Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 18:44:59.122713 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/17 18:44:59.127377 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 18:44:59.145124 GMT+0530

लोकाचार (फोकवेज)

लोकाचार (फोकवेज) विषयक माहिती.

समाजप्रिय समूहाने (समुदायाने) विभागून दिलेली सुजाण वर्तणूक पारंपारिक शिष्टसंप्रदायी पद्धतीची तजवीज करते, तीस ‘लोकाचार’ म्हणतात. एखाद्या सामाजिक समूहातील जवळजवळ सर्व व्यक्तींकडून परंपरागत पद्धतीने पाळली जाणारी विशिष्ट संदर्भातील सामाजिक आचरणांची विविध संकेतांनी युक्त अशी ही पद्धत वा रुढी (कस्टम) आहे. ही कल्पना  विल्यम ग्रेअम सम्नर (१८४०- १९१०) या प्रख्यात अमेरिकन समाजशास्त्रज्ञाने ‘फोकवेज’ या शोधनिबंधाद्वारे १९०६ मध्ये प्रथम मांडली. चालीरीती, रिवाज, शिष्टाचार, रुढी, लोकनीती आणि नैतिक वर्तन यांचे समाजशास्त्रीय महत्व त्याने या संशोधनात्मक निबंधात विशद केले आहे. पुढे त्याचा फोकवेज हा ग्रंथ प्रसिद्ध झाला (१९०७). त्यात त्याने ‘लोकाचार’ (फोकवेज) आणि ‘लोकनीती’ (मोरेझ) या दोन संकल्पनांचा सोदाहरण ऊहापोह केला आहे. फोकवेज (लोकाचार) हा शब्द त्यानेच प्रथम तयार केला आणि प्रचारात आणला; मात्र मोरेझ (लोकनीती) हा शब्द लॅटिन ‘मॉस’ (रुढी) या शब्दावरून घेतला आहे.

ही  आचरणपद्धत अथवा रुढी त्या समाजाचे सदस्य आपल्या समाजाकडून बालपणातच आत्मसात करीत असतात. उदा., भिन्न संस्कृतींत वा मानवी समूहांत बालवयातच मुलेमुली कुटुंबाच्या पारंपारिक चालीरीती, धार्मिक परंपरा, रुढी, रिवाज यांचे आपाततः प्रशिक्षण घेतात आणि त्यांचे अनुकरणही करतात. पाश्चात्त्य देशांत लहान मुलांना जेवताना चाकू-काट्यांचा वापर करण्यास शिकविले जाते; भारतीय मुलास जेवताना उजव्या हाताचा व बोटांचा वापर करण्यास शिकविले जाते; तर चिनी मुलास दोन काड्यांचा वापर करून जेवावयास शिकविले जाते. पोषाखातील नव्या रीती (फॅशन्स) आणि करमणुकीचे कार्यक्रम यांतूनही लोकाचारांचे अनुकरण आढळते. लोकाचारांत समाजातील चालीरीती आणि संकेत यांचा अंतर्भाव होतो. लोकाचार वा जनरुढी ही स्वाभाविक अशी मानववृत्ती असून ती काही निश्चित अशा सांकेतिक आकृतिबंधांचा पाठपुरावा करते.

ह्या लोकाचारांमुळे त्या गटाच्या पारंपारिक आचारणाची पद्धती निश्चित होत असते. समाजप्रिय समूहातील व्यक्तींच्या आचरणात संकेत वा रुढी यांना नैतिक मूल्यांचे अधिष्ठान असण्याची आवश्यकता नसते; तथापि तसे नैतिक अधिष्ठान एखाद्या लोकाचारास लाभले आणि त्याचे उल्लंघन दंडनीय मानले गेले; तर त्या लोकाचाराचे लोकनीतीत रुपांतर होते.सम्नरच्या मते समाजशास्त्रीय अभ्यासात लोकाचारांचा अभ्यास हा जीवशास्त्रातील पेशींच्या अभ्यासाइतकाच महत्वपूर्ण आहे. ज्याप्रमाणे सवयी व व्यक्ती यांचे संबंध असतात, तसेच लोकाचार व सामाजिक समूह यांचेही संबंध असतात. लोकाचार हे रुढिबद्ध कृती वा वर्तन होत. ज्याप्रमाणे सवयी व्यक्तीला बांधून वा जखडून ठेवतात; तद्वतच लोकाचार समूहाला एकत्र जखडून ठेवतात. लोकाचार ही व्यक्तींची सांप्रदायिक कृत्ये असतात. त्यांचा उगम सामाजिक गटातील किंवा संस्कृतीतील सदस्यांच्या वारंवार घडून येणाऱ्या लहानसहान कृतींतून झालेला आढळतो.

ह्या कृती व्यक्तींच्या मूलभूत गरजा यशस्वीपणे पूर्ण करण्यास सिद्ध असतात, नंतर ह्या कृती समान बनतात आणि त्यांचा प्रशस्तपणे अंगीकार केला जातो. परंपरा, सवयी आणि धार्मिक मान्यता यांतून लोकाचारांना बळकटी येते आणि कालांतराने त्यांचे स्वरुप नैतिक बंधनात रुपांतरित होते, मानवी जीवनातील सर्वच उद्दिष्टांभोवती लोकाचारांचे बंध निगडित होताना दिसतात. सुरुवातीस लोकाचार एका अबोध पातळीवर (अनकॉन्शस लेव्हल) कार्यरत असतात आणि समाजाला ते उपयुक्त ठरतात; म्हणूनच दमदारपणे ते समाजात चिरस्थायी होतात वा स्थिरावतात. लोकाचारांच्या आकृतिबंधातूनच सामाजिक संस्थांची निर्मिती होते. लोकाचारांचे रुपांतर लोकनीतीत होते आणि विशिष्ट प्रसंगाभोवती गुंफलेली लोकनीती, लोकाचार यांची मालिका मिळून सामाजिक संस्था बनते.

लोकाचार हे मानवी जीवनातील विशिष्ट परिस्थितीशी यशस्वी समायोजन करण्याचे एक प्रभावी साधन आहे. सांसारिक जीवनातील अनेकविध क्षेत्रांत लोकाचार मानवाच्या वर्तनाला मार्गदर्शन करतात. लोकाचारांचा आणखी एक ठळक विशेष असा, की त्यांतून एक प्रकारच्या सुसंगतपणाकडे नेणारी प्रवृत्ती जाणवत असते. म्हणजे जे  लोकाचार जीवनाच्या एका क्षेत्रासाठी असतात, त्यांच्याशी सुसंगत असेच लोकाचार जीवनाच्या इतर क्षेत्रांबाबतही निर्माण होऊ शकतात आणि अशा प्रकारे जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना व्यापणाऱ्या परस्परसुसंगत अशा लोकाचारांची एक मालिका वा व्यूह निर्माण होतो. ह्या लोकाचारांत सुधारणेच्या दिशेनेही एक प्रकारचा ओढा असतो.

काही लोकाचार व जनरुढी या लोकनीती (मोरेझ) बनतात; लोकनीती म्हणजे प्रतिष्ठाप्राप्त अशा लोकप्रिय सवयी आणि परंपरा होत. प्रदेशपरत्वे प्रत्येक समाजाची लोकनीतीविषयीची विचारसरमी भिन्न असते आणि त्या त्या समूहातील गटाचा असा दृढविश्वास  असतो, की त्यांच्यात प्रचलित असलेले लोकनीतिनियम हे अत्यंत नैसर्गिक, न्याय्य, योग्य व लोककल्याणाच्या दृष्टीने अपरिहार्य असेच आहेत. अशा प्रकारचे नैतिक वर्तन सर्वांनी ठेवलेच पाहिजे, अशी त्या समाजगटाची धारणा असते. नैतिक अधिष्ठान असलेली आणि म्हणून ती पाळलीच पाहिजे, अशी रुढी म्हणजे लोकनीती होय. म्हणून लोकनीतीच्या उल्लंघनाबद्दल कडक शासन वा शिक्षा दिलेल्या आढळतात. लोकनीतीचे नियम हे लोकाचारांपेक्षा संख्येने कमी असूनही त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांबाबत समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण होते. ते अधिक स्थितिशील असतात.

लोकाचार हे संकेतांच्या, रुढींच्या स्वरुपाचे असतात आणि त्यांच्या पालनाने सामाजिक दळणवळण सुलभ, समाधान देणारे व सर्वमान्य होणारे असे बनते. लोकाचारांचा भंग केल्याने फार तर लोकांची नापसंती, नाराजी होईल; पण लोकनीतीच्या भंगाने तीव्र प्रतिक्रिया उमटेल व असे वर्तन दंडनीय ठरेल. उदा., रांग मोडून, आपला क्रमांक सोडून कोणी बसमध्ये घुसेल, तर तो  लोकाचाराचा भंग ठरेल; पण विवाहित स्त्रीने व्यभिचार केला, तर तो लोकनीतीचा भंग ठरेल. समाजातील व्यक्तीचे वर्तन कसे असावे, याचा आदर्श लोकनीतीमुळे लोकांसमोर ठेवला जातो. लोकनीती लैंगिक, कौटुंबिक वा धार्मिक बाबींच्या संदर्भातील नीतिनियमांचे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. काही रुढी वा संकेत समाजात सुप्रतिष्ठित होऊन अंगवळणी पडतात वा रुळतात. ते न्याय्य, उचित आणि समाजाच्या नैतिक धारणेस पोषक म्हणून अटळ असतात, असा त्या समूहातील सर्वांचा दृढ विश्वास असतो.

या रुढींना लोक नीतीचा दर्जा प्राप्त होतो. उदा., आप्तसंभोग, अभक्ष्य भक्षण (स्वकीयांचे मांसभक्षण) इत्यादी. या नकारात्मक लोकनीतीतील रुढींना ‘ताबू’ म्हणतात. त्यांना धार्मिक वा तात्त्विक पार्श्वभूमीची मान्यता असते. लोकाचार आणि लोकनीती यांचे स्वरुप कितीही सनातनी, स्थितिशील व गतानुगतिक असले; तरी बदलत्या परिस्थित्यनुसार आणि सामाजिक संदर्भानुसार त्यांत हळूहळू विकास व परिवर्तन घडून येत असते; कारण व्यक्ती अनेकदा नकळत यांचे पालन करताना त्यांत सतत सूक्ष्म बदल व परिवर्तन करीतच असतात आणि ह्या बदलांचे समाजात अनुकरणही होतच असते. ही उत्क्रांतीच अगदी कमालीच्या सनातनी समाजासही बदलणाऱ्या परिस्थितीशी समायोजनक्षम बनण्यास उपकारक ठरत असते.

संदर्भ : 1. Davie, M.R. William G. Sumner : An Essay of Commentary and Selection, New York, 1963.

2. Hocbel, E. Adamson, The Law of Primitive Man, Cambridge   (Mass). 1954.

3. Kluckohn, Clyde, Mirror for Man, New York, 1949.

4.  Sumner, W. G. Folkways, Boston, 1907.

लेखक: भा. ग. सुर्वे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

2.86666666667
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 18:44:59.428136 GMT+0530

T24 2019/10/17 18:44:59.434416 GMT+0530
Back to top

T12019/10/17 18:44:59.044281 GMT+0530

T612019/10/17 18:44:59.063003 GMT+0530

T622019/10/17 18:44:59.112689 GMT+0530

T632019/10/17 18:44:59.113453 GMT+0530