অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामाजिक संस्था

सामाजिक संस्था

सामाजिक संस्था

( सोशल इन्स्टिट्यूशन्स ). समाजाचे अस्तित्व, सातत्य, स्वास्थ्य आणि सुरक्षितता यांच्या संवर्धनार्थ स्थापन झालेल्या सुविहित यंत्रणा. त्यांच्या प्रकारांत भिन्नता असली आणि त्यांची व्याप्ती संस्थापरत्वे लहान-मोठी असली आणि उद्देश व हेतू वेगवेगळे असले, तरी त्यांचे स्वरूप सार्वत्रिक, सार्वकालिक व परिवर्तनीय असते. सामाजिक संबंधांचे स्वरूप निश्चित व सुस्थिर राहण्यासाठी रुढी, परंपरा, लोकरीती, संकेत, लोकाचार इत्यादींचा आधार घेतला जातो. मूलभूत सामाजिक कार्याच्या पूर्तीसाठी व्यक्तिवर्तनाला संघटित रुप देणारी व्यवस्था कार्यान्वित करण्याचे काम सामाजिक संस्था करतात; कारण समाजाऐबरोबर व्यक्तिगत गरजांची पूर्तताही सामाजिक संस्थांमार्फत होते. समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे ठरते. उदा., विवाह व कुटुंबसंस्था यांमुळे समाजाचे वंशसातत्य व लोकसंख्या नियंत्रित ठेवली जाते, तशीच ती व्यक्तीच्या भावनिक व वैवाहिक संबंधांच्या गरजा पूर्ण करते.

या गरजा स्थलकाल व परिस्थितिसापेक्ष असतात. समाजनियंत्रणाच्या संदर्भात सामाजिक संस्थांकडे एक प्रभावी साधन म्हणून पाहिले जाते. काळाच्या बदलाबरोबर संस्थांमध्ये नवमताचा प्रवाह येणे, परिवर्तन होणे, रचनात्मक व कार्यात्मक नियम बदलणे, नवी प्रतीके व मूल्ये संपादन केली जाणे, या गोष्टी अटळ असतात व त्या घडत राहतात; मात्र सर्व समाजाकडून त्यास सहमती मिळतेच असे घडत नाही; कारण बहुसंख्य गटांची त्याविषयी स्वतंत्र तत्त्वप्रणाली, मते व दृष्टिकोण असतात; त्यांच्या नियंत्रणपद्घतीमध्ये फरक आढळतो. संस्थांच्या जडणघडणीवर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव व परिणाम होत असतो. मानवी समाजात संस्थांचे स्थान उत्कांतिवादी व सार्वत्रिक आढळते. त्यात मानवाचे मूलभूत गुण व वैशिष्ट्ये यांचे दर्शन होते.

प्रत्येक संस्थेचे कार्य, स्वरुप, हेतू व क्षेत्र ठरलेले असते. कुटुंब व नातेव्यवस्था या संस्था समाजातील व्यक्तीचे जैविक संबंध व प्रजनन यांवर नियंत्रण ठेवतात. शैक्षणिक संस्था व्यापक व विस्तारित स्वरूपात कार्य करतात आणि लहान बालकापासून प्रौढ व्यक्तीपर्यंतच्या सर्वांना ज्ञानदान करतात. व्यक्तिमत्त्व विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. या संस्थांद्वारे समाजाचा सांस्कृतिक वारसा व आदर्श मूल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केली जातात. अर्थकारण व अर्थशास्त्र या क्षेत्रांशी निगडित संस्था उत्पादन, विभाजन, सेवा व वस्तुविनिमय, त्यांचा उपभोग यांबाबत दक्ष असतात. समाजात त्यांना महत्त्वाचे स्थान असते. राजकीय संस्था सर्व नियमनांद्वारे समाजात शांतता, सुव्यवस्था राखून अराजकी शक्तींवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. सांस्कृतिक संस्था ह्या मुख्यत्वे धार्मिक, वैज्ञानिक व कलात्मक क्षेत्रांना योगदान देऊन सांस्कृतिक ठेव्याचे संरक्षण-संवर्धन करतात; तसेच संस्कृतीचे काटेकोरपणे संरक्षण करतात.

या सर्व संस्थांमध्ये स्तरीकरणनामक संस्था समाजात मूलभूत भूमिका बजावते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मिळणारा दर्जा अथवा स्थान, पुरस्कार, पारितोषिके, चरितार्थाची साधने व त्यांची प्राप्ती इत्यादींची तपशिलवार नोंद ठेवून यांतील विविधता आणि विभाजनाचे कमी-अधिक प्रमाण यांबाबतच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न ती करते. ही सर्व कार्ये समाजातील ज्येष्ठ,प्रतिष्ठित व प्रभावी व्यक्ती आणि गट करीत असतात. प्रसिद्घ अमेरिकन समाजशास्त्रज्ञ ⇨टॅलकॉट एडवर्ड पार्सन्झ हे संस्थांच्या विविधतेचे विश्लेषण करताना म्हणतात, ‘सामाजिक संस्थांत आढळणारे भेद हे अर्थातच समाजाच्या स्वरूपावर, त्यांतील लोकांच्या व गटांच्या जीवनपद्घतीवर आणि समाजातील प्रस्थापित व्यवस्था यांवर अवलंबून असतात. या कारणामुळे हे वेगवेगळेपण आढळते’. अश्मयुगीन मानवापासून आधुनिक मानवापर्यंतच्या अवस्थांत होत गेलेल्या क्रमविकासामुळे सामाजिक संस्थांतही उत्कांती झालेली दिसते.

 

संदर्भ : 1. Eisenstadt, Samuel N. Essays on Comparative Institutions, New York, 1965.

2. Murdock, George P. Social Structure,

New York, 1949. देशपांडे, सु. र.

स्त्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 8/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate