অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विकासाची (राज)वाडी

विकासाची (राज)वाडी

रत्नागिरी जिल्ह्यात हिरव्यागार झाडींमध्ये वसलेले राजवाडी गाव. मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या या गावाचे नाव विविध उपक्रमांच्या वृत्तामुळे वृत्तपत्रात वाचलेले होते. गावातल्या प्रसिद्ध गरम पाण्याच्या झऱ्याची माहिती घेण्यासाठी एक-दोनदा येणे झाले होते. मात्र जिल्हाधिकारी यांच्या समवेत गावातील उपक्रमांची माहिती घेण्यासाठी इथे भेट दिल्यावर शिर्षकातलं नाव सूचलं.
स्थानिक परिस्थितीला अनुरूप आणि परस्पर सहकार्यावर आधारित उपक्रम राबवून विकासवाटेवर पुढे कसे जाता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे गाव. गावचे सरपंच आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हे दोन्ही तरुण आणि उत्साही. त्यांना पुण्याच्या लोकसक्षमीकरण चळवळीची जोड मिळाल्याने गावात नवनवीन प्रयोग सुरू झाले.
गावात प्लास्टिकवर पूर्णत: बंदी आहे. पेम संस्थेने गावातील महिलांना बिनव्याजी कर्ज देऊन मशीन खरेदी करून दिले. भेट रूपात वृत्तपत्रांची रद्दी एकत्र करून महिलांना कागदी पिशव्या बनविण्याचे तंत्र शिकविण्यात आले आहे. आतापर्यंत 25 हजारपेक्षा जास्त पिशव्यांची निर्मिती महिलांनी केली आहे. 200 रुपये शेकडा दराने पिशव्या विकल्या जातात. प्लास्टिकबंदीमुळे गावात फेरी मारताना कुठेच कचरा दिसला नाही. तरीही प्रमुख कोपऱ्यांवर कचराकुंडीची सोय करून ठेवली आहे.
गावातील ब्राह्मणवाडीने लोकसहभागातून पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबविली आहे. वाडीत 50 घरे आहेत. प्रत्येकाकडून 500 रुपये घेण्यात आले. श्रमदानाने विहीर खोदण्यात आली. विहिरीला पाणी राहावे म्हणून गावाच्या बाजूने जाणाऱ्या नदीवर मनरेगा अंतर्गत वनराई बंधार उभारून पाणी अडविण्यात आले आहे. श्रमदानाला येऊ न शकणाऱ्यांकडून दरदिवशी 100 रुपयेप्रमाणे वर्गणी घेण्यात आली. असे एकूण 45 हजार रुपये गोळा झाले. सर्व रक्कम बँकेत ठेवण्यात आली आहे. शिवाय प्रत्येक घरातून महिन्याला 40 रुपये महिना वर्गणी घेऊन त्यावर वीजबील आणि एक सेवकाचा खर्च भागविला जातो. नळपोस्टच्या माध्यमातून दररोज एक तास पाणी पुरवठा करण्यात येतो.
महिला सक्षमीकरणासाठी आणखी प्रयत्न करताना महिलांना गोधडी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. गावातील गोधडी 'राजवाडी गोधडी' म्हणून प्रसिद्ध आहे. बचतगटाच्या महिलांनी तयार केलेली ही गोधडी पुणे, मुंबई येथेदेखील विकली जाते. गावात फेरी मारताना छतावर सौर उर्जेचे लहान पॅनल दिसतात. या पॅनलचा प्रायोगिक तत्त्वावर उपयोग करून प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. याच प्रकल्पाचा विस्तार करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
गावातील प्राचीन मंदिर आणि गरम पाण्याच्या झऱ्याकडे जाणाऱ्या वाटेवर पाखाडी तयार करण्यात आली आहे. निसर्गवाचन प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील जिल्हा परिषद शाळेत पर्यावरणावर आधारित लघुपट दाखवून विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. विकासाचे लहान प्रयोग नागरिकांत कसा आत्मविश्वास निर्माण करतात याचा प्रत्यय नागरिकांशी बोलताना येतो. पक्ष्यांचे विविध आवाज आणि नदीतून वाहणारे खळाळणारे पाणी माणसाचं निसर्गाशी असणारं नातं सांगतात. छत्रपती शिवाजी महाराज या भूमीत वावरल्याचे सांगताना या भूमीचे पावित्र्य जपण्याची धडपडही इथे दिसते. एवढं सगळं ऐश्वर्य असूनही नवं शिकण्याची तयारी आणि काही विशेष केल्याचा अविर्भावही नाही, हे विशेष. ग्रामविकासाची योग्य प्रतिमा यापेक्षा वेगळी कशी असू शकेल?

लेखक -डॉ. किरण मोघे

 

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate