Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 13:44:57.466453 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 13:44:57.470946 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 13:44:57.488892 GMT+0530

विधवा

विधवा विषयक माहिती.

 

पती व पत्नी यांचे वैवाहिक जीवन हे त्यांच्यापैकी एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे संपुष्टात येते. जिचा पती निधन पावला आहे व जिने पुन्हा लग्न केलेले नाही, अशी स्त्री म्हणजे ‘विधवा’होय; तर ज्याची पत्नी मरण पावली आहे व ज्याने पुन्हा लग्न केलेले नाही, असा पुरूष ‘विधुर’होय. पतिनिधनाखेरीज इतर कारणांमुळे -उदा., घटस्फोटामुळे अथवा पती परागंदा होण्यामुळे-स्त्रीला वैधव्य प्राप्त होत नाही. घटस्फोटिता अथवा परित्यक्ता म्हणून ती जगते. परंपरागत समाजामध्ये विधवा स्त्रीचे जीवन विशिष्ट नीतिनियमांनी नियंत्रित होते. पारंपारिक समाजात धार्मिक व नैतिक मूल्ये अधिक कठोर असतात; परिणामी ‘वैधव्य’ या संज्ञेला त्या समाजात विशिष्ट अर्थ व परिमाणे प्राप्त होतात. कुटुंब, आप्तसंबंधीय, जात व अधिक व्यापक समुदायांतर्गत विधवेचे वैयक्तिक आयुष्य काटेकोर रूढी व बंधने यांनी बंदिस्त होते. पारंपारिक हिंदू, ख्रिस्ती, इस्लाम धर्मीयांमध्ये तसेच प्राचीन ईजिप्तसारख्या देशांतही वैधव्य ही एक कौटुंबिक आपत्ती समजली जाई. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतील विवाहित पुरुषाचे निधन व त्यामुळे कौटुंबिक स्थाने, भूमिका व अधिकार-व्यवस्थेत घडणारे बदल हे मूलभूत स्वरूपाचे असल्याने, धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या या घटनेची गंभीर दखल घेतली जाते.

कुटुंब व समाज, हा विविध स्थाने व भूमिका यांच्या परस्पर संबंधांमुळे संघटित होत असतो. स्त्रीच्या आयुष्यात विवाह हा संस्कार अत्यंत महत्त्वाचा व अनिवार्य मानला गेला आहे. विवाहित स्त्रीला सासरच्या कुटुंबात विशिष्ट स्थान दिले जाते व काटेकोर वागणुकीचे नियम पाळणे तिला बंधनकारक असते. पितृवंशीय व पितृगृहनिवासी म्हणून पितृसत्ताक व पुरूषप्रधान कुटुंबपद्धतीत, विवाहानंतर स्त्री माहेर सोडून पतीच्या घरी येते. पतीमुळे तिला कौटुंबिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा लाभते. पतिनिधनाबरोबरच या नात्याचा आणि              प्रतिष्ठेचा शेवट होतो. पत्नी हे नाते संपुष्टात आल्यामुळे बाकीचे कौटुंबिक बंध शिथिल होतात व तिचे कुटुंबातील स्थान दुय्यम ठरते. धार्मिक रूढी वा प्रभाव असलेल्या सनातनी समाजांमध्ये स्त्री ही भावनिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्यादेखील उपेक्षित होते व एकाकी पडते. पती नसलेली विधवा स्त्री ही कौटुंबिक व्यवस्थेमध्ये व परस्पर संबंधाच्या आकृतिबंधामध्ये अनुचित विघटन घडवेल, ही भीती सर्व सनातनी समाजांमध्ये आढळते. पुरातन पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये विवाहित स्त्री ही पतीच्या अधिकारात असावी, ती पतीशी एकनिष्ठ असावी व केवळ पतीच्या हयातीत नव्हे, तर त्याच्या निधनानंतरही तिने पातिव्रत्य पाळावयास हवे, असे मानले जात असे. विधवेने पतीच्या स्मरणार्थ आजन्म व्रतस्थ जीवन जगावे, पुनर्विवाह करू नये, असे जाचक निर्बंध त्यामुळे रूढ झाले. एकविवाह आणि पातिव्रत्य ह्यांची सक्ती स्त्रियांच्या बाबतीत केल्यामुळे विधवांची समस्या उभी राहिली.बहुपतिकत्व आणि दिराशी विवाह हे मान्य असलेल्या समाजात ही समस्या दिसत नाही.

प्राचीन समाज

प्राचीन समाजांमध्ये (उदा., ईजिप्त व जर्मनी या देशांतील) विधवेला तिच्या मृत पतीच्या थडग्यात जिवंत पुरत असत. प्राचीन भारतीय धर्मशास्त्रे व नीतिनियम यांनुसार विधवेला पतीच्या मरणास कारणीभूत धरल्याने, ती पापी व अमंगल आहे ही समाजाची धारणा बनली. तिने कुटुंबातील मंगल प्रसंगी उपस्थित राहू नये, असा प्रघात पडला. विधवा स्त्रीने सुतक किती दिवस पाळावे, या काळात तिने कोणते वस्त्र परिधान करावे, तिने घराबाहेर पडावे की नाही, तिने कोणाशी बोलावे, कोणते अन्न किती वेळा ग्रहण करावे, यांबद्दलहीविवध समाजांत विभिन्न बंधने विधवेवर लादलेली दिसून येतात. पतिनिधनाचे पातक धुऊन काढण्याकरिता अगर प्रायश्चित्त म्हणून ही बंधने तिने पाळलीच पाहिजेत, असा समाजाचा दंडक असे. हिंदू समाजात धर्मसूत्रे आणि मनुस्मृती यांनुसार विधवेच्या दैनंदिन व्यवहारांवर कडक बंधने घातलेली आढळतात.

प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृती

प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतीमध्ये विधवांच्या पुनर्विवाहाला फारसे प्रोत्साहन नव्हते. प्रारंभीच्या ख्रिस्ती समाजातही पुनर्विवाह हा विवाहपूर्व शरीरसंबंध अगर व्यभिचार यांच्याइतकाचनिंद्य व त्याज्य मानला जाई. प्राचीन भारतात धर्मशास्त्रानुसार विधवेला पुनर्विवाह निषिद्ध ठरविला गेला; मात्र मनुस्मृती आणि नारदस्मृती या ग्रंथांमध्ये ⇨नियोग प्रथेचा उल्लेख येतो. या प्रथेनुसार विधवा स्त्रीला विधीपूर्वक, आपल्या दिराशी समागम करण्याची मुभा दिलेली दिसून येते. मात्र मनुस्मृतीमध्ये नियोग प्रथेला फक्त संततीच्या व वंशवृद्धीच्या दृष्टीने मान्यता दिली आहे. अपत्यहीन स्त्रीने दिराबरोबर समागम करून, वंशाचे नाव कुटुंबाची मालमत्ता टिकवावी, या दृष्टीने ही तडजोड असावी. स्त्री ही फक्तप्रजोत्पादनाचेसाधन आहे, ही अनिष्ट विचारसरणी या परंपरेला आधारभूत ठरली. मात्र सर्वसाधारणपणे भारतीय समाजामध्ये पुनर्विवाहास संमती नसे. तरुणपणी वैधव्य आलेल्या स्त्रीची यामुळे अतिशय कुचंबणा होत असावी. तिच्याकडे संशयाने पाहण्याचा दृष्टिकोन सर्वत्र आढळतो. तिच्यावर परपुरुषाची नजर जाऊ नये, म्हणून अनेक जाचक निर्बंधांबरोबर तिचे केशवपन करण्याची क्रूर चाल भारतात निर्माण झाली. प्राच्यविद्यापंडित अ. स. अळतेकर यांच्या मते बाराव्या शतकापासून या चालीची उदाहरणे आढळतात. काही प्राचीन ग्रंथात-उदा., स्कंदपुराणात-यासंबंधी वचने आढळतात. विधवेला जितके केस असतील, तितकी वर्षे तिच्या मृत पतीला नरकवास घडतो, अशा भ्रामक समजुती प्रसृत केल्या गेल्या. विसाव्या शतकाच्या सुरूवातीलादेखील ही विटंबना विधवा स्त्रियांना ,सहन करावी लागली,हे दारुण सत्य आहे. उच्च जातींमध्ये, विशेषतः ब्राम्हण समाजात, ही चाल प्रामुख्याने प्रचलित होती.

पुनर्विवाहाला बंदी घालण्याबरोबरच, बालविवाह व जरठ-बाला विवाह या घातक प्रथांमुळे विधवांचे प्रश्न अधिकच गंभीर बनले. बालविवाहांचे पर्यवसान मुलीला अल्पवयात वैधव्य येण्यात होई व अशा बालवयीन विधवांच्या वाट्याला फक्त दुःख, निराशा व अवहेलनाच येत असे. ब्राह्मण समाजाव्यतिरिक्त इतर जातींमध्ये मुळात पुनर्विवाहाला विरोध नव्हता; पण प्रतिष्ठेच्या व सामाजिक मानमरातवाच्या चुकीच्या कल्पनांमुळे कनिष्ठ जातींमध्येदेखील पुढे पुनर्विवाह गौण ठरवले गेले. कनिष्ठ जातींतील पुनर्विवाहाला ‘मोहतूर’ वा ‘पाट’लावणे म्हणत. या विधीला प्रतिष्ठा नसे, तसेच मंत्रपठण करून आणि मांडव घालून हा विवाह साजरा होत नसे.

मृत पतीचा मृत्यूनंतरही आपल्या पत्नीवर हक्क असतो, ह्या भ्रामक समजुतीमुळे परलोकात तिने त्याची सेवा करावी व म्हणून देहत्याग करावा, ही भावना भारतीय समाजात तीव्र झाली. त्यातून भारतामध्ये मृत पतीच्या बरोबर पत्नीने सहगमन करण्याच्या अथवा सतीच्या चालीचा प्रचार झाला आणि विधवेला सक्ती करून व जबरदस्तीने पतीच्या चितेवर जाळण्याचे प्रकार घडू लागले. या चालीला जरी धार्मिक अधिष्ठान दिले गेले, तरी कोणत्याही धर्मग्रंथात या प्रथेचा स्पष्ट पुरस्कार नाही. महाभारतात पांडूची पत्नी माद्री सती गेली; पण ही चाल तेव्हादेखील सक्तीची नव्हती. महाराष्ट्रात उच्च क्षत्रिय कुळे, पेशवे व सरदार यांच्या स्त्रिया सती जात. थोरल्या शाहू महाराजांची पत्नी, माधवराव पेशव्यांची पत्नी रमाबाई, संभाजी आंग्रे यांची पत्नी अशी सतीची उदाहरणे इतिहासात प्रसिद्ध आहेत. सहगमनाचा मार्ग हा स्त्रियांनी बहुदा मुसलमानी आक्रमणाच्या प्रसंगी धर्मांतर आणि अत्याचार यांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी स्वीकारला असावा. राजस्थानमधील जोहार हे याचे उदाहरण आहे. विधवेला पतीबरोबर मारून टाकण्याची पद्धत केवळ भारतामध्येच नव्हे, तर प्राचीन यूरोपीय संस्कृतींमध्ये तसेच चीनमध्येही चौदाव्या शतकापर्यंत रूढ होती.

परंपरागत समाजातील विधवांच्या प्रश्नांचे स्वरूप हे बालविवाह, सती, केशवपन यांसारख्या अनिष्ट रूढींशी निगडित असल्याने, मानवतेच्या व नैतिकेच्या दृष्टिकोणातून विधवा स्त्रियांच्या समस्या हाताळणे आवश्यक होते. त्या दृष्टीने एकोणिसाव्या शतकात काही पुरोगामी विचारांच्या नवशिक्षित सुधारकांकडून समाजसुधारणांचे जोरदार प्रयत्न सुरू झाले. केशवपनासारख्या अघोरी चालीविरुद्धही समाजसुधारकांनी लढे दिले. या रूढीतील अशास्त्रीयता पटवून देण्यासाठी व्यंकटेश रंगो कट्टी यांनी विधवावपन-अनाचार हे पुस्तक लिहिले. लोकहितवादी, आगरकर यांनीही ही रूढी नष्ट व्हावी म्हणून आवाज उठविला. सतीच्या अमानुष चालीविरूद्ध भारतात चळवळ उभी राहिली. बंगालमध्ये ⇨राजा राममोहन रॉय यांनी या चालीच्या विरोधात जे प्रयत्न केले, त्यांच्या परिणामी गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंकच्या कारकीर्दीत १८२९ साली कायद्याने सतीच्या चालीवर बंदी घालण्यात आली.

विधवा पुनर्विवाह

विधवांच्या पुनर्विवाहाबाबत या काळात अनेक समाजसुधारकांनी चळवळ सुरू केली. १८५५ मध्ये बंगालमध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवाविवाहाची मागणी करणारा अर्ज सरकारकडे पाठविला. तसेच त्यांनी पुनर्विवाहाच्या पुष्ट्यर्थ ग्रंथही लिहिला; या ग्रंथात विधवाविवाहाला पाठिंबा देणारे दाखले धर्मशास्त्रातूनच काढून दाखवले आहेत. या ग्रंथाचे मराठी भाषांतर ⇨विष्णु परशुरामशास्त्री पंडित यांनी विधवाविवाह या नावाने १८६५ मध्ये केले. ते स्वतःकर्ते समाजसुधारक होते व त्यांनी विधवेशी विवाह केला होता. १८५६ मध्ये हिंदू विधवा पुनर्विवाहाचा अधिनियम मंजूर झाला. मात्र पुनर्विवाहाच्या समयी स्त्री अल्पवनीय विधवा असल्यास, विवाहास तिच्या पालनकर्त्यांची संमती आवश्यक मानली गेली. त्यामुळे कायद्यानेपुनर्विवाहाला मिळालेली मान्यता हवी तितकी प्रभावी ठरली नाही. बालविवाहाला विरोध करणे व विवाहाचे वय वाढविणे यांकरिता बंगालमध्ये व महाराष्ट्रात प्रयत्न सुरू झाले. महाराष्ट्रात जगन्नाथ शंकर शेट, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी प्रभृतींनी या कार्यास वाहून घेतले. १८६५ साली मुंबईत ‘विधवाविवाहोत्तेजक मंडळा’ ची स्थापना झाली. या सभेत महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी, काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांसारखी मातब्बर मंडळी होती. गो. ग. आगरकरांनीही विधवांच्या पुनर्विवाहाचा हिरिरीने पुरस्कार केला. पुनर्विवाहाच्या कार्यातही महत्त्वपूर्ण योगदान ⇨धोंडो केशव कर्वे यांचे आहे. १८९३ मध्ये त्यांनी बालविधवेशी विवाह केला व सनातनी लोकांचा रोष ओढवून घेतला. १८९० मध्ये ‘विधवाविवाहोत्तजक मंडळी’स्थापन करण्यात आली. या संस्थेचे १८९५ मध्ये ‘विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळी’ असे नामांतर झाले. या मंडळीचे अध्यक्ष रा. गो. भांडारकर होते. विधवाविवाहाबरोबरच स्त्रीशिक्षणास समाजात प्राधान्य मिळावे, यासाठी लोकजागृतीचे प्रयत्न महर्षी कर्वे व ⇨महात्मा फुले यांनी केले. १९०० मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे विधवांसाठी आश्रम स्थापन केला. विधवाविवाहावरील बंदीमुळे एखादी तरूण विधवा फसली, तर त्यातून गर्भपात अथवा भ्रूणहत्या घडण्याचे प्रश्न त्या काळात होतेच. लोकहितवादी व महात्मा फुले यांनी या प्रश्नाला वाचा फोडली. महात्मा फुले यांनी पुण्यात ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ (१८६३) काढून असहाय विधवा माता व बालके यांना आसरा देण्याची सोय केली.

एकोणिसाव्या व विसाव्या शतकांमध्ये विधवा स्त्रीला तिचे हक्क प्रदान करणारे अनेक कायदे संमत केले गेले. १९३७ मध्ये हिंदू स्त्रियांच्या संपत्तीविषयक अधिकाराचा अधिनियम मंजूर झाला. त्या अन्वये विधवा स्त्रीला तिच्या मुलांच्या बरोबरीने पतीच्या मालमत्तेचा वारसाहक्क दिला गेला. हिंदू विधवेची असहायता व कुटुंबावरील आर्थिक अवलंबित्व यामुळे संपुष्टात यावे, ही धारणा या कायद्यात होती. स्वातंत्र्योत्तर काळात १९५६ मध्ये हिंदू उत्तराधिकार अधिनियम संमत झाला. त्याचप्रमाणे दत्तक विधान अधिनियमानुसार (१९५६) विधवेला मूल दत्तक घेण्याची कायदेशीर मुभा दिली गेली.

विधवांचे प्रश्न

विधवांचे प्रश्न हे आधुनिक समाजात पुरोगामी विचारसरणी व अनुकूल कायदे यांमुळे काही अंशी सौम्य बनले असले, तरी कोणत्याही समाजात स्त्रीच्या दृष्टीने तिच्या पतीचे निधन ही मोठी दुर्दैवी आपत्ती ठरते. कुटुंबातील पतीच्या निधनामुळे स्त्रीचे व पिताच्या निधनामुळे मुलांचे आयुष्य बदलून जाते. आई, मुले, नातेवाईक व इतर संबंधित व्यक्तीचे आपापसांतले संबंध व अपेक्षा यांमध्ये अनेक फेरबदल व फेररचना घडून येतात. विधवा स्त्रीला आर्थिक ताण तर सोसावे लागतातच; शिवाय मुलांच्या पालनपोषणाचा भारही तिला सोसावा लागतो. तरुण विधवेला मानसिक ताण, शारीरिक कुंचबणा व पुरुषांकडून मानहानी सहन करावी लागते. पाश्चात्त्य समाजातदेखील विधवा स्त्री कुटुंबापासून दुरावली जाते व तिला एकाकीपणा व असुरक्षितता या प्रश्नांशी सामना करावा लागतो. विधवा स्त्री ज्या विशिष्ट समाजव्यस्थेत वावरते तो समाज, त्यातील स्थानिक गट व आर्थिक स्तर यांनुसार तिच्या समस्या भिन्न भिन्न रूपे धारण करतात. अविकसित व विकसनशील देशांत स्त्रियांना शिक्षण, रोजगार व कायदेशीर हक्कांची जाणीव कमी प्रमाणात असल्याने, पतिनिधनामुळे विधवेचे जीवन अत्यंत कष्टप्रद बनते. वृद्व विधवांचे प्रश्न आज अनेक विकसित देशांतही गंभीर स्वरूपाचे बनले आहेत. जगातील अनेक देशांमध्ये विधवांचे प्रमाण विधुरांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. ह्याची दोन कारणे संभवतातः पहिले, स्त्रियांमधील दीर्घायुषी असण्याचे जास्त प्रमाण व दुसरे, पूर्वविवाहित स्त्रियांशी लग्न करण्याबाबत पुरुषांमध्ये असलेली नाराजी. साहजिकच एकाकी निराधार स्त्रियांचे प्रमाण अशा समाजात अधिक असते. वृद्धत्व वैधव्य या दुहेरी आपत्तीला तोंड देण्याकरिता अशा विधवांना कुटुंब, स्नेही व सेवाभावी संस्था यांची मोठ्या प्रमाणात गरज भासते. वृद्धाश्रमांमध्ये निराधार विधवांची व्यवस्था काही प्रमाणात होत असली, तरी हा प्रश्न फक्त कायद्याने व वृद्धांसाठी संस्था स्थापून सुटणार नाही, हेही खरे आहे. अनाथ, वृद्ध विधवांना सेवाभावी संस्थांचा आश्रय, कौटुंबिक आधार व त्यातून लाभणारी सामाजिक सुरक्षितता यांची सर्वांत जास्त आवश्यकता भासत असल्याने, त्या दृष्टीने स्त्रियांकरिता असलेल्या सवलती व तरतुदी यांचे नियोजन करताना, विधवांच्या प्रश्नांना अग्रक्रम देणे महत्त्वाचे ठरते.

संदर्भ : 1. Altekar, A. S. The Position of Women In Hindu Civilization, Delhi, 1962.

2. Chatterji, Shoma, The Indian Women in Perspective, Delhi, 1993.

3. Dandavate, Pramila; Ranjana kumari; Verghese, Jamila, Widows, Abondoned and  Destitute Women in India, Delhi, 1989.

4. Sharma, Vijay, Protection to Women in Matrimonial Home, Delhi, 1994.

५. मालशे, स. गं.; आपटे, नंदा, विधवा विवाह चळवळ (१८००-१९००), मुंबई, १९७८.

६. विद्यासागर, ईश्वरचंद्र; अनुपंडित, विष्णु परशुरामशास्त्री, विधवा विवाह, मुंबई, १८६५.

लेखक: मा. गु. कुलकर्णी ; अनुपमा केसकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

2.93939393939
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 13:44:57.831605 GMT+0530

T24 2019/10/18 13:44:57.838541 GMT+0530
Back to top

T12019/10/18 13:44:57.365745 GMT+0530

T612019/10/18 13:44:57.384439 GMT+0530

T622019/10/18 13:44:57.456440 GMT+0530

T632019/10/18 13:44:57.457275 GMT+0530