অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सती

पती मृत झाला असता त्याच्या प्रेताबरोबर सहगमन करणारी स्त्री. सती या संज्ञेचा सर्वसामान्य शब्दार्थ साध्वी, तपस्विनी किंवा पतिव्रता असा आहे. या आत्मदहन किंवा सहमरण कृतीला सतीप्रथा म्हणतात. सहमरण, सहगमन, अनुमरण, अन्वारोहण इ. संज्ञांनीही सतीप्रथेचा निर्देश करण्यात येतो.

इतिहास

सतीप्रथा प्राचीन असून ती जगातील विविध देशांत व जातींत आढळते. आर्यांच्या अनेक टोळ्यांपैकी सिथियनांसारख्या इंडो-जर्मानिक टोळीत सती जाण्याची प्रथा प्रचलित होती. तिचे अनुकरण भारतातील एतद्देशीय लोकसमूहांनी केले, असा सांस्कृतिक इतिहासकारांचा दावा आहे. पी.थॉमस, मोनिअर विल्यम्स, अ. स. अळतेकर आदी विव्दानांच्या मते जगातल्या अनेक प्राचीनतम टोळ्यांच्या समाजव्यवस्थेत, यूरोप व अतिपूर्वेकडील देशांत सती जाण्याची प्रथा प्रचलित होती. वैदिकपूर्व काळात सतीची प्रथा भारतातील काही लोकसमूहांत रूढ होती, असे इतिहासकारांचे मत आहे. सतीची प्रथा भारतातील मुख्यत्वे बंगाल, राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, काश्मीर आदी प्रदेशांतून अस्तित्वात असल्याचे दाखले शिलालेख, प्राचीन संस्कृत साहित्य आणि परदेशी प्रवासी यांच्या वृत्तांतातून मिळतात. यूआनच्वांग, व्हेनिसचा काँती, झां ताव्हेर्न्ये, फ्रान्स्वा बर्निअर, बार्बोसा, निकोलाव मनुची इ. परदेशी प्रवाशांनी सतीचे प्रसंग प्रत्यक्ष पाहून त्यांची वर्णने लिहून ठेवली आहेत. सती जाण्याचा विधी प्रदेशपरत्वे प्रथापरंपरेनुसार वेगवेगळा असल्याचे व त्यात कालानुरूप बदल झालेले आढळतात. शुद्धीतत्त्व या गंथात सतीच्या विधींचे तपशीलवार वर्णन आढळते.

वात्स्यायना च्या कामसूत्रा त व पद्मपुराणा त सतीप्रथेचे उल्लेख आलेले आहेत; तथापि गुप्तकाळात सतीची अत्यल्प उदाहरणे दिसतात. वराहमिहिर बृहत्संहिते त सतीप्रथेची निर्भत्सना करतो. बाणभट्टाच्या कादम्बरी व हर्षचरिता त तसेच निर्णयसिंधू व धर्मसिंधू त सतीप्रथेबाबत काही उदाहरणे नोंदविली आहेत; पण बाणभट्ट कादम्बरीत या चालीचा उल्लेख करून तिचा कडक शब्दांत निषेध करतो आणि मूर्ख लोक या चालीचा अंगीकार करतात, असे मत प्रदर्शित करतो. बाणाच्या मते मोहाने घडत असलेला हा प्रभाव आहे. आत्महत्येमुळे सती जाणारी व्यक्ती नरकात जाते. बाणाच्या या विचारसरणीमुळे त्याला सतीप्रथेचा पहिला बुद्धीनिष्ठ विरोधक म्हणावयास हरकत नाही. महानिर्वाणतंत्रा तही मोहाने सती जाणारी स्त्री नरकात जाते, असे म्हटले आहे. असे असूनही उत्तर भारतात आठव्या ते अकराव्या शतकांदरम्यान, विशेषत: काश्मीरमध्ये अनेक स्त्रिया सतीप्रथेला बळी पडलेल्या दिसतात. तत्संबंधीचे उल्लेख  कल्हणाच्या राजतरंगिणी त आढळतात. यांत केवळ राजघराण्यांतील स्त्रिया नसून राजाच्या रखेल्या, बहिणी, आई याही सहगमन करीत असत, असे कल्हण म्हणतो. राणी सूर्यमतीसमवेत गंगाधर, टाक्किबुद्घ व दंडक हे सेवक आणि उद्दा, नोनीकाषवल्गा या दासी इ. सर्वांनी अग्निप्रवेश केला (७.४८१); मात्र हिंदूंच्या धर्मशास्त्राने सतीप्रथेला मान्यता दिलेली नाही. मनूने या प्रथेची दखलही घेतली नाही. विष्णुस्मृती त या प्रथेचा निषेध केलेला आहे. उपनिषदे, जैन व बौद्ध धर्मसाहित्य इत्यादींत सतीप्रथेबाबत उल्लेख सापडत नाहीत. वेदपूर्वकाळात सतीची प्रथा थोडयाफार प्रमाणात प्रचलित असली पाहिजे; कारण ऋग्वेद व अथर्ववेदां तील काही उल्लेखांवरून या प्राचीन प्रथेचे स्मरणांश आढळतात. मात्र वैदिक आर्य हे जीवनवादी विचारांचे पुरस्कर्ते होते. वायुपुराणा त (१०.२७) सांगितल्याप्रमाणे प्रजापती दक्ष व प्रसूती यांची कन्या आणि शंकराची पत्नी सती या नावाने प्रसिद्ध आहे. स्वत:च्या वडिलांनी यज्ञप्रसंगी आपल्या पतीचा अवमान केल्यामुळे रागाच्या भरात दक्षकन्या सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वदेहदाह केला. सतीप्रथेचा संबंध याही कथेशी जोडला जातो. पद्मपुराणा त सतीप्रथेचा जो उल्लेख सापडतो, तो फक्त क्षत्रिय वर्णापुरताच मर्यादित आहे. रामायणा त कोणत्याही स्त्रीने सहगमन केल्याचा उल्लेख नाही; परंतु महाभारता त पांडूची पत्नी माद्री सती गेल्याचा उल्लेख आढळतो. तद्वतच बाह्मणी आंगिरसीने (महा. आदि. १८१.२२) अग्निप्रवेश केल्याचा उल्लेख आहे. कर्नाटकातील बेलतुरू येथील इ. स. १०५७ च्या शिला-लेखात एक शूद्र स्त्री सती गेली म्हणून तिच्या स्मरणार्थ सतीशिला उभी केल्याचा उल्लेख आहे. यावरून इतिहास काळात राजघराण्यांतील स्त्रियाच केवळ सती जात नसत, तर अन्य सामान्य स्त्रियाही सती जात असत, असे दिसते.

सती जाण्याच्या प्रथेची कारणमीमांसा विविध प्रकारे करण्यात आली आहे. अग्नीला साक्ष ठेवून वधू-वरांनी आमरण एकमेकांबरोबर जगण्याची शपथ घेतलेली असते. अशा श्रद्धेतून पतीच्या निधनाबरोबर पत्नीने सहगमनाचा मार्ग स्वीकारून सती जाण्याची प्रथा रूढ झाली असावी. यामागे परलोकातही पतीशी पुनर्मीलन व्हावे, अशी अपेक्षा असावी. सतीप्रथा हे समाजातील पुरूषप्रधानतेचे उदाहरण आहे. पति-निधनानंतरही त्याचा पत्नीच्या देहावरचा आणि जीवनावरचा हक्क संपत नाही, हेच या प्रथेतून सूचित होते. योनिशुचिता अत्यंत महत्त्वाची मानली गेल्याने, विधवा स्त्रीचे शील संरक्षितच राहावे, म्हणून ती पतीच्या चितेवरच सती गेलेली बरी, अशी भूमिका दिसते. त्याचप्रमाणे सती न गेल्यास विधवा स्त्रीने विकेशा व्हावे, वीरक्त जीवन जगावे, तसेच तिला पुनर्विवाह करण्यास बंदी असे. विधवा स्त्रीला ती मरेपर्यंत पोसायचे त्यापेक्षा ती मेलेलीच बरी, असाही एक दृष्टिकोन होता. त्यामुळे अशा मरणप्राय जिण्यातून सुटका व्हावी, या अपेक्षेतून ती सती जाण्याचा मार्ग स्वीकारत असावी. सती गेल्यामुळे स्त्रीला मोक्ष मिळतो, अशीही समजूत आढळते. पतीला परमेश्वर मानून त्याच्यावरील निस्सीम प्रेम, निष्ठा, कृतज्ञता इ. व्यक्त करण्याची प्रतीकात्मक कृती म्हणजे सती जाणे होय, असेही म्हटले जाते. पातिवत्य संपुष्टात आल्याची निदर्शक अशीही प्रथा आहे, असेही मानले जाते. मृताबरोबरच त्याच्या गरजेच्या वा आवडत्या वस्तू पाठविण्याची रीत काही जमातींत आढळते. सतीप्रथेशी याही प्रथेचा संबंध असावा, असे दिसते. वीरपतीची वीरपत्नी घराण्याची प्रतिष्ठा उंचावते, या समजुतीतून क्षत्रिय जातीत सतीची प्रथा रूढ झाली असावी. बंगाल प्रांतात स्त्रियांना कुटुंबाच्या मिळकतीच्या मालकी हक्कात जास्तीत जास्त वाटा देण्याची पद्धत आहे. हा त्यांचा हक्क डावलण्यासाठी व त्यांचा अडसर दूर करण्यासाठी तेथे सतीची प्रथा सुरू झाली असावी. अरबांची आणि तुर्कांची आकमणे सुरू होताच व नंतर मोगलकाळात सतीप्रथेला जोहारचे स्वरूप प्राप्त झाले. हिंदू स्त्रियांवर विशेषत: राजपूत स्त्रियांवर जे अत्याचार होत, त्यांच्या भीतीतून जोहार करण्याची म्हणजे सती जाण्याची प्रथा दृढ झाली असावी. याकाळात सततच्या युद्धप्रसंगांमुळे राजवंशांतील आणि सामान्य स्त्रियांतील सतींची संख्या वाढू लागली होती.

ही प्रथा स्त्रीच्या वैयक्तिक इच्छेनुसार स्वीकारली गेली की, पुरूषप्रधान समाजव्यवस्थेच्या दडपणामुळे अनुसरली गेली, यांबाबत निर्विवादपणे काही सांगता येणे कठीण आहे. मात्र विधवा स्त्रियांची मानसिकता आणि अवस्था बदलण्याचा व सुधारण्याचा प्रयत्न परंपरागत पुरूषप्रधान समाजव्यवस्थेने कधीही केला नाही, असेच म्हणावे लागेल. विधवा स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा पारंपरिक दृष्टिकोन असामाजिक, अमानवी व अत्यंत हीन प्रवृत्तीचा होता, असे म्हणावे लागेल. ज्या विशिष्ट प्रांतांत व जाति-जमातींत सतीची प्रथा प्रचलित होती, तेथेही ती ऐच्छिक स्वरूपाची न राहता समूहाच्या दबावातून निर्माण झाली असावी, असा बहुसंख्य विचारवंतांचा दावा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात राजस्थानसारख्या प्रांतात सती जाण्याच्या ज्या घटना घडून आल्या, त्यास सामाजिक दबाव हेच कारण जबाबदार धरलेले आहे. प्राचीन हिंदू धर्मशास्त्राने सतीप्रथेचा निषेध केलेला असला, तरी काही स्मृतिकारांनी तिला अंशत: संमती दिली असून त्यांनीच स्त्री गरोदर असेल किंवा तिचे मूल लहान असेल वा ती पतिनिधनाच्या वेळी रजस्वला असेल, तर तिने सहगमन करू नये, असे निर्बंधही निर्माण केले होते. ही कूर चाल बंद करण्यासाठी अकबर-जहांगीर या मोगल समाटांनी प्रयत्न केले; पण धार्मिक जीवनात हस्तक्षेप केल्याच्या कारणास्तव त्यास म्हणावे तसे यश मिळाले नाही. इ. स. १५१० साली गोव्याचा गव्हर्नर अफांसो द अल्बुकर्कने गोव्यात सती जाण्याच्या प्रथेवर बंदी घातली. कबीर, नानक यांनीही तसेच प्रयत्न केले. नानकासारखे संत म्हणतात, विधवेवर सतीची सक्ती काय म्हणून ? ब्रिटिश राजवटीत मौंट स्टूअर्ट एल्फिन्स्टन, कॉर्नवॉलिस, वेलस्ली इत्यादींनी यासंदर्भात प्रयत्न केले; परंतु लॉर्ड विल्यम बेंटिंकचे प्रयत्न हे अनन्यसाधारण आहेत.

अव्वल इंग्रजी अंमलात एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत ज्ञानोदय, सुधारक, समाचार, बंगाल हुरकुरू, संवाद कौमुदी इ. वृत्तपत्रे-नियतकालिके आणि दुसरा बाजीराव, विदयालंकार, महात्मा फुले, गौरीशंकर भट्टाचार्य, कालीनाथ रॉय, मथुरानाथ मलिक, प्रसन्नकुमार टागोर, रामकृष्ण सिन्हा, आगरकर अशा काही विद्वान विचारवंतांकडून सतीप्रथेला विरोध होत असतानाही पंजाबसारख्या प्रांतात किंवा बंगालमध्ये सती जाणाऱ्या स्त्रियांची संख्या अन्य प्रांतांच्या मानाने लक्षणीय होती. पंजाबातील संस्थानांतून राजेलोकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राण्या सती गेल्याची अनेक उदाहरणे आढळतात. रणजितसिंगाच्या प्रेताबरोबर त्याच्या चार स्त्रियांना जाळण्यात आले होते. राजा सुचेतसिंगाच्या अंत्यसंस्कारात तीनशे-दहा स्त्रियांनी आत्मदहन केले होते. त्यांत दहा राण्या व तीनशे रखेल्या होत्या; परंतु सरदार शानसिंगाची पत्नी सोबाव मात्र स्वेच्छेने सती गेली होती. पंजाबमधील ही अखेरची सती, असे सर लिपल गिफीन इ. स. १८९८ मध्ये एका लेखात नोंदवितो.

राजस्थान

राजस्थानात असे एकही गाव नव्हते की, जिथे सतीच्या शिला किंवा सती- मंदिरे नाहीत. यावरून या प्रदेशातील व्यापकता लक्षात येते. बंगालमधील सतीप्रथेविषयीची आकडेवारी पी. थॉमस यांच्या इंडियन विमेन थू एजीस (१९६४) या पुस्तकात आढळते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीस सतींची किमान संख्या ३७८ होती (१८१५) आणि कमाल संख्या ८३९ होती (१८१८). या प्रांतांच्या तुलनेत महाराष्ट्र, कर्नाटक व अन्य प्रदेशांत सतीप्रथेची काही मोजकी उदाहरणे (छ. शाहूंची राणी सकवारबाई व नाटकशाळा लक्ष्मीबाई किंवा पहिल्या माधवराव पेशव्याची पत्नी रमाबाई) आढळतात.या अनिष्ट प्रथेविषयी अनेकांनी आवाज उठविला. त्यांत ⇨ राजा राममोहन रॉय यांनी कांतिकारक पाऊल उचलले. सतीची चाल कायदयाने बंद करावी, यासाठी अभ्यासपूर्ण दोन पुस्तिका लिहिल्या आणि अथक प्रयत्न केले. तसेच कायद्याचे स्वरूप ठरविण्यासाठी तत्कालीन गव्हर्नर-जनरल विल्यम बेंटिंक ह्याच्याबरोबर चर्चा केली. परिणामत: लॉर्ड विल्यम बेंटिंकने ४ डिसेंबर १८२९ रोजी सती-बंदीचा कायदा केला आणि सती जाणे, हा फौजदारी गुन्हा म्हणून घोषित करण्यातआला.

सध्या भारतात १९८७ चा सती-बंदीचा अधिनियम [ द कमिशन ऑफ सती (प्रिव्हेन्शन) अ‍ॅक्ट ] जारी आहे. सती जाणे व सतीप्रथेचा गौरव करणे, या दोनही गोष्टींवर बंदी आहे. कोणत्याही प्रकारे सतीप्रथेचे उदात्तीकरण होऊ नये, यासाठी न्यायालयाने या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वेही ठरवून दिली आहेत. या अधिनियमात सतीची केलेली व्याख्याही सर्वसमावेशक आहे. सती जाण्यास प्रवृत्त करणे वा बळजबरी करणे, हे या कायदयाने गुन्हे ठरतात व त्यासाठी कडक शिक्षा सुचविलेल्या आहेत. सतीविषयक समारंभ करणे, सतीच्या मंदिरांसाठी निधी उभारणे, यांवरही बंदी आहे. या बाबतीत प्रतिबंधक कारवाई करण्याचे अधिकार राज्यशासनाला आणि मुख्यत्वे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत.

संदर्भ : साळगावकर, ज्योताभास्कर जयंतराव व इतर, संपा. भारतीय इतिहास आणि संस्कृति, एप्रिल-जून, २००८, मुंबई.

लेखक: व्ही. एन. गजेंद्रगड ; नंदिनी आत्मसिद्ध

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate