অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामाजिक कराराचा सिद्घांत

सामाजिक कराराचा सिद्घांत

सामाजिक कराराचा सिद्घांत

राजकीय तत्त्वज्ञानात राज्यकर्ते व प्रजा या दोहोंत कर्तव्ये आणि अधिकार यांसंबधी प्रत्यक्ष किंवा आनुमानिक झालेला करार. प्राचीन काळी मानव हा बेबंद अशा नैसर्गिक अवस्थेत वावरत होता. तो तत्कालीन परिस्थित्यनुसार सुखी वा दुःखी असेल. प्राथमिक समूह अवस्थेतील अशा रानटी परिस्थितीतून मुक्त होण्यासाठी त्यावेळी कोणताही निश्चित मार्ग दृष्टीपथात नव्हता. आक्र मण, भीती, अविश्वास आणि अखेर बळी तो कान पिळी अशी अवस्था निर्माण झाली होती. या बि कट अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी माणसाने आपापसांत सामाजिक हितासाठी करार केला व त्यातूनच सामाजिक कराराचा सिद्घांत ही संकल्पना अस्तित्वात येऊन राज्यसंस्था या यंत्रणेची निर्मिती झाली.

पाश्चिमात्य संस्कृतीच्या वैचारिक इतिहासात आणि ⇨ॲरिस्टॉटल (इ. स.पू. ३८४–३२२) आणि ⇨प्लेटो (इ. स.पू. ४२८–सु.३४८) यांच्या काळापासून सामाजिक कराराची उत्पत्ती, स्वरुप आणि कार्य यांविषयीचे विश्लेषण आणि चर्चा सुरु होती. त्यांनी राज्यसंस्थेच्या उत्पत्तीचे मूळ मनुष्याच्या सहकारी भावनेत असल्याचे मत प्रतिपादन केले आहे. ⇨एपिक्यूरस ( इ. स. पू. ३४१–२७०) आणि ⇨सिसरो ( इ. स. पू. १०६–४३) यांच्या लेखनातही सामाजिक कराराच्या विचाराची बीजे आढळतात; पण या कराराच्या संकल्पनेला अधिक सुसंगत आणि सुसूत्र स्वरुप सोळाव्या ते अठराव्या शतकांत टॉमस हॉब्ज, जॉन लॉक व झां झाक रुसो या विचारवंत तत्त्ववेत्त्यांनी दिले आणि आपल्या स्वतःच्या दृष्टीकोनातून या सिद्घांताचे परिशीलन करुन आपापले स्वतंत्र विवेचन मांडले. त्यामुळे या संकल्पनेला सैद्घांतिक व तात्त्विक बैठक प्राप्त झाली. या तत्त्ववेत्त्यांनी नागरी धुरीण समाजाला (लर्नेड सिव्हिल सोसायटी) मिळणाऱ्या सुविधा, फायदे आणि प्राथमिक नैसर्गिक अवस्थेत ( अ स्टेट ऑफ नेचर ) असलेल्या लोकांचे तोटे, अहितकारक गोष्टी यांची तुलना करुन राज्यसंस्था अस्तित्वात नसेल, तर काय घडते याचे आनुमानिक (हायपॉथेटिकल) चित्र संघटित राज्यसंस्थेचे मूल्य आणि उद्दिष्टे विशद करुन सिद्घ करण्याचा प्रयत्न केला आहे.

टॉमस हॉब्ज (१५८८–१६७९) याने रानटी दुःसह्य अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने आपापसांत करार केला आणि त्यातून सार्वभौम सत्तेची उत्पत्ती झाली, असे सामाजिक कराराचे विवेचन लेव्हायथन या ग्रंथात केले आहे. हॉब्जच्या वेळी इंग्लंडमध्ये यादवी युद्घजन्य परिस्थिती होती. ती टाळण्यासाठी आणि सामाजिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी हा सामाजिक कराराचा विचार त्याने मांडला. त्याच्या विचाराचे मुख्य सूत्र सार्वभौम सत्तास्थान असावे आणि समाजाने आज्ञापालन हे कर्तव्य मानावे, असे होते. त्याच्या मते अशी सार्वभौम सत्ता निरंकुश आणि अविभाज्य असते. अशा सार्वभौम सत्तेची इच्छा म्हणजेच देशाचा कायदा. त्याला कोणत्याही परिस्थितीत विरोध करणे अवैध होय. हॉब्जच्या या सामाजिक कराराविषयीच्या तत्त्वज्ञानाने इंग्लंडमधील राजेशाही सत्तेला भक्कम स्थान मिळवून दिले.

जॉन लॉक (१६३२–१७०४) याने हॉब्जनंतर हा विचार अधिक व्यापक व शास्त्रशुद्घ पद्घतीने टू ट्रीटिझिस ऑफ गर्व्हन्मेन्ट या ग्रंथातील दुसऱ्या प्रबंधात मांडला. या गंथात तो म्हणतो की, ‘मानवाची पहिली अवस्था नैसर्गिक अवस्था (अ स्टेट ऑफ नेचर) होती. त्या अवस्थेत सर्व मनुष्ये स्वतंत्र होती आणि सर्वांचे हक्कही समान होते. प्रत्येक व्यक्तीस आपले व्यवहार मनसोक्त करण्याचे स्वातंत्र्य होते आणि त्याच्यावर हुकमत गाजविणारी कोणतीही श्रेष्ठ सत्ता नव्हती. त्यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्याला मर्यादा होती, ती फक्त नैसर्गिक कायद्याची’. हॉब्ज नैसर्गिक कायदा व मानवी प्रज्ञा (रीझन) ही एकच आहेत, असे मानतो. हा कायदा म्हणजे आपण आपले व आपल्या बांधवांच्या जीविताचे रक्षण करावे आणि कोणीही इतरांचे स्वातंत्र्य आणि मत्ता हिरावून घेण्याचा प्रयत्न करु नये; परंतु या व्यवस्थेत एखाद्याने गैरवर्तन केल्यास त्याचा बंदोबस्त करणारी कोणी अधिकारी व्यक्ती ह्या व्यवस्थेत शक्य नव्हती. यातून मार्ग काढण्याकरिता माणसांनी आपले नैसर्गिक अवस्थेतील काही हक्क सोडण्याचे ठरविले आणि सर्वांनी मिळून एक सामाजिक करार करुन एक समष्टी निर्माण केली. या करारान्वये सर्व मनुष्यमात्रांची जीवने, स्वातंत्र्य आणि मत्ता यांचे रक्षण केले जावे, असे ठरले. मनुष्याची ही मूळ नैसर्गिक अव अवस्था आणि सामाजिक करार या दोन्ही गोष्टी इतिहासात घडल्याचे लॉक मानतो.

झां झाक रुसो (१७१२–७८) या फ्रेंच तत्त्वज्ञ-विचारवंताने सामाजिक कराराचा पुरस्कार सोशल कॉन्ट्रॅक्ट (१७६२) या पुस्तकात केला असून हॉब्ज आणि लॉक यांच्या सामाजिक कराराविषयीच्या, विशेषतः नैसर्गिक अवस्था आणि धुरीण समाज या संकल्पनांविषयी मतभिन्नता व्यक्त केली आहे. त्याच्या मते नैसर्गिक अवस्था ही प्रक्रिया शांततामय व ऐच्छिक आहे. त्याने लोकांच्या क्रांतीचे तत्त्वज्ञान प्रतिपादिले असून जुलमी शासनसंस्थेविरुद्घ क्रांती करण्याचा जनतेला संपूर्ण अधिकार आहे, हा विचार मांडला. तो फ्रेंच राज्यक्रांतीला प्रेरणादायी ठरला. राज्यसंस्था हा एक करार आहे, ही कल्पना त्याने मांडली. नैसर्गिक जीवन तो आदर्श मानतो. माणसे स्वाभाविक प्रवृत्तीनुसार जीवनावश्यक गोष्टी मिळवून एकमेकांना मदत करीत होती, तेव्हा कोणत्याही संस्थेची, संघटनेची, राज्यसंस्थेची, दंडशक्तीची आवश्यकता वाटत नव्हती; पण जेव्हा माणसामाणसांतील संबंध गुंतागुं तीचे झाले आणि त्याला संघर्षात्मक स्वरुप प्राप्त होऊ लागले, तेव्हा नव्या समाजाच्या स्थैर्यासाठी-समाजव्यवस्थेसाठी रुसोला राज्यसंस्था अपरिहार्य वाटली. त्यासाठी त्याने सामाजिक कराराचा सिद्घांत प्रतिपादिला आणि समान इच्छा (जनरल विल) या आपल्या संकल्पनेवर उभा केला. मोठा समाज एकत्र नांदत असला की, सर्वांच्या हितासाठी सर्वांची मिळून एक,सर्वांना समान अशी सार्वत्रिक इच्छा निर्माण होते. तीच समान इच्छा वा ईहा होय. ती स्वतंत्र, सर्वांमध्ये सारखीच वसत असलेली पण अमूर्त अशी एक प्रेरणा असते. त्या इच्छेला प्रत्येक व्यक्ती समूहनियंत्रणासाठी सर्व प्रकारचे अधिकार आपण होऊन प्रदान करते आणि तीत त्या व्यक्तीचीही इच्छा समाविष्ट असते. थोडक्यात रुसोच्या मते प्रत्येक व्यक्ती स्वतःचे स्वतःलाच सर्वाधिकार सुपूर्द करीत असते. राज्यसंस्था ही त्या इच्छेने उभी केलेली यंत्रणा असून ती बदलणे, मोडणे इ. सर्व अधिकार त्या समान इच्छेला असल्याचे रुसो मानतो. यामुळे राजकीय विचारांच्या संदर्भात सामाजिक करार हा त्याचा सिद्घांत इंग्रजी विचारवंतांचा आर्थिक उदारमतवाद आणि फेंच तत्त्वज्ञ ⇨माँतेस्क्यू (१६८९–१७५५) याची प्रत्यक्षार्थवादी अभिवृत्ती या दोहोंच्या पलीकडे जातो.

हॉब्जच्या मांडणीप्रमाणे राजसत्तेला अनियंत्रित अधिकार मिळत होते; तर लॉकच्या विचारप्रणालीत राज्यसत्तेवर काही अल्पस्वल्प बंधने येत होती; मात्र रुसोच्या सामाजिक करारात जनतेचे सार्वभौमत्व आणि समतेचा सिद्घांत ही दोन मूलगामी तत्त्वे असल्यामुळे सरंजामशाही संपुष्टात येऊन आधुनिक लोकशाहीची बीजे रोवली गेली. परिणामतः फ्रेंच राज्यक्रांतीनंतर प्रस्थापित राजेशाही/सत्तांना रुसोच्या सामाजिक कराराने धक्का दिला. विसाव्या शतकात जॉन रॉल्स (१९२१– ) याने सामाजिक कराराच्या सूत्रीकरणात काही बाबतीत रुसोचे अनुकरण केले आहे. त्याच्या मते सुयोग्य अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पूर्वग्रह, स्वार्थ, हेवेदावे यांपासून अलिप्त असलेल्या बुद्घिनिष्ठ व्यक्तींची निकड आहे. आपला सामाजिक दर्जा, प्रतिष्ठा काय आहे, हे विसरुन लोकांनी अज्ञानाच्या पडद्याआड जाऊन आपली समान मूलभूत अवस्था (ओरिजिनल् पोझिशन) ध्यानी घ्यावी. या अवस्थेमुळे न्याय व सुव्यवस्था नांदेल; कारण बुद्घिनिष्ठ सूज्ञ व्यक्ती समान व निःपक्षपाती कायद्याविषयी आदर दर्शवितात. रॉल्सला अभिप्रेत असलेली मूलभूत अवस्था ही संज्ञा नैसर्गिक अवस्थेला चपखल लागू पडते;तथापि अजूनही वास्तवात धुरीण समाज आणि हितचिंतक मध्यस्थ आपणच सर्वांचे कल्याण करु शकतो या भ्र मात असतात.

विसाव्या शतकात उपयुक्ततावादी विचारसरणीमुळे विशेषतः ⇨जेरेमी बेंथॅम (१७४८–१८३२), ⇨ जॉन स्ट्यू अर्ट मिल(१८०६–७३) यांच्या लेखनामुळे सामाजिक कराराची सैद्घांतिक विचारसरणी मागे पडली; तरीसुद्घा सार्वभौम सत्ता,प्रातिनिधिक राज्यसंस्था आणि जुलमी सत्तेविरुद्घ क्रांती करण्याचा लोकांचा अधिकार यांसारखी राजकीय मूल्ये सामाजिक कराराच्या सिद्घांतातून प्रसृत झाली, हे निर्विवाद होय. या कराराने अमेरिकन-फ्रेच राज्यकर्त्यांत लोकशाही मूल्ये रुजविली. त्यामुळे त्यांच्या संविधानात व विधिसंहितांत समानतेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले.

 

पहा : रुसो, झां झाक; लॉक, जॉन; हॉब्ज, टॉमस.

संदर्भ : 1. Buchanan, James M. The Limits of Liberty : Between Anarchy and Leviathan, Chicago, 1975. 2. Kymlicka, ill, Liberalism, Community and Culture, Oxford, 1989. 3. Wolf, Robert Paul, Understanding Rawls : A econstruction and Critique of a Theory of Justice, Princeton ( N. J.), 1977.

गर्गे, स. मा.

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate