অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्यक्तिनामे

व्यक्तिनामे

समाजात ज्या विशिष्ट नावाने प्रत्येक व्यक्ती ओळखली जाते ते नाव. व्यक्तीचे पूर्ण नाव बहुधा व्यक्तिनाम, वडिलांचे वा पतीचे किंवा कुळाचे नाव व आडनाव यांनी मिळून होते. मात्र व्यक्तिनाम हे सामान्याकडून विशिष्टाकडे जाण्याचा अंतिम टप्पा म्हणता येईल. आदिमानव जेव्हा संघटित होऊन समूहरूपाने राहू लागला, तेव्हा एक व्यक्ती दुसरीपासून वेगळी आहे, हे ओळखण्याच दृष्टीने व्यक्तिनामांची गरज निर्माण झाली. त्याचप्रमाणे त्या समूहाभोवतीच्या वस्तू, पशु-पक्षी, वनस्पती इतर निसर्गरूपे इत्यादींनाही विशिष्ट नावे देणे क्रमप्राप्त ठरले. वस्तुनामांत अर्थातच यदृच्छेचा अंश व्यक्तिनामांपेक्षा अधिक आढळतो. याचे कारण व्यक्तिनामांच्या रूढ होत गेलेल्या प्रथांमध्ये वांशिक, धार्मिक, सामाजिक अशा समाजविशिष्ट कल्पनांचा वाढत गेलेला प्रभाव हे असावे. प्राचीन काळी व्यक्तीची ओळख गुणवाचक निर्देशाने होत असावी. पुढे स्वरांच्या जुळणीतून किंवा उच्चारणातून निर्माण झालेली शब्दसदृश रूपे किंवा संबोधने यांनी व्यक्तीचा निर्देश होऊ लागला असे दिसते. भाषेच्या उदयविकासाबरोबर व्यक्तिनामांचा विस्तारही होत गेला आणि त्यांत विविधताही येऊ लागली. सामान्यत: एका व्यक्तीचे एक नाव असा संकेत रूढ असला, तरी जसजसे सामाजिक जीवन अनेकपदरी व गुंतागुंतीचे होत गेले, तसतसे एकाच नावाच्या अनेक व्यक्तींचा प्रश्न निर्माण झाला. त्यातूनच मग व्यक्तीच्या पूर्ण नावाची कल्पना पुढे आली.

जगातील सगळ्या समाजांत नवजात अपत्याच्या नामकरणासंबंधी विविध प्रकारचे धार्मिक विधी, संकेत व रूढी आढळून येतात. हिंदू परंपरेतील बारसे किंवा ख्रिस्ती समाजातील बाप्तिस्मा हे विधी या प्रकारचे म्हणता येतील. व्यक्तिनामांची पूर्वपरंपरा प्राधान्याने धार्मिक कल्पनांनी प्रभावित झालेली आहे. त्यामुळे देवादिकांची, साधुसंतांची व्यक्तीनामे सर्वच समाजांत कमी-अधिक फरकाने आढळून येतात. आदिवासी समाज आपापल्या परिसरातील वनस्पती, प्राणी इत्यादींची तसेच पूर्वजांची नावे निवडतात. इतर सुधारलेल्या समाजांतूनही पूर्वजांची नावे नवजात अपत्यांना देण्याची प्रथा आढळते. नक्षत्रे, ऋतू, महिने, नद्या, मौल्यवान धातू व रत्ने, वेली, फुले-फळे, पशु-पक्षी, पुराणातील व्यक्ती इत्यादींची नावेही ठेवण्यात येतात. मुले जगत नसतील, तर दगडू, धोंडू यांसारखी तुच्छतादर्शक नावे ठेवण्याची रूढी आढळते. अशा नावांनी अपत्यांचे अपमृत्यू टळतात, असे मानले जाते.

भारतात थोड्याफार फरकाने हिंदू, जैन व बौद्ध धर्मांत नामकरण विधी करतात. वैदिक आर्यांनी या विधीला संस्काराचे रूप देऊन प्रतिष्ठा दिली. वैदिक काळात एक नाव व्यवहारासाठी व दुसरे मातृक किंवा पितृक असे. नामकरण हा विधी सोळा संस्कारांपैकी एक असून मुलाचे नाव कुलदेवता वा आराध्यदेवता यांच्याशी संबंधित असावे, असा सर्वसामान्य संकेत आहे. शैव-वैष्णव- वीरशैव या पंथांतील नावे किंवा बोधिसत्त्वादिक वा तीर्थंकरांची नावे ही याची उत्तम उदाहरणे होत. प्राचीन ऋषिमुनींची नावे ठेवण्याची प्रथा होती. नावरस (पाळण्यातील) नाव ज्या नक्षत्रात अपत्याचा जन्म झाला, त्यातील चरणाक्षरावरून ठेवण्याची प्रथा भारतात प्रचलित होती व आजही आहे. पारस्कर गृह्यसूत्रात मुलाचे नाव दोन किंवा चार अक्षरांचे असावे, तर मुलीचे नाव विषमाक्षरी असावे (१·१७·३), असे म्हटले आहे. मुलीच्या नावाची अन्य वैशिष्ट्ये मनुस्मृतीत सांगितली आहेत. उदा. उच्चारणाला सुलभ, सरळ, श्रवणास सौम्य, मंगलवाचक दीर्घ वर्णान्त असे मुलीचे नाव असावे (२·३३). लग्नानंतर मुलीचे दुसरे नामकरण होते. याशिवाय मुलामुलींच्या संदर्भात नाक्षत्रनाम, मासनाम, कुलदेवतेचे व व्यावहारिक असे आणखी चार प्रकार प्रचलित आहेत. गृह्यसूत्रानुसार जन्मानंतर दहाव्या किंवा बाराव्या दिवशी नामकरण करतात; पण विकल्पाने ते एक वर्षांपर्यंत केव्हाही केले तरी चालते. नामकरणाचा लौकिक समारंभ बहुधा बाराव्या दिवशी संपन्न होतो, म्हणून त्यास बारसे हा शब्द रूढ झाला असावा. चरणाक्षरावरून ठेवलेले नावरस नाव गुह्य (गुप्त) असावे, असे बौधायन सांगतो.

गृहस्थाश्रमी पुरुष संन्यास घेतल्यानंतर मूळ नाव सोडून उपपदे असलेले नाव धारण करतो. काही लौकिक नावे मुख्यत्वे कुल, संस्कृती, पद, प्रतिष्ठा, पराक्रम इत्यादींची निदर्शक असतात. आधुनिक व्यक्तिनामांच्या बाबतीत जुन्या रूढी व संकेत यांचा प्रभाव कमी झालेला असून आधुनिक काळातील थोर महापुरुष, कलावंत, क्रीडापटू, कवी व लेखक इत्यादींची नावे अधिक प्रमाणात निवडण्यात येतात.

संदर्भ : 1. Dubois, A. J. A. Trans. And Ed.. Beauchamp, H. K. Hindu Manners, Customs And Ceremonies, 2. Vols., New York, 1999.

2. Kumath, M. V.; Randeri, Kalindi, Indian Names, 2001.

3. Levi-Strauss, Claude, The Savage Mind, London, 1966.

4. Withycombe, E. G. Comp.; Oxford Dictionary of English Christion Names, Oxford, 1982.

लेखिका व लेखक: रुक्मिणी पवार ; सु. र. देशपांडे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate