অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विद्यार्थी घडवताहेत "नवभारत'

राज्यासाठी आदर्श असा दापोलीतील छात्रालयाचा उपक्रम

शिक्षणक्रांतीच्या युगात श्रमसंस्कारांची जोपासना बालवयातच व्हायला हवी, हे लक्षात घेऊन ज्ञानगंगेच्या ओघाला श्रमगंगेशी जोडण्याचे कार्य दापोली (जि. रत्नागिरी) येथील ऋषितुल्य पांडुरंग शिंदे गुरुजी यांनी नवभारत छात्रालयामध्ये केले. त्याच बळावर छात्रालय आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहे. विद्यार्थ्यांनी श्रमदानाच्या जोरावर चालवलेला फळ व भाजीपाला रोपवाटिका पॅटर्न केवळ कोकणासाठीच नव्हे, तर राज्यासाठीही आदर्श आहे.
- राजगोपाल मयेकर
दापोली शहरातील शाळेत ग्रामीण विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून गांधीवादी नेते अप्पासाहेब पटवर्धन, द. सी. सामंत गुरुजी व लोकनेते श्‍यामराव पेजे यांनी प्रयत्न केले. त्यातून दापोलीत 1947 मध्ये कुणबी सेवा संस्थेच्या माध्यमातून नवभारत छात्रालय सुरू झाले. शासन अनुदान व देणगीदारांचा हात मिळाल्याने विद्यार्थ्यांना मोफत भोजनही मिळू लागले. "नवभारत'ची जबाबदारी 1967 मध्ये पांडुरंग शिंदे गुरुजी यांनी उचलली. सन 1948 ते 66 पर्यंत ते शिक्षकी करताना सहव्यवस्थापकही होते. दिवाळीच्या सुमारास मुंबईत कोकणातील चाकरमानी देणगीदारांकडे ते जायचे. दरवर्षी त्याच- त्याच घरांत देणगी मागण्यासाठी जाताना त्यांना संकोच वाटे, त्यामुळे नवभारत छात्रालयाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे एकमेव ध्येय ते उराशी बाळगून होते. 

स्वावलंबनाचे पहिले धडे

नवभारत छात्रालयाला सव्वासात एकर जमीन मिळाली होती. विद्यार्थी तेथे रोज दीड- दोन तास श्रमदान करायचे, भात- भाजीपाला पिकवायचे. भात स्वतःसाठी ठेवायचे. शाळेतून छात्रालयात आणि छात्रालयातून शाळेत एवढ्याच जगात वावरणाऱ्या विद्यार्थ्यांना भाजी विकायला जाणे म्हणजे मौजमजाच वाटायची. दापोलीतील हा "नवभारत' पॅटर्न लोकांच्या कौतुकाचा विषय ठरत होता. या "विद्यार्थी' शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करण्यास ग्राहकही खूष असायचे; पण पाण्याच्या मर्यादेमुळे भाजीपाला जास्त पिकवणे शक्‍य होत नव्हते. यावर नवभारत परिवार उपाय शोधण्याचा प्रयत्न करत होता. 

विहिरीने पालटले चित्र

1984 नंतरच्या काळात रोजगार हमी योजनेअंतर्गत फलोद्यान लागवडीला वेगाने चालना मिळाल्याने रोपवाटिकांचा व्यवसाय तेजीत आला. निवृत्तीनंतरच्या ग्रॅच्युईटीच्या रकमेतून शिंदे गुरुजींनी 1984 मध्ये नवभारतसाठी नवीन मोठी विहीर बांधून घेतली. बारमाही पाणी उपलब्ध झाल्याने छात्रालयात कृषी केंद्र नावाने 1989 मध्ये रोपवाटिका सुरू झाली, त्यासाठी दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञांचे सहकार्य मिळाले. विद्यार्थी आंबा- काजूची कलमे बांधणे, पिशव्या भरणे ही कामे मोठ्या उत्साहाने करू लागले. नवीन व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्याची संधी त्यांना मिळत होती. कलमकाड्यांसाठी आंबा, काजू, चिकूचे मातृवृक्ष लावण्यात आले. भाजीपाला, फुलांची लागवड वाढू लागली. रोपवाटिकेतून उत्पन्न मिळू लागले, तसे जेवणाच्या मोजक्‍या मेनूमधील पदार्थ वाढू लागले. काही महिन्यांनी भरपेट नाश्‍ताही मिळू लागला. खोल्यांमध्ये अभ्यासाची टेबले, कपाटे येऊ लागली. हा बदल विद्यार्थ्यांना सुखावणारा होता. आपले दीड- दोन तासांचे श्रमदान आपल्याच फायद्याचे होत असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत होते. संगणकासारखी आधुनिक सामग्री, नियतकालिके, खेळांची- करमणुकीची साधने याच उत्पन्नातून मिळू लागली.
रोपवाटिकेचा व्यवसाय एवढा वाढू लागला, की त्या उत्पन्नातून 1995 मध्ये कोळबांद्रे येथे साडेबारा एकर जमीन "नवभारत'ने विकत घेतली. तेथे नारळ, आंबा, काजू, चिकू, लिंबू, आवळा, कोकम, पेरू, फणस, सीताफळ, जांब, चिंच, रामफळ, पपनस, सोनचाफा, जांभूळ, जायफळ, दालचिनी, करवंद आदी मातृवृक्षांची लागवड करण्यात आली.

भाजीपाल्याचीही नर्सरी

रोपवाटिका सुरू असतानाच भाजीपाला उत्पादनही नवभारतचे विद्यार्थी वाढवू लागले. कोकण कृषी विद्यापीठाकडून आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन मिळत राहिल्याने "नवभारत'चा भाजीपाला दापोलीत लोकप्रिय ठरू लागला. आसपासचे होतकरू शेतकरीही त्यांची भाजीपाला शेती पाहायला येत. अनेक जण त्यांच्याकडे रोपांची मागणी करू लागले, तेव्हा नवभारतने जास्तीची रोपे वाढवायची आणि विकून शिल्लक राहतील ती रोपे आपल्याकडे लावायची, असा उपक्रम सुरू केला. त्याची ख्याती एवढी झाली की अखेरीस भाजीपाला रोपवाटिकाच सुरू करावी लागली. सध्या दापोलीसह खेड, मंडणगड, चिपळूण येथील शेतकरीही भाजीपाला रोपे नेण्यासाठी नवभारतमध्ये येतात. दरवर्षी 70 ते 80 हजार रुपयांची रोपांची विक्री होते. कै. शिंदे गुरुजी यांच्यापश्‍चात त्यांचे चिरंजीव प्रभाकर शिंदे आता संस्थेच्या दैनंदिन कामकाजातील प्रमुख मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांना संस्थेचे पदाधिकारी हरिश्‍चंद्र कोकमकर यांची साथ आहे. 

विश्‍वासार्ह ग्राहकसेवा

नवभारत संस्थेत कर्मचारी भरतीमध्येही कलमे बांधू शकणाऱ्याला प्राधान्य असते. छात्रालयातील विद्यार्थ्यांना त्याचे योग्य मार्गदर्शन मिळते. मातृवृक्षांची जोपासना, पेरू- रामफळासारख्या रोपांचे मृदकाष्ठ कलम, नारळाचे गुटी कलम, प्रमाणित पॉलिशेडची उभारणी ही कामे विद्यार्थी करतात. भाजीपाला रोपवाटिकेत सुधारित तसेच संकरित बियाण्यांची रोपेही विकली जातात. बियाण्यांची प्रक्षेत्रावर चाचणी घेतली जाते, त्यामुळे विश्‍वासार्हता टिकवण्यात छात्रालय यशस्वी झाले आहे. 

रस्त्यालगत विक्री केंद्र

फळे- भाजीपाला विक्रीसाठी विद्यार्थ्यांना ग्राहकांपर्यंत जावे लागे. आता रस्त्यालगत विक्री केंद्र उभारून नवभारतने ही अडचण दूर केली आहे. सध्या काजू, कोकम फळे, आंबा आदींवर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थ तसेच विविध प्रकारचे पापडही तयार करण्यात येतात, त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचा परवाना घेतला आहे. केंद्रातील विक्रीतून दरवर्षी सुमारे एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. छोट्या उद्योजकांचे हे विक्री केंद्र दापोलीकरांप्रमाणेच पर्यटकांतही लोकप्रिय ठरले आहे.

विद्यार्थ्यांची "लोकशाही"

छात्रालयाच्या कामांचे वेळापत्रक विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ ठरवते. सध्या मनुष्यबळ तुटवड्याच्या दिवसांत अनेक रोपवाटिका डबघाईला आल्या आहेत. या परिस्थितीत नवभारतमधील विद्यार्थ्यांचे दीड- दोन तासांच्या श्रमदानाचे नियोजन म्हणजे "रोल मॉडेल'च आहे. प्रत्येक विभागाचे मंत्री त्या त्या कामांचे प्रमुख होतात. येथे कृषिमंत्रीही निवडले जातात. वर्षभरातील शेतीकामांची जबाबदारी, कामाच्या वेळेची निवड विद्यार्थ्यांच्या सोयीने ठरवली जाते. उन्हाळा व दिवाळीच्या सुट्टीत शेतीची कामे रखडू नयेत यासाठी विद्यार्थ्यांच्या पाळ्या ठरवल्या जातात. मग सुट्टीच्या काळातही मुले उत्साहाने छात्रालयात येतात. संस्थेच्या शेती उत्पन्नातील निम्मा वाटा नवभारतकडे नेहमीच्या खर्चासाठी वर्ग केला जातो. विद्यार्थ्यांनाही श्रमदानाचा मोबदला मिळतो. 

आर्थिक स्वावलंबनाचे उद्दिष्ट

दरवर्षी अनुदानाव्यतिरिक्त छात्रालयाचा 20 टक्के खर्च जास्त होतो, ती रक्कम शेती उत्पन्नातूनच उभी केली जाते. भविष्यकालीन आर्थिक उपाययोजनांसाठीही तयारी ठेवली आहे. 

प्रक्रिया उद्योगाच्या दिशेने

भविष्यकाळात शेतीला प्रक्रिया उद्योगच आधार देऊ शकेल, या जाणिवेतून 2010 मध्ये बाळासाहेब खेर कृषी उद्योग व प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली. केंद्रात प्रक्रिया करण्याबरोबरच परिसरातील महिलांना प्रक्रिया उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. सरस्वती बाळ गंगाधर खेर फाउंडेशनतर्फे त्यासाठी नवभारतला 45 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

अर्थशास्त्र

सध्या संस्थेला शेती उत्पादनातून मिळणारे उत्पन्न 16 लाखांपर्यंत पोचले आहे, त्यातील निम्मा खर्च वगळला तर जवळपास आठ लाख रुपये नफा संस्थेला होतो. त्यातील निम्मी रक्कम नवभारत छात्रालयाच्या दैनंदिन गरजांसाठी वापरली जाते, तर उर्वरित रक्कम भविष्यकालीन तरतुदींसाठी बाजूला करण्यात येते. 


संपर्क - प्रभाकर पांडुरंग शिंदे - 9273947873

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate