অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ

शैक्षणिक विकास व संशोधन करणारे मंडळ. २७ जानेवारी १९६७ रोजी पुणे येथे स्थापना. शालेय विद्यार्थ्यांना रास्त दरात दर्जेदार पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरावर काम करणाऱ्या स्वायत्त संस्थेकडे पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम सोपवावे, अशा स्वरूपाची शिफारस कोठारी शिक्षण आयोगाने (१९६६) केली होती. तिला अनुसरून या मंडळाची स्थापना झाली. प्रस्तुत मंडळ ही एक सार्वजनिक विश्वस्त संस्था आहे.

मंडळाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत

(१) शालोपयोगी पाठ्यपुस्तके, शिक्षकांकरिता हस्तपुस्तके व विद्यार्थ्यांसाठी व्यवसायपुस्तके तसेच शिक्षणविषयक इतर साहित्य तयार करणे, (२) प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आणि शिक्षणाच्या इतर शाखा यांतील अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यांच्या सुधारणेसाठी तसेच पाठ्यपुस्तक निर्मिती, साहाय्यभूत शैक्षणिक साधने आणि विविध शिक्षणसाधने यांवरील साहित्याविषयी संशोधन करणे, (३) शिक्षणाच्या सर्वसाधारण दर्जामध्ये सुधारणा व्हावी या हेतूने अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करणे, त्याचा विकास करणे आणि शासनास किंवा अन्य  योग्य प्राधिकरणास त्याची शिफारस करणे, (४) सर्व शाखांमध्ये शिक्षणाची प्रगती व्हावी यासाठी उपयुक्त किंवा आवश्यक अशा पुस्तकांचे व साहित्याचे मुद्रण, विक्रय व वितरण करणे, (५) शासनास देणगीदाखल मिळालेल्या कागदपत्रांचा संग्रह व उपयोग करणे आणि त्यासंबंधीचा हिशोब ठेवणे तसेच शासनाच्या वतीने पाठ्यपुस्तके मोफत पुरविण्याविषयी योजना कार्यान्वित करणे.

मंडळाचे पुढीलप्रमाणे नऊ विभाग पाडण्यात आले आहेत

(१) विद्याविभाग, (२) सामान्य प्रशासन विभाग, (३) वितरण विभाग, (४) वित्त विभाग, (५) अंतर्गत-लेखापरिक्षण विभाग, (६) निर्मिती विभाग, (७) संशोधन विभाग, (८) ग्रंथालय विभाग, (९) किशोर विभाग.

मंडळाचे मुख्य कार्यालय पुणे येथील ‘ बालभारती ’ नामक इमारतीत असून निर्मिती विभाग वरळी (मुंबई) येथे आहे. यांशिवाय पुणे, नागपूर, मुंबई (गोरेगाव) व औरंगाबाद या चार ठिकाणी मंडळाची पाठ्यपुस्तक-भांडारे व वितरण केंद्रे आहेत. राज्यातील शैक्षणिक संस्थांनी मंडळाकडे नोंदणी करून क्रमिक पुस्तकांची मागणी केल्यास पुस्तक-विक्रेत्यांप्रमाणेच शैक्षणिक संस्थांना पुस्तकांच्या खरेदी किंमतीवर १५% वटाव दिला जातो. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये क्रमिक पुस्तकांचे वितरण सहकारी संस्थेमार्फतच केले जाते.

मंडळाच्या धोरणविषयक सर्व बाबी नियामक मंडळ आखते व या नियामक मंडळातर्फेच पाठ्यपुस्तक  मंडळाचे व्यवस्थापन चालते. राज्याचे शिक्षणमंत्री व शिक्षण संचालक हे मंडळाचे अनुक्रमे पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यक्ष आहेत. नियामक मंडळावर या दोघांसह नऊ पदसिद्ध व सहा अपदसिद्ध सदस्य असतात. अपदसिद्ध सदस्यांची नियुक्ती शासनातर्फे सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी होते. मंडळाचे व्यवस्थापन पुढील समित्यांमार्फत चालते : (१) कार्यकारी समिती, (२) वित्त समिती, (३) विद्यापरिषद, (४) संशोधनसल्लागार परिषद व (५) निर्मिती व वितरण परिषद.

मंडळाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार अधिक समित्या व उपसमित्या नियुक्त करण्याचे अधिकार नियामक मंडळास आहेत. अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी भाषा विषयांच्या एकूण सात समित्या (मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी, इंग्रजी) आहेत. इतिहास, भूगोल, गणित, शास्त्र, या भाषेतर विषयांसाठीही समित्या आहेत.

मंडळाच्या स्थापनेच्या वेळी शासनाने त्यांच्याकडील उपलब्ध पाठ्यपुस्तके (किंमत रु. ४२·८१ लक्ष ) तसेच रोख २७·६० लक्ष रु. वेळोवेळी कर्जरूपाने दिले. त्या सर्व रकमेची मंडळाने व्याजासह परतफेड केली आहे. मंडळाला दरवर्षी लागणारे खेळते भांडवल सु. ८ ते १० कोटी रु. हे बँकांकडून कर्जरूपाने पुस्तकसाठ्याच्या तारणावर वेळोवेळी मिळविले जाते व त्याची परतफेड पुस्तकविक्रीद्वारे मिळालेल्या रकमेतून केली जाते.

पाठ्यपुस्तकांची निर्मिती

मंडळ अस्तित्वात आल्यानंतर अवघ्या चार वर्षांच्या कालावधीत इयत्ता १ ते ७ पर्यंतची पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली. मंडळनिर्मित इ. १ ते ७ पर्यंतची पाठ्यपुस्तके मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, इंग्रजी आणि सिंधी (अरबी व देवनागरी लिपीत) या सात भाषांत प्रकाशित करण्यात आली.

राज्यात १९७२ मध्ये १० + २ + ३ या नव्या आकृतिबंधानुसार इयत्ता ८ ते १० च्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना झाली. पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारीत इयत्ता ८ वी इतिहास, बीजगणित व भूमिती या विषयांची पाठ्यपुस्तके मंडळाने खाजगी प्रकाशनासोबतच प्रकाशित केली. १९७३–७४ पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केलेल्या इयत्ता ८ ते १२ ह्या पाठ्यपुस्तकांची छपाई व वितरण याचे काम मंडळाने स्वीकारले. अशा प्रकारे आतापर्यंत मंडळाने इयत्ता १ ते ७ पर्यंतची एकूण ३९५ पाठ्यपुस्तके तयार केली आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता ८ ते १२ पर्यंतच्या एकूण ३३१ पाठ्यपुस्तकांची निर्मिती व वितरण यांचे कामही मंडळ प्रतिवर्षी करत आहे. इयत्ता १ ते ७ च्या भाषा व गणित या विषयांच्या नव्या मालेचे काम मंडळाने पूर्वीच क्रमश : हाती घेतले असून गणिताच्या मालेतील अखेरचे म्हणजेच इयत्ता ७ वीचे गणिताचे पाठ्यपुस्तक १९८४–८५ या वर्षी प्रकाशित झाले आहे.

पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीबरोबरच मंडळाने इयत्ता १ ते ७ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्फूर्तिगीतांचे एक पुस्तक तयार करून ते प्रसिद्ध केले. पाठ्यपुस्तकांतील काही निवडक कविता तसेच स्फूर्तिगीतांतील काही गीते निवडून मंडळाने १८ गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या आहेत. त्यांचे संगीत दिग्दर्शन वसंत देसाई यांनी केले तसेच बालभारती गीतमंजुषा प्रसिद्ध करून या गीतांची स्वरलिपीही उपलब्ध करून दिली.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate