व अपंगांना वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे व मदत करणे तसेच त्यांचे पुनर्वसन, शैक्षणिक, आरोग्यविषयक व सामाजिक सेवाकार्य करणे, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सामंजस्य वाढविणे इ. स्वरूपांची विधायक कामे ही संघटना करते. काही शाखांनी तरुणांसाठी ‘लिओ क्लब’ आणि तरुणींसाठी ‘लायनेस क्लब’ सुरू केले आहेत. ‘लायन्स इंटरनॅशनल फांउडेशन’ हे प्रतिष्ठान आपद्ग्रस्तांसाठी निधी उभारून त्यांना मदत पोहोचविते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ही संघटना संयुक्त राष्ट्रांच्या सेवाकार्यात सक्रिय भाग घेते तसेच संयुक्त राष्ट्रांच्या ‘केअर-CARE’ (को ऑपरेटिव्ह फॉर अमेरिकन रिलीफ एव्हरीव्हेअर) ह्या विभागाचा एक सदस्य म्हणूनही कार्य करते. या संस्थेचे बोधवाक्य ‘वुई सर्व्ह्’ असे असून ‘लायन्स’ हा एक संक्षेप आहे. एल् म्हणजे लिबर्टी, आय् म्हणजे इन्टेलिजन्स, ओ म्हणजे अवर्, एन् म्हणजे नेशन्स्, एस् म्हणजे सेफ्टी असे त्याचे विवरण आहे. द लायन हे संघटनेचे मासिक मुखपत्र इंग्रजीतून तसेच जगातील इतर प्रमुख अशा अठरा भाषांतून प्रसिद्ध होते. संघटनेचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन दरवर्षी आयोजित केले जाते. अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील ओक ब्रुक येथे संघटनेचे मुख्यालय आहे.

 

लेखक: सुधा काळदाते

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/4/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate