অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जागतिक तापमान वाढ

जागतिक तापमान वाढ

नकळत येणारी संकट परंपरा सांगणारे
जागतिक तापमान वाढ
आजकाल पर्यावरण प्रदुषण हा विषय ज्याच्या त्याच्या जिव्हाळ्याचा झाला आहे. प्रत्येक न्युज चॅनलवर अधूनमधून या विषयी नवनवीनच माहिती देणं सुरू असतं. या सर्वात परवलीचा शब्द असतो, ग्लोबल वॉर्मिंग. बच्चे कंपनींना तर हा ग्लोबल वॉर्मिंग विज्ञानाच्या पुस्तकातून सतत भेटतच असतो. त्यांना या विषयावर निबंध स्पर्धा किंवा वादविवाद स्पर्धातून बोलतं केलं जातं. इतका ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ हा विषय ग्लोबल आहे. अशावेळी आपण त्या विषयी अनभिज्ञ राहून कसं चालेल? नेमकं ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे आहे तरी काय? ते कशामुळे होतं? त्याचे काय काय दुष्परिणाम आहेत? ग्रीनहाऊस, गॅसेस, ओझोन होल हे या संदर्भात काय परिणाम करतात? हे सारे प्रश्न तुमच्या मनात असतील तर जागतिक तापमान वाढ हे पुस्तक अवश्य वाचा.

या पुस्तकाचे लेखक आहेत श्री. गो. बा. सरदेसाई आणि नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास स्पष्टता हे एक ठळक वैशिष्ट्य सांगावं लागेल. पुस्तकाचं मुखपृष्ठ पुस्तकातील विषयाचं गांभीर्य दर्शविते. लेखकाने वैज्ञानिक शब्द मराठीतून मांडले आहेत. परंतु ते मराठीतूनच वाचतांना बोजड वाटू नये याचीही काळजी लेखकाने घेतली आहे.

प्रत्येक मराठी वैज्ञानिक शब्दाला प्रचलीत इंग्रजी शब्द तिथल्या तिथे देण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्य आहे. त्यामुळे संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते. जागतिक तापमान वाढ हा विषय समजावून सांगतांना लेखकाने वाचकांचे ज्ञान गृहीत न धरता आवश्यक त्या सर्व व्याख्या पुरेशा तपशिलासह समजावून सांगितल्या आहेत. जसे अल्ट्रा वायलेट रेंज म्हणजे अतिनील किरणं म्हणजे काय? ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजेच हरितगृह वायू म्हणजे काय? हे समजावून सांगतांना छोट्या छोट्या प्रकरणांच्या स्वरूपात माहिती दिली आहे.

प्रकरणं छोटी-स्वतंत्र असल्याने विषयाचा क्लिष्टपणा कमी झाला आहे. तसेच एखादी संकल्पना पुन्हा समजावून घ्यायची झाल्यास चटकन शोधून काढता येते. संपूर्ण पुस्तकात शोधण्याची गरज भासत नाही. या पुस्तकात एकूण तेवीस प्रकरणे आहेत. त्यापैकी पहिली पाच प्रकरणे लेखकाने आवश्यक असे प्राथमिक ज्ञान समजावण्यासाठी वापरली आहेत आणि मग 6 व्या प्रकरणापासून मूळ विषयाला हात घातला आहे.

जागतिक तापमानात वाढ कशी होते? त्यात हरितगृह वायू मुख्य भूमिका कशी वठवितात? हे सारे लेखकाने टप्प्या टप्प्याने मांडले आहे. हरितगृह वायू ही संकल्पना कुठे, कशी उदयाला आली. त्यात निसर्ग कसा मदत करतो? परंतु मानव निर्मित हरितगृह वायूने जागतिक तापमान वाढीवर कसे अनिष्ट परिणाम होतात, हे समजावून सांगायला लेखकाने जवळ जवळ दहा छोटी छोटी प्रकरणे घेतली आहेत.

पुढे ओझोन हे पृथ्वीचं सुरक्षाकवच कसं तयार होतं? त्याचं कार्य काय? त्याच्यात झालेले बदल जागतिक तापमानावर कसे परिणाम करतात? ध्रुवीय परिसरावर या तापमान वाढीचा काय परिणाम होईल हे सारे लेखकाने अतिशय स्पष्टपणे मांडले आहे. पुस्तकातील शेवटचे प्रकरण ङ्कनकळत येत असलेली संकट परंपराङ्ख हे हादरवून टाकणारे आहे. हे प्रकरण आकडेवारीने परिपूर्ण असे आहे. अद्ययावत माहितीच्या आधारे तापमानात 10ल, 20ल, 30ल, 40ल, किंवा 50ल, ने वाढ झाल्यास काय परिणाम होतील हे सांगितले आहे.

त्यामुळे या विषयाचे गांभीर्य वाढते. जागतिक तापमान वाढ याविषयी प्रस्तुत पुस्तक हे पाठ्यपुस्तक नाही असे जरी प्रकाशक व लेखक म्हणत असतील तरी विषय पुरेशा गांभिर्याने व तपशीलासह दिल्याने प्रभावी झाला आहे.

एखादा गंभीर विषय असतांना जगभरात त्या दृष्टीने ठोस पावले का उचलल्या जात नाही प्रश्न मनात येत असेल तर, त्याचेही समाधान या पुस्तकात आहे. उपाययोजना करतांना संपूर्ण जगावर त्याचे काय दुष्परिणाम होतील किंवा उपायांसाठी काय प्रतिक्रिया जगभर उमटतील याची चर्चा सुद्धा पुस्तकात आहे. त्या चर्चेला पुढे नेऊन तापमान वाढीवर ठोस उपाय शोधले जावे, या साठी मन बेचैन होते, यातच पुस्तकाचे यश आहे.

 

माहिती संकलन: प्राची तुंगार

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate