অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विवाहसंस्था

दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी संततीची प्राप्ती आणि तिचे संगोपन करण्याच्या उद्देशाने, तसेच समाजाच्या मान्यतेने स्थिर आणि सातत्यापूर्ण लैंगिक जीवन जगण्यासाठी, कायदेशीर दृष्ट्या आवश्यक व समाजमान्य विधींचे पालन करून कौटुंबिक जीवनाची केलेली सुरुवात म्हणजे विवाह होय आणि या विविध विधींचा तसेच संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक प्रथांचा समुच्च्य म्हणजे विवाहसंस्था होय. विवाहसंस्थेचे उद्दिष्ट मानवी समाजातील प्रजनन-प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे हे आहे. जीवसृष्टीतील इतर प्राण्यांच्या तुलनेने मानवी मूल हे अतिशय परावलंबी असते. ते स्वतःचे पोषण व संरक्षण अनेक वर्षे करू शकत नाही. इतर प्राण्यांचे जीवन सहजप्रेरणेने घडत असते. स्वतःचे अन्न शोधणे, संरक्षण करणे या गोष्टी प्राण्याचे लहान पिलू थोड्या दिवसांतच स्वतः करू लागते. परंतु मानवाच्या बाबतीत तशी परिस्थिती नाही. मानवास फारच थोड्या सहजप्रेरणा प्राप्त झालेल्या आहेत व एकूण मानवी वर्तनात त्यांचे स्थान दुय्यम आहे. चालणे, बोलणे, जेवणे, शरीराची काळजी घेणे इ. सर्व बाबी मानवाच्या मुलास शिकवाव्या लागतात. त्याशिवाय त्याला या क्रिया करता येणार नाहीत. मानवी सहवासापासून वंचित झालेल्या व प्राण्यांच्या सहवासात वाढलेल्या मुलांची जी थोडीफार उदाहरणे उजेडात आली, त्यांवरून मानवासारखे वर्तन करणे हे मुलास मानवाच्या संपर्काशिवाय व सहवासाशिवाय शक्य होत नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे मूल जन्माला आल्यावर त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी प्रौढ व्यक्तीने स्वीकारल्याशिवाय ते जगू शकणार नाही; अथवा त्याची नीट वाढ होऊ शकणार नाही. गर्भधारणेपासून मुलाच्या जन्मापर्यंत मूल व त्याला जन्म देणारी स्त्री ही एकमेकांस जैविक बंधामुळे बांधलेली असतात. जन्मानंतर मुलाला पहिले अन्न जन्मदात्या आईकडून मिळण्याची व्यवस्था निसर्गाने केलेली आहे. त्यामुळे मुलाच्या जन्मानंतर नाळ पडल्यानंतर मूल आणि माता यांच्यामधील शारीरिक बंध जरी संपत असले. तरी निसर्गाने मुलाच्या जन्माबरोबर त्याच्या जननीस उत्पन्न करू दिलेले दूध स्वतःच्या मुलास पाजण्याच्या प्रेरणेमुळे मूल आणि माता हे बंधन पुढे काही काळ तरी चालूच राहते व त्याबरोबरच इतर भावनिक बंधनांची त्यात भर पडत गेल्यामुळे ते पुढे दीर्घकाळ चालू राहते. अशा तऱ्हेने स्त्री ही स्वतःच्या मुलाशी त्याच्या जन्मानंतर जैविक आणि मानसिक बंधनांमुळे बांधली जाते.

जन्मदात्या पुरुषाची स्थिती याहून वेगळी असते. लैंगिक समागमानंतर पुरुष स्त्रीपासून अलग होतो. त्याने जन्मास घातलेल्या मुलाशी स्त्रीप्रमाणे त्याचे शीरीरिक संबंध राहत नाहीत. त्यामुळे पुरुष पितृत्वाची जबाबदारी सहज झटकू शकतो. परंतु असे झाल्यास स्त्रीला गर्भधारणेपासून मुलाच्या जन्मापर्यंत व त्यानंतरही पुरुषाच्या मदतीने व साहचर्याची जी गरज निर्माण होते, त्याची पूर्तता झाली नसती. ही पूर्तता निसर्गाने मानवाला जी लैंगिक प्रेरणा दिली आहे, तिच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामुळे घडून येते. यातील पहिले वैशिष्ट्य म्हणजे लैंगिक प्रेरणा ही युवावस्था प्राप्त झाल्यानंतर सतत चालू राहणारी गोष्ट आहे. प्राणी जगतात मादी ही एका विशिष्ट कालखंडातच मीलनोत्सुक होते व त्याच वेळी तिचा नराशी समागम झाल्यास तिला गर्भधारणा होण्याची शक्यता असते. परंतु मानवी स्त्रीच्या बाबतीत अशी परिस्थिती नसते. ती ऋतुस्नात झाल्यानंतर तिची मासिक पाळी चालू होते व प्रत्येक पाळीच्या ठराविक कालखंडात ती गर्भवती राहण्याची शक्यता असते. लैंगिक समागम ही पुरुषाची नित्याची गरज असते. त्यामुळे रोज नित्य नव्या स्त्रीचा शोध घेण्यापेक्षा एकाच स्त्रीशी स्थिर लैंगिक संबंध ठेवणे, हे बहुतांशी पुरुषांच्या दृष्टीने अधिक सुखकारक ठरते. स्त्री आणि पुरुष यांच्या या परस्परपूरक लैंगिक गरजांतून स्त्री, पुरुष आणि त्यांचे मूल असा जनन गट असतित्वात येतो. यालाच प्रारंभिक कुटुंब (केंद्र/केंद्रस्थ/बीज-कुटुंब) असे म्हटले जाते. असा गट अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष यांना जी बंधने पाळावी लागतात आणि जे वर्तनसंकेत व मूल्ये आचारणात आणावी लागतात, त्यांच्या एकत्रित अनुबंधातून विवाहसंस्थेची निर्मिती झाली आहे. हॅरी जॉन्सन (१९२३७७) या अमेरिकन समाजशास्त्राने म्हटल्याप्रमाणे, विवाह म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचे असे स्थिर संबंध, की ज्यामध्ये त्यांना त्यांच्या सामाजिक स्थानास कोणतीही बाधा न येता मुलांना जन्म देण्याची अनुमती समाजाने दिलेली असते.

विवाहसंस्थेचा उगम

विवाहसंस्थेच्या शास्त्रीय अध्ययनाच्या इतिहासात स्वैराचारापासून एकपत्नीकत्वाकडे होत गेलेल्या विवाहसंस्थेच्या वाटचालीचा सिद्धांत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्लंडमध्ये व अन्य यूरोपीय देशांत लोकप्रिय झाला होता. व्हिक्टोरिया राणीच्या कालखंडातील समाज हा समाजिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील अत्युच्च बिंदू असून, या समाजात अस्तित्वात असलेली ⇨एकविवाहाची (एकपतिपत्नीकत्वाची) प्रथा ही स्त्रीपुरुषांमधील लैंगिक संबंधाची नितिमत्तेवर आधारलेली आदर्श प्रणाली आहे, असा विचार त्या काळात मान्य झाला होता. मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या आदिम अवस्थेमध्ये स्त्री-पुरुषांमध्ये स्वैराचार अस्तित्वात होता. कालांतराने सामाजिक जीवनात वैवाहिक बंधने असतित्वात येऊ लागली आणि स्वैराचाराची जागा समूहविवाह, बहुपतिकत्व, बहुपत्निकत्व आणि एकपत्नीकत्व पद्धती या क्रमशः उत्क्रांत होत गेलेल्या पद्धतींनी घेतली, अशा स्वरूपाचा हा सिद्धांत होता. हा सिद्धांत मांडणाऱ्यांमध्ये ⇨लेविस हेन्री मॉर्गन (१८१८-८१), रॉबर्ट ब्रिफॉल्ट इ. मानवशास्त्रज्ञांचा अंतर्भाव होतो. हा विवाहसंस्थेच्या उत्क्रांतीचा सिद्धांत ज्या सामाजिक प्रथांच्या आधारावर मांडला होता, त्या प्रथांच्या आधारावर मांडला होता, त्या प्रथांचा विचार करणे अगत्याचे आहे. आदिवासी समाजामध्ये उत्सवाच्या प्रसंगी स्त्री-पुरुषांमधील लैंगिक बधने शिथिल होतात. त्याचप्रमाणे पत्नीची अदलाबदल करणे, खास पाहुण्यास स्वतःची पत्नी उपभोगासाठी देणे या आदिवासी समाजात अस्तित्वात असलेल्या प्रथांचा वरील सिद्धांताच्या उल्लेख केला जातो. तसेच जैविक पितृत्वाविषयीचे अज्ञान ऑस्ट्रेलिया आणि इतरत्र राहणाऱ्या काही आदिवासी जमातींमध्ये दिसून येते. आदिवासी समाजात स्वतःच्या वडिलांच्या, आईच्या, बहिणाच्या, मुलाच्या वयोगटांतील व्यक्तींना त्या त्या नात्याच्या परिभाषेने संबोधण्याची वर्गनिष्ठ नातेपद्धती प्रचलित आहे. या सर्व प्रथांचा चिकित्सक व पूर्वग्रहविरहित मूलभूत पद्धतीने विचार न करता त्यांचा उथळ दृष्टीने विचार करून ह्या शास्त्रज्ञांनी स्वैराचाराचा सिद्धांत मांडल्याचे आता लक्षात आले आहे. आदिवासी समाजामध्ये असलेली वर्गनिष्ठ नातेव्यवस्था, ज्या ज्या संदर्भात स्वतःच्या बायकोच्या वयोगटात मोडणाऱ्या जमातीतील स्त्रियांना बायको म्हणून संबोधिले जाते, ती काही समाजिक उद्दिष्टे साधण्याची एक व्यवस्था आहे. अशा जमातींमध्ये स्वतःच्या बायकोसाठी वेगळे नातेदर्शक नाव व बायकोच्या वयाच्या इतर स्त्रियांसाठी-ज्यांच्याशी अशा अन्य पुरुषाचा विवाह होऊ शकतो वेगळे नातेदर्शक नाव वापरण्यात येते. यामुळे दोहोंमधील सामाजिक भेद स्पष्ट केला जातो. त्याचप्रमाणे जननप्रक्रियेतील पुरुषाच्या कार्याचे अज्ञान काही आदिवासी जमातींमध्ये दिसत असले, तरी अशा जमातींत जैविक पितृत्वापेक्षा सामाजिक पितृत्व हे अधिक महत्त्वाचे मानले जाते. त्याचप्रमाणे आदिवासी समाजामध्ये विवाहाच्या आधी स्वैर लैंगिक संबंध वर्ज्य नसतात; परंतु विवाहानंतर असे संबंध वर्ज्य मानले जातात. या सर्व विवेचनातून एकच निषकर्ष निघतो, तो म्हणजे स्वैराचारातून एकपत्नीकत्वाकडे उत्क्रांतीची वाटचाल दर्शिविणारा जो सिद्धांत एकेकाळी ग्राह्य मानला जात होता, तो आधुनिक काळात मानवशास्त्राने उजेडात आणलेल्या साधनसामग्रीच्या संदर्भात अग्राह्य ठरला आहे. ⇨एडवर्ड अलेक्झांडर वेस्टरमार्कची (१८६२१९३९) भूमिका या संदर्भात महत्त्वाची आहे. विविध विवाहप्रकारांकडे आणि लैंगिक जीवनासंबंधीच्या इतर चालीरीतींकडे सामाजिक उत्क्रांतीच्या अवस्था म्हणून पाहणे, हे शास्त्रीय दृष्ट्या ग्राह्य ठरण्यासारखे नाही.

विवाह आणि औरसता

विवाहाचा उद्देश जे स्त्री-पुरुष संततिनिर्मितीच्या उद्देशाने परस्परांशी स्थिर लैंगिक संबंध प्रस्थापित करू इच्छितात, अशा व्यक्तींच्या संबंधांना विविध नियमांच्या आणि सामाजिक संकेतांच्या बधनाने स्थैर्य प्राप्त करून देऊन संततिसंगोपनासाठी आवश्यक अशा पती, पत्नी आणि त्यांचा मुले हे सदस्य असलेल्या प्रारंभिक कुटुंबाची निर्मिती करणे हा आहे, हे वरील विवेचनावरून स्पष्ट होते. समाजाच्या दृष्टीने स्वतःच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याची ज्यांची तयारी आहे, अशाच स्त्री-पुरुषांच्या संबंधांना विवाहाच्या संस्काराने मान्यता देणे व या बंधना बाहेर संततिनिर्मितीच्या शक्यतेवर नियंत्रण ठेवणे, हे जबाबदार सामाजिक घटक निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक आहे. असे जर झाले नाही, तर सामाजिक जीवन अनियंत्रित होऊन मानवी जीवनाच्या अस्तित्वासच धोका निर्माण होऊ शकतो. या दृष्टीने विवाहाशी औरसतेची संकल्पना जोडलेली आहे. विवाहबंधनातून निर्माण झालेल्या संततीस औरस संततीचा दर्जा दिला जातो. विवाहबंधनाबाहेर निर्माण होणाऱ्या संततीमुळे समाजस्वास्थावर विपरित परिणाम होत असल्यामुळे अशा संततीस अनौरस संतती म्हणून संबोधले जाते व तिला औरस संततीचा सामाजिक दर्जा व अधिकार प्राप्त होत नाही. अशा तऱ्हेने औरसतेच्या संकल्पनेद्वारा समाजमान्य संततीच्या निर्मितीस प्रोत्साहन दिले जाते आणि समाजस्वास्थावर ताण निर्माण करणाऱ्या विवाहबाह्य संततीच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवले जाते.

समाजाच्या स्थैर्यास धोका उत्पन्न करणारी अनौरस संतती समाजास अमान्य असणाऱ्या विविध प्रकारच्या स्त्री-पुरुषांमधील लैंगिक संबंधांतून निर्माण होण्याची शक्यता असते. या विविध प्रकारच्या अमान्य संबंधांच्या समाजाच्या स्थैर्यावर होणाऱ्या परिणामांचे गांभीर्य एकसारखे नसते. काही लैंगिक संबंध अत्यंत घृणास्पद मानले जातात, तर काही लैंगिक संबंध अत्यंद घृणास्पद मानले जातात, तर काही संबंध कमी घृणास्पद मानले जातात व त्यांना समाजाची मान्यता जरी नसली, तरी समाज अशा संबंधांकडे कानाडोळा करतो. या दृष्टीने अनौरसतेचे त्याच्या गांभीर्यावर आधारित विविध प्रकार केले जातात. जगातील सर्व समाज वडील व मुलगी, आई आणि मुलगा, तसेच बहीण आणि भाऊ यांच्यामधील लैंगिक संबंधम्हणजेच ⇨अगम्य आप्तसंभोग-सर्वांत निषिद्ध मानतात. सर्व धर्माचा अशा संबंधांना विरोध आहे. अशा संबंधांमुळे संततिसंगोपनास अत्यावश्यक असलेल्या प्रारंभिक कुटुंबाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असते. आदिवासी समाजामध्ये विवाहपूर्व लैंगिक संबंधांना मान्यता असते. परंतु अशा संबंधांची परिमती स्त्री गर्भवती राहण्यात होत असल्यास अशा जोडप्यांचे लग्न लावण्यात येते. परंपरागत कृषिप्रधान समाजात रखेली ठेवण्याची पद्धत अस्तित्वात होती व अजूनही ही प्रथा संपूर्णपणे नाहीशी झालेली नाही. अशा संबंधातून निर्माण होणाऱ्या संततीच्या पालनपोषणाची जबाबदारी संबंधित जोडपे उचलत असल्यामुळे अशा अस्तित्वाकडे समाज कानाडोळा करतो. अशा संबंधांना गौण दर्जाची मान्यता मिळते. विवाहित स्त्रीबरोबर विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणे, हे कुमारिकेशी अनैतिक संबंध ठेवण्यापेक्षा सामान्यतः अधिक गंभीर मानले जाते. अशा प्रकारे समाजामध्ये औनरसतेचे त्याच्या कमीअधिक गांभीर्यावर आधारलेले विविध प्रकार असल्यामुळे दिसून येते. या औनरसतेच्या विविध प्रकारांकडे बघण्याच्या निरनिराळ्या प्रकाराच्या समाजांचा दृष्टिकोन निरनिराळा असू शकतो. परंतु एका संबंधाबाबत सर्व समाजांचा समान दृष्टिकोन दिसतो, तो म्हणजे अगभ्य आप्तसंभोग. सर्व समाजांमध्ये अगभ्य आप्तसंभोग-निषेध अस्तित्वात आहे.

विवाह आणि गृहनिवासासंबंधीचे नियम

अगम्य आप्तसंभोग-निषेधाच्या नियमाच्या सार्वत्रिक अस्तित्वामुळे विवाहच्या वेळी प्रत्येक व्यक्तीस आपला जोडीदार हा स्वतःच्या प्रारंभिक कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तींमधून निवडावा लागतो. त्यामुळे विवाहबद्ध जोडप्यामधील किमान एका व्यक्तीला स्वतः जन्म घेतलेल्या कुटुंबाचा त्याग करून स्वतःच्या जोडीदाराच्या कुटुंबामध्ये राहावयास जाणे भाग पडते. प्रत्येक समाजास लाभलेल्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीच्या संदर्भात विवाहानंतर कोणी कोणाकडे राहावयास जावे, यासंबंधीचे नियम त्या त्या समाजात अस्तित्वात असल्याचे दिसते. या संदर्भात पाच प्रकारचे नियम निरनिराळ्या समादांत अस्तित्वात असल्याचे आपणास दिसते. हे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) पितृस्थानीय, (२) मातृस्थानीय, (३) मातृ-पितृस्थानीय, (४) मातुलस्थानीय आणि (५) नूतन-स्थानीय. या पाच प्रकारांचे थोडक्यात विवेचन खाली केले आहे.

पितृस्थानीय व्यवस्थेमध्ये विवाहानंतर वधू ही वराच्या पित्यातच्या कुटुंबात राहवयास जाते. जॉर्ज पीटर मर्‌डॉक (१८९७-१९८५) या अमेरिकन मानवशास्त्र हा नियम सर्वाधिक समाजांत म्हणजे त्याने अध्ययन केलेल्या २५० समाजांच्या नमुन्यांमधून १४६ समाजामध्ये-अस्तित्वात असल्याचे आढळले. ज्या समाजातील आर्थिक व्यवस्थेत पुरुषांना महत्त्वाची भूमिका असते, अशा समाजात हा नियम अस्तित्वात असल्याचे दिसते. पशुपालन संस्कृतीत व पुरुषप्रधान कृषिसमाजात या नियमाचे अस्तित्व दिसते. मर्‌डॉकच्या सोशल स्ट्रक्चर (१९४९) या ग्रंथात त्याने केलेले संशोधन व निरीक्षणे नमूद केली आहेत.

मातृस्थानीय व्यवस्थेनुसार वर हा वधूच्या पालकांच्या घरी राहावयास जातो, किंवा त्यांच्या घराला लागून स्वतंत्र घर करून राहतो. ज्या समाजामध्ये स्थिर कृषिव्यवसाय अस्तित्वात असून जमिनीची मालकी स्त्रियांकडे असते व त्या कृषिव्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावीत असतात, अशा समाजात मातृस्थानीय प्रथा आढळते. मर्‌डॉकने केलेल्या अध्ययनात अशा समाजांची संख्या ३८ होती.

आर्थिक दृष्ट्या अप्रगत समाजामध्ये वरास विवाहाच्या वेळी वधूच्या पित्यास वधूमूल्य देणे शक्य होत नाही, अशी वेळी तो वधूच्या घरी राहून आपल्या श्रमांद्वारा वधूमूल्याची फेड करतो. त्यानंतर त्यास आपल्या पत्नीबरोबर स्वतःच्या पित्याच्या घरी राहावयास जाण्याची मुभा असते. म्हणून या पद्धतीस मातृ- पितृस्थानीय पद्धती म्हणतात. मर्‌डॉकच्या अध्ययनात अशा समाजांची संख्या २२ होती.

मातुलस्थानीय व्यवस्थेमध्ये विवाहानंतर विवाहित जोडपे वराच्या मामाच्या घरी राहवयास जाते. मर्‌डॉकने अध्ययन केलेल्या २५० समाजांच्या नमुन्यांपैकी आठ समाजांमध्ये अशी पद्धत अस्तित्वात होती. मेलानीशियामधील डोबुवा जमातीमध्ये विवाहित जोडप्याने विवाहानंतर आळीपाळीने एकेक वर्ष वधूच्या पितृगृही आणि वराच्या मामाच्या घरी राहण्याची प्रथा आहे.

नूतन-स्थानीय व्यवस्थेमध्ये विवाहानंतर विवाहित जोडपे वधू अथवा वर यांच्या पालकांच्या घरी न राहता स्वतंत्र घर करून राहते. मर्‌डॉकच्या अध्ययनात हा नियम १७ आदिवासी समांजांमध्ये अस्तित्वात होता. बऱ्याचशा आधुनिक नागर समाजांत ही व्यवस्था प्रचलित आहे.

स्थानाविषयीचे नियम हे विशिष्ट समाजात अस्तित्वात असलेल्या आर्थिक व्यवस्थेच्या गरजेतून तसेच विवाहच्या प्रकारातून आकारास येतात. नूतन-स्थानीय व्यवस्था ही एकविवाह पद्धतीशी (म्हणजे एकपती व एकपत्नी या पद्धतीशी) तसेच प्रारंभिक कुटुंबव्यवस्थेचे प्राबल्य याच्याशी सुसंगत असते.

संदर्भ : 1. Askham, Janet, Identity and Stability in Marriage, Cambridge, 1984.

2. Bernard, Jessie, The Future of Marriage, London, 1982.

3. Blood Robert O. Marriage, New York, 1962.

4. Bowman, Henry A. Marriage for Moderns, New York, 1965.

5. Cherlin, Andrew J. Marriage, Divorce, Remarriage, Cambridge,1981.

6. Clark, D. Marriage,Domestic Life and Social Change, London, 1991.

7. Fortes, M. Ed., Marriage in Tribal Societies, Cambridge, 1962.

8. Goode, W. J. The Family, New Delhi, 1965.

9. Harlan, Lindsey; Courtright, Paul B. Ed., From the Margins of Hindu Marriage, London,1995.

10. kapadia, K. M. Marriage and Family in India, London, 1959.

11. Mace, D. R.; Mace, Vera, Marriage: East and West, London 1960.

12. Murdock, G. P. Social Structure, New York, 1949.

13. Stopes, Marie, Married Love, Calcutta, 1966.

14. Westermark, E. A. The History of Human Marriage, 3Vols., (5th Ed.), 1971.

15. Williamson, Robert C. Marriage and Family Relations, New York, 1965.

१६. जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास (आवृ. तिसरी), वाई, १९९६.

१७.राजवाडे,वि. का. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, पुणे १९७६.

लेखक: त्रि. ना. वाळुंजकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate