Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 14:34:18.935805 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 14:34:18.948767 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 14:34:18.972761 GMT+0530

वंशवाद

वंशवाद विषयक माहिती.

आनुवंशिक शारीरिक लक्षणे आणि व्यक्तिमत्त्वातील निश्चित गुणविशेष-बुद्धिमत्ता किंवा सांस्कृतिक दर्जायांत आढळणारा कार्यकारणभाव आणि त्याबरोबरच काही वंश जात्याच इतरांपेक्षा श्रेष्ठ असतात, ही कल्पना मांडणारा सिद्धांत. भिन्न मानवी वंशातील व्यक्तींच्या बुद्धीमत्तावादी कार्य़शक्ती भिन्न असतात आणि काही वंश आनुवंशिकतेत अधिक संपन्न बनतात, तर काही कमी संपन्न बनतात. या संपल्पनेतून वंशवादाचा सिद्धांत प्रसृत झाला आहे. शास्त्रीय दृष्ट्या वंशसंकल्पनेचा विचार कालानुसार बदलत गेला. सुरुवातीस वंशोत्पत्तीसंबंधी विचार केला गेला. वंश जरी निराळे दिसत असले, तरी त्यांचा उगम एकच आहे की अनेक, हा महत्त्वचा मुद्दा चर्चिला गेला आणि अनेक जननिक (जेनेटिक) उगमांच्या विचाराला मान्यता मिळवून त्यातून वांशिक उच्चनीचतेचा उगम झाला. पुढे वांशिक भेदाभेद व एक जननिक विरूद्ध अनेक जननिक, असे वाद सुरू झाले. या पार्श्वभूमीवर असमानतेच्या मुद्याला धरून असणाऱ्या लोकमताला विसाव्या शतकात आव्हान देण्यात आले. या शास्त्रीय चर्चेचे पडसाद सामाजिक जीवनावर पडून प्रत्येक वंश आपापल्या परीने श्रेष्ठच आहे, या मताची धारणा झाली आणि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वंशसंकल्पनेच्या मूळ कल्पनेस आव्हान दिले गेले. सध्या हयात असणारे सर्व मानव ‘होमो सेपियन’ या एकाच जातीचे असून सर्वजण समाईक साठ्यातून निर्माण झालेले आहेत. गटागटातील काही शारीरिक विषमता आनुवंशिकी संरचनेमुळे व काही वातावरणाच्या परिणामांमुळे दिसून येते. राष्ट्रीय, धार्मिक, भौगोलिक, भाषिक, सांस्कृतिक गटांचा वंशगटांशी काही संबंध नसतो. निदान सांस्कृतिक लक्षणांचा असा संबंध दर्शविणारा एकही पुरावा अद्यापि झालेला नाही किंवा तसा दाखला देता येत नाही.

जीवशास्त्रीय व सामाजिक दृष्टिकोन

वंशवादाचा जीवशास्त्रीय व सामाजिक अशा दोन दृष्टिकोनांतून विचार होतो. ज्यांना आपण ‘वंश’ असे संबोधतो, ते यातूनच निर्माण झालेले विविध समुदाय आहेत. प्रत्येक समुदायातील व्यक्तींमध्ये काही वैशिष्ट्ये आढळतात. ती प्रामुख्याने रंग (कातडीचा, डोळ्यांचा, केसांचा वगैरे), केसांचा प्रकार, मानवनिर्मितीची काही मोजमापे, डोळे, नाक, कान, ओठ या शारीरिक ठेवणीत असतात. मानवी समाजात सतत वर्णसंकर होत राहिल्याने अगदी शुद्ध वंशाचे असे जमनसमुदाय जवळजवळ नाहीतच.

वंशवाद हा सामाजिक जीवनातील परस्परसंबंधावर प्रभावी नियंत्रण करू शकतो; पण समाजातील सर्वच परस्परसंबंध वंशवादावर अवलंबून असतातच असे नाही. मानवी समुदायांचे संबंध दोन प्रकारांनी घडतात; समाजातील विविध जातिजमातींमध्ये अनेक भेदभाव असतात. धर्म, भाषा, संस्कृती इत्यादींमुळे भिन्न जातिजमातींमध्ये वैवध्य आढळते व काही अंतरही पडते. त्यांच्यातील परस्परसंबंध विशिष्ट चौकटीतच घडतात. येथे वांशिक किंवा शारीरिक भेदभावांमुळे सामाजिक अंतर पडते, असे नाही. जैविक किंवा शारीरिक भेदभावांमुळे वेगवेगळ्या समुदायांच्या परस्परसंबांधात अडथळे येतात व सामाजिक आंतरसंबंधांमध्ये फूट पडते, तेव्हा वंशवादाचा प्रभाव अधिक दिसतो.

जेव्हा दोन किंवा अधिक समुदाय, एकमेकांशी संबंध ठेवताना काही विशिष्ट जैविक व शारीरिक भेदभावनांचे निकष लावतात, तेव्हाही वंशवाद निर्माण होतो. सर्वसाधारणपणे समाजात निर्माण होणारे संघर्ष, तणाव व भेदभाव हे अधिकतर सांस्कृतिक भेदभावांमुळेच निर्माण होतात. तेव्हा जातीयता, जमातवाद, वर्णभेद या सर्व प्रकारांपेक्षा वांशिक संघर्ष वेगळे असतात. वंशवाद ही समाजाचीच प्रामुख्याने एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची निर्मिती आहे, हे विसरून चालणार नाही. त्याबद्दलचे सिद्धांत व अभिव्याप्ती समाजातील सर्व व्यक्तींत रुजलेली दिसते. व्यक्तींच्या अभिव्यक्तीतून व वागणुकीतून ते स्पष्ट होते. तद्वतच वंशवादाची मुळे समाजजीवनात खोलवर रुजल्याचे निदर्शनास येते. हे वंशवादी विचार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात व सामाजिकीकरणाचा तो एक अविभाज्य भाग बनतो. उदा., श्वेतवर्णीय व्यक्तीला आपली बुद्घिमत्ता कृष्णवर्णीय निग्रोपेक्षा अधिक कुशाग्र आहे, असे वाटणे.आपातत: या विचापप्रणालीचा परिणाम सर्व क्षेत्रांतील परस्परसंबंधावर होतो. व्यावसायिक क्षेत्रात, शिक्षणसंस्थांमध्ये किंवा दैनंदिन व्यवहारात या दोन समुदायातील अंतर त्यामुळे राखले जाते व वंशवाद संस्थीकृत होत जातो. समाजातील बहुसंख्य लोक (एका वंशाचे) वर्णभेदाला महत्त्व देऊ लागले, तर त्यांच्या मनात दुसऱ्या समुदाया बद्दल घृणा उत्पन्न होते. जो वांशिक समाज अल्पसंख्यांक किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असतो, त्याला सांस्कृतिक, राजकीय वा अन्य इतर अनेक पातळ्यांवर कनिष्ठ दर्जा प्राप्त होतो. उच्चवर्णीय समुदायांना अधिक सत्ताधिकार, सवलती व स्वातंत्र्य प्राप्त होते. परिणामतः समाजजीवनावर त्याचे गंभीर परिणाम होतात आणि त्यांतूनच सामाजिक संघर्ष निर्माण होतो.

वंशवादाची विचारसरणी

वंशवादाची विचारसरणी प्राचीन काळापासून कमीअधिक प्रमाणात पाहावयास सापडते; परंतु औद्योगिक क्रांतीनंतर, विशेषतः चार्ल्स रॉबर्ट डार्विन (१८०९-८२) याने मांडलेल्या उत्क्रांतीवादानंतर, या संकल्पनेस जैविक सिद्धांताची जोड मिळून वंशश्रेष्ठत्वाला महत्त्व प्राप्त झाले. पुढे उत्क्रांतीवादाच्या या जैविक सिद्धांताला सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ जोडल्यामुळे गोरे व गोरेतरांमधील भेद हे उत्क्रांतीमधून उत्पन्न झाले आहेत, हा विश्वास दृढतर झाला आणि त्याला झोझेफ आर्त्यूअर द काँत गॉबीनो (१८१६-८२) या फ्रेंच मुत्सद्याने द इनइक्वॉलिटी ऑफ ह्यूमन रेसिस हा ग्रंथ लिहून पुष्टी दिली. एवढेच नव्हे तर गॉवीनोन नॉर्डिक वंशाच्या श्रेष्ठत्वाचा सिद्धांत मांडला. त्यानंतर हौस्टन स्टीवर्ट चेंबरलेन या गॉबीनो प्रणालीच्या अनुयायाने द फाउंडेशन्स ऑफ द नाइन्टीन्थ सेंचरी (१८९९) हे पुस्तक प्रसिद्ध केले. ते पाश्चात्त्य देशांतील सत्ताधाऱ्यांत अत्यंत लोकप्रिय झाले. जर्मन सम्राट विल्यम कैसरने त्यास दरबारातील मानवशास्त्रज्ञाचे प्रतिष्ठित पद दिले. चेबरलेनने ट्यूटन सरदारांचे श्रेष्ठत्व प्रतिपादन केले. वंशवादाचा सिद्घांत व उपपत्ती यांचा पुरस्कार करणारे प्रमुख लेखक म्हणजे लुडविख वुल्टमान, एच्. एफ्. के गुंथुर (जर्मनी), लॉथ्रॉप स्टॉडर्ड आणि मॅडसन ग्रँट (अमेरिका), चार्ल्स किंग्झली व रडयर्ड किपलिंग (इंग्लंड) इ. होत. वंशवादाच्या या सैद्धांतिक प्रणालीबद्दल हिटलरने या सर्व विचारवंतांचे आभार मानले असून चेंबरलेनबद्दल विशेष आदर व्यक्त केला आहे. या लेखकांमुळे त्याच्या नाझीवादाच्या तत्त्वज्ञानास शास्त्रीय पार्श्वभूमी प्राप्त होऊन प्रचार-प्रसारास बळकटी आली.

इतिहास

वंशवादी विचारसरणीच्या सूलस्त्रोताविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. मानवाच्या इतिहासकाळापासून ही संकल्पना प्रसृत झाली असावी, असे तज्ञांचे मत आहे. ग्रीक व रोमन साम्राज्यांमध्ये दोन हजार वर्षांपूर्वी गुलामगिरीची प्रथा होती. ती वर्णभेदाच्या व आर्थिक सुबत्तेच्या वर्चस्वावर, प्रामुख्याने वांशिक भेदभावांवरच, आधारित होती. पुढे ज्यू लोक स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानीत आणि आपणच देवाचे प्रिय-देवाने निवडलेले-आहोत, असे समजत. परिणामतः धार्मिक पाखंडीपणाबद्दल त्यांचा रोमन लोकांकडून छळ झाला. मध्ययुगात चिनी लोक हे पश्चिमी श्वेतवर्णियांची ‘केसाळ व रानटी’ म्हणून संभावना करीत असत. सतराव्या शतकापासून एकोणीसाव्या शतकापर्यंत यूरोपमधील लष्करी दृष्ट्या बलाढ्य असलेल्या राष्ट्रांनी वसाहती निर्माण केल्या. अशा सत्तांनी प्रतिष्ठा, प्रदेशविस्तार, व्यापारवृद्धी आणि वांशिक आकांक्षा यांसाठी कमकुवत राज्यशासन असलेल्या भूप्रदेशावर वर्चस्व मिळविले. तेथील लोकांवर आपली सत्ता लादून त्यांनी स्थानिक जनतेला कनिष्ठ दर्जा दिला वसाहतीतील प्रजेवर गोरा माणूस हा या कनिष्ठ, कृष्णवर्णीय व मागासलेल्यांचा उद्धार करण्यास व त्यांना सुसंस्कृत बनविण्यास आला आहे, असे प्रतिपादन यूरोपियन वसाहतवादाच्या हस्तकांनी केले. त्यांचा दावा असा होता की, काही वंश दास्याकरिता जन्माला आलेले असतात व काही स्वभावतःच प्रभुत्ववादी व शक्तिसंपन्न असतात. वंशश्रेष्ठत्व आणि मूळ संस्कृतीपेक्षा आपली संस्कृती व जीवनपद्धती श्रेष्ठ आहे, या वसाहतवाल्यांच्या तथाकथित दाव्यामुळे वंशवादाचा अमेरिका, आफ्रिका, आशिया आदी खंडात प्रचार-प्रसार झाला. वसाहतवाल्यांनी मूळ लोकांवर या वंश श्रेष्ठत्वाच्या नावाखाली आपली भाषा, धर्म, चालीरीती व जीवनपद्धती लादण्याच्या प्रयत्न केला. अनेक श्वेतवर्णियांनी अमेरिकेतील मूळ रहिवाशांना गुलाम बनविले. अमेरिकेतील रेड इंडियन लोकांना ब्रिटिशांनी जवळजवळ नामशेष करून आफ्रिकेतून निग्रो मजूर आणून गुलामांच्या साहाय्याने तेथील संपूर्ण शेती-व्यवसाय विकसित केला. त्यातून एकोणीसाव्या शतकात गुलामगिरीविरोधी चळवळ उभी राहिली. अमेरिकेतील यादवी युद्धाचे (१८६१–६५) प्रमुख कारण गुलामगिरीच होते. त्या शतकाच्या अखेरीस काळ्या निग्रोंची गुलामगिरीतून मुक्तता झाली; परंतु काळ्यांचे पृथक्वासन आणि त्याबद्दलचा दुजाभाव संपुष्ठात आला नाही. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी या संदर्भात निग्रोंना समान संधी देणारे कायदे केले. विसाव्या शतकात आशिया-आफ्रिका खंडातील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले; तथापि दुसऱ्या महायुद्धकाळातील (१९३९–४५) वंशश्रेष्ठत्वाच्या तत्त्वावरील अँडॉल्फ हिटलरने केलेले ज्यू हत्याकांड आणि दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकातील तेथील ब्रिटिश राज्यकर्त्यांचे १९४८ नंतरचे वर्णविद्वेषवादी (ॲपरथाइड) धोरण, ही विसाव्या शतकातील वंशवादाची अत्यंत बोलकी व घृणास्पद उदाहरणे होत. जर्मन हे नॉर्डिक वंशीय श्रेष्ठ लोक असून ज्यू व अन्य जमाती ह्या कनिष्ठ आहेत, या तत्त्वावर हिटलरने नाझी राजवटीचा एकूण सर्व राजकीय कार्यक्रम राबविला आणि साठ लाख ज्यूंना कंठस्नान घातले. या त्याच्यातंत्रामूळे जर्मनांचे एकीकरण झाले आणि काही प्रदेशही त्याला पादाक्रांत करता आला. दक्षिण आफ्रिकेतील गोरेतर लोकांनी नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्त्वाखाली आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाची स्थापना करून वर्णविद्वेषाच्या धोरणास सतत विरोध केला आहे. त्याची फलश्रुती १९९० च्या दक्षिण आफ्रिकी प्रजासत्ताकाच्या बदलत्या धोरणात झाली आहे. गुलामगिरीच्या स्वरूपात सुरू झालेला हा वंशवाद दुजाभाव पृथक्वासन यांच्या रूपात आजही अमेरिकेसारख्या प्रगत देशांतील समाजात अधूनमधून डोके वर काढीत असतो. वंशवाद ही एक प्रवृत्ती आहे. ती एक विचारप्रणाली आहे. तिची पाळेमुळे खणून काढणे, राजकीय किंवा शासकीय स्तरांवरून कायदेकानू करूनही कोणत्याही देशाला अद्यापि शक्य झालेले नाही.

जैविक आनुवंशिक क्रमाने प्राप्त होणाऱ्या शारीरिक वैशिष्ट्यांवर आधारित असा मानववंश आणि सामाजिक पारंपारिक संकेतांनुसार अगर संगोपनाच्या माध्यमातून आत्मसात केली जाणारी संस्कृती यांच्यात अन्योन्य संबंध आहे. हा तर्कविसंगत सिद्धांत या सर्व वंशवादाच्या मुळाशी आहे. या सिद्धांतानुसार भिन्न मानववंशाची एखादी जमात राजकीय व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास, ती जमात सांस्कृतिक दृष्टीनेही निकृष्ट व नीच समजली जाऊ लागली. गौरवर्णीय विचारवंतांनी या सिद्धांताचा जगभर पुरस्कार केला. काही विचारवंताच्या मते हिंदूंची जातिव्यवस्थासुद्धा अशाच प्रकारच्या वांशिक विभाजनातून निर्माण झाली असावी. ‘वर्ण’ या शब्दाचा अर्थ रंग असा असल्याने कदाचित हा सिद्धांत मांडला गेला असावा; परंतु भारतीय जातींमध्ये रंग-रूपानुसार असा फरक केलेला सहसा आढळत नाही.

भारताइतक्याच जुन्या संस्कृतीमधील वंशवाद कसा होता, हे तपासणे येथे संयुक्तिक ठरते. चीन व जपानमध्ये रंग, चेहरेपट्टी, उंची,शरीरसामर्थ्य इत्यादींना अधिक दर्जा दिला जात असे. जपानमध्ये जी सरंजामशाही पद्धत होती, तीत ‘बुराकुमिन’ नावाचा एक कनिष्ठ सामाजिक दर्जा प्राप्त झालेला समुदाय होता; मात्र हा भेदभाव वांशिक निकषांवर आधारलेला नव्हता. जपानमधील कोरियन समुदायाला कनिष्ठ स्थान असे, पण त्याच्या मुळाशी आर्थिक व राजकीय पार्श्वभूमी होती; वांशिक पूर्वग्रहदूषित वंशवादी कल्पना नव्हती.

वंशवादाचा प्रसार-प्रचार प्रामुख्याने विकसित पाश्चात्त्य राष्ट्रांतून दृग्गोचर होतो. तरीदेखील आफ्रिकेतील काही आदिम जमातींमध्ये वंशवाद विद्यमान काळातही आढळतो. उदा., रूआंडा आणि बुरूंडी या आफ्रिकेतील छोट्या देशांमध्ये १९६१ पर्यंत समाजाचे विभाजन तीन वेगवेगळ्या समुदायांत केले होते. या विविध गटांमध्ये रंग, रूप व उंची या बाबतींत बराच फरक होता. उंच व बलबंड शरीरयष्टी असलेल्या तुल्सी जमातीचे वर्चस्व इतर दोन गटांवर त्यावेळी लादले गेले. त्या समाजाचे स्तरीकरण व राजकारण वंशवादाला महत्त्व देणारे होते, हे स्पष्ट दिसते.

वांशिक भेदभाव व वंशवादाचे परिणाम दूरगामी झाले आहेत. ज्या अल्पसंख्यांक दुर्बल गटाला यामुळे त्रास सोसावा लागला, त्यांच्यात नियतिवादी विचारसरणी दृढावली. त्यांचा विशिष्ट काळ मानसिक पातळीवर छळ झाला. सततच्या शोषणामुळे व दडपशाहीमुळे तो आपला आत्मविश्वास व स्वाभिमान गमावून बसला होता. त्याची अशी भावना झाली होती की, कनिष्ठ स्थान हेच आपले योग्य स्थान आहे; तीमुळे आळस, उदासीनता व पलायनवाद अशा घातक प्रवृत्ती त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा एक भाग बनल्या. जेव्हा दडपशाही करणाऱ्या गटांविरुद्ध आवाज उठविता येत नाही, तेव्हा दुर्बल घटकांत आंतरिक संघर्ष व द्वेषभाव निर्माण होतो. त्यांच्यातील एकी कमी होते. वंशवादी प्रवृत्तीचा सत्ताधारी वर्गावरही विशिष्ट परिणाम होतो. सत्ताधारी वर्ग मग्रूर बनून समाज व सत्ताधीश यांत कटुता निर्माण होते. तद्वतच गरीब-श्रीमंत यांतील दरीही रुंदावते आणि मुक्त व स्वतंत्र वृत्ती दडपल्या जातात. अखेर सुव्यवस्था व शांतता यांसाठी दडपशाहीचा अवलंब करावा लागतो.

मानवी संस्कृतीची ही वंशवादी उपपत्ती निर्दोष नाही. विशेषतः जगातील प्राचीन, मध्ययगीन व आधुनिक संस्कृतींचे मोठमोठे प्रसिद्ध समाज एकमेकांच्या संस्कृतीचे लीलेने आदानप्रदान करीत असताना दिसतात. अरबांनी साम्राज्य स्थापनेनंतर बगदाद शहरात ग्रीकांची सांस्कृतिक प्रेरणा आत्मसात करून तीत मौलिक भर घातली. मागील दोनशे वर्षांचा इतिहास पाहता, आधुनिक वैज्ञानिक संस्कृतीचा प्रसार सर्व जगात झालेला आढळतो. मूलतः ही संस्कृती पाश्चात्त्य आहे; परंतु हिंदी, चिनी, जपानी विद्यापीठांनी पाश्चात्त्यांच्या विद्या व कला समर्थपणे आत्मसात करून वाढीस लावल्या आहेत; परंतु यूरोपियन, चिनी, हिंदी व जपानी यांची वांशिक एकता सिद्ध करण्यास काही प्रमाण नाही. यांपैकी प्रत्येकात भिन्न वंशांची मिश्रणे झाली आहेत. दुसरे असे की, काही विद्यमान रानटी समाज वगळता आजच्या मानव समाजात असा कोणताही मानव गट वा देश सापडत नाही की, ज्याच्यात दुसऱ्या संस्कृतींचे जोमदार अनुकरण करण्याचे सामर्थ्य कमी आहे.विद्यामान पाश्चात्त्य संस्कृतीसुद्धा अनेक सहस्त्र वर्षांच्या भिन्न मानववंशांनी आधारलेल्या भिन्न संस्कृतीचे परिणत झालेले स्वरूप आहे. यहुदी, ग्रीक व रोमन या तीन संस्कृतींचा वारसा या संस्कृतीला प्राप्त झाला आहे. त्यामुळे ही संस्कृती जगातील सर्व मानव कुलांच्या संस्कृतीतील उपयुक्त गुणांचा संग्रह करू लागली आहे. निग्रो व रेड इंडियन यांपासून नृत्यकलेचे अनेक प्रकार पाश्चात्त्यांनी स्वीकारले आहेत. चिनी लोकांच्या मृत्पात्रांनी केलेली सजावटही अलीकडे आवडू लागली आहे.

संदर्भ: 1. Ehrlich, Paul R.; Feldman, S. S. The Race Bomb: Skin colour, Prejudice and Intelligence, London, 1977.

2. Hirsch, S. Carl. The Riddle of Racism, New York, 1972.

3. Pettigrew, Thomas F. Ed. The Sociology of Race Relations: Reflection and Reform London, 1980.

4. Thinker, Hug, Race, Conflict and The International Order: From Empire to United Nations, London, 1977.

लेखिका: अनुपमा केसकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

2.96666666667
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 14:34:19.999767 GMT+0530

T24 2019/10/18 14:34:20.007274 GMT+0530
Back to top

T12019/10/18 14:34:18.812594 GMT+0530

T612019/10/18 14:34:18.830316 GMT+0530

T622019/10/18 14:34:18.909413 GMT+0530

T632019/10/18 14:34:18.910344 GMT+0530