Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 18:44:16.898520 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/17 18:44:16.903382 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 18:44:16.920941 GMT+0530

विवाहाचे प्रकार

विवाहाचे प्रकार या विषयी माहिती.

पति-पत्नीच्या परस्परांशी असलेल्या संख्येच्या आधारावर दोन विवाहप्रकार संभवतात : एकविवाह (एकपत्नीकत्व) व बहुपतिपत्नीक्तव. एकविवाह म्हणजे एका व्यक्तीस एकावेळी फक्त एकाच जोडीदाराशी विवाहबद्ध होता येते. आधुनिक समाजाचा कल हा एकविवाह पद्धतीकडे असल्याचे दिसते. काही आदिवासी जमातींमध्येही हा विवाहप्रकार रुढ आहे. मर्‌डॉक याने केलेल्या अध्ययनात अशा जमातींची संख्या त्रेचाळीस असल्याचे आढळून आले.

बहुपतिपत्नीकत्व या विवाहप्रकारचे दोन उपप्रकार आहेत : यांतील एक उपप्रकार बहुपत्नीकत्व म्हणजे एकाच पुरुषाने अनेक स्त्रियांशी विवाह करणे. विवाहित स्त्रीयांचे सहअस्तित्व ह्यात गृहीत आहे. हा प्रकार अनेक समाजांमध्ये अस्तित्वात असल्याचे आढळून आले आहे. मर्‌डॉकने केलेल्या आदिवासी जमातींच्या अध्ययनानुसार १९३ आदिवासी समाजांत बहुपत्नीकत्वाची प्रथा होती. मात्र बहुपत्नीकत्वाची प्रथा असलेल्या समाजामध्येही प्रत्याक्षात आर्थिक परिस्थितीच्या दबावामुळे विविध वयोगटांतील बहुतांशी पुरुषांचे विवाह हे प्रत्यक्षात एकपत्नीकत्वाच्या स्वरूपाचेच असतात.

मात्र अनेक स्त्रियांशी विवाह करणे हे अशा समाजात प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. व त्याला सांस्कृतिक आदर्शांचे स्थान प्राप्त होते. आदिवासी समाजाखेरीज सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत असणाऱ्या इस्लाम धर्मीय समाजामध्ये, तसेच पूर्वीच्या पारंपरिक भारतीय, चिनी, जपानी समाजांत, तद्वतच दक्षिण अमेरिकेतील देशांमध्येही बहुपत्नीकत्वाची प्रथा अस्तित्वात असल्याचे दिसून येते. अनेक धर्मांची या प्रथेस मान्यता आहे. याला अपवाद ख्रिस्ती धर्माचा आहे. ख्रिस्ती धर्माची फक्त एकपत्नीकत्वाच्या प्रथेसच मान्यता आहे.

ज्या समाजात बहुपत्नीकत्वाची प्रथा आहे, अशा समाजात या प्रथेस पोषक ठरणाऱ्या काही प्रथा अस्तित्वात असतात. बहुपत्नीक कुटुंबामध्ये पुरुषाच्या विविध पत्नींच्यामध्ये कलह होण्याची शक्यता बरीच असते. अशा समाजात निरनिराळ्या पत्नींच्या राहण्याची व्यवस्था प्रत्येक पत्नीसाठी निराळे घर बांधून केलेली असते, अथवा एकाच महालाच्या वा विस्तीर्ण घराच्या निरनिराळ्या भागांत केलेली असते. कलह कमी करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, पहिल्या पत्नीच्या संमतीने दुसऱ्या पत्नीची निवड केली जाते. त्याचप्रमाणे पहिल्या पत्नीस धाकटी बहीण असल्यास दुसऱ्या विवाहाच्या वेळी तिला प्राधान्य दिले जाते. अशा विवाहास मेहुणीविवाह म्हणून संबोधले जाते.

बहुपतिकत्व हा बहुपतिपत्नीकत्व विवाहप्रकारातील दुसरा प्रकार. हा विवाहप्रकार फार थोड्या समाजांमध्ये अस्तित्वात असल्याचे दिसते. एकाच स्त्रीने एका वेळी अनेक पती करणे व त्या पतींचे सहअस्तित्व म्हणजे बहुपतिकत्व होय. हे पती एकमेकांचे बंधू असल्यास अशा विवाहास ‘भ्रातृक बहुपतिकत्व’ म्हणतात व ते कोणत्याही नातेसंबंधाने जोडलेले नसल्यास त्यांच्या विवाहास ‘अभ्रातृक बहुपतिकत्व’ म्हणतात. भ्रातृक बहुपतिकत्वाची विवाहपद्धती दक्षिण भारतातील तोडा जमातीमध्ये, उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी राहत असलेल्या खस जमातीमध्ये व भारताबाहेर तिबेटच्या काही भागांमध्ये आढळते.

भ्रातृक विवाहानंतर आपल्या पतीच्या घरी राहावयास जाते व पतीच्या सर्व भावांच्या बरोबर लैंगिक संबंध ठेवते. अशा संबंधातून जन्मास येणाऱ्या मुलांचे जैविक पितृत्व कोणाकडे जाते हे महत्त्वाचे मानले जात नाही, तर त्यांची सामाजिक जबाबदारी कोणत्या भावाने स्वीकारावयाची-म्हणजेच त्यांचे सामाजिक पितृत्व कोणाकडे आहे-हे महत्त्वाचे मानले जाते. हे सामाजिक पितृत्व काही सामाजिक रूढींनुसार ठरविले जाते. उदा., काही समाजांमध्ये पहिल्या दोन मुलांचे पितृत्व सर्वात थोरल्या भावाकडे जाते आणि त्यानंतरच्या मुलांचे पितृत्व धाकट्या भावांच्याकडे क्रमशः सोपविले जाते. अभ्रातृक बहुपतिकत्वाची पद्धती ही फार थोड्या समाजांमध्ये अस्तित्वात असल्याचे आढळते. भारतामध्ये केरळमधील नायर जातीत ही पद्धत काही वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. भारताबाहेर पॉलिनीशियातील मार्केझान जमातीत, तसेच आफ्रिकेतील काही जमातींत ही पद्धत अस्तित्वात असल्याचे दिसून आले आहे.

बहुपतिकत्व विवाहपद्धती ही कठीण आर्थिक परिस्थितीशी निगडित असते. ही पद्धत अस्तित्वात असलेल्या जमाती अतिशय खडतर भौगोलिक परिस्थितीत राहत असतात व त्यांना तीव्र जीवनकलहाला सामोरे जावे लागते. काही कारणाने आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यास कुटुंबातील धाकट्या भावांना दुसऱ्या स्त्रीशी विवाह करण्याची अनुमती दिली जाते व त्यांच्या पत्नींनाही सर्व भावांची पत्नी म्हणून मानण्यात येते. अशा परिस्थितीत बहुपतिकत्वाच्या जागी समूहविवाहपद्धती अस्तित्वात येते. हा विवाहप्रकार फारच दुर्मिळ आहे. ब्राझीलमधील कैगांग जमातीमध्ये, तसेच मार्केझान जमातीमध्ये या प्रकारचे काही विवाह झाल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले. एकूणच मानवी समाजजीवनात या विवाहप्रकाराचे स्थान नगण्य आहे.

जोडीदाराची निवड

विवाह ही सामाजिक महत्त्वाची बाब असल्यामुळे कोणत्या स्त्रीने कोणत्या पुरुषाशी विवाहबद्ध व्हावे, हे विविध प्रकारच्या सामाजिक नियमांनी आणि संकेतांनी निर्धारित केलेले असते. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल, की समाजामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या समान पातळीवर असणाऱ्या स्त्री-पुरुषांचा एकमेकांशी विवाह होण्याची शक्यता अधिक असते. ही गोष्ट सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या नियमांनी साध्य केली जाते. कोणत्या सामाजिक गटातील जोडीदार निवडावा, ह्याचे सूचन सकारात्मक नियमांनी केले जाते. ह्यालाच ‘अंतर्विवाहाचे नियम’ असे म्हणतात.

स्वतःच्या धार्मिक, वांशिक, सामाजिक व सांस्कृतिक गटातून जोडीदाराची निवड करावी, असे अंतर्विवाहाचे नियम सांगतात. पारंपरिक समाजात हे नियम बरेच बंधनकारक असतात आणि ते प्रकट स्वरूपात असतात. पारंपरिक भारतीय समाजात स्वतःच्या जातीतून, पोटजातीतून विवाहासाठी जोडीदार निवडण्याचे बंधन असते. हे बंधन प्रकट स्वरूपात असते व त्याचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक रोषास वा बहिष्कारास तोंड द्यावे लागते. आधुनिक यूरोपीय व अमेरिकन समाजांत हे सामाजिक नियम अप्रकट स्वरूपात असतात. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना पारंपरिक समाजातील व्यक्तींप्रमाणे समाजाचा रोष सहन करावा लागत नसला, तरी एकूण त्यांचा कल हे नियम कळत-नकळत पाळण्याकडे असतो. अशा समाजातील बहुसंख्य विवाह हे समान दर्जाच्या सामाजिक-सांस्कृतिक व आर्थिक गटात होतात.

व्यक्तीने कोणत्या गटातील व्यक्तीशी विवाह करणे निषिद्ध आहे, हे ‘बहिर्विवाहाचे नियम’ सांगतात. जगात सर्वत्र प्रारंभिक कुटुंबातील पति-पत्नी खेरीज इतर नात्याने बांधल्या गेलेल्या व्यक्तींमध्ये लैंगिक संबंध ठेवणे निषिद्ध मानले आहे. म्हणजेच रक्तसंबंधी नात्यांमध्ये लैंगिक संबंध असणे निषिद्ध मानले आहे. हा बहिर्विवाहाचा नियम सर्वत्र अस्तित्वात आहे. पारंपरिक समाजात प्रारंभिक कुटुंबाच्या जागी विस्तारित कुटुंब अस्तित्वात असते. त्यामुळे रक्तसंबंधी नातेसंबंधाची व्याप्ती ही मोठी असते. त्यामुळे एकाच वंशावळीतील नातलगांनी परस्परांशी विवाह करू नये, असा नियम पाळला जातो. भारतीय समाजात सगोत्र व सपिंड तसेच समान देवक असणाऱ्या व्यक्तींमध्ये विवाह करणे निषिद्ध मानले जाते.

वरील दोन प्रकारचे नियम प्रत्येक समाजात अस्तित्वात असले, तरी आदिवासी आणि पारंपरिक समाजांमध्ये त्यांची व्यापकता अधिक असते व त्यांचे पालन कटाक्षाने केले जाते. आधुनिक समाजाचा कल या नियमांची व्यापकता कमी करण्याकडे असून ते कमी जाचक असतात. अगम्य आप्तसंभोग-निषेधाचा नियम सोडल्यास इतर कुठलेही नियम जोडीदाराची निवड करताना व्यक्तीवर बंधनकारक असू नयेत, असा कल आधुनिक समाजात असल्याचे दिसते. या सामाजिक दृष्टिकोनातील फरकामुळे जगातील मानवी समाजात दोन प्रकारच्या विवाहव्यवस्था अस्तित्वात आहेत. त्यांचे विवेचन पुढे केले आहे.

वधूवरांची देवाणघेवाण आणि विवाहव्यवस्था : विवाहातील अगम्य आप्तसंभोग-निषेधाच्या नियमामुळे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या प्रारंभिक कुटुंबाच्या बाहेर असलेल्या व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड करावी लागते. ही निवड नातेसंबंध अस्तित्वात असलेल्या कुटुंबामधून अथवा अनेक कुटुंबांच्या बनलेल्या मर्यादित गटामधून स्त्री-पुरुषांच्या देवाणघेवाणीच्या प्रकट व्यवहारातून केली जाते, किंवा समाजातील विविध गटांतून अप्रत्यक्ष देवाणघेवाणीच्या रूपाने केली जाते. पहिल्या प्रकारात विवाहाची बंदिस्त अथवा प्रारंभिक व्यवस्था म्हटले जाते व दुसऱ्या प्रकारास विवाहाची मुक्त व्यवस्था म्हणून ओळखले जाते.

विवाहाची प्रारंभिक व्यवस्था

या प्रकारांमध्ये व्यक्तीचा वैवाहिक जोडीदार म्हणून ज्या व्यक्तीची निवड केली जाते, तिच्याशी आधीच नातेसंबंध प्रस्थापित झालेले असतात. काही जमातींमध्ये विवाहाच्या दृष्टीने जमातीची वाभागणी दोन आप्तगटांत झालेली असते. वधू ‘अ’ गटातील असेल तर वर ‘ब’ गटातील असतो व वधू ‘ब’ गटातील असेल तर वर ‘अ’ गटातील असतो. अशा तऱ्हेने दोन आप्त समूहांत वधूवरांची देवाणघेवाण होते. जगातील सर्व भागांत, विशेषत्वाचे ऑस्ट्रेलियातील आदिवासी जमातींत, अशी व्यवस्था अस्तित्वात असल्याचे दिसून येते. काही आदिवासी जमातींमध्ये दोनऐवजी चार आप्तगट अ, ब, क, ड अस्तित्वात असतात. अ गटातील पुरुष ब गटातील स्त्रीशी विवाह करतो व त्याची संतती क गटात समाविष्ट होते. त्याचप्रमाणे ब गटातील पुरुष अ गटातील स्त्रीशी विवाह करतो व त्यांची संतती ड गटात समाविष्ट होते. याचप्रमाणे क आणि ड गटात विवाहसंबंध प्रस्थापित होऊन त्यांच्या संततीला अ आणि ब गटांत स्थान मिळते.

वरील पद्धतीमध्ये दोन आप्तगटांत स्त्री-पुरुषांची देवाणघेवाण प्रत्यक्ष होताना दिसते. परंतु दुसऱ्या पद्धतीमध्ये ही देवाणघेवाण दोन अथवा त्यातून अधिक आप्तगटांत अप्रत्यक्ष पद्धतीने होते. उदा., अ, ब, क असे तीन आप्तगट अस्तित्वात असल्यास अ गटाकडून ब गट मुली स्वीकारतो; पण आपल्या मुली त्या गटात देत नाही. तसेच ब गटातून क गटात मुली दिल्या जातात; पण स्वीकारल्या जात नाहीत. अशा पद्धतींमध्ये विवाहाच्या रूपाने दोन अथवा त्याहून अधिक गटात स्त्री-पुरुषांची देवाणघेवाण अप्रत्यक्षपणे होत असते.

बऱ्याच समाजांमध्ये विशिष्ट प्रकारचे नातेसंबंध असलेल्या व्यक्तींच्या विवाहास प्राधान्य दिले जाते. भारतातील दक्षिण भागातील बऱ्याच जातींमध्ये मामेबहिणीशी विवाह करण्यास प्राधान्य दिले जाते. अशी प्रथा चीनमधील काही भागांत अस्तित्वात असल्याचे दिसते.

विवाहाची मुक्त व्यवस्था

या व्यवस्थेमध्ये विवाहाच्या निमित्ताने एका गटातून दुसऱ्या गटात जी स्त्री-पुरुषांची देवाणघेवाण होते, तिचे स्वरूप जटिल आणि व्यापक असते. अशा तऱ्हेची विवाहव्यवस्था अमेरिका, यूरोपचा बहुतांश प्रदेश व आफ्रिकेतील बराचसा प्रदेश या ठिकाणी अस्तित्वात आहे. या विवाहपद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे, अगम्य आप्तसंभोग-निषेधाचे प्राथमिक आणि दुय्यम नियम सोडल्यास इतर कुठलेही नियम वधूवराच्या निवडीच्या वेळी पाळावे लागत नाहीत. ‘प्राधान्य विवाह’ हे या पद्धतीत नसतात. या दृष्टीने ही व्यवस्था लवचीक असून तीत वधूवरांच्या निवडीचे स्वातंत्र्य बरेच असते.

वधू-वरांच्या निवडीच्या पद्धतीवरून या व्यवस्थेचे दोन उपप्रकार पडतात :

  1. भावी जोडीदारांचे आईवडील, नातेवाईक व इतर मध्यस्थ यांनी जुळविलेला विवाह,
  2. स्त्री-पुरुषांनी विवाहासाठी स्वतःचा जोडीदार स्वतःच निवडण्याची पद्धत.

आईवडील, नातेवाईक व इतर मध्यस्थ यांनी जुळविलेला विवाह हा भारत, चीन, जपान इ. परंपरागत समाजांमध्ये सुपरिचित आहे. परंपरागत यूरोपीय समाजांमध्येही ही पद्धत आधुनिकतेच्या आगमनापूर्वी अस्तित्वात होती व अद्यापही ती काही प्रमाणात टिकून आहे. विवाहाच्या दुसऱ्या पद्धतीत विवाहेच्छू व्यक्तीला स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य असते. एवढेच नव्हे तर तशी समाजाचीही अपेक्षा असते.

ही पद्धत प्रामुख्याने आधुनिक समाजात, विशेषत्वाने यूरोपीय व अमेरिकी समाजांत जास्त प्रचलित आहे. ही निवडपद्धती मुख्यत्वे भावी जोडीदारांमधील प्रणयनिर्भर प्रेमाच्या (रोमँटिक लव्ह) उत्कट जाणिवेवर अधिष्ठित आहे. या जाणिवेची अनुभूती तरुणतरुणींना यावी, म्हणून ‘डेटिंग’ सारख्या प्रथा काही आधुनिक समाजात रूढ आहेत. डेटिंग (संकेत भेट) म्हणजे एखाद्या तरुणीने तिच्याशी ओळख करू इच्छिणाऱ्या तरुणाला भेटीगाठी घेण्यास व सहवास वाढवण्यास दिलेली अनुमती. अशा प्रत्येक भेटीचे रूपांतर संबंधित तरुणतरुणींच्या विवाहात होईलच असे नाही. परंतु अशा संकेतभेटींतून परस्परांना संभाव्य जोडीदाराची निवड करण्याची संधी लाभते.

अशी संधी यवकयुवतींच्या भरवलेल्या मेळाव्यांतून, संमेलनांतून, पार्ट्यांतूनही मिळू शकते. अशा विवाहाचे जे अध्ययन झाले आहे, त्यावरून असा निष्कर्ष निघतो, की बहुतांश तरुणतरुणी अशा पद्धतीतून आपल्या जोडीदाराची निवड स्वैरपणे न करता कळत-नकळत परस्परांच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीशी सुसंगत असणारा जोडीदार निवडतात. बहुतांशी तरुणतरुणींचे आईवडील अशा निवडीवर आपल्या पसंती-नापसंतीचा प्रभाव अप्रत्यक्षपणे पाडीत असतात. मात्र तरीही असे म्हणता येईल, की तरुणतरुणींना स्वतःच्या जोडीदाराच्या निवडीचे जास्तीत जास्त स्वातंत्र्य या पद्धतीमध्ये मिळते.

विवाहसंबंधाची आर्थिक बाजू

सामान्यपणे विवाहानंतर दोहोंपैकी एका जोडीदाराला स्वतःच्या जन्मदत्त कुटुंबाचा त्याग करावा लागतो. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या समाजामध्ये एका व्यक्तीच्या विवाहोत्तर अपरिहार्य असलेल्या अशा कुटुंबत्यागाकडे केवळ भावनात्मक दृष्टिकोनातून न पाहता, आर्थिक दृष्टिकोनातूनही पाहिले जाते. पितृस्थानीय कुटुंबपद्धतीनुसार ज्यावेळी नवविवाहित स्त्री स्वतःचे जन्मदत्त कुटुंब सोडून पतीच्या घरी राहावयास जाते, त्यावेळी जन्मदत्त कुटुंबातून एका व्यक्तीचा आर्थिक भार कमी होतो व पतीच्या कुटुंबात एका व्यक्तीच्या आर्थिक भाराची भर पडते.

ही व्यक्ती कमावती (नोकरी/व्यवसाय करणारी) असल्यास, जन्मदत्त कुटुंबाच्या एकूण मिळकतीत त्या प्रमाणात कमतरता येते व ती ज्या कुटुंबात जाते, त्या कुटुंबात आर्थिक दृष्ट्या भर पडते. अशा विवाहामुळे संभवणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई लग्नाच्या प्रसंगी वधूशुल्क अथवा देज देऊन केली जाते. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या जमातीमध्ये वधूशुल्काची पद्धत कार्यरत असते. अनेक वेळा हे वधूशुल्क देण्याची वरीची परिस्थिती नसते. अशा परिस्थितीत पती आपल्या पत्नीच्या घरी राहून शेतीचे अथवा अन्य काम करून वधूशुल्काची रक्कम फेडतो आणि नंतर पत्नीसह स्वतःच्या घरी राहावयास जातो. या पद्धतीस ‘सेवाविवाह’ असे म्हटले जाते.

परंपरागत कृषिप्रधान समाजामध्ये शेती करण्याची सुधारित पद्धती वापरल्यामुळे कृषि-उत्पादनात वाढ होते व त्यामुळे समाजात आर्थिक व सामाजिक असमानतेच्या तत्त्वावर आधारित विविध स्तर अस्तित्वात येतात. त्याचप्रमाणे स्त्रियांना शेतीच्या व्यवसायात अंगमेहनतीचे काम करण्याची आवश्यकता भासत नाही व त्यांची भूमिका प्रामुख्याने घरकाम करणारी गृहिणी म्हणून आर्थिक दृष्ट्या संपन्न सामाजिक वर्गात तयार होते. त्यामुळे स्त्रीचे आर्थिक व्यवहारातील महत्त्व कमी होते व त्याचा परिणाम विवाहप्रसंगी मुलीच्या पालकांना वधूशुल्क देण्याच्या पद्धतीचा लोप होऊन, त्याजागी वराला वरदक्षिणा अथवा हुंडा देण्याच्या पद्धतीचा उदय होण्यात होतो. जगातील सर्व पारंपरिक समाजात हुंड्याची पद्धत अस्तित्वात होती व अद्यापही काही प्रमाणात टिकून आहे.भारतामध्येही अद्याप काही समाजात ही प्रथा अस्तित्वात आहे.

हुंडा हा पैशाच्या तसेच सोने, चांदी यांसारख्या मौल्यवान वस्तूंच्या वा गाई, बैल यांसारख्या उपयुक्त जनावरांच्या तसेच शेतजमिनीच्या रूपाने देण्याची प्रथा समाजाच्या वेगवेगळ्या वर्गांत दिसून येते. परंपरागत समाजात ज्या काळी जमिनीच्या खरेदीविक्रीचे व्यवहार होत नसत, त्यावेळी हुंडा हे जमीन प्राप्त करून घेण्याचे महत्त्वाचे साधन म्हणून मानले जात असे. परंपरागत कृषिप्रधान पितृसत्ताक समाजात वरिष्ट वर्गात हुंडा घेण्याची पद्धत अस्तित्वात असते, तर कनिष्ठ वर्गात वधूशुल्काची पद्धती प्रचारात असते. परंतु हुंडा घेणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असल्यामुळे कनिष्ठ वर्गातील लोकही हुंड्याच्या पद्धतीकडे एक आदर्श पद्धत म्हणून पहात असतात व त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली, तरी त्यांचा कल हुंडा घेण्याकडे राहतोच. हुंडा देताना मुलीला सुस्थिती प्राप्त व्हावी व आपत्काली संरक्षण मिळावे, जन्मदत्त कुटुंबातील मालमत्तेचा तिचा वाटा तिला मिळावा, अशा प्रकारचा वधूपित्याचा उद्देश असतो; तर वरपित्याला मुलाच्या हुंड्यातून आपल्या मुलीच्या लग्नाचा खर्च भागविता यावा, असे वाटत असते.

ज्या समाजात जन्माधिष्ठित सामाजिक विषमता असते व सामाजिक चलनशीलतेचा अभाव असतो, अशा समाजात खालच्या स्तरातील लोकांचा कल आपल्या मुलीचा विवाह आपल्यापेक्षा वरचा सामाजिक दर्जा असलेल्या कुटुंबात करण्याकडे असतो. त्यासाठी जास्त हुंडा देण्याची त्यांची तयारी असते. पारंपरिक समाजातील अनिष्ट अशा हुंड्यासारख्या प्रथांचा अतिशय घातक परिणाम स्त्रियांच्या सामाजिक स्थानावर झालेला दिसून येतो. विधवांची दुरवस्था, मुलींच्या बालविवाहास काही ठिकाणी दिले जाणारे प्रोत्साहन, मुलींना कुटुंबात मिळणारी हीन वागणूक, क्वचित प्रसंगी अर्भकावस्थेतील मुलींची कुटुंबियांकडून होणारी हत्या, वेश्यावृत्तीस काही वेळा दिले जाणारे प्रोत्साहन, विवाहानंतर पत्नीच्या जन्मदात्या आईवडिलांची हुंड्यासाठी होणारी पिळवणूक, समाजातील स्त्रीपुरुषांचे विषम प्रमाण इ. परिणामांचा या संदर्भात उल्लेख करता येईल.

विवाहाचे वय

वैवाहिक जीवनास सुरुवात करण्याच्या वेळी स्त्री-पुरुषांचे वय काय असावे, या प्रश्नाला जशी जीवशास्त्रीय बाजू आहे, तशीच सामाजिक सांस्कृतिक बाजूही आहे. शारीरिक दृष्ट्या मुलगी ऋतुस्नात झाल्याशिवाय-म्हणजे तेरा-चौदा वर्षांची झाल्याशिवाय ती गर्भधारणेस योग्य होत नाही. पूर्ण शारीरिक वाढ होण्यासाठी मुलगी सोळा वर्षांची होणे आवश्यक असते. मुलाच्या बाबतीत त्याने पौगंडावस्थेत प्रवेश केल्याशिवाय-म्हणजेच तो किमान सोळा वर्षांचा झाल्याशिवाय-विवाहास म्हणजे प्रजननास योग्य होत नाही.

बहुतेक सर्व समाजांमध्ये विवाहाच्या वेळी वधू ही वरापेक्षा ३-४ वर्षांनी लहान असावी, असे मानण्यात येते आणि यासाठी स्त्री आणि पुरुष यांच्या शारीरिक विकासांत तीन ते चार वर्षांचे अंतर पडते, असे सांगण्यात येते. परंतु शास्त्रीय वस्तुस्थितीच्या निकषावर ही कल्पना टिकू शकत नाही. विवाहित स्त्रीची कौटुंबिक भूमिका काय असावी, याबद्दलच्या सांस्कृतिक आदर्शांचा प्रभावही वधू आणि वर यांचे विवाहसमयी वय काय असावे या बाबीवर पडल्याचे दिसते. पत्नी ही नाजूक असावी, ती स्वसंरक्षणाच्या बाबतीत आपल्या पतीवर अवलंबून असावी, अशा सांस्कृतिक संकेतांमुळे पत्नी म्हणून वयाने लहान असणाऱ्या मुलीची निवड पती करताना दिसतो.

आदिवासी जमातींत स्त्री-पुरुषांच्या सामाजिक दर्जामध्ये बरीच समानता आढळते. तसेच बऱ्याच आदिवासी जमातींमध्ये प्रौढविवाह प्रचलित आहेत. कौमार्याच्या वा योनिशुचितेच्या संकल्पनेला आदिवासी जीवनात फारसे स्थान नाही. त्यामुळे तरुणतरुणींमधील विवाहपूर्व लैंगिक संबंध क्षम्य असतात. परंतु पारंपरिक कृषिप्रधान, पितृसत्ताक समाजामध्ये स्त्री-पुरुषांच्या सामाजिक दर्जामध्ये असमानता आढळते. असा समाज निरनिराळ्या वांशिक गटांचा मिळून बनला असेल व त्यांचा सामाजिक दर्जा असमान असेल, तर वंशशुद्धी महत्त्वाची मानली जाते.

अशा परिस्थितीत विवाहाच्या वेळी मुलीच्या कौमार्याला महत्व दिले जाते व तारुण्यागम-पूर्व (प्रीप्यूबर्टी) विवाहास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे लहान वयातच मुलीचे लग्न तिच्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या असणाऱ्या पुरुषाशी लावले जाते. मुलीचे लग्न लहान वयातच करण्याच्या सामाजिक दडपणामुळे कित्येकदा मूल गर्भावस्थेत असतानाच सोयरीक जमविली जाते. अशी पद्धत राजस्थानमध्ये अस्तित्वात होती. पारंपरिक भारतीय समाजात वरिष्ट जातींत मुलींची लग्ने तारुण्यावस्था प्राप्त होण्यापूर्वीच लावण्याचा दंडक पूर्वी होता. परंतु अशा बालवधूचा पती किती वयाचा असावा, याविषयी कोणतेही बंधन नसे. त्यामुळे बालिका वधू व प्रौढ जरठ असे विवाह प्रचलित व समाजमान्य होते. परिणामी अशा वरिष्ठ जातींत विधवांचे व त्यातही बालविधवांचे प्रमाण मोठे असे.

विवाहबंधनाची स्थिरता

विवाहबंधनाच्या स्थिरतेकडे पहाण्याच्या सामाजिक दृष्टिकोनामध्ये स्थूल मानाने दोन प्रकार दिसतात. काही समाजात विवाहबंधन हे अतूट मानले जाते; तर काही समाजांत ते काही परिस्थितीत तोडले जाऊ शकते, काही अपवाद वगळल्यास सर्वसाधारण असे म्हणता येईल, की आदिवासी समाजामध्ये विवाहविच्छेद विनासायास होऊ शकतो. आफ्रिकेतील मातृसत्ताक झूनी जमातीमध्ये एखाद्या विवाहित स्त्रीला आपल्या पतीबरोबर राहणे पसंत नसेल, तर ती त्याचे कपडलत्ते आणून घराच्या दरवाज्याजवळ ठेवते. हे ज्या वेळेला पती म्हणून असलेले नाते संपलेले आहे हे समजतो व आपले सामान घेऊन स्वतःच्या जन्मगृही जातो. बहुतेक आदिवासी जमातींमध्ये वैवाहिर बंधन हे चिरस्वरुपाचे मानले जात नाही.

विवाहित स्त्री-पुरुषांना एकमेकांपासून घटस्फोट घेण्याची तरतूद असते व त्यासाठी परस्परांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करण्याची आवश्यकता नसते. घटस्फोटित स्त्री-पुरुषाला पुनर्विवाह करता येतो, त्याचप्रमाणे विधवेलाही पुनर्विवाह करण्याचा अधिकार असतो. शिकारीवर निर्भर असणाऱ्या काही थोड्या आदिवासी जमातींमध्ये विवाहबंधन हे अतूट मानण्यात येते. याचे उदाहरण श्रीलंकेतील ⇨वेद्दा ही आदिवासी जमात होय.

परंपरागत कृषिप्रधान समाजामध्ये विवाहसंबंधांना स्थैर्य प्राप्त करून देण्याकडे समाजाचा कल असतो. यास अशा समाजातील धार्मिक श्रद्धा मोठ्या प्रमाणावर सहाय्यभूत होतात. हिंदू धर्मात त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मातील रोमन कॅथलिक पंथात विवाह हे पतिपत्नीमधील अतूट नाते म्हणून मानले आहे. विवाहबंधन हे स्वर्गात ठरविले जाते व ज्यांना देवाने एकत्र जोडले आहे त्यांना कोणीही विभक्त करू शकत नाही, अशी श्रद्धा आहे.

जोडप्यातील एकाच्या मृत्यूनेच हे नाते समाप्त होऊ शकते. घटस्फोटाची कल्पना रोमन कॅथलिकांना मान्य नाही. परंतु विधवाविवाह धर्मसंमत आहे. हिंदू धर्मात वैवाहिक बंधन हे केवळ या जन्मापुरते अतूट मानले आहे असे नसून ते जन्मजन्मांतरीचे बंधन म्हणून मानण्यात येते. वैदिक संस्कारांना ज्या उच्चवर्णीय जातींचे विवाह होतात अशा जाती वैवाहिक बंधन अतूट मानतात व त्यात विधवाविवाह आणि घटस्फोट यांना मान्यता नसते. कनिष्ठ जातींत लग्ने वैदिक संस्काराने लावली जात नाहीत, तसेच जातीच्या प्रथेनुसार पतिपत्नीस घटस्फोट दिला जातो आणि विधवाविवाहासही मान्यता असते. परंतु पुरुषाचा कुमारिकेशी झालेला पहिला विवाह हा धार्मिक दृष्ट्या उच्च प्रतीचा मानला जातो. इस्लाम धर्मात विवाह हा करार मानला जातो.

घटस्फोटाचा अधिकार स्त्री व पुरुष दोघांनाही असला, तरी प्रत्यक्षात मात्र या अधिकाराचा वापर बव्हंशी पुरुषच करताना दिसतो. घटस्फोटाच्या वेळी विवाहकरारात नमूद केलेली मेहेरची रक्कम पुरुषाला आपल्या पत्नीस द्यावी लागते. स्त्री व पुरुष या दोघांनाही जरी धर्माने वा रूढीने घटस्फोटाबाबत समान अधिकार दिले असले, तरी पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने पुरुषच या अधिकाराचा वापर करताना दिसतात.

विवाहाचे सामाजिक आणि धार्मिक स्वरूप

समाजधारणेच्या दृष्टीने एक सामाजिक संस्था म्हणून, स्त्री-पुरुषांच्या व्यक्तिगत जीवनातील विवाहास सामाजिक महत्व प्राप्त होत असल्यामुळे सर्व समाजांमध्ये विवाह ही एक सामाजिक घटना मानली जाते व विवाहाची ही सामाजिक बाजू विवाहप्रसंगी धार्मिक विधी व सामाजिक समारंभ साजरे करून समाजात व्यक्त केली जाते. आदिवासी आणि पारंपरिक समाजांमध्ये या विधीचा प्रारंभ स्त्रीच्या बाबतीत तारुण्यागमाच्या विधीने होतो.

समाजात रूढ असणारे विवाहविषयक विधिनियम पाळले गेले आहेत किंवा नाही ह्यांस महत्त्व येते, तसेच विवाहानंतर स्त्री आणि पुरुष यांच्या सामाजिक जबाबदारीत होणारे बदल, विवाहानंतर प्राप्त होणारे नव्या आप्तसमूहाचे सदस्यत्व, वधूवरांच्या आप्तांची त्यांच्या संबंधातील तसेच वधूवरांची आप्तांच्या संबंधातील जबाबदारी, वधू आणि वर यांची परस्परांविषयीची जबाबदारी इ. बाबी सामाजिक व धार्मिक विधींच्या द्वारा सर्व संबंधितांच्या मनावर बिंबविल्या जातात. या सर्व सामाजिक घटनांभोवती गुंफलेल्या क्रियांना धार्मिक विधीचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे त्यांची दखल समाजात अधिक गांभीर्याने घेतली जाते.

विवाहाच्या घटनेची सामाजिक दखल आदिवासी आणि पारंपरिक कृषिप्रधान समाजांत जास्त प्रमाणात घेतली जाते. अशा समाजांतील संबंधित जनता या विधींच्या पालनाबद्दल जास्त जागरूक असते. काही विधींचे रीतसर पालन न झाल्यास संबंधितांना दंड केला जातो. आधुनिक समाजात व्यक्तीवरील अत्यावश्यक बंधने सोडल्यास तिला पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. परिणामस्वरूप अशा समाजात विविध धार्मिक व सामाजिक विधींचे पालन कमी प्रमाणात होताना दिसते. दोन व्यक्ती विवाहबद्ध झाल्याची नोंद समाजातर्फे शासकीय यंत्रणा घेते. त्याचप्रमाणे विविहविच्छेदाची नोंदही शासकीय यंत्रणा घेते.

आदिवासी जमातींमध्ये तसेच पारंपरिक कृषिप्रधान समाजामध्ये विवाहाच्या वेळी बहिर्विवाह, अंतर्विवाह इ. नियमांना धार्मिक स्वरूप प्राप्त होते. अशा नियमांचे पालन न झाल्यास धर्माचे उल्लंघन झाल्याचे मानण्यात येते व धर्मसंस्थेतर्फे अशा व्यक्तीस योग्य ती शिक्षा होते. उदा., हिंदू समाजात सपिंड व्यक्तीशी काही अपवाद वगळता विवाह होत नाही. अशा तऱ्हेचा विवाह झाल्यास त्यास समाजविरोधी व धर्मविरोधी वर्तन मानण्यात येते. परंतु औद्योगिक समाजव्यवस्थेमध्ये परिस्थिती वेगळी असते. अशा समाजात अनेक धर्मांचे लोक राहत असतात व त्यांच्या सामाजिक चालीरीतींमध्येही भिन्नता असते. निरनिराळ्या धर्मांचे लोक विवाहाच्या आणि कौटुंबिक व्यवहाराच्या संदर्भात भिन्नभिन्न चालीरीतींचे आचरण करतात. त्यामुळे सामाजिक ऐक्यास तडे जाण्याची शक्यता असते.

हे संकट टाळण्यासाठी विविध धर्मांतील लोकांसाठी किमान सामाजिक आचारसंहिता असणे जरूरीचे भासते. अशा आचारसंहितेस धर्माचा आधार प्राप्त होण्याची शक्यता नसल्यामुळे तिला कायद्याच्या रूपाने शासनाचा आधार द्यावा लागतो. विवाहाच्या संदर्भात विवाहसमयीचे वधूवरांचे वय, घटस्फोट, पोटगी, वारसाहक्क इ. बाबींविषयी कायदे करून भिन्नभिन्न धर्मीयांना नागरिक या नात्याने समान हक्क मिळण्याची व्यवस्था शासन करते.

संदर्भ : 1. Askham, Janet, Identity and Stability in Marriage, Cambridge, 1984.

2. Bernard, Jessie, The Future of Marriage, London, 1982.

3. Blood Robert O. Marriage, New York, 1962.

4. Bowman, Henry A. Marriage for Moderns, New York, 1965.

5. Cherlin, Andrew J. Marriage, Divorce, Remarriage, Cambridge,1981.

6. Clark, D. Marriage,Domestic Life and Social Change, London, 1991.

7. Fortes, M. Ed., Marriage in Tribal Societies, Cambridge, 1962.

8. Goode, W. J. The Family, New Delhi, 1965.

9. Harlan, Lindsey; Courtright, Paul B. Ed., From the Margins of Hindu Marriage, London,1995.

10. kapadia, K. M. Marriage and Family in India, London, 1959.

11. Mace, D. R.; Mace, Vera, Marriage: East and West, London 1960.

12. Murdock, G. P. Social Structure, New York, 1949.

13. Stopes, Marie, Married Love, Calcutta, 1966.

14. Westermark, E. A. The History of Human Marriage, 3Vols., (5th Ed.), 1971.

15. Williamson, Robert C. Marriage and Family Relations, New York, 1965.

१६. जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास (आवृ. तिसरी), वाई, १९९६.

१७.राजवाडे,वि. का. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, पुणे १९७६.

लेखक: त्रि. ना. वाळुंजकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

2.93548387097
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 18:44:17.205654 GMT+0530

T24 2019/10/17 18:44:17.212253 GMT+0530
Back to top

T12019/10/17 18:44:16.817534 GMT+0530

T612019/10/17 18:44:16.835071 GMT+0530

T622019/10/17 18:44:16.887149 GMT+0530

T632019/10/17 18:44:16.887947 GMT+0530