Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/24 16:59:50.682587 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/24 16:59:50.687388 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/24 16:59:50.706557 GMT+0530

व्यभिचार

व्यभिचार विषयक माहिती.

वैवाहिक संबंध हा सामान्यतः शास्त्रविहित, धार्मिक, नैतिक, कायदेशीर स्वरूपाचा असल्यामुळे त्याला प्रतिष्ठा व मान्यता असते. विवाहप्राप्त व्यक्तीशी करावयाच्या संबंधासारखा इतर व्यक्तीशी केला जाणारा लैंगिक संबंध म्हणजे विवाहबाह्य संबंध होय. विवाहित स्त्रीने अगर पुरुषाने विवाहबंधनाने निगडित असलेल्या पतीच्या अगर पत्नीच्या व्यतिरिक्त इतरांशी स्वेच्छेने लैंगिक संबंध ठेवणे म्हणजे व्यभिचार होय.

विवाहित पुरुषाने अथवा स्त्रीने अन्य स्त्रीशी अथवा पुरुषाशी समागम करणे या कृतीला ‘जारकर्म’ असे म्हटले आहे. धर्मशास्त्रात व मनुस्मृतीत याला पातक व अपराध समजून कडक शिक्षा सांगितल्या आहेत (मनु. ८·३५२-३५३, ३५६, ३७१-३७२). परस्त्रीशी जारकर्म केल्यास वर्णसंकर होऊन अधर्म होतो, म्हणून पुराणांनी या वर्तनाची निंदा केली. या सर्वांमागे विवाहसंस्थेचे संरक्षण करणे हा हेतू दिसतो.

पाश्चात्त्य विद्वानांनी प्रस्तुत हिंदू समाजव्यवस्थेवर व जारकर्माला लागू केलेल्या शिक्षांवर आक्षेप घेतले. भारतीय दंडसंहितेत जारकर्माच्या गुन्ह्याला पाच वर्षे कैद व दंड अशी शिक्षा सांगितलेली आहे. हिंदू विवाह कायद्याप्रमाणे व्यभिचारी व्यक्तीला सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. हिंदू व ख्रिश्चन कायद्यांत या कारणामुळे घटस्फोट मिळू शकतो.

भारतात पुरुषाला एकापेक्षा अधिक पत्नी असणे, हे द्विभार्या-प्रतिबंधक कायदा होईपर्यंत गैर मानले जात नसे. तसेच पुरुषाला राजरोसपणे विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी धार्मिक व सामाजिक मूल्ये पोषक होती. स्त्रीविषयक पावित्र्याच्या कल्पना मात्र शरीरनिष्ठ आहेत. स्त्रीने व्यभिचार केला, तर तो अक्षम्य व अधार्मिक म्हणून घृणास्पद समजण्यात येतो.

वात्स्यायनाच्या  कामसूत्र (इ. स. तिसरे-चौथे शतक) या ग्रंथामध्ये ‘पारदारिक’ या नावाचे एक स्वतंत्र प्रकरण आहे. ‘पारदारिक’ म्हणजे विवाहित पुरुषाने परस्त्रीशी (परदारा) केलेला संबंध होय. विवाहबाह्य संबंध हे तत्कालीन समाजजीवनाचे एक अंग होते, हे त्यातून सूचित होते.

विवाहित पुरुषाला बहुपत्नीकत्वाच्या प्रथेमुळे आपल्या विवाहबाह्य संबंधांचे रूपांतर विवाहसंबंधात करून घेण्याचा मार्ग उपलब्ध होता. धर्मशास्त्रे, रूढी व शिष्टाचार या पातळ्यांवर मात्र व्यभिचाराचा वारंवार निषेध करण्यात आला आहे. कौटिल्याने तर परस्त्रीच्या बाबतीत स्पर्श करणे, स्मित तथा संभाषण करणे इ. कृत्यांना ‘मानस व्यभिचार’ असे म्हटले आहे. वात्स्यायनाने अशा संबंधांना गैर मानले आहे व गुरुपत्नीशी अथवा रक्तसंबंधियांशी संबंध ठेवणे अत्यंत निषिद्ध मानले आहे. वात्स्यायनाने पुरुषाला विवाहबाह्य संबंधांसाठी सहजपणे वश होणाऱ्या स्त्रियांची यादी कामसूत्रात दिली आहे (उदा. जिचा पती प्रवासाला गेला आहे वा पती मत्सरी व रोगट आहे अशी पत्नी, सवतीकडून अपमानित झालेली स्त्री किंवा बालविधवा).

स्त्रिया स्वभावतःच चंचल, धूर्त, भोगातुर असतात व व्यभिचार करण्यास सहजता प्रवृत्त होतात, अशा अर्थाची अनेक वचने भारतीय इतिहासात व वाङ्‌मयात आढळतात. पुरुषाच्याही अधःपतनाची जबाबदारी सामान्यतः स्त्रीवर टाकल्याचे दिसून येते. पुरुषाला राजरोसपणे विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी सोयीस्कर अशा स्त्रिया समाजात होत्या.  देवदासी, वेश्या दासी, गणिका अशा स्त्रियांशी संबंध ठेवणे निषिद्ध नव्हते. कलावती व सुंदर स्त्रिया यांच्याशी शरीरसंबंध ठेवणे हे लक्ष्मीपुत्रांचे व राजघराण्यातील पुरुषांचे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाई. महाराष्ट्रात रक्षा, उपस्त्री, नाटकशाळा, मर्जी अशी वेगवेगळी नावे देऊन स्त्रिया बाळगणे शिष्टसंमत मानले जाई. पुरुषांना व्यभिचार करण्यास बंदी नव्हती; पण धर्माच्या नावावर स्त्रीला मात्र कठोर बंधने पाळावी लागत. विवाह हा तिच्या दृष्टीने वज्रलेप समजला जाई. बालविवाह सर्रास होत असत व विधवेचे आयुष्य खडतर असे. विधवा स्त्रीचा तोल ढळला, तर तिला कठोर शिक्षा होई.

वैध-अवैध अशा अनेक मार्गांनी ऐतिहासिक काळात विवाहबाह्य संबंध चालू होते. अशा एखाद्या संबंधाला स्त्रीपुरुषातील असामान्य निष्ठेमुळे प्रतिष्ठा मिळाली, तरी बहुतेक संबंध अप्रतिष्ठित मानले जात. विवाहित स्त्रीच्या व पुरुषाच्या व्यभिचारासंबंधी बहुतेक देशांत विरोधी भूमिका घेतल्याचे दिसून येते. ज्या देशांत मुस्लिम धार्मिक कायद्याचा अंमल आहे, तेथे व्यभिचाराला कडक शिक्षा होऊ शकते. रोमन कॅथलिक पंथाच्या धर्मतत्त्वानुसार वैवाहिक जीवनात एकनिष्ठेला महत्त्व आहे. १९४८ साली अमेरिकेत अॅल्फ्रेड किन्से (१८९४–१९५६) या प्राणिशास्त्रज्ञाने मानवी लैंगिक प्रवृत्तींबाबत संशोधनपर सर्वेक्षण (किन्से रिपोर्ट) केले.

किन्सेच्या सेक्स्युअल बिहेव्हिअर इन द ह्यमून मेल (१९४८) व सेक्स्युअल बिहेव्हिअर इन द ह्यूमन फीमेल (१९५३) या ग्रंथांतून खळबळजनक निष्कर्ष प्रसिद्ध झाले. त्यांत विशेषतः विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण मोठे असल्याचे आढळले. स्त्रीवादी चळवळीचा प्रभाव पाश्चात्त्य देशांमध्ये नवीन जाणीव-जागृती करणारा ठरला. सीमॉन द बोव्हारचे द सेकंड सेक्स (१९४९, इं. भा. १९५३); जर्मन ग्रिअरचे सेक्स्युअल पॉलिटिक्स, बेटी फ्रायडनचे द फेमिनिन मिस्टिक इ. साहित्यामुळे या चळवळीला वैचारिक बैठक प्राप्त झाली. त्याचा परिणाम स्त्री-पुरुष-संबंधांवर झाला. स्त्री-पुरुष दोघांनाही अधिक स्वातंत्र्य, समानता व अर्थपूर्ण साहचर्याची जरुरी भासू लागली. समाजाची वाटचालच आज समूह-मानसिकतेकडून व्यक्तिकेंद्री अवस्थेकडे चालू आहे.

भारतीय समाजात एकोणिसाव्या शतकानंतर स्त्री-पुरुषसंबंध व एकंदर सामाजिक नीतिमूल्ये यांमध्ये बदल घडून आले. प्रौढ विवाहाच्या काळात स्त्री-पुरुषांच्या परस्परांबाबतच्या व्यक्तिगत पसंतीला न्याय्य महत्त्व आले. व्यावसायिक व सार्वजनिक क्षेत्रांत स्त्री-पुरुष एकत्र येतात. विवाहपूर्व आणि विवाहबाह्य मैत्रीला ही परिस्थिती पोषक ठरते. लग्नाचा जोडीदार समविचारी व समवयस्क नसला, तर विवाहबाह्य संबंध घनिष्ट होऊ लागतात. भारतातील प्रसिद्ध लैंगिक शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश कोठारी यांच्या मते भारतीय विवाहसंस्थेच्या मर्यादा व त्रुटी यांमुळे व्यभिचार उद्भवतो. लैंगिक शिक्षणाचा अभाव असणे, जोडीदाराची शारीरिक दुर्बलता, संततिप्रतिबंधक साधने सहजतेने उपलब्ध असणे आदी कारणांमुळे ही प्रवृत्ती वाढते. पतिपत्नींमध्ये भावनिक व सांस्कृतिक दुरावा असल्यास, पत्नी कमी शिकलेली असल्यास वा ती कौटुंबिक जबाबदाऱ्यानी दबलेली असल्यास पती साधारणतः विवाहबाह्य संबंधांकडे वळू शकतो. मात्र डॉ. कोठारींच्या मते व्यभिचारामुळे दोघांच्या संततीचे व कुटुंबाचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. कौटुंबिक ताण व हिंसाचार यांना ही परिस्थिती कारणीभूत होऊ शकते.

साधारणपणे व्यक्तीमध्ये लैंगिक गरजा या अत्यंत तीव्र स्वरूपाच्या असतात व मानवी जीवनातील ते एक महत्त्वपूर्ण अंग आहे. ही विचारसरणी सर्व काळातील सर्व समाजांत आढळते. या गरजांवर नियंत्रण ठेवून त्यांना नीतीच्या व समाजमान्यतेच्या चौकटीत बसविण्याच्या दृष्टीने विवाहसंस्थेला व कौटुंबिक जीवनाला समाजजीवनाचा पाया म्हणून महत्त्व प्राप्त झाले. जसजशा स्त्रिया शिक्षण घेऊन अर्थार्जन करू लागल्या व आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या, तसतसे वैवाहिक जीवनातील स्त्री-पुरुष संबंधांचे परिमाण बदलले. विवाह व कुटुंब यांच्यामार्फत सामाजिक जीवनाचे संवर्धन होते व त्यामुळे वैवाहिक बंधनाचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी विवाहपूर्व पावित्र्य व विवाहोत्तर जीवनातील एकनिष्ठता या नीतिमूल्यांचे वर्चस्व सनातन समाजामध्ये अधिक होते. आज पति-पत्नीच्या परस्परांविषयीच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. मानवी लैंगिक जीवनाचे असंख्य सूक्ष्म कंगोरे अभ्यासताना आधुनिक विचारवंतांच्या मते पुढील काळात एकनिष्ठ संबंधांवर भर न देता, एका व्यक्तीचे अनेक व्यक्तींशी संबंध प्रस्थापित होण्याकडे कल वाढला आहे. अमेरिकेतील १९८६च्या जनगणनेनुसार पाच कोटी वीस लाख प्रौढ व्यक्तींचे विवाहोत्तर अन्य व्यक्तींशी संबंध आले होते, हे स्पष्ट झाले. यूरोपमध्ये, विशेषतः नेदर्लंड्समध्ये विवाहबाह्य संबंधांबाबत मोकळपणा अधिक दिसतो. तेथील कायदा व अधिकारव्यवस्था हीदेखील या विचारांशी सुसंगत आहे. स्त्री-पुरुष-स्वातंत्र्याबरोबर अनाचार माजेल ही विचारसरणी तेथे मान्य नाही.

पाश्चात्त्य देशांतील या मूलगामी परिवर्तनामुळे स्त्री-पुरुष-संबंधांबाबत अनेक पर्याय शोधले गेले आहेत. मात्र यामुळे अनेक इष्टानिष्ट गोष्टींचा स्वीकार त्यांना करावा लागला आहे. वैवाहिक जीवनातील अस्थिरता, वाढते घटस्फोट, प्रायोगिक विवाह (ट्रायल मॅरेज) यांसारखे प्रयोगांमुळे मानसिक ताणतणाव, लैंगिक विकृती व एड्ससारखे रोग वाढत्या प्रमाणात आढळून येतात. भावनिक संबंधांत प्रेम व आकर्षण यांबरोबरच असूयेची प्रबळ भावना उद्‌भवते. स्त्री-पुरुषांनी परस्परांकडे ‘लैंगिक मालमत्ता’ या दृष्टीने पाहिल्यास वैवाहिक वा विवाहबाह्य संबंधांतून संघर्ष वाढण्याचा धोका असतो. व्यभिचारामुळे विवाहित व्यक्तीच्या ठायी असुरक्षिततेच्या भावना निर्माण होतात.

भारतामध्ये सामान्यतः अनेक सामाजिक-सांस्कृतिक बंधने पाळली जातात. त्यांमधील सावधगिरी ही पिढ्यान्पिढ्यांच्या व्यावहारिक अनुभवांची परिणती आहे. विवाहबाह्य संबंध हा फक्त पतिपत्नींच्या जीवनातील खाजगी प्रश्न न राहता संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न मानलेला आहे. विवाहसंस्था कोठेही परिपूर्ण नाही व या संस्थेची चौकट आज कमकुवत झाली आहे. असे असले, तरी जगात कोठेही विवाहबाह्यसंबंधांतून प्रश्न सुटत नाहीत, ह्याचेही भान वाढते आहे. अमेरिकेतदेखील लैंगिक स्वातंत्र्याबाबत हळूहळू मत बदलते आहे. १९५० पूर्वी असणारी नेमस्त व सावध नीती आता परत प्रचलित होऊ लागली आहे. अनेक प्रकारच्या कुटुंबरचनांचा व लैंगिक व्यवहारांमधील प्रयोगांचा अनुभव घेऊन आता तेथे परत वैवाहिक एकनिष्ठेतेवर भर देणारे मतप्रवाह दिसू लागले आहेत.

भारतीय विचारसरणीमध्ये विवाहसंस्थेचे पारंपरिक महत्त्व अद्याप कायम आहे. मात्र त्यातील विविध रूढी, विचार व परस्परसंबंधांबद्दलच्या भूमिका काळानुसार बदलत चालल्या आहेत. भारतीय दंडविधान संहितेखाली (कलम ४९७) एखाद्या विवाहित स्त्रीशी परपुरुषाने संबंध ठेवल्यास, त्या स्त्रीला शिक्षा होत नाही. पुरुषाला मात्र शिक्षा (५ वर्षांची कैद किंवा दंड अथवा दोन्हीही) होऊ शकते.

संदर्भ : 1. Goode, William J. World Revolution and Family Patterns, New York, 1963.

2. Kinsey, Alfred; Pomeroy, C. W.; Martin; Clyde, Sexual Behaviour in the Human Male, London, 1948.

3. Murdock, George, Social Struclure, New York, 1949.

४. लिंबाळे, शरणकुमार, विवाहबाह्य संबंध : नवीन दृष्टिकोन, पुणे, १९९४.

५. सागडे, जया, संपा. स्त्री-न्याय-कायदा, पुणे, १९९८.

लेखिका: अनुपमा केसकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

3.05
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/24 16:59:51.019632 GMT+0530

T24 2019/06/24 16:59:51.025664 GMT+0530
Back to top

T12019/06/24 16:59:50.573596 GMT+0530

T612019/06/24 16:59:50.594410 GMT+0530

T622019/06/24 16:59:50.671286 GMT+0530

T632019/06/24 16:59:50.672241 GMT+0530