অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्रहणांकित चांदणं : कर्णबधिरांना बोलतं करताना...

ग्रहणांकित चांदणं : कर्णबधिरांना बोलतं करताना...

‘ग्रहणांकित चांदणं’ या २०१३ च्या दिवाळी अंकातील विशेष विभागातील चर्चा, अनुभवकथन आपण वाचलं आहेच. याच विषयावर याच नावाने एक नवीन सदर सुरू झालं आहे. अपंग व्यक्तींच्या समस्यांवर सातत्याने चर्चा व्हावी आणि आपला दृष्टिकोन अधिकाधिक व्यापक होत जावा हा या मागचा उद्देश आहे. अशा व्यापक दृष्टिकोनाच्या पायाभरणीतूनच हा प्रश्‍न सोडवायला मदत होणार आहे.

एकच अपत्य, तेही कर्णबधिर. कर्णबधिर म्हणजे अर्थातच मुके. कारण कर्णबधिर बालके बोलू शकत नाहीत हे शास्त्र आहे. आमच्या स्वत:च्या मुलाला आम्ही बोलते केले हे यश .पण त्याच्यासारखीच ग्रामीण परिसरातली कर्णबधिर बालके बोलायला शिकावीत हे समोरचं ध्येय व त्या व्यापातून सत्कारणी लागणारा वेळ. त्यातून मिळणारे समाधान आम्ही अनुभवत आहोत. आणि हेच अनुभव शेअर करण्याचा हा छोटासा प्रयत्न.

प्रसूनचा जन्म २००० साली झाला . तो साधारणपणे चार वर्षाचा होईपर्यंत दुसरे अपत्य नको हा आमचा विचार झालेला होता.प्रसूनचं पहिलं वर्ष- दीड वर्ष कसं आनंदात गेलं. घरात सगळी माणसे मोठी. त्यामुळे त्याचं येणं हा खूपच कौतुकाचा विषय होता.आयुष्यात पुढं काय वाढून ठेवलं आहे याची पुसटशीही कल्पना आम्हाला आली नव्हती. लवकरच आम्हाला फार मोठ्या दिव्याला सामोरे जावे लागले. प्रसूनच्या बाललीला सुरू होत्या. मात्र हाक मारली की त्याची दुड्दुड्णारी पावले थांबत नाहीत की आवाजाला प्रतिसाद देत नाहीत. असे का ? याची आम्हाला भीती वाटू लागली. प्रसूनच्या व्यंगाची भीती खरी ठरली. एकटेपणी,अंधारात, नजरेआडून मारलेल्या हाकेला प्रतिसाद न देणे , मोठा आवाज आला तर न दचकणे, नजरेआड असणारी वाहने अथवा बालकांना मजा वाटणारी आवाजाची खेळणी अशा सगळ्यांना प्रसून प्रतिसाद का देत नाही ? हे आम्हाला काळजीचं वाटू लागलं.

साधारणपणे वर्षभरातच मुले अक्षर , शब्द आणि पुढे दीडेक वर्षापर्यंत वाक्यांच्या उच्चाराकडे सरकणे अशा टप्प्यांतून नैसर्गिकपणेच भाषाविकास साधत असतात.मात्र या वयात नॉर्मल मुलांची होणारी ‘बाबा’, ‘आई’, ‘दादा’ अशी शब्दांची बडबड प्रसूनची होतच नव्हती. आम्हाला सोलापूरच्या विद्याधर बोराडे यांनी ‘बेरा’ टेस्टसाठी पुण्याला पाठवले.आमची भीती खरी ठरली. प्रसून एका कानाने ९० टक्के तर दुसरीकडील कानाने ९५ टक्के बहिरा होता! बहिरी व्यक्ति हमखास मुकी बनतेच हे विज्ञान असल्याची समज आम्हाला काही दिवसांतच आली. म्हणजे प्रसून मुका होणार होता. मग त्याच्या अभिव्यक्तीचे काय? त्याचे शिक्षण, व्यवहार, समाजात त्याचे वावरणं, उदरनिर्वाह या सगळ्यां प्रश्‍नांनी आम्ही पार कोलमडलो.

आमचा परिसर पूर्णपणे ग्रामीण. येथून सोलापूर ६० तर पुणे २०० किलोमीटरवर. कुठल्याही सोई नाहीत. उलट अंधश्रद्धा, देवभोळेपणा, व्रतवैकल्ये, पाप-पुण्य या सगळ्यांना प्रमाण मानणारी इथली मानसिकता. भेटेल तो वेगळा उपाय सुचवायचा. वेगळा नवस सायास सांगायचा. कुणी म्हणायचे पोपटाचा उष्टा पेरू त्याला खाऊ घाला. कुणी सांगायचे तबला- पखवाजाला माळलेल्या कणकेची चपाती त्याला खायला द्या. पण प्रसून नक्की बोलू शकेल असे कोणीच ठामपणे सांगत नव्हते.

ही झाली अडाणी निरक्षर जगताची कथा. पण चार बुके शिकलेले काही "E.N.T.' तज्ज्ञ सुद्धा ’बोलेल चार पाच वर्षांनी आपोआप’ असे सांगत होते. पण आमचा कुणावर विश्‍वास बसत नव्हता. दिशा नव्हती . पण चौकशा ,संघर्ष सुरूच होता. पुण्याच्या ऑडिओलॉजिस्ट अरूणा सांगेकर यांनी आम्हाला अलका हुदलीकरांचा पत्ता दिला. अलकाताईंकडे प्रसूनसारखीच इतर मुले पहायाला मिळाली जी मुले बहिरी होती पण बोलत होती. फार मोठा दिलासा मिळाला. अलकाताईंनी आम्हाला मानसिक पातळीवर आधार दिला. ‘तुमचे एकट्याचेच मूल असे नाही तर भारतात दर हजारी सात बालके कर्णबधिर जन्मतात. रडत बसलात तर मूल मुके बनेल आणि प्रयत्न केलात तर मूल बोलेल. त्याचे सर्व प्रश्‍न सुटतील. तुम्ही प्रयत्न केला तर मूल नक्की बोलेल’ असा त्यांनी आम्हाला आधार दिला. अलकाताईंनी त्यांच्याकडील मुले व पालकांच्या भेटी घालून दिल्या. थोडाफार आशेचा किरण दिसू लागला. पण संघर्ष कायम होता.

मग सुरू झाल्या पुण्याच्या चकरा. पुणे आमच्यापासून २०० किलोमीटर अंतरावर . प्रवासासाठी सहा तास लागायचे. तेथे कोण नातेवाईक नाहीत.प्रसूनचा मामा योगेशचंद्र चौधरी हा चिंचवडला मित्रांसोबत रहायचा. त्याचे आणि त्याच्या मित्रांचे सहकार्य व्हायचे. पुण्याच्या प्रवासाचं दिव्य असायचं. एकदा भिगवणला उतरल्यावर गडबडीत प्रसून दुसरीकडच्याच गाडीत बसला. भयंकर घाबरलो आम्ही. त्या बसमधल्या इतर प्रवाशांच्या लक्षात आल्यावर प्रसूनला खाली सोडले. कारण त्याला ना बोलता येत होतं किंवा नाव सांगता येत नव्हते. म्हणून पुढे प्रवासात पत्ता असलेली चिठ्ठी आम्ही प्रसूनच्या खिशात ठेवायला लागलो. या चिठ्ठीच्या प्रकारानेच आम्ही कमालीचे अस्वस्थ झालो. असे कुठपर्यंत चिठ्ठी ठेवणार? काहीही झाले तरी प्रसूनला बोलायला आलेच पाहिजे. त्याने सगळे मनातले खुणांच्या भाषेऐवजी बोलूनच व्यक्त झाले पाहिजे. हा ध्यास आम्हाला क्षणभरही स्वस्थ बसू देत नव्हता.

अलकाताईंनी आम्हाला स्पीच थेरपीचे धडे दिले. अरूणा सांगेकर यांनी श्रवणयंत्रांबाबत मार्गदर्शन केले आणि अलकाताईंकडे सातत्याने जाण्याचा सल्ला दिला. अलकाताईंचे स्पीच थेरपीमधले बारकावे, या मुलांबाबात कमालीची तळमळ हे सगळं आम्हाला भावलं. पुण्याला आलो की आमची बॅटरी ‘चार्ज’ व्हायची. तब्बल अकरा महिन्यांनी प्रयत्नांना यश आले. आवाजांना, सूचनांना प्रसूनचा प्रतिसाद वाढला. एके दिवशी तो खेळताना पडला आणि आई असा शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडला. तेव्हा आमच्या डोंळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. पुन्हा नवी उमेद आली. शब्द, वाक्ये, प्रसंग हे सगळं सुरू झालं.

आज प्रसून आठवीत शिकतो आहे. सातवी पर्यंत जिल्हा परिषदेच्या नॉर्मल मुलांच्या शाळेत शिकला. आत्ता आठवीला गावातच आहे. सगळ्या मित्रांसोबत गप्पा- टप्पा चालतात. मस्ती चालते. गावातल्या दुकानांतून सामान घेऊन येतो. दुकानदारांना ‘वस्तू महाग आहेत,’ ‘एक्स्पायरी डेट काय आहे?’, अशा गंमती करून सतावतो. त्यांनाही जो मुलगा मुका होता तो प्रयत्नांनी बोलतो याचं मोठं कौतुक वाटतं . कधी एखादा नवखा त्याला भेटला आणि त्याचे उच्चार याला समजले नाहीत तर हा त्यांना म्हणतो कसा, ‘स्पष्ट उच्चारात बोला ना. माझ्या कानांत मशीन आहे दिसत नाही का? मला नीट नाही कळलं तर मी तुमच्याशी संवाद कसा साधणार?’ आम्हाला सारे श्रम, पैसा, योग्य दिशेने सार्थकी लागल्याचं समाधान मिळालं.

हा इथपर्यंतचा प्रवास करून थांबणे आम्हाला पटत नव्हते. आमच्यासारखे अनेक हतबल पालक आहेत. सैरभैर आहेत. महागडी श्रवणयंत्रे, गरज नसताना ‘कॉक्लीअर इम्प्लांटसारख्या’ लाखो रूपयांच्या शस्त्रक्रिया, चुकीचे समुपदेशन आणि चुकीची स्पीच थेरपी, दिशाभूल करणारी जाहिरातबाजी यांतून पालक अक्षरक्ष: त्रस्त झाले आहेत. एवढे करूनही मूल हमखास बोलेल याची खात्री कुणीच देत नाही. ज्यांच्याजवळ पैसा आहे ते पालक ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ करतात. त्यांनाही बाळाच्या बोलण्याबाबत कोणी स्पष्ट सांगत नाही. पैसे नसणारे विशेषत: आमच्याकडच्या ग्रामीण भागातले मजुरी करणारे,खायच्या अन्नाची भ्रांत असणारे पालक पन्नास - साठ हजारांच्या शस्त्रक्रियेचे आणि सहा- सात लाखांच्या ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ चे नाव ऐकूणच खचून जातात. आपले मूल बोलावे या स्वप्नाचा नादच सोडून देतात.

पालकांच्या या घालमेलीत, कमिशन आणि पैसा मिळवायाला बसलेल्या या व्यापारी जगात या अजाण निष्पाप बालकांचा काय दोष? केवळ पाच हजारापर्यंतची श्रवणयंत्रे व योग्य ‘स्पीच थेरपी’ द्वारे कर्णबधिर बालके बोलू शकतात हे या पालकांना कोणी सांगत नाही. हतबल झालेल्या, परिस्थितीने भांबावलेल्या पालकांना या गोष्टी माहीत झाल्या तर अशा बालकांना बोलायला येईल. हे कुणी समजवत नाही. गावाकडे तर अंधश्रद्धा आणि देवभोळेपणाचा गैरफायदा घेऊन या पालकांना लुटणारे आहेत ते वेगळेच. या सगळ्याचा शेवट होतो तो मुलाला मूकबधिर शाळेत पाठवून. ही मुले नैसर्गिक बोलायचे वय निघून गेल्यावर या शाळेत जातात.आणि कायमचीच मुकी निघतात.

या बालकांच्या बाबतीत समाजात असे भयंकर चित्र निर्माण झाले आहे. हे सगळं आम्ही जवळून अनुभवले आहे.अनुभवत आहोत. पैसा,वेळ आणि उमेद खर्चून मूल दहा-बारा वर्षाचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठे झाल्यावर बरेच पालक आमच्याकडे येतात.आजवर दिशाभूल झाल्याचे समजल्यावर अक्षरश: रडतात. खरे तर आता फार काही उपयोग होणारा नसतो. कारण माणसाचं भाषा शिकण्याचं नैसर्गिक वय चार वर्षाच्या आतीलच असते. आम्हालाही वाईट वाटतं. हे कुठेतरी थांबायला हवे. अमेरिकेसारख्या प्रगत देशांत महिनाभरातच बाळाची ‘बेरा’ टेस्ट करतात.बालक कर्णबधिर असल्यास आई वडीलांनाच स्पीच थेरपी शिकवली जाते. आपल्याकडेही या मुलांसाठी काहीतरी करा असं अलकाताईंचं सतत सांगणं असतं.

या सगळ्या परीस्थितीचा विचार करून आम्ही ‘व्हॉईस ऑफ व्हॉईसलेस’ ची स्थापना केली. ‘कर्णबधिर बालकांचा शोध घेणे आणि त्यांना बोलायला शिकवणे’ हा आमच्या कामाचा मुख्य उद्देश आहे. स्पीच थेरपीबाबत पालकांसोबत काम करणे, कर्णबधिरांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती पालकांपर्यंत पोचवणे,समाजातील दातृत्वातून ग्रामीण गरजू बालकंना श्रवण यंत्रे पुरवणे असे आमचे काम चालते.

अलिकडे आमच्या कामाला मुंबईच्या ‘कोरो’ या सामाजिक संघटनेमुळे वेगळी दिशा मिळाली आहे. कर्णबधिर बालकांना ऐकू येत नाही हे जर अगदी कमी वयात समजले तर त्यांना बोलता येणे ,त्यांचे शिक्षण, त्यांचे समाजातील पुनर्वसन असे कितीतरी प्रश्‍न सुटणार आहेत. अपंगत्वाचे साधारणपणे सहा प्रकार आहेत. त्यापैकी हा प्रकारच असा आहे की त्वरित निदान झाले तर पुढील अनेक तोटे व खर्च वाचणार आहे. पोलिओ काही सगळ्यांनाच होणार नसतो. तरीही आपण पोलिओची मात्रा नाही का देत सगळ्यांनाच? तसाच हा प्रश्‍न आहे. शासनाने नवजात बालकांच्या कानाची तपासणी केली आणि कर्णबधिर बालकांना अगदी कमी वयात श्रवणयंत्र बसवले तर हमखास ही बालके बोलतील हा आमचा अनुभव आहे. त्यासाठी ‘कोरो’ आम्हाला सहकार्य करत आहे. यापुढे कामाचे ‘मॉडेल’ उभे करणे आणि संशोधनात्मक पातळीवर आम्ही चाललो आहोत. कारण हा प्रश्‍न केवळ महाराष्ट्रातल्या ठराविक पालकांचा नाही तर तो आपला सगळ्यांचा आहे.
----
जयप्रदा व योगेशकुमार भांगे
मु.पो.शेटफळ, ता.मोहोळ
जि. सोलापूर - ४१३३२४
चलभाष ः ९९२२०६०५९९ / ७७७४९८२९८१

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate