অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्त्रीवाद

सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रांत स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारी प्रणाली. प्रारंभी स्त्रीवाद ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर पश्चिमी देशांत उद्भूत झाली आणि नंतर ती जागतिक स्तरावर हळूहळू प्रसृत झाली. पुढे ती चर्चेचा गंभीर व मूलभूत विषय बनली.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

पाश्चात्त्य देशांचा सुरुवातीचा इतिहास पाहता, स्त्रिया या फक्त चूल आणि मूल या कौटुंबिक व्यवस्थेत अडक-लेल्या होत्या. त्यांना सार्वजनिक जीवनात स्थान नव्हते. तो पुरुषांचाच अधिकार समजला जाई. मध्ययुगात स्त्रियांना संपत्तीत वाटा नव्हता आणि शिक्षणाची संधी नव्हती. स्त्रियांचे सामाजिक स्थान, समाजजीवनातील त्यांचा सहभाग आणि योगदान, त्यांचे विविध प्रश्न व समस्या इत्यादींबद्दलचे विचारमंथन अठराव्या शतकात होऊ लागले. या विचारमंथनातून स्त्रीवादी विचारधारेचा उगम झाला आणि स्त्रीशिक्षण,स्त्रियांचे राजकीय हक्क, समान संधी अशा अनेक प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधले गेले. ज्ञानोदयाचा ( इन्लाइटन्मेन्ट ) प्रभाव स्त्रीवादावर पडला. त्यातून ‘ आम्ही सार्‍या एकत्र येऊन मिळून जाऊ ’, ही प्रबोधनकालातील स्त्रीवादी घोषणा गाजली; पण तिचे संलग्न चळवळीत कधीच रूपांतर झाले नाही. तथापि ज्ञानोदय काळातील काही सुधारणावादी स्त्रियांनी स्वातंत्र्य,समता आणि नैसर्गिक अधिकार हे स्त्री-पुरुष या दोघांनाही सारखेच लागू करावेत, अशी जोरदार मागणी केली. तेव्हा प्रसिद्ध फ्रेंच नाटककार ऑलँप द गॉजिस हिने डिक्लेरेशन ऑफ द राइट्स ऑफ विमेन अँड ऑफ द फीमेल सिटिझन ( इं. भा., १७९१ ) हा ग्रंथ लिहून स्त्रियांच्या हक्कांची जाणीव करून स्त्री ही केवळ पुरुषाबरोबर समान नसून ती त्याची सहकारी-सोबती आहे,असे ठामपणे प्रतिपादिले. याच सुमारास मेरी वुलस्टोनक्राफ्टचा ए व्हिन्डिकेशन ऑफ द राइट्स ऑफ विमेन (१७९२ ) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यात मेरीने स्त्री-पुरुषांना शिक्षण, काम आणि राजकारण यांत समान संधी द्यावी; कारण त्या पुरुषांइतक्याच नैसर्गिक दृष्ट्या बुद्धिगम्य-हुशार आहेत, असे ठणकावून लिहिले. त्यांना शैक्षणिक व आर्थिक संधी आणि समान नागरी हक्क दिले, तर त्या पुरुषांएवढ्याच सक्षम व समर्थ बनतील. ज्ञानोदय युगाने राजकीय क्षोभ निर्माण केला होताच, त्याचा परिणाम म्हणून फ्रान्स, जर्मनी आणि इटलीत वैचारिक मंथन होऊन उन्मूलनवादाच्या चळवळीस ( अबॉलिशन मूव्हमेंट ) चालना मिळाली.

एकोणिसाव्या शतकात स्थित्यंतराची-बदलाची मागणी यूरोप व उत्तर अमेरिकेत होऊ लागली. पॅरिसमधील स्त्रीवादी महिलांनी द व्हाइस ऑफ विमेन हे दैनिक काढले (१८४८) आणि स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली. स्त्रीशिक्षण, स्त्रियांचे राजकीय हक्क, समान संधी, समान वेतन, कुटुंबांतर्गत आणि कुटुंबाबाहेरील हिंसाचार, समविभागणी अशा बहुविध प्रश्नांकडे या दैनिकाने समाजाचे लक्ष वेधले आणि स्त्रीवादाची सैद्धांतिक भूमिका मांडली. त्याच सुमारास जर्मन लेखिका लूईस डिटमर हिने सोशल रिफॉर्म हे नियतकालिक काढून स्त्रियांचे प्रश्न चर्चेत आणले. याच सुमारास न्यूयॉर्क राज्यातील सेनेका फॉल्स येथे स्त्रियांच्या हक्कांसाठी विद्वत्सभा भरली (१८४८) आणि त्यांनी अकरा ठराव या संदर्भात संमत केले. त्यांमध्ये स्त्रियांच्या मतदानाचा अधिकार हा प्राधान्याने विचारात घेतला गेला. अशा प्रकारच्या स्त्रियांच्या परिषदा अन्य राज्यांतूनही झाल्या. त्यांतूनच पुढे एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन, मार्था राइट, सुसान अँथनी इत्यादींनी ‘ नॅशनल विमेन सफ्रेज असोसिएशन ’ ही मतदानाच्या संदर्भात जागतिक संघटना स्थापन केली (१८६९). सुरुवातीस उच्चभ्रू व कामगार स्त्रियांत मतभेद झाले. तेव्हा शार्लट पर्किन्स गिलमन हिने विमेन अँड इकॉनॉमिक्स (१८९८) या ग्रंथात असे प्रतिपादन केले की, जोपर्यंत स्त्रिया घरगुती काम व कुटुंब या पाशातून मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्या पुरुषांवर अवलंबून राहणार ! लिंगभेदाच्या आधारे स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते आणि सामाजिक दमनाला, अन्यायाला त्यांना तोंड द्यावे लागते.  त्यासाठी पुरुषप्रधान-पितृसत्ताक कुटुंबपद्धतीत बदल होणे आवश्यक आहे. असा समाजवादी समतेचा सिद्धांत तिने मांडला. स्त्रियांना विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनुक्रमे देशपरत्वे मतदानाचा हक्क प्राप्त झाला आणि त्यांचे काही हक्कही मान्य झाले. स्त्रीवादाचा हा प्रसार-प्रचार पाश्चात्त्य देशांतून आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत प्रसृत झाला आणि विकसित राष्ट्रांबरोबरच त्याचे लोण अविकसित व विकसनशील देशांत पोहोचले.

स्त्रीवादाची आधुनिक वाटचाल

स्त्रियांना दुय्यमत्व देण्यामागे जे पुरुषी राजकारण आहे, त्याचा बीमोड करणे हे स्त्रीवादाचे मूळ उद्दिष्ट आहे. स्त्रीवादांतर्गत अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. पुरुषांइतकीच स्त्रीलाही स्वतःची ओळख आहे. स्व-विकास, स्वतंत्रता यांची जरूरी आहे. स्वत्वाची ओळख, स्वायत्तता, स्वयंनिर्णय, सक्रिय सहभाग या गोष्टी स्त्रीला व्यक्ती म्हणून परिपक्व बनवितात. त्या मिळवून देण्याचा प्रयत्न स्त्रीवादी चळवळीने केला. आपल्या सांकल्पनिक, सैद्धांतिक चौकटीमध्ये स्त्रियांना मिळणारे गौणत्व, त्यांचे केले जाणारे दमन यांचे स्पष्टीकरण, त्यामागील कारणांचे विश्लेषण स्त्रीवाद करतो. त्याचप्रमाणे हे सामाजिक वास्तव बदलण्यासाठी काय करावे, याचे विवेचनही करतो. काळानुसार स्त्रीवादी चळवळीत जहाल,मवाळ, मार्क्सवादी, पर्यावरणवादी, कृष्णवर्णीय वगैरे अनेक छटा असलेल्या विचारसरणींच्या बहुविध संघटना सामील झाल्या.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्रीवादी-सुधारणावादी महिला अधिक आक्रमक झाल्या. त्यांनी स्त्रियांचे दमन हे ऐतिहासिक दृष्ट्या पहिले आणि ते सर्वांत दूरगामी आहे, हा सिद्धांत प्रतिपादिला. या स्त्रीवाद्यांनी पुनरुत्पादन, मातृत्व, लैंगिकता यांसंबंधी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. त्याचप्रमाणे पितृसत्ताक कुटुंबपद्धतीत अनुस्यूत असलेल्या सत्ता, स्पर्धा,श्रेणीबद्धता, वर्चस्ववाद यांचा समूळ उच्छेद करावा, असे प्रतिपादन केले. ‘ पर्सनल इज पोलिटिकल ’ ( जे जे व्यक्तिगत ते ते राजकीय ), अशी घोषणा करताना स्त्रियांच्या जाणीव-जागृतीवर भर दिला. स्त्री आणि पुरुष यांच्या विकासाच्या दोन अलग प्रक्रिया न मानता दोहोंच्या विकासाच्या दृष्टीने एकसमयावच्छेदे विचार व्हावा, हा मनोविश्लेषणवादी सिद्धांत मांडला. सीमॉन द बोव्हारने स्त्रीच्या दमनाचे अस्तित्ववादी स्पष्टीकरण दिले. स्त्रीला ‘ अन्य ’ किंवा ‘ इतर ’, विशेषतः ‘ पुरुषेतर ’ ( अदर दॅन मॅन ) मानले गेल्यामुळे ती स्वतंत्र,स्वनियंत्रित राहिली नाही. तिच्या अस्तित्वाला ती स्वतः अर्थ देऊ शकत नाही; तर तो तिच्यासाठी स्त्रीत्वाच्या साराच्या (‘ एसेन्स ’ च्या ) संदर्भात ठरवला जातो. स्त्रीवादाची चळवळ उभी राहिली, ती समाजपरंपरेतील स्त्रीप्रतिमा नाकारण्यासाठी. स्त्रियांनी त्यांचे अस्तित्व मर्यादित करणार्‍या स्त्रीत्वाच्या रूढ व्याख्या नाकाराव्यात. स्त्री ही माणूस आहे म्हणून व्यक्ती या स्वरूपात तिचा विचार व्हावा. नरनारी ही व्यवस्था नैसर्गिक आहे; परंतु पुरुषप्रधान व्यवस्थेत लिंग भेदभाव मुद्दाम घडविला गेला. संस्कृतीच्या इतिहासाने स्त्रीची सांगड निसर्गाशी घातली. त्यामुळे स्त्रीविषयक प्रश्नांचा विचार निसर्गसापेक्ष केला पाहिजे. पितृसत्ताक पद्धतीची विचारसरणी ही श्रेणीबद्ध, द्वंद्ववादी आणि वर्चस्ववादी आहे. तीत स्त्रियांचे  शोषण झाले आहे.

अलीकडे आधुनिकोत्तर ( पोस्ट मॉडर्न ) स्त्रीवाद, कृष्णवर्णी स्त्रीवाद ( ब्लॅक फेमिनिझम ), बहुसांस्कृतिक आणि वैश्विक स्त्रीवाद असेही विविध प्रकार पुढे आले आहेत. यांपैकी कृष्णवर्णी स्त्रीवादाने स्त्रीवादाच्या मुख्य धारेच्या मर्यादा स्पष्ट करताना वर्णवर्चस्ववादाशी निगडित असे प्रश्न स्त्रीवादाच्या संदर्भात अधोरेखित केले आहेत. स्त्रीवादाच्या कक्षा श्वेतवर्णीय, मध्यमवर्गीय आणि भिन्नलिंगी संबंध असणार्‍या स्त्रियांच्या प्रश्नांपलीकडे विस्तारण्याची आवश्यकता त्यातून प्रकर्षाने पुढे आली.

स्त्रीवादाचा निरनिराळ्या सिद्धांतांमधून आणि त्यांच्या परस्परसंबंधांमधून जो विकास घडला, त्यामध्ये स्त्रीच्या गौणत्वाला कारणीभूत ठरणार्‍या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक,राजकीय, मानसशास्त्रीय घटकांचा सखोल विचार करण्यात आला. त्याचप्रमाणे स्त्रीत्वाची काही सार्वत्रिक, सार्वकालिक व्याख्या करणे शक्य आहे काय ? स्त्रीत्व हे निसर्गदत्त असते व म्हणून अपरिवर्तनीय असते, की ते एक सामाजिक रचना ( सोशल कन्स्ट्रक्ट ) असते व म्हणून परिवर्तनशील असते? असे स्त्रीवादाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे, मूलभूत प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत. स्त्री प्रश्नांचे सैद्धांतिक आणि व्यावहारिक पातळ्यांवर वर्ण, वर्ग, जात इत्यादींशी जे गुंतागुंतीचे संबंध असतात, त्यांच्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. स्त्रीमुक्तीचा लढा हा सर्व शोषित, वंचित मानवसमूहांच्या मुक्तीच्या लढ्यांपासून वेगळा काढता येत नाही, याचे एक सुजाण भान या सर्व चर्चेमधून निर्माण झाले आहे.

अविकसित व विकसनशील देशांतील स्त्रियांच्या व्यथा आणि हक्क, शैक्षणिक समस्या, सामाजिक मागासलेपणा इ. विषयांची दखल व चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने ( युनो ) कोपनहेगन ( डेन्मार्क ) येथे जागतिक परिषदेचे आयोजन केले (१९८०). या परिषदेत जे काही ठराव झाले व धोरण ठरले, त्याची प्रत्यक्षात कार्यवाही काय झाली, याविषयी १९९४ मध्ये जागतिक महिला परिषद भरविण्यात आली.

एकूण पाश्चात्त्य स्त्रीवादाच्या विचारसरणीत स्त्रीच्या व्यक्तित्वाचा मानसन्मान, सर्व प्रकारची स्वातंत्र्ये आणि समानता यांवर भर देण्यात आला आहे; तथापि भारतात स्त्री विरुद्ध पुरुष अशी भावना भारतीय संस्कृतीत कधीच नव्हती. उलट, स्त्रियांच्या उद्धाराचे प्रयत्न राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे इ. पुरुषांनीच मोठ्या प्रमाणात सुरू केले. कुटुंबसंस्थेला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असल्याने पती, पिता, भाऊ, मामा, काका या नातेसंबंधांतून स्त्री-विकासाचे मार्ग खुले झालेले दिसतात. व्यक्तिस्वातंत्र्यापेक्षा व्यापक समाजहितासाठी त्याग करण्याची परंपरा भारतात असल्याने स्त्रीवादाची भूमिका भारतीय परिप्रेक्ष्यात पाश्चात्त्यांच्या विचारांपेक्षा वेगळी करण्याची गरज भासते. तरी अंतिमतः स्त्रीवादाचा साकल्याने विचार केल्यास, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समता व आत्मनिर्भरता या गोष्टी स्त्रीउद्धारासाठी अपरिहार्य ठरतात.

संदर्भ : 1. Hooks, Bell, Feminist Theory : From Margin to Center,  New York, 2000.

2. Nicholson, Linda, Ed. The Second Wave, London, 1997.

लेखिका: दीप्ती गंगावणे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate