Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/16 17:47:1.730978 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक संकल्पना व संज्ञा / समाजशास्त्र, मानसशास्त्र, धर्म व मृत्यू
शेअर करा

T3 2019/06/16 17:47:1.735936 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/16 17:47:1.757561 GMT+0530

समाजशास्त्र, मानसशास्त्र, धर्म व मृत्यू

समाजशास्त्र, मानसशास्त्र, धर्म व मृत्यू विषयक माहिती.

मृत्यू

मृत्यू अनेक कारणांनी येऊ शकतो. त्यांची वर्गवारी अशी : (१) आत्महत्या, (२) अपघात, (३) खून, (४) मृत्युदंड, (५) युद्ध, (६) आजार व (७) वार्धक्य. यांतील पहिली सहा कारणे टाळता येणे शक्य आहे; कारण त्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे मानवी हस्तक्षेप किंवा प्रयत्न यांचा वाटा असतो. त्यामुळेच या प्रकारच्या मृत्यूस अनैसर्गिक मृत्यू म्हणतात, तर वार्धक्यामुळे येणाऱ्या मृत्यूस नैसर्गिक मृत्यू म्हणतात. वृद्धापकाळात येणारा मृत्यू आयुमर्यादा संपल्याचा निदर्शक ठरतो व तो अपेक्षितही असतो; आयुर्मर्यादा देशकालपरिस्थितीनुसार कमीअधिक आढळते.

मृत्यूचे भय व त्याच्या अपरिहार्यतेची जाणीव सार्वत्रिक असून त्याचे मानवी वर्तनावर दूरगामी व सखोल परिणाम होतात. मृत्यूच्या जाणिवेमुळे मानवी वर्तन सतत नियंत्रित होत असते. मृत्यू घडतो तेव्हा त्या व्यक्तीच्या सामुदायिक अस्तित्त्वाचा एक भाग निखळून पडतो. मृत्यूमुळे परस्परांवर आधारलेल्या विविध सामाजिक संबंधांवर विलक्षण ताण निर्माण होतो; अनेक संबंधांचा विच्छेद होतो व त्यांची लगेचच पुन्हा जुळणी करावी लागते. कुटुंबप्रमुख, अधिपती, शास्ता, राजा, गुरू, वारस इत्यादींची मृत्यूमुळे रिक्त झालेली पदे पुन्हा भरावी लागतात. मृत्यूमुळे संबंधित व्यक्तीवर वैधव्य, विधुरता, अनाथता यांसारख्या आपत्ती येतात. मालमत्तेच्या वाटणीत वारसाचे प्रश्न निर्माण होतात.

सिग्मंड फ्रॉइड

मृत्यूबाबतची सर्वसाधारण मानवी प्रतिक्रिया म्हणजे त्याचे भय व तो टाळण्याची प्रवृत्ती. प्राचीन कालापासून सर्वच धार्मिक-तात्त्विक संप्रदायांनी व विचारप्रणालींनी मृत्यूची अपरिहार्यता गृहीत धरून मानवी जीवनास एक अर्थपूर्ण वैचिरिक बैठक प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे.  सिग्मंड फ्रॉइड (१८५६–१९३९) या मनोविश्लेषणज्ञाने जीजीविषा-जगण्याची वासना-आणि निर्वाण तत्त्व–मृत्यूची वासना-या दोन मूलभूत प्रेरणा मानल्या आहेत. सौंदर्य, प्रेम, मैत्री यांसारखी सार्वत्रिक मूल्ये तसेच मानवी कर्तृत्व, कौशल्य, यश या सर्वांचा मृत्यूमुळे निकाल लागतो. मरणोन्मुख व्यक्तीस होणाऱ्या वेदना हा मृत्यूच्या भयातील एक घटक आहे. कुटुंबाकडून तसेच इतरांकडून होणारी उपेक्षा, शारीरिक अपंगत्व, परावलंबित्व, स्वतःवरील नियंत्रण सुटणे, स्वकीयांनी टाकणे, हीही मृत्यूभयाची कारणे असतात. इतर गोष्टींचे भय व मृत्यूचे भय यांत फरक आहे. मृत्युभय त्या व्यक्तीचे सबंध अस्तित्व व्यापते व तिला त्या भयात संपूर्ण बुडवून टाकते. त्यामुळे कोंडी होऊन व्यक्तीचे मानसिक व भावनिक जीवन उद्‌ध्वस्त होते. इतर भयांत भयाची उद्दीपके दूर झाली, की भयही नाहीसे होते. मृत्यूचे तसे नाही; कारण या भयाचा उद्दीपक नष्ट होत नाही.

मानवाच्या मृत्यूचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न सर्वच समाजांत, धर्मांत व संस्कृतींत आदिम कालापासून आजवर होत आल्याचे दिसते.मृत्यूनंतर आत्मा वा जीव कोठे जातो याबाबतचे चिंतन मरणोत्तरस्थितिविज्ञानात (एस्कटॉलॉजी) केले जाते. माणूस मृत्यू पावला म्हणजे त्याचे केवळ शरीर मरते; आत्मा वा जीव अमर असून तो पुन्हा दुसऱ्या योनीत वा शरीरात जन्म घेतो असे मानणारी विचार सरणी पुनर्जन्माचा पुरस्कार करणारी म्हटली जाते. हा पुनर्जन्म जीवाच्या चांगल्या-वाईट पूर्वकर्मानुसार वेगवेगळ्या योनींत प्राप्त होत असतो; यास कर्मवादाप्रमाणे कर्मविपाक म्हणतात. येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढविल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याचे पुनरूत्थान झाल्याचे ख्रिस्ती धर्म मानतो. ज्यू व ख्रिस्ती धर्मांत निवाड्याच्या दिवशी सर्वच मृतांच्या पापपुण्यांचा निवाडा ईश्वर करणार आहे असे म्हटले आहे. त्यांना त्यांच्या पापपुण्यानुसार स्वर्ग वा नरक प्राप्त होतो. इस्लाम धर्मातही ‘कियामत’ च्या दिवशी सर्व मृतात्म्यांच्या पापपुण्याप्रमाणे त्यांना गती प्राप्त होईल अशी श्रद्धा आहे. आदिम समाजांत मृतात्मा भूतादी योनींत प्रवेश करतो अशी समजुती आहेत.

देहापासून प्राण वेगळा होऊन बाहेर जाणे वा प्राण व देह यांच्या वियोगास मृत्यू म्हटले जाते. दुसऱ्या योनीत जाणे म्हणजे मृत्यू. मृत्यू व अपमृत्यू असे मृत्यूचे दोन प्रकार होत. मृत्यूची जी कारणे मानवी हस्तक्षेपाने एरवी टाळता येणे शक्य झाले असते अशा कारणांनी येणारा मृत्यू ते अपमृत्यू आणि वार्धक्याने येतो तो नैसर्गिक मृत्यू होय. अधिक काळ जगण्यासाठी म्हणजे मृत्यू टाळण्यासाठी माणसाची सतत धडपड चाललेली दिसते. अनेक औषधे, रसायने, मंत्रतंत्र, कर्मकांड, योगसाधना इ. मार्गांचा त्यासाठी माणूस अवलंब करत आला आहे. मरण कधीच येऊ नये म्हणून अमरत्व प्राप्तीसाठी किंवा अमृत मिळविण्यासाठी देवदानवांनी प्रयत्न केल्याच्या पुराणकथा बहुतांश धर्मांत आढळतात. ‘मृत्योर्मा अमृतं गमय’ यांसारख्या वचनांतून असाच विचार मांडला आहे. मृत्यूबाबत जिज्ञासा बाळगणारा उपनिषदांतील नचिकेतस प्रसिद्ध आहे. त्याने मृत्युदेवता यमाकडून मृत्यूचे रहस्य म्हणजे आत्मविद्या जाणून घेतली (कठोपनिषद १·१·२०–२९). मरणोत्तर कुठल्याही प्रकारे अस्तित्व उरत नाही, असे एक मत कठोपनिषदात सांगितले असून चार्वाकादी नास्तिक या मताचा पुरस्कार करतात.

जैन धर्म

जैन धर्मात वार्धक्य, असाध्य रोग, दुर्भिक्ष्य, उपसर्गादी कारणांनी जेव्हा जगण्याची आशा संपते, तेव्हा धर्म म्हणून ⇨ संलेखना व्रत आचरून किंवा अनशन करून देहत्याग करणे विहित मानले आहे. बौद्ध धर्मांतही मृत्यू अटळ मानला आहे. तिबेटमधील लामा धर्मात जराजर्जर देह त्यागण्याची धर्मविहित प्रथा पूर्वापार चालत आली आहे. भीष्माने उत्तरायणात इच्छामरण स्वीकारले. कृतिशील जीवनकार्य संपते तेव्हा किंवा जराप्राप्त होऊन जगण्यात अर्थ उरत नाही तेव्हा योग-समाधी, जलप्रवेश, अग्निप्रवेश, अनशन इ. मार्गांनी देहत्याग करणे हिंदू धर्मात विहित मानले आहे. दुर्धर रोगाने त्रस्त व्यक्तीने ईशान्य दिशेकडे प्रस्थान ठेवावे व केवळ पाणी व वायू भक्षण करून देहपात होईपर्यंत चालत राहावे, असे मनुस्मृतीत (६·३१) म्हटले आहे.

संदर्भ : 1. Choran, Jacques, Death and Western Thought, New York, 1963.

2. Cutler, D. Updating Life and Death: Essays in Ethics and Medicine, Boston, 1969.

3. Deshpande, M. G. Philosophy of Death, Pune, 1979.

4. Evans, W. E. D. Chemistry of Death, Springfield, 1963.

5. Feible, Herman, Ed, The Meaning of Death, New York. 1959.

6. Glaser, Barney; Strauss, Anselm, Awareness of Dying : A Study of Social Interaction, Chicago, 1965.

7. Kastenbaum, Robert; Aisenberg, Ruth, The Psychology of Death, London, 1974.

8. Korein, J. Brain Death : Interrelated Medical and Social Issues, New York, 1978.

9. Kubler Ross, E. On Death and Dying, New York, 1969.

10. Myers, Frederick W. H. Human Personality and Its Survival of Bodily Death, 2 Vols., New York, 1954.

11. Parikh, C. K. A Simplified Textbook of Medical Jurisprudence, Bombay, 1970.

12. Shneidman, E. S. Ed. Death: Current perspectives, Hamilton, Calif., 1976.

13. Simpson, K. Ed. The Mysteries of Life and Death, New York, 1979.

लेखक: चिं. त्र्यं. भोपटकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

3.10526315789
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/16 17:47:2.083866 GMT+0530

T24 2019/06/16 17:47:2.091467 GMT+0530
Back to top

T12019/06/16 17:47:1.627482 GMT+0530

T612019/06/16 17:47:1.644670 GMT+0530

T622019/06/16 17:47:1.720045 GMT+0530

T632019/06/16 17:47:1.720909 GMT+0530