অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंधश्रद्धा विरोधी कायदा

अंधश्रद्धा विरोधी कायदा

अंधश्रध्दा निर्मूलन समितीच् अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यानी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी  कायदा अमलात यावा यासाठी  कायदा केला जावा म्हणून सुमारे सोळा वर्षे संघर्ष  केला. त्यांच्या  मागणीनुसार  सरकारने विधेयक  तयार केले आणि ते विधेयक विधिमंडळात मंजुरीसाठी मांडण्यात आले. पण तेथे ते चौदा वर्षे अडकले होते. जेव्हा दाभोलकर यांची अत्यंत अमानुष हत्या झाली त्याच्या दुसर्‍या दिवशी घाईघाईने सरकारने तो कायदा वटहुकूम काढून अमलात आणला आहे.

अंधश्रध्दा विरोधी विधेयकाच्या अनेक संज्ञा-शब्द बदलले, ढाचा बदलला, काही कलमांची छाटाछाटी झाली. मूळ विधेयकाचे नामकरण अंधश्रध्दाऐवजी जादूटोणा विरोधी असे करण्यात आले. दिनांक १३.१२.२०१३ ला विधानसभेत तर दिनांक १८.१२.२०१३ ला विधान परिषदेत हा अध्यादेश पास होऊन आता तो कायदा म्हणून अस्तित्वात आला. अशा प्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र हे भारतातले पहिले राज्य ठरले. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पुरोगामी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी थोड्या उशिरा का होईना, हा कायदा मंजूर करून क्रांतिकारी टप्पा गाठला आहे. आता या कायद्याची अंमलबजावणी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अकराव्या- बाराव्या शतकात श्रीचक्रधर - ज्ञानदेवांपासून आपल्याकडे सुधारणेचे वारे वाहत आहेत. नामदेव, तुकाराम, एकनाथांच्या संत साहित्यापासून तर अगदी अलिकडच्या गाडगेबाबांच्या किर्तनांपर्यंत अशा अघोरी प्रथांवर संतांनी कोरडे ओढले आहेत.

जादूटोणाविरोधी कायद्यातील कलमानुसार भूत उतरविण्याच्या बहाण्यानं चमत्काराचा प्रयोग गुप्तधन, जारण मारण करणी भानामती या नावानं अमानुष, अनीष्ट, अघोरी  कृत्य करणे, नरबळी देणे, एखादी व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते, भूत  लावते, अपशकुनी आहे, सैतान आहे असं जाहीर करणं, भूत पिशाच्चाना आवाहन करून घबराट निर्माण करणे, कुत्रा, साप, विंचू  चावला तर एखाद्या  व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी मंत्र तंत्र, गंडे दोरे, किंवा त्यासारखे उपचार करणे. बोटाने शस्त्रक्रिया करण्याचा  दावा करणं, गर्भवती महिलेच्या गर्भातील बालकाचे लिंग बदलण्याचा  दावा करणे. स्वतःमध्ये अलौकिक शक्ती आहे अथवा आपण कोणाचे तरी अवतार आहोत असा दावा करणे.

एखाद्या मतिमंद व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा धंद्यासाठी आणि व्यवसायासाठी वापर करणे. अशा  अघोरी प्रकारांवर त्यात बंदी आहे. हे अघोरी प्रकार कायद्याने लगेच दूर होतील, असे नाही. त्यावर मूलगामी उपाय शिक्षण हाच आहे. या अनिष्टांवर कार्यक्षम उपाय समाजप्रबोधन हाच आहे. हे प्रबोधन ज्याप्रमाणे विद्यालयातील औपचारिक शिक्षणातून होऊ शकते, त्याचप्रमाणे, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात, भाषणे, कीर्तने, प्रवचने, नाटकादि मनोरंजनाची साधने यातूनही होऊ शकते. तेव्हा या कायद्याबाबत गैरसमज होऊ नये. त्याचा जास्तीत जास्त प्रसार करून तो सामान्य जनतेला सहज समजावा यांसाठी प्रत्येक  सुजाण  नागरिकांनी तो जनतेपर्यंत नेला पाहिजे. त्याची प्रभावी अंमलबजावणी हीच फार महत्वाची आहे.

लेखक : अतुल पगार (मास्टर्स ऑफ जर्नालिझम)

अंतिम सुधारित : 9/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate